अनाहत शंकरा (Raga Shankara)

अनाहत या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ आहे, स्वयंभू, ज्याच्यावर कसलाही आघात झालेला नाही असा. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातला शंकरा हा राग हा असाच एखाद्या स्वयंभू, बलदंड खडकाप्रमाणे आहे. या रागाची माहिती करून देत आहेत डॉ. सौमित्र कुलकर्णी. शास्त्रीय संगीताविषयीच्या त्यांच्या लेखमालिकेतला हा चौथा लेख. जिज्ञासूंच्या सोयीसाठी त्यांनी शंकरा रागातल्या बंदिशींच्या यू-ट्यूबवर उपलब्ध असलेल्या लिंक्स दिल्या आहेत त्यामुळे रागाचे स्वरूप समजून घ्यायला मदतच होईल.

‘मोगरा फुलला’ या दालनातले इतर लेख वाचण्याकरता येथै क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

अनाहत शंकरा 

शंकरा! रात्री गायचा, प्रामुख्याने रौद्र आणि वीर रसाचा राग! उत्तरांगप्रधान असल्यामुळे अधिकच तडफदार आणि तेज:पुंज स्वरांच्या लडींनी व्यापलेला! उत्तरांगप्रधान म्हणजे ज्या रागाचा विस्तार प्रामुख्याने सप्तकाच्या वरच्या स्वरांमध्ये होतो. साधारणपणे ‘प’ ते वरच्या ‘सा’ या स्वरांमध्ये होतो, तो राग.

शंकरा रागाचे आणि माझे नाते हे फार लहानपणापासूनचे आहे. विदुषी मालिनी राजूरकर यांच्या वाशी येथील मैफलीतील शंकरा रागाचे ध्वनिमुद्रण माझ्या आई-वडिलांनी करून ठेवले होते. विस्तृतपणे मांडलेला तो शंकरा मी अजूनही अनेकदा ऐकतो. ‘सो जानू रे जानू’ हा पारंपरिक ख्याल, ‘सावन डो म्हाने भायो’ ही द्रुत व अतिद्रुत लयीतील तराणा; सर्वच एकापेक्षा एक सरस! त्यातली द्रुतगती आणि मालिनीताईंचा वीरश्रीयुक्त स्वर यावर मी डोलत बसे. तेव्हा माझ्या आजीने सैगलचे ‘रुमझुम रुमझुम चाल तिहारी’ हे गाणेदेखील शंकरांमध्ये आहे असे सांगितले होते.

यानंतर ऐकला तो पं. उल्हास कशाळकर आणि विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला शंकरा!  रागाला साजेसे, तडफदार; पण आक्रस्ताळेपणाचा लवलेशही नसलेले असेच या दोन्ही गायकांनी मांडलेल्या शंकराचे रूप ! ‘अनाहत नाद’ हा प्रसिद्ध ख्याल! त्याला जोडून उल्हासजींनी ‘सुनो जगदीश पियारे ‘ही द्रुत ; तर वीणाताईंनी अत्यंत प्रसिद्ध अशी ‘शंकर भंडार डोले’ ही बंदिश गायली आहे. वीणाताईंचा तराणाही अप्रतिमच !

शंकरा रागाच्या उत्तरांगप्रधान स्वभावामुळे असेल; पण यात फार सुंदर द्रुत चिजा आणि तराणे आहेत. प्रभाताईंची ‘शिव हर हर महादेव शंकर’ ही बंदिश, कुमारजींची ‘सिर पे धरी गंगा’ ही चीज, भीमसेन जी गायचे ती, ‘कल ना परे’ आणि डॉ विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांनी बांधलेला तराणा ही काही उदाहरणे!

रागाच्या नावामुळे असेल कदाचित; पण यामध्ये प्रामुख्याने शंकर या दैवताला उद्देशून किंवा एकंदरीत भक्तिरसप्रधान रचना आढळतात. तरीही काही वेगळ्या विषयांवर आधारित रचनासुद्धा ऐकायला मिळतात. ‘मलिका-ए-मौसीक़ी’ रोशन आरा बेगम यांचा शंकरा एकेकाळी सुप्रसिद्ध होता. त्या ‘झूलना झुला दे आई ऋत सावन की’ ही बंदिश सुरेख मांडत. अश्विनीताईंनी ही १५ मात्रांच्या सवारी तालात ‘बचन लई के मैं हारी’ अशी रचना केली आहे. सहज जाता जाता, मौसीक़ी हा मूळचा फारसी भाषेतला शब्द, त्याचा अर्थ संगीत. ग्रीक, लॅटीन असा प्रवास करत करत इंग्लिशमध्ये तो म्युझिक झाला.

आता ही झाली विविध बंदिशींची चर्चा! पण राग हा बंदिशींसाठी नसतो; तर बंदीश रागासाठी असते, हे गानसरस्वती किशोरीताईंचं वाक्य समजायला आणि त्या अनुषंगाने रागाच्या अंतरंगात डोकावण्याचा, त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे लक्षात यायला, अनेक वर्षे जावी लागली आणि त्यानंतर द्रुत चिजा आणि तराण्यांनी झपाटलेला मी, फक्त विलंबित ख्यालांमध्ये रमू लागलो. यातूनच मग शंकराचे ‘सा  ग प नि ध सा ‘ हे स्वर, अल्प वापरला जाणारा ‘रे’ व ‘ध’, तसेच ‘पsरे ग रे सा’ ही वारंवार येणारी जागा इत्यादी गोष्टी कळू लागल्या. हंसध्वनी, मालश्री व काही अंशी जयत कल्याण या रागांशी असलेले शंकरा रागाचे साधर्म्यही लक्षात येऊ लागले.

माझ्या गुरू प्रा.सुलभा पिशवीकर यांनी किशोरीताईंच्या शंकराबद्दल लिहिले आहे, ‘ताईंच्या मैफलीमध्ये शंकरा आला, तो सुरांचे तळपते झेले लेऊन’. साहजिकच किशोरीस्पर्शाचा शंकरा ऐकायची इच्छा झाली परंतु यूट्यूबवरील १७ मिनिटांची एक क्लिप वगळता दुर्दैवाने किशोरीताईंच्या शंकराचे ध्वनिमुद्रण उपलब्ध नाही. तरीही त्या १७ मिनिटांतदेखील रागाच्या शक्यतांचा मुळापासून केलेला विचार, स्वरांच्या लगावाची सूक्ष्मता आणि अत्यंत तयार गळा असतानाही रागाची सर्व भाववैशिष्ट्ये फक्त विस्तृत आलापीतून किती सुरेख साकारली गेली आहेत; हे जाणवल्या वाचून राहात नाही. ‘अनाहत आदिनाद को भेद’ ही उस्ताद अल्लादियां खांसाहेबांची बंदिश मांडताना ताई नुसत्या स्वरलगावातून रागाचा रौद्र रस, तडफदार स्वभाव कसा दाखवतात; हे ज्याने त्याने अनुभवावे. ते शब्दातीत आहे. पुढे एका खाजगी कॅसेट वरील बरेचसे सदोष, पण काही प्रमाणात जपलेले, असे ध्वनिमुद्रण मिळाले. सुदैवाने त्यात द्रुत बंदीशही होती. मी आधी उल्लेखिलेली ‘सुनो जगदीश पियारे’ हीच ती बंदिश! ताईंच्या आविष्काराने सजलेली ही बंदीश ऐकून मी पुन्हा त्या बंदिशीच्या प्रेमात पडलो. अवाजवी लयकारी, तानांचे सट्टेच्या सट्टे असे काहीही न करतादेखील शंकरा कसा उभा करायचा हे ताईंचे ऐकून शिकण्यासारखे आहे. जसे कुमारजी म्हणतात, तसे रागाचे प्रोफाइल रंगवता आले पाहिजे.

यात एक किस्सा सांगावासा वाटतो तो असा, की शंकरा आणि हंसध्वनी हे एकमेकांशी साधर्म्य असलेले राग! सोलापूरचे संगीत रसिक व मर्मज्ञ प्रा श्रीराम पुजारी यांनी या दोन्ही रागांच्या छटा दाखवत बांधलेली शिवस्तुती मला सुलभाताईंनी शिकवली आणि ती मी एका छोटेखानी कार्यक्रमात गायलोदेखील! गमतीने त्याचा राग शंकराध्वनी आहे असे मी म्हणतो.

तसे पाहता शंकराचे स्वतःचे अस्तित्व असे आहे की, त्याचे जोडराग फारसे नाहीत. पण ग्वाल्हेर घराण्यात ‘शंकरा बिहाग’ गायला जातो आणि जयपूर अत्रौलीमध्ये ‘आडंबरी केदार!

शंकरा रागात गाणी तशी फार आहेत असे म्हणता येणार नाही. नाही म्हणायला वर उल्लेख केलेले सैगल यांचे गाणे यात आहे. मराठी गाण्यांपैकी गीतरामायणातले ‘मार ही त्राटिका रामचंद्रा’ हे गाणे शंकरा रागात आहे. ‘विलोपले मधुमीलनात या’ हे नाट्यपद तसेच ‘आज जिंकीला गौरीशंकर’ हे गजानन वाटवे यांचे गीत शंकरा रागाच्या छायेतील आहेत. गंमत म्हणजे ‘गोंधळात गोंधळ’ या मराठी चित्रपटातले ‘अग नाच नाच नाच राधे उडवूया रंग’ हे प्रसिद्ध गाणेदेखील शंकरा रागावर आधारित आहे.

असा हा शंकरा जितक्या वेगाने मैफलीत येतो, तितक्याच वेगाने लुप्तही होतो; पण मनावर चिरकाल टिकणारा परिणाम सोडून जातो हे निश्चित! जिज्ञासूंच्या सोयीसाठी यू-ट्यूबवर उपलब्ध असलेल्या बंदिशींच्या लिंक सोबत दिल्या आहेत. त्या ऐकून रागाचे स्वरूप तर स्पष्ट होईलच पण ऐकणारे त्या रागाच्या प्रेमात पडतील हेही नक्की!

  1. विदुषी मालिनी राजुरकर
  2. पंडित उल्हास कशाळकर
  3. विदुषी वीणा सहस्रबुद्धे
  4. किशोरी आमोणकर

डॉ. सौमित्र कुलकर्णी 9833318384

saumitrapk94@gmail.com

About Post Author

18 COMMENTS

  1. अप्रतिम लिहिलंय. संगीतशास्त्र सर्वसामान्यांना ज्ञात नसले तरी हा लेख वाचल्यानंतर प्रत्येकला खालच्या लिंक्सवर जाऊन शंकराची अनुभूती घेण्याची इच्छा होईल.

  2. शंकरा रागाची माहिती डॉ सौमित्र कुलकर्णी यांनी सुटसुटीत शब्दात करून दिली आहे. त्यांचं अभिनंदन. त्यांची भाषा स्पष्ट व स्वच्छ आहे.
    जिरे आणि बडीशेप तसंच मोहरी आणि नाचणी दुरून पाहिल्यास एकेकदा गफलत होऊ शकते, ओळखायला. तीच गत शंकरा आणि हंसध्वनी या रागांची. जाणकारच ओळखू शकेल इतकी. हंसध्वनी हा माझा आवडता राग. सौमित्रने हंसध्वनी आणि शंकराशी साम्य असलेल्या इतर रागांचीही नावे आवर्जून दिली आहेत.
    आपल्या गुरू आदरणीय सुलभाताई यांच्याकडून सौमित्रने संगीत व त्यातील बारकावे शिकून घ्यावेत. लिहून आम्हांलाही असाच आनंद द्यावा.
    युवी पिढी संगीताचं जतन करत आहे. ही आनंदाची बाब आहे.
    मित्रा, अऩेक शुभाशिर्वाद.

  3. उत्तम व माहितीपूर्ण लेखन. हल्ली कमी ऐकायला मिळणाऱ्या शंकरा रागाचं, कुठेही शास्त्रोक्त विवेचनाचा समावेश असून सुद्धा फक्त बौद्धिक किंव्हा boring न वाटणारं आणि सामान्य श्रोत्यांमध्ये विविध गान प्रकारांच्या उदहरणामुळे एकूणच शंकरा रागा प्रती कुतूहल निर्माण करणारं लेखन.

    • धन्यवाद साई! तुझ्यासारख्या कलाकाराची दाद महत्त्वाची!

  4. डॉ सौमित्र यांचा लेख अतिशय अप्रतिम आहे..मी शास्त्रीय संगीताची फक्त श्रोता आहे,तीही जाणकार नाही, सामान्य श्रवणसुखाचे समाधान लाभलं तरी खूप खुश होणारी.कानाला आणि मनाला गोड लागेल, रुचेल ते संगीत ऐकणे, हेच करणारी….
    शास्त्रीय संगीत शिकायला मिळालं नाही हे दुर्दैव…असो..
    सौमित्र यांनी फारच सुरेख विवेचन केले आहे शंकरा रागाचे, खूप छान समजून आले…एक फक्त शंका आहे..
    जुन्या पिढीतील संगीत अभिनेत्री सुमती टिकेकर, यांनी, वरदान, नाटकात उत्तम गायलेलं,अनाहत नाद उठे गगनी,हे पद गायले होते.त्या गदिमांच्या गीताला डॉ वसंतराव देशपांडे यांचं संगीत होतं,ते गीत शंकरा रागातलच आहे कां,एवढीच शंका आहे…कारण हा लेख वाचून त्या क्षणी हे नाट्यगीत आठवलं आणि माझ्या स्मरणशक्तिचं मलाच जरा कौतुक वाटलं…
    फारच सुंदर लेख वाचायला मिळाला तुझ्यामुळे, शिरीन,याबद्दल मनापासून धन्यवाद..

  5. Dear Saumitra,
    I liked your article. I had learnt to play this raag on flute when I was in school, but only elementary.
    Best wishes,
    Sudhirkaka

  6. फारच सुरेख उलगडला आहे शंकरा. विशेषतः वेगवेगळ्या मैफिलींचे दाखले, बंदिशी, गायनशैली यामुळे लिखाण रंजक झाले आहे. शंकरा आणि बिहाग मधला फरक, शंकरा – हंसध्वनीचा अनोखा मिलाफ या बारकाव्यांमुळे मजा आली. लिखाणाची बढत अशीच राहू दे. शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here