राजा-रेणू दांडेकर – चिखलगावचे ध्येयप्रेरित जोडपे

0
331

राजा दांडेकर यांचा जन्म ज्या तालुक्यात टिळक, आंबेडकर, कर्वे, काणे व साने गुरुजी जन्माला आले, त्याच दापोली तालुक्यात झाला. त्यांच्याही घरी गरिबी व घरात खाणारी तोंडे जास्त. शेती हेच उत्पन्नाचे साधन. राजाभाऊंनीदेखील आधुनिक काळात जगण्याचा वेगळा मार्ग निवडला. राजाभाऊंनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण माधुकरी मागून पूर्ण केले. ते मॅट्रिक झाल्यावर पुण्यात गेले. त्या वेळेस त्यांच्या वडिलांनी दोनशे रुपये त्यांच्या हातात ठेवले व त्यांना सांगितले, “तुला जे करायचं आहे ते कर !” राजाभाऊंनी ठरवले होते, शिकून- डॉक्टर होऊन परत स्वत:च्या गावी यायचे. ते ध्येयवादाने झपाटलेले व्यक्तिमत्त्व होते. भारताचा इतिहास व भारतीय संस्कृती यांच्यावरील प्रेम त्यांच्यात ठासून भरलेले आहे. त्यांनी जवळ जवळ संपूर्ण भारतभर भ्रमंती केली आहे. ते गो.नी. दांडेकर यांच्यासोबत अनेक गडकोट व किल्ले भटकलेले आहेत.

राजाभाऊ त्यांच्या चिखलगावात डॉक्टर होऊन परतले, ते लग्न करून व त्यांच्या पत्नी रेणू दांडेकर यांच्या समवेत. ते सांगतात, “मी जेव्हा पुण्याहून चिखलगावला आलो, तेव्हा लोक विचारायचे. ‘तू इथे येऊन काय करणार?’ तेव्हा मी सांगायचो, ‘शेती’… ‘माणसांची शेती’ करणार !” शाळा काढल्यानंतर, येथे अनेक भागांतून शिक्षक आले. ती माणसे येथे जन्मलेली नाहीत. वाढलेली नाहीत. त्यांना येथे रुजायला वेळ लागला. झाडाचे कलम जसे लावतो, खत घालतो, वाढवतो; तसा माणसा-माणसांचा रुजवा करावा लागला आणि त्याचबरोबर स्वतःचाही रुजवा करावा लागला. कारण स्वतःच्या मनाचीही मशागत करावी लागते.”

रेणू दांडेकर म्हणजे लग्नापूर्वीच्या प्रतिमा केसकर. त्या हुशार म्हणून प्रसिद्ध. बी ए, एम ए ला विद्यापीठात पहिल्या आलेल्या. अकोल्याला 1981 साली झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गो.नी. दांडेकर होते. ते राजाभाऊंचे चुलते. त्या संमेलनात राजाभाऊंची ओळख नरहर कुरुंदकर यांच्या नांदेडमधील कॉलेजात प्राध्यापक असलेल्या प्रतिमा केसकर यांच्याशी झाली. त्या ओळखीचे रूपांतर गाढ मैत्रीत झाले. पुढे, प्रतिमा यांनीच त्यांना लग्नासाठी प्रपोज केले. त्यावर राजाभाऊ म्हणाले, “मी असा फकीर-भणंग माणूस. गाठीला पैसा फारसा नसलेला. पुण्यात बीएमएस हे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. परंतु माझ्या पुढील आयुष्याच्या भविष्यातील पंचवीस वर्षांच्या योजना माझ्या डोक्यात आहेत. त्या म्हणजे मी माझ्या चिखलगावी जाऊन मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग करणार आहे. मी तेथे शैक्षणिक व वैद्यकीय या क्षेत्रांत कार्य करणार आहे. त्यात अनंत अडचणी येतील. त्यासाठी अतोनात कष्ट उपसावे लागणार आहेत. ते जर तुला जमणार असेल, सोसण्याची तयारी असेल तर आपण लग्न करू !” आणि अशा प्रकारे राजाभाऊ आणि प्रतिमा केसकर यांचे लग्न झाले.

रेणू यांनी त्यांचा संसार गुरांच्या गोठ्यात सुरू केला. त्यांनी गावातील सहा मुलांना घेऊन शाळा सुरू केली. राजाभाऊंचा फिरता दवाखाना चालू होता. ते गावा गावात जाऊन गरजूंना औषधोपचार करत. रोगी जेवढे पैसे देतील, तेवढे घेत. ते त्यांच्या अथवा रोग्याच्या घरातील घोंगडीवर किंवा जमिनीवर बसून आजारी व्यक्तीला तपासत असत. त्यांचे औषधोपचार व दुसरीकडे रेणू यांची शाळा ! तेथे त्या एकट्याच शिक्षिका.

त्यांच्या या कामाची, संसाराची सुरुवात कशी झाली? तर राजाभाऊ सांगतात, की महाविद्यालयात असताना त्यांनी अनेक चांगले प्रकल्प पाहिले, महाराष्ट्रातील आणि देशातील ! त्याच काळात त्यांनी ग्रामीण भागही पाहिला. तेव्हाच त्यांच्या वाचनात एक पुस्तक आले होते- ‘जगाची शेती’ नावाचे. फिलिपाईन्समधील ग्राम पुनर्रचनेचे प्रणेते डॉक्टर जेम्स इन यांचे ते पुस्तक. त्यांनी त्या पुस्तकात पाच सूत्रे सांगितली आहेत. ती सूत्रे अशी- तुम्हाला ग्रामीण भागात काम करायचे तर लोकांच्यात जा, लोकांच्यात राहा -त्यांच्यासारखे जगा. लोकांकडून शिका. तुम्हाला काय येते हे विसरून जा आणि लोकांच्या गरजांनुसार काम करा.

त्यांनी आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांत काही प्रयोगक्षम शाळा पाहिल्या. त्यांना शाळा प्रचलित पद्धतीने चालवण्यात रस नव्हता. त्यांनी रेणू यांना सांगितले, “तू शासनाच्या चौकटीत राहून शाळा चालव आणि मी त्याच चाकोरीत राहून वेगळे काही करता येईल का, ते बघतो. शासनाने असे काही सांगितलेले नाही, की चांगले काही करू नका. त्यांचे नियम पाळूनही वेगळे काही करता येते.”

ते व त्यांच्या पत्नी आणि त्यांचे सहकारी गेली तीस वर्षे शाळा समाजाच्या चौकटीत राहून नाविन्यपूर्ण काही देता येते का, या विचारधारेतून चालवत आहेत. दरम्यान, तेथे कॉलेजही सुरू झाले आहे. त्यांची धारणा शिक्षणाची प्रयोगशाळा, प्रयोगशाळेची कार्यशाळा आणि कार्यशाळेची उद्योगशाळा झाली पाहिजे अशी आहे. शिक्षण ‘प्रॉडक्टिव’ असले पाहिजे. पाचवीतील विद्यार्थ्यालासुद्धा वाटले पाहिजे, की त्याला पण काहीतरी करता येते. तो त्याच्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकतो. ते विद्यार्थ्यांना सांगतात, “नोकर बनण्याचे स्वप्न बघू नका. मालक बनण्याची स्वप्ने बघा.” ते त्याचबरोबर तुकडोजी महाराजांचे एक वाक्य आवर्जून सांगतात, “करावे काय शिक्षण, जे कधी कामास येई ना !” त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी शिकून गावातच उद्योगधंदे सुरू केले आहेत. काही जण शहरात जाऊन- शिकून त्यांच्या गावी उद्योग व शेती करण्यासाठी परत आले आहेत.

दांडेकर यांच्या शाळेत मुलगा-मुलगी असा भेद नाही. मुलीसुद्धा वेल्डिंग व सुतारकाम करतात. तर मुले जेवण, केटरिंग, बेकरी असे उद्योग चालवतात. त्यातून त्यांना पैसे कमावता येतात. त्यांनी शासनाचा अभ्यासक्रम सांभाळून त्यासोबतच मुलींसाठी नर्सिंग, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर असे कोर्स सुरू केले आहेत. ते प्रत्येक मुलाला प्रयोगशील उत्पादक शिक्षण कसे देता येईल याचा विचार करत असतात. दांडेकर सांगतात, “आमच्याकडे प्रत्येक डिपार्टमेंट मुले सुरू करतात व तेच चालवतात. त्याबाबतचे निर्णयही तेच घेतात. म्हणजे काम त्यांनी करायचे आणि निर्णय मी घ्यायचा असे आमच्याकडे नाही. त्यामुळे कामाला आकार येतो आणि ताकद मिळते. मला आमची सगळी मुले, हे सर्व सांभाळताना दिसत आहेत. माझ्या पश्चातही ती हे सगळे नक्की सांभाळतील.”

त्यांनी त्यांचा चांगला चाललेला वैद्यकीय व्यवसाय एके दिवशी पूर्णपणे सोडून दिला; बारा वर्षे केलेली प्रॅक्टिस एका दिवसात बंद केली ! तेव्हा त्यांच्या मुलीने त्यांना विचारले, “बाबा, आता तू काय करणार? इतके दिवस मी सांगायचे, की माझे बाबा डॉक्टर आहेत. आता मी काय सांगू?” तेव्हा ते म्हणाले, “माझे बाबा शेतकरी आहेत, असे सांग.” राजाभाऊंना स्वत:ला ‘मी डॉक्टर आहे’ असे सांगण्यापेक्षा ‘मी शेतकरी आहे’ हे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो. दुसरे असे, की ते स्वतःला भिकारी समजतात. ते म्हणतात, “लोकांसाठी भीक मागण्यात मला काहीच वाटत नाही.” पुढे ते सांगतात, “आपल्या परंपरेतच असे आहे, की अन्न जरी मिळवायचे झाले तरी भिक्षा मागून अन्न मिळवावे. जो व्रती आहे, त्याने भिक्षा मागावी. भिक्षा मागितल्याने अहंपणा संपतो.” ते खांद्याला झोळी लावून नित्य याच कामी फिरत असतात.

त्यांनी ग्राम आरोग्य सेविका दापोलीच्या बत्तीस गावांमध्ये तयार केल्या आहेत आणि प्रत्येक गावात एक नर्सिंग किट दिले आहे. रेणू या प्राध्यापक असतानाही त्यांनी बी एड केले, कारण घरात शाळा काढायची तर त्यासाठी फुकट शिक्षक हवा. बी एड झाल्यावर गावाकडे जाण्याचे ठरले तेव्हा त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. गोठ्यात शाळा, दवाखाना व संसार सुरू झाला. रेणू या खेड्यात कधी राहिल्या नव्हत्या. त्यांना चुलीवरील स्वयंपाकही येत नव्हता. पण त्या ते सगळे शिकल्या. त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळेत शिकून मोठमोठ्या हुद्यांवर आहेत. काहींनी गावातच उद्योगधंदे सुरू केले आहेत. त्याचबरोबर ते त्यांची शेतीही करतातच. राजाभाऊंनी वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना कधी शिकवले नाही. त्यांनी मुलांशी दोस्ती केली. त्यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांच्याशी गप्पा मारल्या. तेव्हा विद्यार्थी मोकळे व्हायचे व त्यातूनच त्यांना असे समजले, की जे काही करायचे ते प्रत्यक्ष कृतीतून करावे. चाकोरीत राहून चाकोरीबाहेरचे शिक्षण देता येते. शासनमान्य तेच करायचे. ‘ग्राम विकास’ शिक्षणाच्या माध्यमातून करायचा ! उमलत्या वयापासूनच मुलांना ग्रामीण पुनर्रचनेचे धडे देण्यास हवेत. राजाभाऊ व रेणू दांडेकर यांनी चिखलगावची परिस्थिती गेल्या तीस वर्षांत बदलली. त्यांनी ‘आदर्श शाळा व आदर्श शिक्षणपद्धत’ चिखलगावातील शाळेद्वारे नावारूपाला आणली आहे.

राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांची मुलगी मैत्रेयी हिचे लग्न झाले आहे. ती आणि तिचे पती आर्मीत मेजर पदावर कार्यरत आहेत. तर दांडेकर दाम्पत्याचे चिरंजीव कैवल्य हे वकील आहेत. ते लोकसाधना या संस्थेची धुरा वाहतात. कैवल्य यांच्या पत्नी धनश्री यांनी सायकॉलॉजीची पदवी मिळवली आहे. त्या शिक्षिका आहेत. राजाभाऊंच्या पाच पिढ्या या सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.

सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com

——————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here