धर्मांतर म्हटले, की हिंदुस्तानातील वाचकांच्या मनात प्रथम नापसंतीची लहर उमटते. त्याचे कारण म्हणजे धर्मांतर हे पोर्तुगीजांनी गोव्यात घडवलेले माहीत असते किंवा (आजकाल) मुस्लिम धर्मात जबरदस्तीने झालेल्या धर्मांतराच्या गोष्टी माहीत असतात. मात्र ख्रिस्ती धर्मातून इस्लामचा स्वीकार करून मुस्लिम झालेले पुरुष आणि स्त्रियाही अनेक होत्या आणि ते सारेजण ब्रिटिशांची सत्ता सर्व जगात पसरलेली असताना, धर्मांतर करून मुस्लिम झाले होते ! तशाच एका धर्मांतरित महिलेची आणि तिच्या लेखनाची ही ओळख.
ती महिला म्हणजे 1867 साली जन्मलेली लेडी एव्हीलीन जॉन कोब्बोल्ड होय. तिला प्रदीर्घ असे आयुष्य लाभले (शहाण्णव वर्षे). तिच्या आईलाही तितकेच आयुष्य लाभले होते. लेडी एव्हीलीन हिचे वडील- चार्ल्स ऍडॉल्फस मरे हे गडगंज श्रीमंत आणि त्याचबरोबर हौशी साहसपर्यटन करणारे गृहस्थ होते. त्यांना शिकारीची आवड होती आणि ते पूर्वेकडील देशांत अनेकवार जात असत. त्यांनी त्यांचा पैसा उधळला असेही म्हणता येईल. त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी त्यांच्या राहत्या गढीचा विस्तार केला होता. गढी मुळात प्रचंड मोठी अशी होती. परंतु त्यांच्या पत्नीला तो विस्तार फारसा पसंत पडला नाही. त्यामुळे जिद्दीस पेटून एव्हीलीनच्या वडिलांनी घराच्या निर्मितीत आणखी पैसा ओतला. परिणामी, त्यांच्यावर नादारी ओढवली ! कर्ज देणाऱ्या बँकांनी पुऱ्या न झालेल्या घराचा ताबा घेतला. तेव्हा एव्हीलीनचे आईवडील अल्जेरियाला आले. त्यांना तेथील हवामान पसंत पडले, मानवले. एव्हीलीन तेथे मुस्लिम सवंगड्यांत वाढली. ती त्यांच्याबरोबर मशिदीतही जाई. ती अरेबिक शिकली.
परंतु वडील एका जागी स्थिर होणाऱ्यांतील नव्हते. ते सतत सहलींवर असत. तिच्या वडिलांनी बऱ्याच देशांत प्रवास 1858 ते 1885-91 या काळात केला. कॅनडामध्ये पाच वेळा; त्याशिवाय रशिया, तुर्कस्तान, अमेरिका, जर्मनी, उत्तर आफ्रिका, इजिप्त, सीरिया, स्वीडन, कोलेरोडो, डेन्मार्क, नॉर्वे अशा दूरदूरच्या देशांत प्रवास केला. त्यांचे ते प्रवासप्रेम एव्हीलीन हिच्यातही उतरले होते. तीही वडिलांबरोबर काही प्रवासांत असे. तिचे तिच्या वडिलांबद्दल एका ठिकाणी विधान आहे – “ते बहुदा वर्षातून एकदा घरी येत, नव्या अपत्याचे बीजारोपण करण्यास !” तिला पाच भावंडे होती, परंतु त्यांपैकी कोणाला साहसाची किंवा प्रवासाची आवड नव्हती.
एव्हीलीनच्या वडिलांनी त्यांचा एक मित्र मेजर रोश (Roche) आणि आणखी दोन इसम यांना बरोबर घेऊन 1892-93 या वर्षभरात अफगाणिस्तान, काश्मीर, तिबेट, चीन, पामीर, मध्य आशियातील रशियन मुलुख असा भलामोठा प्रवास केला. त्याचा वृत्तांत पुस्तकरूपाने प्रकाशित झाला आहे – The Pamirs – Narrative of a year’s expedition on horseback and foot through Kashmir, western Tibet, Chinese territory and Russian Central Asia. ते पुस्तक गाजले. नवरा प्रवासाला गेला, की एव्हीलीनची आई अंथरूण धरत असे. तिला काही आध्यात्मिक अनुभव येत. आईचा तो वारसा एव्हीलीनकडे आला होता.
लग्नाचे वय झाले तेव्हा, एव्हीलीनचा परिचय जॉन ड्यूपीअस कोब्बोल्ड यांच्याशी झाला. जॉन तिच्याकडे आकर्षित झाला. जॉन याचा सात पिढ्यांपासून मद्यनिर्मितीचा व्यवसाय होता. त्याच्या परिसरात त्याला प्रचंड मानसन्मान होता. एव्हीलीन आणि जॉन यांचा विवाह 1891 मध्ये झाला. जोडपे मधुचंद्राला गेले तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्यावर तांदुळाच्या दाण्यांचा वर्षाव केला. इतक्या सामाजिक प्रतिष्ठेची सवय एव्हीलीन हिला नव्हती. तिच्याबद्दल स्थानिक वृत्तपत्रात मजकूर छापून आला – “मि. कोब्बोल्ड यांची निवड अतिशय चोखंदळ आहे याची साक्ष लेडी एव्हीलीन यांना पाहिल्यावर मिळते. त्यांचे दर्शन म्हणजे एका प्रगाढ आणि मार्दवी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होय! पण त्याचबरोबर त्यांच्यामध्ये दूरस्थ असा एक भाव आहे.”
वडिलांची साहसपर्यटनाची आवड एव्हीलीनमध्ये आली होती, तितकाच तिच्या कुटुंबीयांमध्ये एक प्रकारचा अंटसंटपणा (मध्यप्रदेशातील मराठी भाषकांकडून बऱ्याचदा वापरला जाणारा शब्द. त्याचा अर्थ भन्नाट असा होतो) भरला होता. एव्हीलीनच्या आईची एक आत्या लेडी एलनबरो हिला नऊ भाषा येत होत्या. मक्का आणि मदिना येथे वेष पालटून गेलेले सर रिचर्ड बर्टन व त्यांची पत्नी यांच्याशी तिचे मैत्रीपूर्ण संबंध होते. तिने स्वतःपेक्षा वीस वर्षांनी लहान असलेल्या एका सीरियन शेखशी खूप उशिरा निका लावला होता, पण तिने इस्लामचा स्वीकार केला नाही.
एव्हीलीनचा इस्लामकडे असलेला कल एका कवितेत व्यक्त होतो असे मत Mayfair to Mecca या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे. ती कविता एव्हीलीन हिने लग्नापूर्वी दोन वर्षे म्हणजे 1889 मध्ये लिहिली होती. ही कविता लिहिली तेव्हा एव्हीलीन फक्त बावीस वर्षांची होती. एव्हीलीनचा नवरा खानदानी गडगंज श्रीमंत होता, तरी एव्हीलीनला सासरच्या कुळापेक्षा स्वतःचे कुळ श्रेष्ठ वाटत होते.
तिला पूर्वेकडील देशांबद्दल वाटणारी ओढ बऱ्याच प्रमाणात तिचे बालपण अल्जेरियात गेल्यामुळे होती. आणखी एक गोष्ट नोंदणे जरूरीचे आहे. ते म्हणजे तिच्या पूर्वजांपैकी दोन पुरुष हेनरी अँसन आणि जॉन फॉक्स स्ट्रॅन्गवेज. हे मक्केच्या प्रवासाला वेषांतर करून गेले होते. त्यांना अरबी रीतिरिवाज माहीत नव्हते. ते सीरियामध्ये मशिदीत जाण्यापूर्वी, पादत्राणे काढण्यास विसरले आणि पकडले गेले ! जमलेल्या लोकांनी त्यांना जीव जाईपर्यंत मारहाण केली. तुरुंगात टाकले. सुटका झाली तेव्हा हेनरी यांना प्लेग झाला आणि काही दिवसांनी, ते मरण पावले.
वैवाहिक जीवनात एव्हीलीनला तीन अपत्ये झाली. दुसरे अपत्य जन्मून अडीच महिने झाले नाही तोच, मुलाला नोकर-चाकरांवर सोपवून एव्हीलीन आणि तिचा नवरा मॉण्टो कार्लो येथे गेले. त्यावेळी ब्रिटनमधील रईस लोकांच्यात तसे वागणे सरसकट होत असे. एव्हीलीनने Frances Gordon Alexander या एका सहचरी प्रवासोच्छुक महिलेबरोबर वाळवंटाची सफर 1912 साली केली. तिने त्याचा वृत्तांत लिहिला-‘लिबियन वाळवंटातील वाटसरू’. मात्र तो प्रवास वास्तवात इजिप्तच्या पश्चिमी वाळवंटातील प्रदेशाचा होता. वाळवंटाचा म्हटल्यावर, तो खडतर असणार हे उघड आहे. काही वेळा एव्हीलीनने उंटावर तर काही वेळा गाढवावर बसून प्रवास केला. मात्र त्या प्रवासात तिच्या अरबी लोकांशी असलेल्या परिचयामुळे तिला व तिच्या मैत्रिणीला हवे-नको बघणाऱ्या दोन दासी, काही सुरक्षा रक्षक लाभले होते. ते सर्व आणि उंटावरून माल वाहून नेणारे, तंबू उभारणारे आणि गुंडाळणारे असे अनेक इतर साथीदार लोक एव्हीलीन व तिची मैत्रीण यांच्यासाठी सर्व व्यवस्था बघत होते. एव्हीलीनने लिहिलेला तो वृत्तांत रोजनिशीच्या रूपात आहे आणि अर्थात, केवळ नोंदी न करता त्यात काही ऐतिहासिक माहिती, काही भाष्ये आणि काही चपखल व काव्यमय वर्णने आहेत.
त्या प्रवासात तिने ओऍसिस बघितले, स्मशानभूमी बघितली, जनानखाना (हारेम) बघितला, बाजार बघितले आणि त्या सर्वांची, खास करून निसर्गाच्या विविध रूपांची – वाळूच्या वादळासकट – सुरेख वर्णने केली. त्यांतील एक-दोन देण्याचा मोह आवरता येत नाही –
“प्रातःकाळची रमणीयता लोपली आहे. वाळवंट आम्हाला दाखवून देत आहे, की सौंदर्य आणि गूढता या आवरणांखाली एक निष्ठूर मार्जार क्रौर्य लपलेले असते. निसर्गाने त्याचे अस्तित्व अधोरेखित केले आहे. त्याच्या पकडीत आमची अवस्था शुष्क पानासारखी झाली आहे.”
“मृतांचे निवासस्थान’ या शीर्षकाच्या प्रकरणात ती म्हणते- जे जग जिवंत होते, ज्ञात होते, त्याची लुटालूट करून, जे काही सुंदर होते ते तेथून हलवून मृताचे घर सुशोभित करण्यासाठी वापरले जात असे.”
“सर्व सकाळभर, आम्ही अंतहीन अशा वाळूच्या मैदानात प्रवास करत होतो. मध्ये मध्ये खडकांचे ढीग होते. त्यामुळे भास होई, की भव्य असे देऊळ निसर्गाने निष्ठुरपणे एखाद्या लहरीत उद्ध्वस्त केले आहे.”
“वाळवंटात लोक ‘लेथे’चे पाणी पितात. ते विपुल आहे, अगदी महत्त्वाचे आणि अगदी शिगोशिग जिवंत आहे. त्यामुळे क्षुद्र गोष्टी टिकून राहतात. येथे मार्कोनी नाही, की टेलिफोन नाहीत. आयुष्याचा एकसुरीपणा घालवण्यास आवश्यक असे काहीच येथे नाही आणि तरीही येथे सारे काही आहे. कायम स्वरूपातील आणि अपरिवर्तनीय वाळवंट सतत बदलत असते. या अमर्याद शांततेत आम्ही तंबू ठोकला.”
या पुस्तकात तिचा कल इस्लामकडे होत असल्याचे स्पष्ट दिसते. तिने धर्मांतर 1915 साली केले असे विकिपीडियावर दिले आहे, परंतु तिने त्याचा उल्लेख स्पष्ट केलेला नाही.
‘मेफेर टु मक्का’ या लेखनात अनेक गोष्टींचे पुरावे स्पष्ट करून माहिती दिलेली आहे, मात्र तिने इस्लाम स्वीकारल्याची तारीख येत नाही. तारीख कोणतीही असो, धर्मांतरानंतर तिचे आणि तिच्या नवऱ्याचे संबंध दूरचे झाले. ती दोघे 1922 मध्ये विभक्त झाली. त्या विभक्त होण्याचे पर्यवसान घटस्फोटात मात्र झाले नाही. विभक्त होताना तिला ‘पोटापाण्याला पुरेसे’, उत्पन्न मिळेल याची सोय झाली. तिच्यासारख्या खानदानी श्रीमंत मुलीला आणि गडगंज धनवानाच्या पत्नीला, पुरेसे एवढेच ते होते- वर्षाला दहा हजार पौंड (करपश्चात) एवढी रोख रक्कम आणि दीड हजार एकर इतक्या क्षेत्रफळाचे रान- त्यात पंधरा बेडरूम्स असलेले एक शिकार निवास (Shooting Lodge) इतकी मालमत्ता मिळाली. त्याशिवाय तिच्या नवऱ्याने तिला मेफेअर भागात एक घर घेऊन दिले (त्यामुळेच तिच्या चरित्राचे शीर्षक From Mayfair to Mecca असे झाले असावे). दुसऱ्या महायुद्धानंतर नवऱ्याच्या वंशजांना तिला मंजूर केली गेलेली करपश्चात दहा हजार पौंड सालिना एवढी रक्कम देणे अतिशय जड जाऊ लागले. कदाचित त्यामुळे असेल किंवा धर्मांतरामुळे असेल, परंतु तिच्या कुटुंबीयांशी तिचे संबंध खूप दुरावले.
तिच्या चरित्रात असा उल्लेख येतो, की तिच्या वंशातील व्यक्ती सांप्रत काळीही म्हणतात (2008), की त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीशी तिच्या वृत्ती संपूर्णपणे अलग (परक्या) होत्या. ते लोक कर्मठ विचारांचे होते, तिने इस्लामचा स्वीकार करणे हे त्यांच्या दृष्टीने तिच्या ‘परके’पणाचे उत्कृष्ट उदाहरण होय. त्या वेळच्या उच्चवर्गीयांत अनेक ‘प्रियकर’ असणे ही गोष्ट नवलाची नव्हती. एव्हीलीनही तशीच होती असा समज आहे. तिच्या नवऱ्यालाही अशा अनेक ‘मैत्रिणी’ होत्या असे म्हटले जाते.
इस्लामचा स्वीकार केल्यानंतर नाव बदलणे हे सक्तीचे नसते किंवा धर्मांतराचा तो आवश्यक असा भाग नसतो. मात्र एव्हीलीनने नाव बदलून झैनाब असे घेतले होते आणि ती स्वतःचा उल्लेख झैनाब कोब्बोल्ड असा करत असे. तसाच प्रकार ख्रिस्ती धर्मांतून इस्लामवासी झालेल्या आणखी एका गृहस्थाचा झाला होता. Abdullah Quilliam या धर्मांतरोत्तर प्रचारकाचे मूळ नाव विलियम हेन्री क्विलिअम असे होते. त्याने मुस्लिम लोकांना प्रार्थना करताना मोरोक्को येथे 1887 मध्ये पाहिले आणि त्याला इस्लामबद्दल आस्था वाटू लागली. त्याने वर्णन केले आहे – “त्यांना बोटीवर प्रार्थना करताना जबरदस्त अशा वाऱ्याच्या सामर्थ्याची भीती अजिबात वाटत नव्हती. त्यांच्या चेहेऱ्यावरील भाव पाहून मी अतिशय प्रभावित झालो. ते भाव संपूर्ण श्रद्धा आणि मनःपूर्वकता यांचे द्योतक होते.” त्याने त्या प्रश्नाचा बराच विचार इंग्लंडला परतल्यावर केला आणि अखेर, एकतिसाव्या वर्षी त्याने इस्लाम धर्म स्वीकारला व अब्दुल्ला असे नाव धारण केले. “माझी नवी श्रद्धा म्हणजे तार्किकता आणि समंजसपणा यांचे प्रतीक होय. माझ्या मूळ श्रद्धास्थानाशी ती अजिबात विसंगत नाही.”
एव्हीलीन हिने नक्की कोणत्या कारणांनी इस्लाम धर्म स्वीकारला असे कुतूहल वाटतेच. तिने मक्का-मदिना ही, मुस्लिम धर्मीयांसाठी आयुष्याचे सार्थक झाले असे वाटणारी यात्रा केली. त्या यात्रेनंतर, 1934 मध्ये तिने ती हकीगत एका पुस्तकाद्वारे लोकांसमोर आणली. ती त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगते, “माझे बालपण अल्जियर्सबाहेरच्या एका लहानशा टेकडीवर एका व्हिलामध्ये गेले. तेथे माझे आईवडील सूर्यप्रकाश आणि ऊन यांच्या शोधात बाहेर जात आणि मी माझ्या गव्हर्नेसचा डोळा चुकवून माझ्या अल्जेरियन मित्रांसोबत मशिदीत जाई. मी माझ्या नकळत अंतर्यामी मुस्लिम होत गेले. आम्ही तीन वर्षे तेथे काढल्यावर त्या जागेला रामराम ठोकला. मला त्याचे फार वाईट वाटले. पण मला काही काळातच माझ्या अरब मित्रमैत्रिणींचा विसर पडला. मी मशिदीत केलेल्या प्रार्थना आणि अरेबिक भाषा हेही विसरले. तशीच काही वर्षे गेली आणि मी रोममध्ये माझ्या इटालियन मैत्रिणींसोबत राहत होते तेव्हा माझ्या यजमानांनी मला विचारले, “पोपना भेटण्यास आवडेल का तुला?” मला अर्थातच अगदी थरारून जाण्यास झाले. मग लांब काळाशार झगा घालून मी, माझे यजमान आणि माझी मैत्रीण असे आदरणीय पोप यांच्या दालनांत दाखल झालो. अचानकच, मला पूज्य पोप यांनी विचारले, “तू कॅथॅलिक आहेस का?” क्षणभर मी दचकले ! आणि म्हटले, ‘मी मुस्लिम आहे.’ त्यावेळी मी कशाने झपाटून गेले होते ते मला सांगता येत नाही, कारण गेल्या कित्येक वर्षांत मी इस्लामबद्दल विचारही केला नव्हता. अचानक, एक काडी पेटली गेली होती. मी त्या क्षणी आणि तेथेच ठरवले, की इस्लाम धर्माचा अभ्यास करायचा. मी त्याबाबत अधिक वाचत गेले, तितकी माझी खात्री अधिकाधिक पटत गेली, की इस्लाम हा एक व्यावहारिक धर्म आहे आणि त्याची आखणी जगातील गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेली आहे. तेव्हापासून माझी अशी श्रद्धा आहे- ईश्वर एकच आहे, मोझेस, जीझस, मोहम्मद आणि इतर सारे त्याचे प्रेषित आहेत आणि प्रत्येक राष्ट्राला ईश्वराने त्याचा प्रेषित पाठवला आहे. त्यांना आध्यात्मिक ज्ञान होते. आपला जन्म पापात झालेला नाही आणि आपल्याला ‘मुक्ती’ मिळवण्याची गरज नाही. ईश्वर आणि आपण यांच्यात रदबदली करण्यासाठी कोणी मध्यस्थ असण्याची गरज नाही, अगदी मोहंम्मद किंवा जीझस यांचीही गरज नाही. आपण ईश्वराला सरळ साद घालू शकतो. इस्लाम म्हणजे ईश्वराला शरण जाणे. शांती हाही इस्लामचा अर्थ आहे. ह्या विश्वाच्या निर्मात्याची आज्ञा प्रमाण मानणारा तो मुस्लिम ! इस्लामची मूलभूत अशी तत्त्वे आहेत- ईश्वराचे एकमेव असणे, माणसांमध्ये भ्रातृभाव असणे, कोणत्याही तत्त्वज्ञानाच्या दुराग्रहापासून मुक्ती म्हणजे इस्लाम !”
इस्लाम धर्माच्या अभ्यासानंतर, एव्हीलीनची जी धारणा झाली असे ती सांगते, त्याचा विचार केला, की ख्रिस्ती धर्मविचार आणि इस्लाम यांच्यात फरक असण्यापेक्षा साम्य अधिक आहे असे वाटू लागते. एकेश्वरवाद हा हिंदुस्तानात राममोहन रॉय यांनी प्रभावशाली पद्धतीने मांडला. त्यांना पुष्कळ अनुयायीदेखील मिळाले. त्यांच्यावर ख्रिस्ती धर्माचा अनुयायी अशी टीकाही भरपूर झाली. म्हणजे असे म्हणता येईल, की कोणी बहुसंख्यांच्या विरोधातील कोणताही धर्मविचार मांडला – मग विचार मांडणारा हिंदू असो वा ख्रिस्ती – त्याला ‘परधर्मीय’ अशी निंदात्मक उपाधी लावली जाते. सर्व धर्म एकच तत्त्वज्ञान सांगतात असे बरेच जण म्हणतात; त्यापेक्षा सर्व धर्मांतील सत्ताधीशांनी त्यांच्या त्यांच्या अनुयायांना कर्मकांडात गुंतवले हा त्यांच्यातील समान भाग आहे आणि धर्मांतर कोणत्याही धर्मात केले असले तरी विरोध हा होतोच हे त्याहून महत्त्वाचे साम्य होय असे म्हणावे लागते.
जाणत्या वयात स्वीकारलेला इस्लाम आणि तो स्वीकारण्याच्या कृत्याला झालेला प्रगट किंवा अप्रगट विरोध यांमुळे असेल कदाचित; एव्हीलीन हिने मक्केच्या प्रवासाची हकिगत सांगताना, अनेक वेळा इस्लामचे श्रेष्ठत्व, क्वचित ख्रिस्ती धर्माच्या तुलनेतही प्रतिपादन केले आहे. अनेक स्थळांचा इतिहास, महात्म्य यांनी त्या हकिगतीचा बराच मोठा भाग व्यापला आहे. तिने रोजनिशीतील नोंदी असा घाट त्या लेखनासाठी घेतला आहे. तिने तोच घाट तिची अन्य दोन पुस्तके – ‘लिबियाच्या वाळवंटातील वाटसरू’ आणि ‘केनिया – भासांची भूमी’ (Kenya – The Land of illusion) यांतही वापरला आहे.
केनियावरील पुस्तक ‘मक्केची तीर्थयात्रा’ (Pilgrimage to Mecca) हे नंतर प्रकाशित झाले. त्या दोन्ही पुस्तकांत प्रवासलेखनासोबत इतिहास आणि पश्चिम-पूर्व देशांतील लोकांची मानसिकता असे विषय येतात. त्यातल्या त्यात, लिबियावरील पुस्तक हे निखळ प्रवासलेखन म्हणता येईल असे आहे. तिची लोकप्रियता मक्केच्या तीर्थयात्रेवरील पुस्तकानंतर वाढली. ती युरोपातील मुस्लिम स्त्रीने मक्का-मदिना यात्रा करण्याची पहिलीच वेळ होती. रिचर्ड बर्टन आणि उपरोल्लेखित अयशस्वी अशा युरोपीयनांच्या मक्का-मदिना यात्रांमुळे, अरेबियन सत्ताधारी युरोपातील लोकांबद्दल अतिशय नाराज आणि आडमुठे म्हणता येतील इतके कडक बनले होते. युरोपातून येणाऱ्या मुस्लिमांना मक्का तीर्थक्षेत्री प्रवेश करण्यासाठी सत्ताधीशांची परवानगी घ्यावी लागत असे आणि ती जेद्दाह येथे एक वर्ष राहिल्यानंतर मिळत असे. एव्हीलीनला त्या नियमातून सूट मिळाली. अवघ्या पंधरा दिवसांनंतर तेथे जाण्यास तिला परवानगी मिळाली. त्यासाठी तिच्याचसारखा ख्रिस्ती धर्मातून इस्लामवासी झालेला एक माणूस (Philby) उपयोगी पडला. तो सौदीच्या राजाचा सल्लागार होता. त्याने एव्हीलीनचे यजमानपद निभावले. मात्र त्याला तिच्याबद्दल पूर्ण आदर नव्हता. उलट, काही अंशी नाखुषी होती असे ‘मेफेअर टू मक्का’ या लेखनात नमूद केले आहे.
लेडी एव्हीलीन हिचा मृत्यू वयाच्या शहाण्णवव्या वर्षी, 26 जानेवारी 1963 रोजी झाला. तिच्या दफनाचा वृत्तांत सांगणारा लेख wokingmuslim.org या पोर्टलवर उपलब्ध आहे. तो वृत्तांत अंत्यसंस्कार करणाऱ्या इमाम मौलाना याकूब खान यांनी लिहिला आहे. ते तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लंडन येथून सोळा तासांचा प्रवास करून गेले होते. लेडी एव्हीलीन हिने तिच्या दफनाबद्दल लेखी स्वरूपात सूचना लिहून ठेवल्या होत्या-
- दफनविधीला एकही ख्रिस्ती पुरोहित हजर राहता कामानये, 2. अंत्यविधीतील प्रार्थना अरेबिकमध्येच असावी, 3. माझा चेहेरा मक्केकडे वळवलेला असावा, 4. समाधीवर पुढील मजकूर अरेबिक मध्ये खोदावा – Allahu- hur- us- samawati sal ard. (अल्लाह हा पृथ्वीवरील आणि स्वर्गातील प्रकाश आहे).
एव्हीलीनबद्दलचे कुतूहल किती आहे याचा एक किस्सा-
स्कॉटलंडमधील लेडी एव्हीलीन हिची कबर बघण्यासाठी इंग्लंडच्या विविध भागांतून एक जथा वीस किलोमीटर एवढे अंतर चालून गेला होता. त्या यात्रेतील सर्वांनी ख्रिस्ताचा मार्ग सोडून पैगंबराचा मार्ग धरला होता. त्यांनी पाऊस व वारा यांची तमा न करता ती कबर दर्शन यात्रा पार पाडली. बीबीसी स्कॉटलंड न्यूज या पोर्टलवर, Lady Evelyn Cobbold – why are Muslim pilgrims visiting her Scottish grave – या शीर्षकाचा एक लेख आणि त्यात एक व्हिडियो- एका धर्मांतरित महिलेचे मनोगत व्यक्त करणारा उपलब्ध आहे.
एव्हीलीनची कविता –
I stood on the roof in the still of the night ,
And looked my last on the Eastern home
The stars above shed their radiant light,
Those stars will be with me wher’er I roam.
And their weird radiance was as soothing balm,
That filled my soul with an infinite calm.
The city beneath me, lay silent in sleep.
It was hush that precedes the dawn.
And my soul yearned to the mighty void ,
To yield its mysteries ere the morn.
Awake, when the toil of the day would begin,
With it’s burden of weary sorrow and sin.
And as I gazed into those silent depths,
The vague longings that filled my soul,
Took the form of prayer, I upward sped,
To Him, The One, The essence of all.
And I felt his essence within and around,
Divine, soul- enhancing, His Love I Found.
And even flowed onward the mighty river,
To yield its secrets into the sea.
The mysteries of forgotten nations,
The buried Past of History.
And the weird cadence of the Mueddin’s cry ,
Bid the faithful prepare for the day that was nigh.
And far in the East, where desert and sky,
Seemed to meet, to welcome the morn.
Came slowly stealing across Abbassiyeh
The radiantly Beautiful Dawn.
Embracing all the things in its tender light ,
And I bade farewell to the silent night.
(Mueddin म्हणजे प्रार्थनेची वेळ झाली असे चारी दिशांतील लोकांना ओरडून सांगणारा मशिदीतील सेवक)
– मुकुंद वझे 98209 46547 vazemukund@yahoo.com