केशवसुत ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी, जाळूनी किंवा पुरुनी टाका’ असे फार वर्षांपूर्वी म्हणून गेले. पण मुळात जुने म्हणजे काय? आणि नवे म्हणजे काय? संदिग्धच असते, कारण माणसा माणसागणिक माहिती असण्याची पातळी आणि क्षेत्र बदलत असते. तरीही आज माहीत असलेले त्याच्या वाढत्या वयाबरोबर जुने होत असते आणि आज नवे म्हणून स्वीकारलेले काही काळाने ‘जुन्या’त गणले जाते! हे सगळे मला प्रकर्षाने प्रथम जाणवले ते ‘अशी पुस्तके होती’ हे माझे विस्मृतीत गेलेल्या पुस्तकांबद्दलचे पुस्तक प्रकाशित झाले तेव्हा. परिचितांकडून विचारणा होई, ‘आता त्या जुन्या पुस्तकांचे महत्त्व काय?’ तरीही मी जुन्या पुस्तकांचा शोध घेणे चालूच ठेवले. माझ्या त्या निर्धाराला पाठिंबा मिळाला डॉक्टर आनंद जोशी यांच्या ‘तो अक्षर पाविजे निर्धारे’ या लेखाने. तो लेख सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘आशय’ वार्षिकात प्रसिद्ध झाला होता. जोशी यांनी वाचता कसे येते आणि संवेदना व स्मृती जागृत असल्या तर एका वाचनातून कसे विविधांगांनी विचारविश्व समृद्ध होते ते छान मांडले आहे. त्या लेखात आनंदाचे जे विविध कल्लोळ सांगितले आहेत त्यांतील काही माझ्याही वाट्याला येऊ शकले व येतात, ते मी ‘इंटरनेट’वर मुख्यत: जुनी पुस्तके शोधून वाचत असतो तेव्हा. मी वाचतो ती पुस्तके 1960-62 पासून 1930-35 पर्यंतची असतात.
मी ‘प्रवासवर्णनांचा प्रवास’ या पुस्तकासाठी शोध घेत असताना एक कळून चुकले, की गोडसे भटजींचे ‘माझा प्रवास’ हे पुस्तक मराठीतील पहिले प्रवास लेखन नव्हे. त्यामुळे कुतूहल निर्माण झाले, की हिंदुस्तानातील पहिले प्रवास लेखन कोठले असावे? इंटरनेटवर शोध घेताना गोंधळलेली माहिती मिळाली. म्हणजे हिंदुस्तानी माणसाने इंग्रजीत लिहिलेले पहिले पुस्तक ‘साके दीन महोमत’ या बिहारी मुस्लिम तरुणाचे आहे. ते पुस्तक प्रवासाच्या हकिगती सांगणाऱ्या पत्रांच्या रूपात आहे. त्यामुळे ते हिंदुस्तानातील पहिले प्रवास लेखन म्हटले जाते. पण त्यात काही तांत्रिक मुद्दे उपस्थित केले जातातच. म्हणजे असे, की ते पुस्तक जरी प्रवासाच्या हकिगती सांगते तरी ते तेवढेच सांगत नाही. त्यात लेखकाचा आत्मचरित्रात्मक भाग, थोडा इतिहास, थोडी सामाजिक परिस्थिती असे अन्य बरेच काही येते. शिवाय, ते पुस्तक हिंदुस्तानात प्रकाशित झालेले नाही. ते प्रसिद्ध झाले आयर्लंडमध्ये, 1794 साली.
मला तो शोध लागला एका जुन्या पुस्तकामुळे. ते पुस्तक होते ‘मधुमक्षिका’ (सातवी आवृत्ती, 1915). ते पुस्तक आहे मोहनलाल या दिल्लीत राहणाऱ्या काश्मिरी तरुणाचे. Travels in Punjab, Afghanistan and Turkistan, to Balk, Bokhara and Herat, A visit to Great Britain and Germany. ते 1834 साली प्रकाशित झाले. ते भारतीय (हिंदुस्तानी) माणसाने इंग्रजी भाषेत लिहिलेले पहिले पुस्तक म्हणतात. मला उपलब्ध झालेली आवृत्ती 1846 सालची आहे. त्यात प्रस्तावना 1834 सालच्या पहिल्या आवृत्तीची आहे. ती कोलकाता येथे लिहिली गेली होती असे दिसते. त्यातून पुढील प्रश्न उपस्थित झाला, की ते लेखन होते इंग्रजीत. जेव्हा ते प्रकाशित झाले तेव्हा सुशिक्षितांचा – इंग्रजी शिक्षितांचा – नवा वर्ग हिंदुस्तानात तयार होत होता. पण त्यापूर्वी प्रादेशिक भाषेत लेखन होतच होते की, मग प्रादेशिक भाषेत लिहिले गेलेले प्रवास लेखन (प्रथम) कोणते असावे? माहितीजालावर असे समजले, की पहिलेपणाचा तो मान जातो पी थॉमस काथनकर या मल्याळी धर्मोपदेशकाने लिहिलेल्या ‘पारूर ते रोम’ या प्रवासाच्या वर्णनात्मक ‘Varthaman Pusthakam’ या पुस्तकाकडे, त्यातही एक गंमत आहे! ते पुस्तक लिहिले गेले 1785 साली, परंतु प्रकाशित झाले 1935 साली. ते हस्तलिखित म्हणे दीडशे वर्षें गहाळ होते!
बंकिमचंद्र चटर्जी या बंगालीतील प्रसिद्ध व लोकप्रिय लेखकाचे वाङ्मय क्षेत्रातील पहिले पाऊल इंग्रजी लेखनाद्वारे पडले होते हे वाचून नवल वाटेल. त्यांची कादंबरी ‘Rajmohan’s Wife’ ही 1864 मध्ये ‘द इंडियन फिल्ड’ या साप्ताहिकातून क्रमशः प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी त्या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद बंगालीत केला. परंतु तो सात प्रकरणांच्या पुढे गेला नाही. इंग्रजी भाषेतील लेखन – कादंबरी पुस्तक रूपाने छापण्याचा प्रसंग आला तेव्हा पहिली तीन प्रकरणे असलेले अंक उपलब्ध होईनात. अखेर, ती कादंबरी अर्धवट टाकलेल्या बंगाली अनुवादातील पहिल्या तीन प्रकरणांचा अनुवाद पुन्हा इंग्रजीत करून घेऊन इंग्रजी भाषेत प्रकाशित करण्यात आली. ते लिखाण इंग्रजी -प्रादेशिक – इंग्रजी असा प्रवास झालेले पहिले व कदाचित एकमेव असावे.
मेयोबाईंनी ब्रिटिश हिंदुस्तानात येण्यापूर्वी भारतात शिक्षणाला महत्त्व नव्हते; तेथे कोणत्याही प्रकारची शिक्षणपद्धत व प्रशासनिक व्यवस्था अस्तित्वात नव्हती आणि ब्राह्मण वर्गाने ब्राह्मणेतरांना सर्व प्रकारच्या शिक्षणापासून वंचित ठेवले – पद्धतशीरपणे, अशी सर्व प्रकारची खोटी विधाने केली होती. त्यांचा समाचार घेताना लालाजी दाखवतात, की ब्रिटिशांनी पूर्वापार चालू असलेली शिक्षणव्यवस्था अत्यंत शिताफीने मोडीत काढली; स्थानिक भाषांच्याऐवजी इंग्रजी भाषेची स्थापना करण्याचे धोरण स्वीकारले; एतद्देशीयांकडे काहीच वाङ्मयीन कर्तृत्व नाही असे जनतेच्या मनात रुजवण्याचा वसा घेतला.
भारतीय महत्त्वाची लेखने (दस्तावेज) गहाळ होण्याचे हे एक कारण असू शकते का?
जुन्यातून नवे मिळते ते असे. लाला लजपत राय यांनी आणखी दोन पुस्तके लिहिली आहेत. ‘स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन (1908) व ‘द प्रॉब्लेम ऑफ नॅशनल एज्युकेशन’ (1920). त्यांनी, त्यांना तडकाफडकी पकडून रावळपिंडीहून अंदमानला नेले होते, त्याची हकिकत पहिल्या पुस्तकात सांगितली आहे. हिंदुस्तानातील शिक्षणव्यवस्थेचे विवेचन दुसऱ्यात आहे. ‘स्टोरी’मधील त्यांचा सूर काहीसा संयमी आहे. ते जहाल पक्षाचे समजले जातात. परंतु महात्मा गांधींचे योग्य ते मूल्यमापन करणारा त्यांचा लेख ‘पुण्यश्लोक’ या मराठी संग्रहात मिळतोच. असेच काही साक्षात्कार 1939 सालची ‘त्यागपत्र’ ही मराठीतील अनुवादित कादंबरी (मूळ हिंदी कादंबरीचे लेखक जैनेन्द्र कुमार – प्रकाशन 1937) व ‘ब्राह्मणकन्या’ (डॉक्टर केतकर प्रकाशन 1930) वाचताना होतो.
– मुकुंद वझे, vazemukund@yahoo.com