Home मराठी भाषा विस्मरणात गेलेली पुस्तके विज्ञान दृष्टी, स्त्रीवाद आणि रोकिया खातून (Rokiya Khatoon’s 1905 story speaks about...

विज्ञान दृष्टी, स्त्रीवाद आणि रोकिया खातून (Rokiya Khatoon’s 1905 story speaks about scientific temper and women’s equal rights)

0

एकशेसोळा वर्षांपूर्वी चौदा-पंधरा पानांची एक विज्ञानकथा लिहिली गेली हे समजले तर आश्चर्य वाटेल ना? – त्यावेळी ती काल्पनिक कथा मानली गेली असेल. आणखी आश्चर्य म्हणजे त्यातून स्त्रीवाद देखील प्रकट होतो ! त्या कथेचा अनेक विषयाच्या अभ्यासकांनी त्यांच्या लेखनांत त्यानंतर कित्येक दशके उल्लेख केला आहे.

त्या कथेचे शीर्षक आहे ‘सुलतानाचे स्वप्न’. ती मूळ इंग्रजीत लिहिलेली आहे (इंग्रजीतील शीर्षक Sultana’s Dream). ती लिहिली आहे सध्याच्या बांगला देशाच्या रंगपूर जिल्ह्यातील पैराबाद गावातील मुस्लिम जहागीरदार झहिरउद्दीन मुहम्मद अबू अली हैदर साबेर याच्या मुलीने; तिचे नाव रोकिया खातून. ते तिच्या वडिलांनी ठेवलेले नाव होते. तिचा जन्म 9 डिसेंबर 1880 रोजीचा. तिच्या वडिलांना अरेबिक, उर्दू , पर्शियन, बंगाली, हिंदी आणि इंग्रजी अशा सहा भाषा येत होत्या. सखेद आश्चर्याची बाब म्हणजे, ते मुलींना बंगाली आणि इंग्रजी शिकवण्याच्या विरूद्ध होते. उलट, रोकिया आणि तिची मोठी बहीण करिमुन्नीसा यांना त्यांचा मोठा भाऊ इब्राहिम साबेर याने बंगाली आणि इंग्रजी शिकण्यास प्रोत्साहन दिले. मोठी बहीण पुढे कवयित्री झाली.

रोकियाचे लग्न तिच्या अठराव्या वर्षी तिच्याहून वीस वर्षे मोठ्या असलेल्या पुरुषाशी झाले. तो उर्दू भाषिक होता आणि बिहारमधील भागलपूर येथे डेप्युटी मॅजिस्ट्रेट होता. सुखद आश्चर्याची वेळ लग्नानंतर आली. रोकियाला नवऱ्याने शिकण्यास आणि लिहिण्यास उत्तेजन दिले. त्याची आनंददायक परिणती म्हणजे ‘सुलतानाचे स्वप्न’ होय ! आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते लिखाण मुळात इंग्रजीत झाले होते. रोकियाने बंगाली भाषेत पुढे कथा, कादंबरी, निबंध असे बरेच लेखन केले. तिच्या एका कादंबरीचे – पद्मराग – इंग्रजीत भाषांतर झाले. ‘सुलतानाचे स्वप्न’ आणि ‘पद्मराग’ या दोन गोष्टी पेंग्विन बुक्समध्ये एकत्रित 2005 साली प्रकाशित झालेल्या आहेत.

रोकिया लेखिका म्हणूच जगली नाही तर स्त्रीवादी स्त्री म्हणून जगली. तिचे लेखन आणि शिक्षण यांना उत्तेजन देणारा तिचा पती लग्नानंतर अकराव्या वर्षी,1909 साली निधन पावला. रोकिया ही त्यावेळी एकोणतीस वर्षांची होती. तिने मुलींसाठी शाळा भागलपूर येथे पतीच्या मृत्यूनंतर पाच महिन्यांनी काढली. सासरच्या मंडळींशी मतभेद झाले – बहुदा पैशांवरून – त्यामुळे तिने शाळा कोलकाता येथे हलवली (1911). त्यानंतर ती तिच्या मृत्यूपर्यंत शाळेची प्रमुख होती. तिने Anjuman -e- Khawateen -e-Islam ही मुस्लिम महिलांची वादविवाद सभा शाळेबरोबरच स्थापन केली. रोकिया कोलकाता येथे भरलेल्या महिला शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी 1926 साली होती. तिच्या कार्याच्या गौरवाचा दिवस म्हणून 9 डिसेंबर हा दिवस बांगला देशमध्ये पाळला जातो.

रोकिया ज्या लेखनामुळे सर्वात प्रसिद्धीस आली ते म्हणजे तिची ‘सुलतानाचे स्वप्न’ ही कथा. कथेत कल्पना अशी केली आहे, की लेखिकेला ती एकदा आरामखुर्चीत बसलेली असताना, डुलकी येते व ती झोपते. त्या झोपेत असताना तिला स्वप्न पडते. त्या स्वप्नात तिला तिची मैत्रीण- सारा आली आहे असा भास होतो. सारा तिला बोलावते आणि लेखिका तिच्याबरोबर जाते. परंतु अल्पावधीत, ती स्त्री तिची मैत्रीण सारा नसल्याचे कळून लेखिकेला तिची चूक समजते. मात्र स्वप्नात आलेल्या स्त्रीला ती सारा असेच संबोधते. ती जेथे जाते ते विश्व अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि शुद्ध हवा असलेले असते. लेखिकेला भीती वाटत असते, की ती अशी रस्त्यात फिरत असलेली पाहून लोक तिची थट्टा करतील. पण ते लोक म्हणजे पुरुष नसतात. त्या स्त्रियाच असतात आणि त्या लेखिकेला हसत असतात, कारण त्यांना ती ‘पुरुषी’ – म्हणजे भिडस्त आणि लाजाळू – अशी वाटत असते. त्याचे कारण त्या प्रदेशात सर्व पुरुष माजघरात आणि स्वैपाकघरात काम करत असतात आणि रस्त्यांवर फक्त स्त्रिया वावरत असतात. ते ‘स्त्रियांचे राज्य’ असते. सारा तिला साऱ्या गोष्टींचा खुलासा करते.

त्या राज्याच्या गादीवर एक महिला होती आणि तिला शिक्षणाची व त्यातही विज्ञानाची विलक्षण आवड होती. तिने फर्मान काढले होते, की प्रत्येक मुलीने शाळेत हे गेलेच पाहिजे ! आणि कोणत्याही मुलीचे लग्न एकवीस वर्षे पूर्ण होण्याआधी केले जाता कामा नये. तिने दोन विद्यापीठे – फक्त मुलींसाठी – काढली होती. त्या विद्यापीठांच्या कुलगुरूपदी दोन बुद्धिमान अशा महिला होत्या. त्या दोघींमध्ये चुरस आणि काही प्रमाणात असूया होती. एका विद्यापीठातील मुलींनी संशोधन करून सूर्याची उष्णता जमिनीवर येण्यापूर्वी गोळा करून तिच्याद्वारे घरातील विजेची सोय केली होती! औष्णिक विजेमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण नव्हते. ते संशोधन मत्सरातून झाले होते, कारण पहिल्या विद्यापीठाने ढगांच्याही वर जाऊन पावसाचे पाणी गोळा करून ते साठवणुकीच्या फुग्यांतून शेतांत परस्पर पुरवले जाण्याची पद्धत विकसित केली होती. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचा अभाव कधीच जाणवत नव्हता. पाणी परस्पर शेतीला पुरवले जात होते. त्यामुळे कोठेही पूर नव्हते, पाण्याचा राडा आणि चिखल होत नसत. सूर्याचा ताप जेव्हा खूप वाढत असे तेव्हा कृत्रिम कारंजातून जमिनीवर पाण्याच्या थेंबांचा शिडकावा केला जात असे. त्या राज्याची राणी वनस्पतिशास्त्राची पुरस्कर्ती होती आणि तिचे ध्येय होते, की साऱ्या राज्याचे रूपांतर एका उद्यानात करावे !

राज्यात सर्वत्र शांतता होती. त्याचे कारण शांतताभंगाचे जनक जे पुरुष ते माजघरात आणि स्वयंपाकघरात काम करत होते. त्यांना अन्य कोठेही प्रवेश नव्हता.

पुरुष माजघरात का राहू लागले किंवा त्यांना माजघरात कोंडून घेण्याची पाळी का आली? तर काही वर्षांपूर्वी, राज्यावर शेजारच्या राजाने हल्ला केला. त्याचे कारण असे होते, की शेजारच्या राज्यातील दोन माणसांनी राणीच्या राज्यात आसरा घेतला होता – त्यांनी काही अपराध केला होता आणि ते राणीच्या राज्यात आश्रयाला आले होते. राणीने त्या दोन माणसांना त्यांच्या राजाच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. म्हणून शेजारच्या राजाने हल्ला केला. राणीच्या सैनिकांनी राज्य वाचवण्याचे प्रयत्न अटीतटीने केले. अगदी सोळा वर्षांची मुलेदेखील सैन्यांत भरती झाली. परंतु शत्रू अगदी जवळ- पंचवीस मैलांवर आला. सूर्याची उष्णता संग्रहित करून तिचा वापर करण्याची पद्धत शोधणाऱ्या महिला विद्यापीठ प्रमुख महिलेने शेवटचा उपाय करून बघण्याची तयारी दर्शवली. राणीने सर्व पुरुष योद्धयांना मागे बोलावले. थकलेले पुरुष विश्रांती घेण्यास तयार झाले. मग सर्व महिला विद्यापीठ प्रमुख महिलेच्या नेतृत्वाखाली रणभूमीवर गेल्या. सूर्याची एकत्रित केलेली उष्णता आणि प्रकाश त्यांनी शत्रूच्या सैनिकांवर फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या त्या ‘अकल्पित शस्त्रा’च्या हल्ल्याने शत्रुपक्षाचा पराभव झाला. तेव्हापासून पुरुष स्वयंपाकघर आणि माजघर येथे राहू लागले आणि त्यांचे पुरुष व्यवहार स्त्रियांच्या हाती आले.

ती विज्ञान काल्पनिका म्हणता येईल. सौर ऊर्जेचे महत्त्व त्या काळात सांगावे ही केवढी दूरदृष्टी ! त्याच बरोबर किंवा त्याहून अधिक महत्त्वाचा आहे तो कथेतील स्त्री वादाचा सूर. त्या अर्थाची अनेक विधाने त्या कथेत येतात :

  • स्त्रिया या निसर्गतः दुर्बल असतात म्हणून त्यांना गोषात आणि जनानखान्यात ठेवले पाहिजे असे म्हणणे चूक आहे. जे पुरुष अमर्याद अशा खोड्या काढू शकतात, त्यांना मोकळे सोडले जाते आणि निष्पाप महिलांना कोंडून ठेवले जाते; तुम्ही स्वतःला बंदिस्त का करून घेता? तुम्ही स्वतःप्रती असलेले कर्तव्य विसरत आहात – तुम्ही तुमच्या हिताकडे डोळेझाक केली आहे. साऱ्या गोष्टी आम्ही केल्या तर पुरुष काय करतील हा प्रश्न उद्भवतच नाही, कारण काही करण्याची क्षमताच त्यांच्यात नाही !
  • बायकांचे मेंदू पुरुषांपेक्षा अधिक वेगाने काम करतात. त्यांनी स्वयंपाकघरात फार वेळ बसता कामा नये. पुरुषांना इतका वेळ स्वयंपाकघराच्या बाहेर काढण्याची सवय उरली नाही. त्यामुळे ते अस्वस्थ झाले असतील.

विज्ञानाचे महत्त्व आणि स्त्रीवाद यांचे ते मिश्रण फार झकास झाले आहे. रोकिया बेगम हिच्या लेखनापैकी फार थोड्या भागाचा अनुवाद इंग्रजीत झाला आहे असे वाटते. ‘पद्मराग’ या कादंबरीत तिच्या आयुष्यातील तशा घटना आल्या आहेत.

‘सुलतानाचे स्वप्न’ वाचताना आठवण होते ती कृ.प्र. खाडिलकर यांच्या ‘बायकांचे बंड’ आणि गिरिजाबाई केळकर यांच्या ‘पुरुषांचे बंड’ या दोन नाटकांची. खाडिलकर यांचे नाटक 1907 सालातील आणि केळकर यांचे नाटक 1913 सालचे. त्या सर्वांचा अभ्यास स्त्रीवादी भूमिकेच्या संदर्भात करण्यासारखा आहे.

एक नवल वाटावा असा योगायोग – ‘सुलतानाचे स्वप्न’ मला प्रथम वाचण्यास मिळाली ती 9 डिसेंबर 2021 रोजी. आणि योगायोग म्हणजे 9 डिसेंबर हा लेखिकेचा जन्मदिवस व स्मृतिदिनही असतो.

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

———————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version