कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश (Ram Deshpande : Kolhapur’s Encyclopedia)

4
125
राम देशपांडे

   “ज्या वेळी संग्रहाचं, जतनाचं हे काम तुमच्या आवाक्याबाहेरचं आहे असं वाटेल तेव्हा मला कळवा.” लंडन युनिव्हर्सिटीचे डॉ. ग्रॅहम स्मिथ यांनी मला आश्वासक सुरात पाठिंबा दिला. स्मिथ माझ्याकडे माझा संग्रह पाहण्यासाठी आले होते. स्मिथ यांनी भा. रा. तांबे यांच्या कवितेवर पीएच डी केली आहे. त्यांना पुण्यात कळले, की तांबे यांच्या हस्ताक्षरातील एक मूळ कविता माझ्या संग्रही आहे. त्यामुळे तो संग्रह पाहण्यास ते कोल्हापूरला माझ्या घरी आले होते. जवळपास सातशे ते आठशे मूळ स्वरूपातील हस्ताक्षरे म्हणजे त्यांच्या दृष्टीने प्रेशस ट्रेझरहोता. ते संग्रह पाहण्यासाठी दोन-तीन दिवस येत होते. त्यांनी संग्रहातील काही कविता लिहून घेतल्या;संग्रहाविषयीचा अभिप्रायही शुद्ध मराठीत लिहून दिला. मला बालपणीच सारे काही जतन करण्याचा छंद जडला. तो वयाच्या ऐंशी वर्षांच्या प्रवासापर्यंत सातत्याने चालू आहे. साहित्यिकांची, मान्यवर व्यक्तींची हस्ताक्षरे, हस्तलिखिते; तसेच, मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा, विविध विषयांवरील ग्रंथ- तसेच, त्यांवरील कात्रणे, जुनी मासिके-पुस्तके यांचा संग्रह करण्याचा हा नाद आहे. तो वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षी लागला. संदर्भ हा माझ्या आवडीचा विषय. साहजिकच, मी साहित्य, संगीत, कला, प्रसारमाध्यम, विज्ञान, आरोग्य, व्यक्ती या विषयांवरील कात्रणे गोळा केली आहेत. त्या संदर्भसाधनांचा उपयोग मला तर होतोच, पण अनेक जिज्ञासू, अभ्यासक, प्राध्यापक, संस्था यांनाही झाला आहे. त्यामुळेच माझे काही रसिक मित्र मला म्हणतात, कोल्हापूरचा चालता बोलता ज्ञानकोश.

अचलपूर येथील प्रदर्शन पाहताना रसिक

 

व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हस्ताक्षरातून समजते. माझ्या हस्ताक्षर संग्रहाचे कौतुक वि.स.खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, अरुण शौरी, राम शेवाळकर अशांसारख्या दिग्गजांनी केले आहे. मी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची हस्ताक्षरे मिळवण्यासाठी त्यांच्या वंशजांचा शोध घेण्याचा खटाटोपही केला आहे. मी त्यांच्याकडील संग्रहातून मोरोपंत, शाहीर राम जोशी, पठ्ठे बापुराव, गोपाळ गणेश आगरकर, राम गणेश गडकरी अशा ऐतिहासिक व्यक्तींपासून ते लक्ष्मीबाई टिळक, विंदा करंदीकर, जी.ए. कुलकर्णी, इंदिरा संत या साहित्यातील अग्रणींपर्यंत अनेकांच्या हस्ताक्षराचा ठेवा मोठ्या प्रयत्नपूर्वक मिळवला आणि माझ्या संग्रही जपला आहे. संग्रहातील सगळ्या कागदपत्रांच्या जपणुकीसाठी त्यांचे लॅमिनेशन करणे, त्याचे स्कॅनिंग करणे, त्यांच्या विषयवार याद्या करणे हे सगळे सोपस्कार आणि खर्चही करत आलो आहे. मी त्या संग्रहाची प्रदर्शने गावोगावी भरवली आहेत. प्रदर्शने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही झाली. साहित्य संमेलने आणि साहित्य परिषदा येथेही प्रदर्शनांचे आयोजन केले.

माझे शिक्षण इस्लामपूर, कोल्हापूर आणि पुणे येथे झाले. मी महाराष्ट्र शासनाचा ग्रंथपालन अभ्यासक्रम पुणे येथे पूर्ण केला. मी श्री महालक्ष्मी को-ऑपरेटिव बँक लिमिटेड (कोल्हापूर) व कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (कोल्हापूर) या दोन संस्थांमध्ये नोकरी करत होतो. मी करवीर नगर वाचन मंदिर; तसेच, शासकीय संग्रहालयाच्या पुरातत्त्व विभागाच्या नोकरीतून वीस वर्षे काम करून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर विविध वृत्तपत्रांच्या संदर्भ विभागात काम केले. वीस वर्षे शासकीय सेवेत असतानाच्या काळात तेर (उस्मानाबाद), पैठण (औरंगाबाद) येथील उत्खननात सहभाग घेतला; तसेच, सातारा जिल्ह्यातील औंध संग्रहालयातील ग्रंथांच्या सूचिकामात सहाय्य केले. माझ्या संग्रहात आठशे मान्यवर व्यक्तींची मूळ हस्ताक्षरे आहेत. हस्ताक्षराबरोबरच मान्यवर व्यक्तींच्या आवाजांचा संग्रहही आहे. त्यात सुमारे पाचशे ध्वनिफिती आहेत. कॅलिग्राफीची आवड, तीन हजार फाउंटन पेनांचा संग्रह, कात्रणांचा संग्रह, ग्रंथसंग्रह असा पसारा आहे.

शाळेत असताना मला वाचनाचा नाद होताच. शिवाय शाळेत काही कार्यक्रमांच्या निमित्ताने येणाऱ्या लेखकांच्या स्वाक्षर्‍या घेण्याचाही छंद होता. मी अनेकदा त्या स्वाक्षऱ्यांच्या वह्या चाळत बसायचो. एकदा मनात आले, की अमुक एका व्यक्तीला आपण भेटलो त्याची आठवण म्हणून स्वाक्षरी ठीक आहे; पण लेखकांची साहित्यसंपदा आणि त्यांच्या स्वाक्षर्‍या यांचा आपापसात तसा काहीच संबंध नाही. परिणामी, माझ्या या छंदासंबंधात काही तरी पुनर्विचार करायला हवा, हे माझ्या मनाशी अधिकाधिक पक्के होत गेले. कारण छंद हा प्रथमदर्शनी जरी विरंगुळा मानला जात असला, तरी त्यातून मौलिक काही तरी हाती लागणे, आपली जीवनदृष्टी उजळून निघणे महत्त्वाचे. त्यामुळे विचारांती मी स्वाक्षऱ्या घेण्याचे काम अखेर थांबवले आणि त्याऐवजी हस्ताक्षरांचा संग्रह करण्यास प्रारंभ केला.

राम देशपांडे यांनी खासदार उदयसिंग गायकवाड यांच्या आत्मकथेचे शब्दांकन केले आहे.

मी हस्ताक्षरासाठी पहिले पत्र पाठवले ते शंकरराव किर्लोस्कर यांना- 1953 साली. माझ्या पत्राला शंकररावांचे लगेच उत्तर आले. त्यांनी एक चांगला विचार त्यांच्या हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरीसह माझ्याकडे पाठवला. माझा हुरूप वाढला. अक्षरांना स्वतःचे व्यक्तिमत्त्व नसते; पण जेव्हा एखाद्या थोर साहित्यिकाचा, लेखकाचा त्याला स्पर्श होतो तेव्हा त्याचे संदर्भमूल्य एकदम वाढते. त्यातून काळाचा मागे पडलेला एक टप्पाच वाचकापुढे खुला होतो. एक उदाहरण देतो. आचार्य विनोबा भावे यांनी 29 मे 1947 रोजी लिहिलेले एक पत्र माझ्याकडे आहे. त्या पत्रासाठी विनोबाजींनी स्वतःची अशी लिपी वापरली आहे. त्या लिपीला त्यांनी लोकनागरी लिपीअसे नाव दिले होते. त्यांतील त्यांनी लिहिलेली जोडाक्षरे विशेष उल्लेखनीय आहेत- वाक्‍्य ऐवजी वाक् य‘ ; ‘प्रणामऐवजी परणा् म‘; ‘श्रीच्या जागी श् री‘.अशा प्रकारे लिहिलेले शब्द पाहून आता आश्चर्य वाटते. पण जरा बारकाईने विचार केला तर लक्षात येते, की देवनागरी लिपीतील जोडाक्षर समजून घेण्याची हीच तर पद्धत होती. ती विनोबाजींनी किती सहजगत्या वापरात आणली होती ! अजून एक उदाहरण एस.एम. जोशी यांचे. माझ्या संग्रहासाठी एसेम यांचे हस्ताक्षर मला हवे होते. त्यांनी माझ्या आयुष्याचा जमाखर्चया विषयावर त्यांचे मनोगत व्यक्त करावे असे मला मनापासून वाटत होते. त्यांनी मला स्वलिखित पत्र 18 डिसेंबर 1978 रोजी पाठवले. त्या पत्रातून फार मोठा बोध घेण्यासारखा आहे. पत्रातील संपूर्ण मजकूर सांगत नाही, पण एसेम यांच्यासारखा पुरोगामी विचारवंत, ध्येयनिष्ठ राजकारणी स्वतःच्याच आयुष्याकडे किती अलिप्तपणे पाहू शकतो, किती निरलसपणे त्यातील तात्पर्य मांडू शकतो हे वाचून थक्क व्हायला होते.

साहित्य संमेलनातील रसिक वाचक

         बहुतेक लेखकांनी माझ्या या उपक्रमाला कायम सहकार्य केले. या छंदाद्वारे त्यांच्याशी माझे स्नेहबंधही जोडले गेले. मी ना.घ. देशपांडे यांना पत्र लिहून विनंती केली होती, की मला तुमच्या अक्षरांत डाव मांडून भांडून मोडू नकोआणि मन पिसाट माझे अडले रेही गीते हवी आहेत; तशी ती त्यांनी पाठवली. आरती प्रभू यांच्या अक्षरांत मला ये रे घना ये रे घनाही कविता हवी होती, ती मिळाली. कसुमाग्रजांनी देणंही कविता दिली. इंदिरा संत यांनी नको नको रे पावसा‘, शंकर रामाणी यांनी दिवे लागले रे दिवे लागले‘, पी. सावळाराम यांनी गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का?’, गदिमांनी मराठी मनाची मागणीही गीते दिली. शांता शेळकेयांच्याकडून जिवलगा राहिले दूर घर माझे, दाटून कंठ येतो, मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, काटा रुते कुणालाही गीते मिळाली. रमेश आणावकर यांचे केशवा माधवा‘, रा. ना. पवार यांच्या हस्ताक्षरातील क्षणभर उघड नयन देवाअशी गीतेही माझ्या संग्रहात जमा झाली. इंद्रजित भालेराव, सतीश सोळांकूरकर, प्रकाश होळकर अशा ताज्या दमाच्या कवींच्या कविताही संग्रहात जमा झाल्या.

          कोणी लेखक काही निमित्ताने कोल्हापूरला आले, की मी त्यांना भेटत असे. त्यांच्याशी आधी पत्रव्यवहार झालेला असेल तर त्यांना त्याची फक्त आठवण करून देत असे. कारण कोणालाही सभा-समारंभात गाठून हस्ताक्षर घ्यायचे नाही असा माझा कटाक्ष होता. त्या लेखकाला त्याचे विचार मोकळेपणाने लिहिता यावेत इतकाच त्यामागचा हेतू. या संदर्भातील एक आठवण. कवी यशवंत काही कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरला आले होते. हस्ताक्षरासाठीचे माझे पत्र त्यांना आधीच गेलेले होते. त्यांना जाऊन भेटलो, तर ते म्हणाले, “पत्रासोबत तुम्ही तिकिटं लावलेला लखोटा कशासाठी पाठवलात? तेवढा खर्च मी करू शकलो असतो. तुम्ही माझ्या हस्ताक्षरात आईकविता मागितली आहे, पण ती फार मोठी आहे. मी असे करतो, त्या कवितेचे सार एका ओळीत लिहून पाठवतो. ते मान्य करून घ्या.त्यांचे वय आणि प्रकृती लक्षात घेऊन मी माझा हट्ट बाजूला ठेवला. त्यांनी पुण्याला परतल्यावर स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारीएवढी एक ओळ लिहिलेला कागद त्यांच्या स्वाक्षरीसह मला पाठवला.

कवी जगदीश खेबूडकर यांच्यासमवेत
         सोलापूरचेकवी संजीव यांना मी त्यांच्या कवितेसाठी भेटलो. त्यांनी त्यांच्या स्वाक्षरीसह एक कविता दिलीच आणि त्याबरोबर सोलापूर आणि त्या परिसरात होऊन गेलेल्या लेखक, कवी, नाटककरांच्या नातेवाइकांची माहितीही मला दिली. सोलापूरला असलेले पंडित जोशी हे शाहीर राम जोशी यांचे वंशज. मी त्यांच्याशी शाहिरांच्या हस्ताक्षरासाठी पत्रव्यवहार सुरू केला आणि मग एक दिवस माझा संग्रह घेऊन मी त्यांना भेटण्यासाठी सोलापूरला गेलो. पंडित जोशी भेटले. त्यांनी संग्रह पाहिला. पुढे काही दिवसांनी त्यांनी शाहिरांच्या हस्ताक्षरातील एका लावणीचा अखेरचा भाग मला पाठवला. तो कागद अतिशय जीर्ण झालेला. त्याचे तुकडे पडत होते. राम जोशी यांनी पुणे शहरावर एक लावणी लिहिली होती- कृष्ण जन्म आनंद वाटतो आज हे पुणेया लावणीचा तो शेवटचा भाग. त्या ओळी होत्या, ‘जेथे नरनारायण वसले स्वये भक्तिच्या गुणे । ते मंदिर कविराय वर्णितो नको म्हणावे कुणे |’

          ‘विश्रब्द शारदाचे खंड (पत्रव्यवहाराचे) प्रकाशित करणारे हरिभाऊ मोटे यांचा स्वत:चा पत्रसंग्रह खूप मोठा. त्यांना माझ्या संग्रहाबद्दल समजले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आमचा पत्रव्यवहार वाढला. एकदा पुण्यात सलग तीन दिवस त्यांच्या सान्निध्यात राहण्याचा योग आला. त्यांनी त्यांच्याकडील जुन्या पत्रव्यवहाराच्या पेट्या काढल्या. आम्ही दोघेही धुळीचा त्रास होऊ नये म्हणून नाकांना रुमाल बांधून जुनी पत्रे चाळत किती तरी वेळ बसलो होतो! त्या दिवशी हरिभाऊंमुळे गोपाळ कृष्ण गोखले, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वा.गो. आपटे, विष्णू मोरेश्वर महाजनी यांची दुर्मीळ पत्रे माझ्या संग्रहात जमा झाली. काही काही वेळा मला मिळालेली हस्ताक्षरे अभ्यासकांना दाखवून खात्री करून घेण्याचे कामही करावे लागे. आर्याकार मोरोपंतांच्या हस्ताक्षरातील कागदाचे तीन तुकडे पंढरपूरच्या अनंतराव पराडकर यांनी दिले होते. ते तिन्ही कागद मोरोपंतांच्या हस्ताक्षरातलेच असल्याचा निर्वाळा पंडित बाळाचार्य खुपेरकरशास्त्री यांनी दिला. अशी धडपड करून एखादे हस्ताक्षर नव्याने माझ्या संग्रहात जमा झाले की इतिहासाचा एक तुकडा ओंजळीत येऊन पडल्यासारखा वाटायचा !

अमरावती येथील हस्ताक्षर प्रदर्शनात मनोगत व्यक्त करताना राम देशपांडे

 

 मी विविध वृत्तपत्रांतून लेखन केले आहे. मी वि.स. खांडेकर यांच्याकडे लेखनिक नऊ वर्षे होतो. तसेच; बाबुराव पेंढारकर, रणजित देसाई, वामनराव चोरघडे, राम शेवाळकर यांचाही लेखनिक म्हणून काम केले आहे. शेवाळकर यांच्या व्याख्यानांच्या ध्वनिफितीवरून तीन पुस्तकांच्या मुद्रणप्रती तयार करून दिल्या. श्रीविद्या प्रकाशनचे मधुकाका कुलकर्णी यांची प्रकाशकनामा ही आत्मकथा, राजहंस प्रेसचे श्रीपाद गोसावी यांच्या स्मृतिग्रंथाचे संपादन अशी काही कामे मजकडे आली. मी माजी खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या आत्मकथेचे शब्दांकन केले. तसेच वेद- पंडित मधुकाका शुक्ल गौरवग्रंथाचे संपादन केले. मी स्वतः भाऊंच्या सहवासात (वि.स.खांडेकर यांच्या आठवणींचा संग्रह) आणि आठवणी सहवासाच्या (मान्यवर व्यक्तींच्या सहवासाची आठवणींचा संग्रह) अशी दोन पुस्तके अजब पब्लिकेशन (कोल्हापूर) या प्रकाशन संस्थेच्या वतीने प्रकाशित केली. गोकुळ डेअरीचे चेअरमन अरुण नरके यांची व्यवसायगाथा(गोकुळगाथा) या पुस्तकाचे लेखन-संपादन केले. त्याचे प्रकाशन पुण्याच्या राजहंसने केले. रत्नागिरीचे आमदार गोविंदराव निकम यांच्या आठवणींचे संपादन केले. मी सामना दैनिकामध्ये आठवणी सहवासाच्या या सदराचे सुमारे दोन वर्षे लेखन केले.

नाशिक येथील प्रदर्शनात प्राचार्य वसंतराव पाटील, कुसुमाग्रज यांचे स्नेही/मानसपुत्र

 

माझ्या संग्रहातील मासिके/कात्रणे पुनःपुन्हा चाळताना-वाचतानाचा आनंद काही वेगळा असतो. त्यातच नरहर कुरुंदकर यांचे मनोगत माझ्या वाचनात आले. शीर्षक होते माझी लेखन उमेदवारी. कुरुंदकर यांचे अभ्यासक, विचारवंत, लेखक म्हणून मराठी साहित्यातील स्थान अनन्य आहे. त्यांचा तो लेख हाती येताच मला अफाट आनंद झाला. तो मी प्रसृत केला. लोकांनीही लेख ओढीओढीने वाचला. लेख प्रसिद्ध झाला होता मार्च 1982 च्या संग्रहालयया मासिकात. त्या मासिकाचे संपादक होते वासुदेव वामन भट (वा.वि.).

हा संग्रह माझा वैयक्तिक असला तरी ते सांस्कृतिक विचारांचे आणि अक्षरांचे धन समाजाचेच आहे. पण तरीही कधी कधी वाटते, की माझी ही धडपड एकाकी ठरत आहे. पुरेसे अर्थबळ हाती नसल्यामुळे संग्रह, जतन आणि प्रदर्शन यांपैकी कशावर किती खर्च करायचा याचा मला सतत विचार करावा लागला. पण मी जर पैशांची वाट पाहत बसलो असतो तर सगळी कामे जेथल्या तेथे ठप्प झाली असती. शासनाला याचे महत्त्व पटवून देण्यामध्येही माझा बराच वेळ गेला. ज्यांच्या हातात माझा प्रस्ताव जायचा त्यांना या विषयात रस नसायचा. माझ्या प्रस्तावाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जायच्या. याउलट, वैयक्तिक पातळीवर रसिकांचा मला नेहमीच खूप छान अनुभव आला. या संग्रहाचे पुढे काय?’ हा प्रश्न मला सतावतो. संग्रहाच्या अनेक व्यथा असल्या तरी त्यांना कुरवाळत बसण्यापेक्षा त्यावर मार्ग शोधण्यातील आनंद मला लाखमोलाचा वाटतो.

राम देशपांडे 8600145353

——————————————————————————————————————————————————-

—————————————————————————————————————————–

About Post Author

4 COMMENTS

  1. रामभाऊ… तुमच्या अविश्रांत धडपडीतून उभा राहिलेल्या हस्ताक्षर संग्रहाचे मोल फार मोठे आहे. तुम्ही आमचे मित्र याचा अभिमान वाटतो. – सुभाष नाईक, पुणे.

  2. हा तर अनमोल ठेवा आहे..त्याचे जतन झाले पाहिजे..एक प्रकारे ही कालकुपी च आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here