मनकर्णिका ऊर्फ मनू – झाशीची राणी (Queen of Zhansi was Manu before she was adopted)

2
268

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न, द.ब. पारसनीस यांनी लिहिलेले पहिले चरित्र प्रसिद्ध झाल्यानंतर (1894) पुढील शेसव्वाशे वर्षांत अनेक लोकांनी विविध अंगांनी केला आहे, त्या सर्वांमध्ये प्रतिभा रानडे यांचे ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ हा चरित्र ग्रंथ सर्वांगसुंदर आहे. त्या वेळच्या लोकांच्या भावना; तसेच, आजूबाजूची परिस्थिती (लोकांच्या मनावरील धार्मिक भावनांचा पगडा) याचे उत्तम दर्शन त्या पुस्तकामधून घडते. ते पुस्तक पुण्याच्या राजहंस प्रकाशबाईंचे नाने 2003 मध्ये प्रसिद्ध केले.

राणीचे वडील मोरोपंत तांबे हे मूळचे खानदेशातील पारोळे गावचे रहिवासी. तेथे त्यांची शेती व इनाम जमिनी होत्या. परंतु मोरोपंत ते सर्व सोडून पुण्याला पेशव्यांकडे नोकरीसाठी आले. तो काळ उत्तर पेशवाईचा होता. मराठी साम्राज्य अस्तंगत होण्याच्या वाटेवर होते. त्या वेळी पेशव्यांच्या गादीवर दुसरा बाजीराव होता, पण मोरोपंत तांबे यांनी दुसऱ्या बाजीरावाऐवजी त्यांचे बंधू (दुसरे)चिमाजी अप्पा यांच्याकडे नोकरी पत्करली.

इंग्रजांनी मराठी राज्य खालसा करून दुसऱ्या बाजीरावाची रवानगी कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे केली होती. त्याबद्दल त्यांना आठ लाख रुपये पेन्शन दिले. बाजीरावाबरोबर दोनशे मराठी कुटुंबे विविध सेवा करण्याकरता ब्रह्मावर्ताला गेली. इंग्रजांनी त्यांना पाच-सहा मैलांचा प्रदेश तोडून दिला. तेथे बाजीरावांनी स्वतःसाठी राजवाडा व इतर लोकांसाठी घरे बांधली.

त्याच वेळी इंग्रजांनी चिमाजी अप्पांना पुण्याच्या आजूबाजूची पंधरा ते वीस लाख रुपये उत्पन्नाची गावे व पुणे शहर देण्याची तयारी दर्शवली, पण चिमाजी अप्पांना काशीला जाण्याची व संन्यास घेण्याची ओढ होती. त्यांनी तसेच केले. साहजिकच, मोरोपंत चिमाजी अप्पांबरोबर काशीला गेले. चिमाजी अप्पांचे निधन काशीलाच 1832 साली झाले. तोपर्यंत मोरोपंतांनी लग्न करून काशीला बिऱ्हाड केले होते. त्यांना एक छोटी मुलगी झाली होती. ती काशीला जन्माला आली म्हणून तिचे नाव मनकर्णिका (गंगा नदीचे एक नाव) ऊर्फ मनू असे ठेवले.

चिमाजी अप्पांच्या मृत्यूनंतर मोरोपंतांनी ब्रह्मावर्ताला जाऊन बाजीरावाची भेट घेतली. मोरोपंत चिमाजी अप्पांकडून आलेले असल्यामुळे बाजीरावांनी मोरोपंतांना होमशाळेत मुख्य पुजाऱ्याच्या मदतीस ठेवून घेतले. मोरोपंतांच्या पत्नीचे ब्रह्मावर्ताला निधन झाले. मुलीची जबाबदारी मोरोपंतांवर पडली. त्या वेळी ती चार-पाच वर्षांची होती. दुसऱ्या बाजीरावाने ब्रह्मावर्ताला आल्यावर सहा मुले (तीन मुलगे व तीन मुली) दत्तक घेतली होती. त्यामध्ये मनकर्णिका ऊर्फ मनूही होती अशी एक कथा आहे. मनू चुणचुणीत, देखणी, गोरी, उंच पण बारीक अंगाची होती. ती नेहमी मुलांबरोबर खेळत असल्यामुळे तिला मर्दानी खेळांची गोडी लागली. बाजीरावाकडे मुलांना स्वातंत्र्य होते. साहजिकच, मनू खेळाबरोबर घोडेस्वारी, तलवारबाजी वगैरे, योद्ध्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टी शिकली.

बाजीरावांच्या दत्तक मुलांची नावे म्हणजे सर्वात मोठे धोंडदेव ऊर्फ नानासाहेब, दुसरे बाळासाहेब व तिसरे रावसाहेब अशी होती. त्यांपैकी नानासाहेब व रावसाहेब यांनी 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला. रावसाहेब पेशव्यांच्या सैन्याचे सेनापती झाले, खरे; पण त्यांच्यात नेतृत्व गुण नव्हते. त्यामुळे ते पेशव्यांची लढाऊ व मोठी फौज असूनसुद्धा जिंकू शकले नाहीत. त्यांना ब्रिटिशांनी फासावर दिले. नानासाहेब नेपाळला निघून गेले ते परत आलेच नाहीत. पुढे, ब्रिटिशांनी त्यांचा राजवाडा खणून काढला. अशा तऱ्हेने, पेशव्यांचे शंभर वर्षांचे मराठी राज्य अस्तंगत झाले.

पुढे, ब्रिटिश राणीने जाहीरनामा काढून ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचे राष्ट्रीयीकरण केले. हिंदुस्थान ब्रिटिश साम्राज्याचे एक अंकित राष्ट्र झाले.

झाशीच्या राणीबद्दल इतिहासकारांनी नेहमी गौरवानेच लिहिले आहे – राणीच्या मृत्यूनंतर पाठोपाठ, 1869 साली तिच्यावरील पहिला पोवाडा कल्याणसिंह कुडेरा यांनी रचला. तो ‘लक्ष्मीबाई रासो’ म्हणून प्रसिद्ध आहे. झाशी दरबारचा चित्रकार सुखदेव यांनी राणी लक्ष्मीबाईंना प्रत्यक्षात पाहिले होते. सुखदेवने गंगाधरराव आणि लक्ष्मीबाई यांची बुंदेलखंडी शैलीत अनेक चित्रे काढली आहेत. वृंदावनलाल वर्मा यांनी ‘झांसी की रानी – लक्ष्मीबाई’ ही कादंबरी हिंदीमध्ये लिहिली आहे, ती प्रसिद्ध 1946 साली झाली. त्या कादंबरीवर ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. वृंदावनलाल यांचे आजोबा युद्धाच्या वेळी राणीच्या सैन्यात होते. त्यांच्या आठवणी हा वृंदावनलाल यांच्या कादंबरीचा मुख्य आधार आहे. सिकंदर, सोहराब-रुस्तम यांसारख्या ऐतिहासिक अशा भव्य चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या सोहराब मोदी यांनी ‘झांसी की राणी’ हा चित्रपट काढला आहे, तर वि.वा. शिरवाडकर-कुसुमाग्रज यांच्यासारख्या नावाजलेल्या नाटककाराने लक्ष्मीबाईंच्या जीवनावर ‘वीज म्हणाली धरतीला’ हे नाटक लिहिले. आधुनिक काळात स्त्री-स्वातंत्र्याच्या चळवळीतील स्त्रियांना झाशीची राणी ही स्त्रीमुक्तीची प्रतीक वाटते. एखादी छोटी मुलगी, बाई स्वतंत्र वृत्ती दाखवू लागली की लोक तिचा उल्लेख ‘झाशीची राणी’ असा कौतुकाने करतात.

‘केसरी’चे संपादक नरसिंह चिंतामण केळकर यांनीही 1940 साली फ्रान्सच्या जोन ऑफ आर्कचे चरित्र लिहिताना त्याला नाव दिले, ‘फ्रान्सची झाशीवाली’. कारण झाशीवाली म्हटले, की सर्व गुणांची ओळख पटते ! केळकर यांना राणी लक्ष्मीबाईंपेक्षा जोन श्रेष्ठ वाटते, कारण ती फ्रान्ससाठी लढली, स्वार्थासाठी नाही. परंतु पुस्तकाच्या शेवटी ते म्हणतात, “हिंदुस्थानावर परकी अंमल असल्यामुळे खरी वीरवृत्ती चेतवणारे, स्वदेशस्वातंत्र्याला पोषक असे वाङ्मय लिहिता येत नाही ही गोष्ट पुष्कळशी खरी आहे. कायदा लेखणीला पदोपदी मागे ओढतो. अशा स्थितीत स्वत: इंग्रज लोक ज्या स्त्रीचे गुण घेतात त्या जोनचे चरित्र आमच्या तरुण मुलामुलींना वाचण्यास हाती दिले तर ते कायद्याचा काच टाळून, देशप्रेमाची स्फूर्ती त्यांच्या मनात उत्पन्न करू शकेल अशी अपेक्षा आहे व ती सफळ होवो अशी प्रार्थना आहे.” म्हणजे केळकर यांना हिंदुस्थानी लोकांच्या मनात स्वातंत्र्याची ऊर्मी जागण्यासाठी झाशीच्या राणीचे चरित्र लिहिण्याऐवजी परक्या जोनचे चरित्र लिहावे लागले. कारण इंग्रजांशी लढणाऱ्या फ्रेंच जोनबद्दल चारशे वर्षांनी इंग्रजांचे मत बदलले होते. इंग्रजांनी तिला संतपद दिले होते !

लक्ष्मीबाईंचा जन्म काशीला गंगानदीच्या घाटावरील एका घरात झाला होता. राणी ज्या जागी मृत्युमुखी पडली ती जागा 1929 साली हिंदुस्थानच्या पुरातत्त्व खात्याने शोधून काढून, तेथे समाधीचा एक लहानसा चौथरा बांधला आहे. त्या जागी राणी लक्ष्मीबाईंचे स्मारक व्हावे अशी झाशीवाल्यांची इच्छा होती. त्यासाठी येणारा खर्च करण्याची जबाबदारी झाशीवाल्यांनी घेतली. परंतु ग्वाल्हेरकरांनी त्याला परवानगी दिली नाही. कारण तसे केल्यास इंग्रज सरकारचा रोष ओढावेल असे त्यांना वाटले असावे. पडझड झालेला चौथरा तसाच राहिला. त्या जागी खरेखुरे स्मारक होण्यास 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वेळच लागला. झाशीच्या राणीच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना तेथे 1962 साली झाली. कल्याणचे शिल्पकार सदाशिव साठे यांनी तो अनुपम सुंदर पुतळा केला आहे. मूळच्या समाधी स्मारकाचा चौथरा नव्याने बांधला गेला. स्मारकाच्या शिळेवर भा.रा. तांबे यांच्या कवितेतील दोन ओळी कोरून ठेवल्या आहेत –

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी | अश्रू दोन ढाळी |
ती पराक्रमाची ज्योत मावळे | इथे झाशीवाली: ||

ब्रिटिश सेनापती सर एडविन अर्नॉल्ड यांनी म्हटले आहे, “जी स्त्री (पती निधनानंतर) राज्यकारभार चालवण्यास असमर्थ आहे म्हणून तिचे राज्य आम्ही खालसा केले, ती स्त्री एका प्रचंड सैन्याचे आधिपत्य स्वीकारण्यास समर्थ आहे ही गोष्ट आम्हाला नंतर उमजली.”

लेखक टॉरेन्स याने ‘एम्पायर इन इंडिया’मध्ये म्हटले आहे, “सन 1857 च्या क्रांतियुद्धात मदत झडू लागताच राणी पुरुषी वेषांत घोड्यावर स्वार होऊन तिच्या हजारो सैनिकांची नेता बनली व तिच्या शौर्याने ‘जोन ऑफ आर्क’ बनली. मुख्य सेनापती सर ह्यु रोज यांच्या सैन्याची त्रेधातिरपीट इतकी इतर कोणीही उडवली नाही. अनेक तास घनघोर युद्ध झाले तरी राणी कधी निराश झाली नाही. अपयश आले म्हणून त्या व्यक्तीचे प्रयत्न खोटे ठरत नाहीत. व्यक्तीचे महत्त्व ठरते ते त्या व्यक्तीने नियतीचे आव्हान कसे स्वीकारले यावर. त्या व्यक्तीचे हे प्रयत्न दैदिप्यमान असतील तर तेही त्याचे यश असते.”

पारसनीस यांच्या पुस्तकावर लिहिताना, लोकमान्य टिळक यांनी त्या काळाप्रमाणे एक खोच मारली होती. ते राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल म्हणतात, “स्त्रीस्वभावाच्या साहजिक कोतेपणाने ती कोणाच्या तरी नादी लागून पुढे बंडवाल्यांत अग्रगण्य झाली, ते आपणांस कबूल केले पाहिजे… लक्ष्मीबाई किती झाली तरी माणूस, त्यातून स्त्रीजात व त्यात मानी स्वभावाची असून, डलहौसीसारख्या अधाशी गव्हर्नरच्या जुलमाने गांजलेली; तेव्हा तिच्या हातून एखादी राजकारणी चूक झाली असली तरी त्याबद्दल कोणी सुज्ञ मनुष्य तिला फारसा दोष देणार नाही. ‘एको हि दोषो गुणसन्निपाते’ या न्यायाने तिच्या विमल कीर्तीस तेणेकरून बिलकूल डाग लागत नाही व इंग्रज ग्रंथकार काही भकले तरी महाराष्ट्र लोकांस असले अद्वितीय स्त्रीरत्न आपल्यात निर्माण झाल्याबद्दल जो अभिमान वाटतो तो यत्किंचितही कमी होणार नाही.”

प्रतिभा रानडे त्यावर लिहितात, “युद्धानंतर सदतीस वर्षांनी लिहिताना, टिळक यांनी राणी लक्ष्मीबार्इ यांचे मन:पूर्वक कौतुक केले, त्याच वेळी त्यांनी इंग्रजांविरूद्ध युद्ध केले ही ‘एखादी राजकारणी चूक’ केली त्याचा दोष त्यांच्या ‘स्त्री स्वभावाच्या साहजिकच कोतेपणाला’ दिला आणि एका अर्थी, त्या ‘दोषा’तून अंशत: त्यांची मुक्तताही केली. कारण त्या काळी, ‘स्त्रिया या कोत्या मनोवृत्तीच्या असतात, त्यांच्यामध्ये संपूर्ण परिस्थितीचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता नसते, त्यांना राजकारण कळत नाही’ या विचारांचा पगडा समाजावर होता. टिळक हेही त्यातून सुटले नव्हते; की त्यांचा तो प्रयत्न राणीला इंग्रजांच्या दृष्टिकोनातून दोषमुक्त करण्याचा होता?

– प्रभाकर भिडे 9892563154 bhideprabhakar@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here