Home साहित्य पुस्‍तक परिचय प्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी – विहीर

प्रत्ययकारी ग्रामीण कादंबरी – विहीर

राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी ‘विहीर’ ही कादंबरी लिहिली आहे. ते येलूरसारख्या ग्रामीण भागात राहतात. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते पेठ नाका येथील बॉम्बे रेयॉन कंपनीत ‘विव्हर’ म्हणून काम करतात. कादंबरी आहे छोटेखानी, परंतु तिचा सामाजिक आशय मोठा आहे.

गाई-म्हशी, शेळ्या-मेंढ्यांचा कळप घेऊन, घोडा-गाढवांवर संसार बांधून डोंगररांगांमधून फिरणार्‍या एका कुटुंबाला जेव्हा कडक उन्हाळ्यात एका माळरानामध्ये तीव्र तहान लागते, तेव्हा सगळे कुटुंबीय पाण्याच्या शोधार्थ धावपळ करू लागतात. ते हतबल होऊन असहाय्य अवस्थेत असतात, त्याच वेळी ‘संभा’ नावाच्या मुलाला ‘पाण्याचा झरा’ दिसतो! त्याची गाय तेथे पाणी पीत असते. तो पाण्याचा ‘उमाळा’ सर्वांची तहान भागवतो आणि पुढे, त्याच ‘उमाळ्या’चे डबके व डबक्यातून ‘साधी विहीर’ व पुढे नक्षीदार दगडी बांधकाम केलेली ‘विहीर’… हे बदल कसे होत जातात त्याचे वर्णन लेखक राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी केलेले आहे. ते प्रत्ययकारी उतरले आहे.

‘विहीर’ ही कादंबरी वाचकाच्या मनाचा ठाव घेते. त्यातील निसर्गसौंदर्याचे वर्णन तर एकदम जिवंत झालेले आहे. कादंबरी ग्रामीण बोलीभाषेत लिहिली आहे, मात्र ती गावंढळ वाटत नाही, भरकटत जात नाही, कथानक भराभर पुढे सरकते. विहिरीसाठी संभाचे बलिदान, गाव पाटलांची धडपड, मोठी शिळा बाहेर काढण्यासाठी भीमा वडाराची यारी आणणे, यारी ओढण्यासाठी दादांची – लाडक्या व राजा या बैलांची धडपड, शिळा वर आल्यावर त्याच शिळेखाली दबून भीमा वडार याचा मृत्यू… अशा अनेक घटना मनाला चटका लावून जातात. विहीर तयार झाली. तेथे काळुबाईचे मंदिरही बांधले गेले. गावाला पाणी भरपूर मिळू लागले. तसेच, विहिरीवर पोहण्यासाठी मुलांची झुंबड उडू लागली.

छकू, धन्या, पाटील यांचा आनंदा यांचे प्रेमप्रकरण कादंबरीच्या आशयाला सुखद हलकेपणा देऊन जाते. विहिरीच्या पाण्यामुळे संभावाडी या गावाची भरभराट झाली. जमीनदार, सावकार आणि पाटील यांनी राजकारण करून धनदौलत कमावली. कुंपण शेत गिळू लागल्यावर दाद कोणाकडे मागावी अशी अवस्था गावाची होते. संभावाडी या गावाचे नामकरण संभापूर असे होते. माजलेल्या जमीनदार, सावकार आणि पाटील यांची मस्ती बाळकोबा दरोडेखोर कशी उतरवतो व बाळकोबा दरोडेखोराने लुटलेल्या सोन्याचे काय होते? बाळकोबाला कोण व कसा धडा शिकवतो? या सर्व प्रश्नांची उत्तरे ‘विहीर’ कादंबरीमध्ये लेखक राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांनी दिलेली आहेत.

_Vihir_2.jpgराजेंद्र जगन्नाथ ठोंबरे यांची ‘विहीर’ ही पहिलीच कादंबरी. ती इतकी छान झाली आहे, की ती जिज्ञासू साहित्य रसिकांची ‘तहान’ नक्की भागवेल. ‘विहीर’ कादंबरी सामाजिक-सांस्कृतिक चढउतार, काळानुसार बदलणारे मानवी स्वभावविशेष, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, प्रदूषण, निसर्गसौंदर्य या सर्व गोष्टींवर सकारात्मक दृष्टिक्षेप टाकते.

राजेंद्र एकतीस वर्षांचा असून, तो आई-वडील व धाकटा भाऊ यांच्या समवेत राहतो. त्याला सिनेमाची फार आवड. तो गेली दहा वर्षे हॉलिवूडचे सिनेमे डाऊनलोड करून पाहत असतो. त्यातून त्याला आपण चित्रपट बनवावा अशी उर्मी त्याच्या मनात निर्माण झाली. त्याने तशा ओळखीही जोडल्या, परंतु ते काही जमेना. दरम्यान, जे काही मनात येईल ते तो कागदावर उतरवत असे. त्याची बघता बघता कादंबरी झाली. त्याचे त्यालाही आश्चर्य वाटले. लेखन तयार झाले तेव्हा तो प्रकाशक शोधू लागला. तो म्हणाला, की सगळे प्रकाशक लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक प्रसिद्ध करण्यास तयार होते. राजेंद्रजवळ तर पैशांचा खडखडाट. अखेरीस कवितासागर अकादमीचे सुनीलदादा पाटील यांनी कादंबरी हौसेने प्रकाशित केली.

विहीर
लेखक – राजेंद्र जगन्नाथ ठोंबरे 9172672005 rajendrathombare9637@gmail.com
प्रकाशन – कविता सागर पब्लिकेशन (संचालक -सुनीलदादा पाटील, 02322 – 225500, 09975873569, जयसिंगपूर)
पृष्ठ संख्या – 112
किंमत – 180 ₹

– कुमार रामगोंडा पाटील
सचिव – साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था, शिरढोण

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version