वर्ध्याचे पुलगाव : माझे माहेरगाव (Pulgaon of Wardha – My childhood)

34
1482

माझे पुलगाव हे माझ्या जिवाभावाचे गाव. या गावाशी असलेले माझे नाते अजोड आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे त्या गावाने पाहिले आहेत. माझे लहानपण, शिक्षण, लग्न या महत्त्वपूर्ण दिवसांचे ते साक्षीदार आहे. म्हणूनच पुलगाव सोडून पन्नास वर्षे झाली तरी त्या गावाशी असलेली माझी नाळ तुटलेली नाही. त्या गावाने मला आयुष्यभराचा लळा लावला आहे.

पुलगाव हे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात वसलेले गाव. गावाच्या लगत वर्धा नदी आहे. त्याच नदीच्या पाण्याचा पुरवठा गावाला व कॅम्पमधील वसाहतींना होतो. ती नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. कधी तरी पूरपरिस्थिती निर्माण होते व किनाऱ्यावरील लोकांना स्थलांतर करावे लागते. वर्धा नदीवर एक मोठा पूल आहे. तसे गावात बरेच छोटे-छोटे पूल आहेत. त्यामुळे त्या गावाला पुलगाव हे नाव पडले असावे. गावात सुती कापडाची मोठी गिरणी होती. तिचे नाव ‘एम्प्रेस मिल’. ती गावातील अर्ध्याअधिक लोकांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन होती. त्या मिलमध्ये पुरुष अणि स्त्रिया मोठ्या संख्येने काम करत. ‘मिलचा गणपती’ परिसरात प्रसिद्ध होता. तेथील सजावट आणि रोषणाई प्रेक्षणीय असे. तो उत्सव दहा दिवस चालत असे. आम्ही एक दिवस तरी रोषणाई बघण्यास जात असूच. खूप मजा येई.

‘सेंट्रल अॅम्युनेशन डेपो’ हे पुलगावचे वैशिष्ट्य आहे. त्या डेपोमुळे माझे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले. ब्रिटिशांनी त्या डेपोसाठी पुलगावची निवड केली होती. तो आशिया खंडातील मोठा डेपो मानला जातो. पुलगाव डेपो स्टेशनपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर वसलेला आहे- झाडाझुडुपांत लपलेला आहे. सभोवताली जंगल परिसर आहे. सहजासहजी शत्रूच्या नजरेत येणार नाही अशीच त्याची रचना आहे. ठिकठिकाणी दारूगोळा साठवण्यासाठी शेड बांधलेल्या आहेत. एक वेगळी रेल्वेलाईन तेथपर्यंत जाते; मालगाडीतून दारूगोळा नेला जातो आणि तेथे साठवला जातो.

माझे वडील त्या डेपोत नोकरीला चाळीसच्या दशकात लागले. त्यांनी डेपोत 1975 पर्यंत काम केले. त्या दरम्यान, आम्ही सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो. दिवसाची सुरुवात सकाळी सातच्या सायरनने होई. आठचा सायरन झाला, की ‘कामावर जाणाऱ्या लोकांची लगबग सुरू होई. जेवणाचा डबा घेऊन कोणी सायकलने तर कोणी पायी जात असे. तेथे काम करणारे लोक एकमेकांना बाबू म्हणून संबोधीत. जागोजागी मिलिटरीच्या चौक्या होत्या. त्यामुळे वातावरण शिस्तबद्ध होते. स्वच्छ डांबरी रस्ते होते. रस्त्यांवरून मिलिटरीच्या गाड्या फिरताना दिसत. मिलिटरी गणवेशात असलेले शिपाई येता-जाता नजरेस पडत, पण त्यांची भीती वाटत नसे. सुरक्षित वाटे !

डेपोत काम करणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या सरकारी कॉलनी उभारल्या होत्या-एस पी कॅम्प, लेबर कॅम्प, वॉच अॅण्ड वार्ड, इ पी बॅरेक्स, ऑफिसर्स लोकांसाठी वेगवेगळी बंगलो टाइप घरे अशा. एस पी कॅम्पची कॉलनी बरीच मोठी होती. काळ्या दगडांचे भक्कम बांधकाम असलेल्या चाळी होत्या. प्रत्येक चाळीत दहा खोल्या होत्या. वातावरण शांत आणि प्रसन्न होते. कामासाठी आलेले लोक भारताच्या वेगवेगळ्या भागांतील होते-हिंदी-मराठी-पंजाबी-बंगाली-मद्रासी भाषिक असे. ते सर्व जण बाहेरून आलेले असल्यामुळे, एकमेकांशी एकजुटीने वागत असत. सर्व सण-समारंभ मोठ्या उत्साहाने साजरे करत होते. एस पी कॅम्पला मराठी शाळा होती, पण फक्त चौथीपर्यंत. चौथीची परीक्षा बोर्डाची होती. ती परीक्षा वेगळ्या सेंटरमध्ये जाऊन द्यावी लागे. बोर्डासारखे चौथी पासचे प्रमाणपत्र मिळत असे. सेंट्रल स्कूलचा पर्याय उपलब्ध होता, पण सेंट्रल स्कूल वेगळ्या ठिकाणी होते.

एस पी कॅम्पमध्ये एक क्लब होता. तेथे कॅरम, बुद्धिबळ, पत्ते असे बैठे खेळ असत. काहीजण टेबलटेनिस खेळत. क्लबात वर्तमानपत्रे वाचण्यास मिळत. तसेच, रेडिओ असल्यामुळे बातम्या, गाणी ऐकण्यास मिळत. तेव्हा घरोघरी रेडिओ, टी.व्ही. नव्हते. भारताचे चीनबरोबर 1962 ला युद्ध झाले होते. त्या युद्धाच्या बातम्या ऐकण्यासाठी लोक क्लबच्या जवळ गोळा होत ! बाहेरच्या भिंतीवर स्पीकर लावला होता. त्यामुळे युद्धाच्या ताज्या घडामोडी रोजच्या रोज ऐकण्यास मिळत. त्या वेळी कॅम्प परिसरात ब्लॅक आऊट होता. घरातील खिडक्यांच्या काचांना कागद चिकटवले होते- जेणेकरून घरातील प्रकाश बाहेर दिसू नये. शत्रू पक्षाला तेथे डेपो आहे, वस्ती आहे हे कळू नये म्हणून तो युद्धनीतीचा भाग होता. त्यामुळे आमच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत होत होती.

क्लबमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा भरवल्या जात. पाककृती, रांगोळी वगैरे. एकदा अशीच ‘सुदृढ बालक – स्पर्धा’ आयोजित केली होती. ज्यांची बाळे एक वर्षाच्या आतील आहेत, त्या मातांनी त्यांची बाळे घेऊन स्पर्धेसाठी क्लबमध्ये यावे, त्यावेळी माझा भाऊ सुहास चार महिन्यांचा होता, त्याला घेऊन आई क्लबमध्ये गेली. आणि काय आश्चर्य ! त्यालाच पहिल्या नंबरचे बक्षीस मिळाले. तीन पौंड लोकर.

ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या युरोपीयन बायका त्यांचे हात-पाय दाबून बघत होत्या. आणि आपसात इंग्रजीमध्ये काहीतरी बोलत होत्या. त्या प्रसंगाची आठवण आईकडून ऐकायला मिळे. इंग्रज मॅडमच्या हस्ते ‘प्रथम क्रमांकाचे पारितोषिक’ या बातमीने दुर्गे बाबूंचा मुलगा म्हणून त्यावेळी कॅम्पमध्ये ज्याच्या त्याच्या तोंडी सुहासचे नाव होते.

क्लबच्या मागील बाजूस मोठी मेस होती. डेपोत कामासाठी असलेल्या सिंगल लोकांसाठी त्या खाणावळीत जेवणाची व्यवस्था होती. क्लबच्या जवळ सोसायटीचे दुकान होते. तेथे किराणा माल, मातीचे तेल, जळणासाठी लाकडे अशा वस्तू वाजवी दरात मिळत. कॅम्पला लागून असलेल्या शेतात आणखी एक किराणा दुकान होते. त्याचा मालक देवजीभाई होता. आम्ही त्याला झोपडीचे दुकान म्हणत असू. आमची आई किराणा दर महिन्याला त्या दुकानातून भरत असे. परंतु बाकीच्या इतर वस्तू घेण्यास म्हणजे भांडीकुंडी, कपडे यांसाठी गावात जावे लागे.

कॅम्पमध्येच छोटासा दवाखाना होता. तेथे औषध मोफत मिळे. कॅम्पमध्ये रोज सकाळी सात वाजता सायकलवरून एक डबल रोटीवाला येई. डबलरोटी ऽऽऽ असा त्याने आवाज दिला, की आम्ही तो घेत असू, कधी कधी, तो चहात बुडवून खाण्यास मजा येई. तसेच, ‘बुढ्ढी के बाल’ विकणारा माणूस येई. उंच काठीवर बांधलेले गुलाबी- पिवळ्या रंगांचे ‘बुढ्ढीचे बाल’ सुंदर दिसत. ते तोंडात टाकले, की विरघळून जात. उन्हाळ्यात दुपारच्या वेळी घंटी वाजवत आइसफ्रूटवाला येत असे. त्याच्याकडील थंडगार कुल्फीची चव म्हणजे अहाहा ! आम्ही ती चाखली आहे. कॅम्पमध्ये न चुकता एक कल्हईवाला येई. घरोघरी तांब्या-पितळेची भांडी वापरली जात. स्टील एवढे प्रचलित नव्हते. कल्हईवाला भांड्यांना कल्हई करून देण्याचे काम घराच्या समोरच बसून करत असे. अगदी मन लावून तांब्या-पितळेची ती भांडी चांदीसारखी चमचमणारी अशी चकचकीत करून देई. बांगडीवाला, नाक-कान टोचणाराही दारावर येत असे. माझ्या लहानपणी टोचलेल्या कानाचे छिद्र मोठे झाले म्हणून आईने माझे कान पुन्हा दुसऱ्यांदा टोचून घेतले. त्यावेळी मी इयत्ता सातवीमध्ये होते. मला आठवते, मी कान टोचून घेण्यास आनंदाने तयार झाले, पण टोचल्यानंतरच्या वेदनेने तासभर रडत बसले आणि आईवर ओरडत राहिले. माझ्या कानांच्या पाळ्यांवर असलेली दोन छिद्रे अजूनही मला त्या घटनेची आठवण करून देतात.

कॅम्पच्या सभोवताली शेती आणि जंगलाचा भाग असल्यामुळे तेथे साप, विंचू इत्यादी सरपटणारे प्राणी दिसत. एकदा आमच्या घराच्या छातावर एक साप आला. चांगला भला मोठा होता. त्याने केलेल्या विष्ठेमुळे, बाबांचे लक्ष वरती छताकडे गेले. लगेच, बाबांनी आम्हा सर्वांना प्रथम घराबाहेर काढले. आम्ही खूप घाबरलो होतो. कॅम्पमध्येच कुलकर्णी नावाचे सद्गृहस्थ सर्पमित्र म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी सापाची पुढील कार्यवाही व्यवस्थित केली.

कॅम्प परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर कमी प्रमाणात होता. त्याचे कारण म्हणजे त्यांचा विशेष प्रकारे आणि वेळोवेळी केलेला बंदोबस्त. आम्ही लहान असताना, दुपारच्या वेळी एक गाडी येई. त्या गाडीत बंदूकधारी शिपाई असत. कोणीही घराबाहेर न निघण्याची सूचना केली जाई. त्या दरम्यान, दिसलेल्या कुत्र्यांना ते गोळ्या घालत आणि उचलून, गाडीत घालून घेऊन जात, त्यामुळे कुत्रे चावण्याचा प्रकार कॅम्प परिसरात नव्हता. अशा प्रकारचा बंदोबस्त नव्या जमान्यातील श्वानप्रेमींना रुचणार नाही, आपल्यालाही ते निर्दयपणाचे वाटेल, पण घटना सत्य आहे.

कॅम्प परिसरात दोन टेकड्या आहेत. त्या चांगल्याच उंच आहेत. पैकी एक टेकडी अगदी जवळ म्हणजे पाच मिनिटांच्या अंतरावर होती. बरेच लोक टेकडीवर फिरण्यास जात असत. एकदा वर्धा नदीला पूर आला होता. पुराचे ते दृश्य बघण्यासाठी खूप लोक टेकडीवर चढून गेले होते. टेकडीच्या माथ्यावरून सभोवतालचा परिसर आणि पुराच्या पाण्याने भरलेली नदी स्पष्टपणे दिसत होती. दुसरी टेकडी थोडी दूर होती, परंतु आमच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर होती. तिला बहिरम बाबाची टेकडी म्हणत. त्या टेकडीच्या पायथ्याशी बहिरम बाबाचे देऊळ आहे. त्या टेकडीच्या विरुद्ध बाजूला शनी महाराजांचे देऊळ आहे. त्या बाजूने टेकडीवर चढून पार माथ्यावर तिच्या जात असू. तेथून संपूर्ण गावाचा मस्त नजारा दिसे. मग दुसऱ्या बाजूने खाली उतरत असू, ते थेट बहिरम बाबाच्या देवळात. दोन्ही पायथ्यांशी देवळे आणि मधोमध ती टेकडी !

बहिरम बाबाची मूर्ती एका मोठ्या अखंड दगडातून साकारलेली आहे. मूर्तीचा मोठा दगड त्या टेकडीवरूनच घरंगळत खाली आला आणि नंतर त्याला मूर्तीचे स्वरूप देण्यात आले अशी आख्यायिका आहे. मूर्ती घंटेचा आकार असलेली, शेंदूर फासलेली आणि चांदीचे डोळे बसवलेली अशी विलोभनीय आहे. तिच्या दर्शनासाठी बरेच लोक येतात. माझ्या सासुबार्इंनी त्यांना नातू झाल्यावर, तो वर्षाचा होण्याच्या आत त्याला म्हणजे माझ्या मुलाला- परिमलला- देवळात नेऊन त्याचे केशार्पण केले. तेथेच स्वयंपाक करून दहा लोकांना भोजनदान दिले ! त्या देवळाच्या परिसरात गणेशोत्सव, दुर्गापूजा, रामनवमी असे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत. दसऱ्याच्या दिवशी तेथे जत्रा भरे. रावणाचा मोठा पुतळा बनवून त्याचे दहन दूर अंतरावर होई. त्यावेळी फटाक्यांची रंगीबेरंगी आतषबाजी बघण्यास मिळे.

आमच्या मिलिटरी परिसरात सिनेमागृह एकच होते. त्याचे नाव ‘गॅरिसन सिनेमा’. तेथे इंग्रजी, मराठी, हिंदी सिनेमे दाखवत. त्यावेळी सगळे कृष्णधवल सिनेमे होते. ते पाहण्यासाठी गर्दी असे. तिकिट काढण्यासाठी रांग लावावी लागे. बहुतेक शो रात्रीचे असत. रात्रीचे जेवण लवकर उरकून, अनेक स्त्रिया एस पी कॅम्पमधून त्यांची छोटी बाळे कडेवर घेऊन, समूहाने सिनेमा बघण्यास जात. पायी चालत जाण्यास अर्धा तास लागे, पण त्या आवडीने ती रपेट करत.

एस पी कॅम्प आणि इ पी बॅरेक्स यांच्या अगदी मधोमध रस्त्याच्या एका बाजूला बऱ्यापैकी मोठी दुधाची डेअरी होती. तेथे म्हशी भरपूर होत्या. त्या डेअरीत दूध-दही-चीक हे पदार्थ चांगले मिळत. सकाळचे नऊ वाजले की ते डेअरीवाले भैय्ये म्हशींना गोठ्याबाहेर काढत आणि त्यांना रानात चरण्यास नेत. आम्ही सुट्टीच्या किंवा सणासुदीच्या दिवसांत रस्त्याने चालणाऱ्या म्हशींचे शेण गोळा करत असू. अंगणात सडा टाकून झाला, की उरलेल्या शेणाच्या गोवऱ्या थापत असू. सुकलेल्या गोवऱ्या इंधन म्हणून कामी येत.

पुलगावच्या आठवडी बाजाराचा दिवस म्हणजे सोमवार. दर सोमवारच्या या आठवडी बाजारात सर्व वस्तू स्वस्त दराने मिळत. शेतातील ताजा भाजीपाला आणि नदीच्या पाण्याची ताजी मासळी हे त्या बाजाराचे वैशिष्ट्य होते. बाजाराचे ठिकाण दूर गावात असले तरी लोक सायकलने, रिक्षाने किंवा बसने खरेदी करण्यासाठी जात. आमचे आईबाबासुद्धा न चुकता या बाजाराला हजेरी लावत. त्यामुळे दर सोमवारी रात्रीच्या आमच्या जेवणात मच्छी हमखास असे ! एकुलते एक मटणाचे दुकान लेबर कॅम्पला होते. आमची आई दर रविवारी मला आणि सुहासला मटण आणण्यास तेथे पाठवत असे. एस पी कॅम्पपासून लेबर कॅम्प हे अंतर दोन किलोमीटर तरी नक्कीच होते.

कॅम्पमधून गावात जाण्यासाठी एक बस होती, निळ्या रंगाची. तिचा मुख्य थांबा क्लबच्या समोरच्या रस्त्यावर होता. ठरावीक दिवशी, ठरावीक वेळेला ती बस ये-जा करत असे.

लेबर कॅम्पचा परिसर चांगलाच मोठा होता. तेथेही डेपोत काम करणाऱ्या लोकांची वस्ती होती. शिवाय शाळा होती- पाचवी ते दहावीपर्यंत. शाळेचे नाव ‘लेबर कॅम्प हायस्कूल’ असेच होते. आमचा शिक्षकवर्ग अभिमान वाटावा असा होता. त्या शाळेतून मी दहावीची परीक्षा 1967 साली दिली होती. त्या वेळी आठवीपासूनच आर्टस् आणि सायन्स अशा दोन डिव्हिजन केल्या होत्या. सायन्स आणि गणित इंग्रजीतून आणि बाकी विषय मराठीतून शिकवत. गणित, सायन्स घेणाऱ्या त्या वर्षीच्या बॅचमध्ये आम्ही पाच मुली आणि बाकी मुलगे होते.

मी दहावी झाले; त्या वर्षी, पुलगावला ‘सुवालाल पाटणी’ नावाचे आर्टस् आणि कॉमर्स कॉलेज निघाले. कॉलेज गावाच्या बाहेर नाचणगाव रोडवर होते. कॅम्पपासून चार-पाच किलोमीटर अंतर असेल. कॉलेजमध्ये जाण्यासाठी बाबांनी मला लेडीज सायकल घेऊन दिली. मी आणि माझी मैत्रीण इंदिरा फुलझेले, आम्ही दोघी सायकलने जात-येत असू. एकदा आचार्य रजनीश आमच्या कॉलेजमध्ये आले होते. त्यांना प्रत्यक्ष पाहिले आणि त्यांचे उत्तम विचार ऐकले. ते अतिशय विद्वान व्यक्तिमत्त्व होते. कॉलेजमध्ये पहिल्या वर्षी सर्वांना एन.सी.सी. सक्तीचे होते. एन. सी.सी.चा क्लास रविवारी असे. त्यावेळी खाकी रंगाचा गणवेश कॉलेजकडून मिळाला होता. खळ लावलेला, कडक इस्त्रीचा गणवेश घालून परेड करताना अभिमान वाटे. आम्हाला शिकवण्यास येणारे सर मिलिटरी गणवेशात असत. त्यांचे शिकवणे एवढे प्रभावी असे, की त्यामुळे आमच्या मनात देशासाठी प्राणपणाने लढण्याची भावना निर्माण होई. एन.सी.सी.चा दहा दिवसांचा कॅम्प वर्षातून एकदा असे. आमच्या वेळी तो कॅम्प ‘वर्धा’ येथे आयोजित केला होता. एका मोठ्या पटांगणात लहान लहान तंबू ठोकून राहण्याची व्यवस्था केली होती. पहाटे उठणे, लवकर तयार होऊन ट्रेनिंगसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार हजर राहणे या गोष्टी नियमित कराव्या लागत. चुकारपणाला शिक्षा होती. त्या कॅम्पमध्ये एक दिवस ‘रायफल शूटिंग’ शिकण्यास मिळाले. त्या रायफल शूटिंगची प्रॅक्टिस करताना मोठे अप्रूप वाटे. शेवटच्या दिवशी ‘कॅम्प फायर’ आणि काही मनोरंजनपर कार्यक्रम होत. एक वेगळा अनुभव एन.सी.सी.मुळे मिळाला.

आम्ही एस. पी. कॅम्प 1969 ला सोडले आणि इ.पी. बॅरेक्सला राहण्यास आलो. ती छोटीशी इमारत नवीन होती. आमचे घर वरच्या मजल्यावर होते. तेथील विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे त्या घरात विजेचे दिवे होते. एस. पी. कॅम्पला असताना रोज संध्याकाळ झाली, की कंदिलाची, दिव्याची पायली पुसून स्वच्छ करणे, त्यात घासलेट भरणे, वात पेटवणे आणि काही शोधायचे असेल तर कंदील घेऊन घरभर फिरणे. अशा सर्व कामांपासून सुटका झाली.

पुढे, बाबा चंद्रपूरला स्थायिक झाले. तेव्हापासून पुलगाव सुटले. माझे पुलगाव म्हणजे मंतरलेल्या दिवसांच्या आठवणींचा खजिना आहे. तो माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, चिरंतन आहे, तो मी माझ्या हृदयात प्राणपणाने जपून ठेवला आहे. हल्लीच मला कळले की आता कॅम्प परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. माझ्या भावाची- रवींद्राची वर्गमैत्रीण मंगला जंगले हिच्याकडून त्याबाबत सविस्तर माहिती मिळाली. तिचा पुलगावच्या काही लोकांशी संपर्क आहे. डेपोमध्ये मिसाइल्स ठेवले आहेत. मोठ्या प्रमाणात दारूगोळा आहे. म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. मध्यंतरी डेपोच्या काही भागाला आग लागली होती. त्यावेळी बऱ्याच गोष्टी जळून खाक झाल्या. प्रचंड नुकसान झाले. सुरक्षेच्या कारणास्तव प्रवेश निषिद्ध केला असावा.

एस पी कॅम्प ओसाड झाला आहे. तेथे माणसांची वस्ती नाही. सर्व चाळी तोडून टाकल्या आहेत. त्या ठिकाणी गवत, झाडेझुडुपे वाढले आहेत. जंगलासारखा भाग झाला आहे. पशू-पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. तशीच दुरवस्था लेबर कॅम्पची झाली आहे. ‘लेबर कॅम्प हायस्कूल’ ही आमची जिवाभावाची शाळासुद्धा गावात दुसरीकडे हलवण्यात आली आहे. इ पी बॅरेक्सच्या इमारती ओस पडल्या आहेत. हे सर्व ऐकून मला गहिवरून आले.

‘बदल’’हा सृष्टीचा नियम आहे. कोणत्याही ठिकाणाचे स्वरूप, विकास, सुधारणा, परिस्थिती यामुळे बदल मान्य आहे. पण ज्या ठिकाणी आपले लहानपण गेले, आपण खेळलो, बागडलो, वावरलो ते ठिकाण मोकळेपणाने पुन्हा कधीच बघता येणार नाही, यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही.

संजीवनी साव 9969435094 saonag@rediffmail.com

(‘दर्याचा राजा’ जून 2023 अंकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
———————————————————————————————-

About Post Author

34 COMMENTS

  1. संजीवनी ताई तु जसच्या तस पुलगांव डोळ्या पुढे उभ केले. ताई खरच पुलगांव नं बरच काही घडवलं, पुलगांव कॅम्प म्हणजे आपलं एक कुटुंब होत. प्रत्येकाच्या सुख दु:खात बरोबरीचा वाटा असायचा अस आमच नाही गं आपल पुलगांव. धन्यवाद ताई सगळ्या आठवणींना उजाळा करुन दिला. प्रत्येक वेळी वाचतांना पुलगांव डोळ्या पुढ उभ रहात. *आम्हीं पुलगांव कर* चा ग्रुप तयार केला आणि 50वर्षानंतर परत एकदा एकत्रित आलोत.

  2. पुलगाव माझे माहेरगाव , लेख वाचला . लेखिकेने लिहिलेल्या आठवणी वाचून संपूर्ण पुलगावचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. फार सुंदर प्रकारे वर्णन केले आहे. त्यांना असलेली गावाची ओढ लिखाणातून जाणवते. त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.

  3. That was happy days’,but that Golden era never been come back again , Golden Memories always been kept in the Heart. Article on “Pulgaon Camp” nicely written .🎈🎈🎉🎉

  4. Old memories are treasuries that can be preserved through such articles and photos.
    Best article with photos depicting old heritage and life style of year 1950 to 75.

  5. The article on Pulgaon camp is very nice ,while reading it was pleasure to see old photographs of s p camp.I was student of both sp camp and labour camp school upto 8std.I left pulgaon in 1975, but sweet memories of pulgaon will always remain with me.

  6. Ati uttam likhan ahe Sanjivani Tai
    Tuzya likhanala ajibat tod nahi
    Agdi jashach tas Pulgaon che varnan keli ahes
    Sarv lahanpanichya athvani tazya zalyat
    Farach sunder apratim likhan ahe Tai
    Mrs Surekha Durge
    Mumbai

  7. मी पुलगावकर,सगळं कस डोळ्यासमोर दिसून आल हुबेहूब चित्रण.1967 ला मी 11 वी झालो.वडील डेपोत होते,परंतु आमचे राहणे चित्रा talkies जवळ गावात होते .1983 ला नोकरी निमित्त पुन्हा पुलगावला आलो .
    परत कधीतरी उरलेले लिहीन

    • अप्रतीम, लेख वाचून पुलगाव बद्दल बरीच माहीती मला कळाली.

  8. ताईसाहेबांचे आभार. पुलगाव चे त्या काळातील अगदी वास्तविक चित्र स्पष्ट नजरेस दिसायला लागले. मी चार वर्षाचा असताना १९६२ चा भारत-चीन युद्धधाचा तो काळ आठवला, सायंकाळी आई घराबाहेर जाऊ द्यायची नाही. दरवाजा व खिडकी बंद, घराबाहेर उजेड जाऊ द्यायचा नाही. तेल भरलेल्या कंदिलाच्या उजेडातील मोठ्या ताईचा अभ्यास, घरासमोरील डांबरी रस्त्यावरून मिलीट्रीची गस्ती गाडी,काळ्या पेंटने गाडीचे हेड लाईट अर्धे झाकलेले, दरवाज्याच्या फटीतून पहायच.

  9. Ho vachali khubch chan

    Mahity lihili lahanpachya athvani tajya jhalya pulgaon chya Miss karat ahe te divas punha ekda javese vatate

  10. 🌹 आमच माहेरगाव , पुलगांव जिल्हा वर्धा 🌹
    संजीवनी , तुझ्या अप्रतिम लिखाणाला सर्व प्रथम सॅल्यूट ! खरच आपण पुलगांव च्या आठवणी जन्मभर विसरणार नाही ! बालपण , तारूण्य , शिक्षण सर्व काही ह्या छोट्याशा गावातूनच घडल ! जे मीळाल ते खायचं कधीच हट्ट नाही केला ! काय ते डोंगर , काय ती वर्धा नदी , काय ती लेबर कॅम्प शाळा , काय एसपी कॅम्प , ईपी बॅरेक ! दर शनिवारी शाळा सुटल्यावर कवठयाला जाऊन चींचा तोडायच्या मजाच मजा ! काय ते मिलटरी कॅंप चे गुळगुळीत रस्ते , गॅरीसन टाॅकिज सर्व काही अगदी डोळ्यासमोर येत ! शबदांची जुळवाजुळव व अलंकारी रूपात तू पुलगांवच केलेल वर्णन म्हणजे साक्षात आपण पुलगांवलाच आहोत असं वाटत अन् मन भारावून जात ! ते पुलगांव चे दिवस आता कधीच परत येणार नाहीत ! पुलगांवच्या आठवणीत असलेल्या लोकांना पण ही लींक जरूर पाठव !
    तुझ्या अप्रतिम लिखाणा बधल तुला पुनःश्च एकदा सॅल्यूट 🌹💯पैकी 💯
    रविंद्र दुर्गे मुंबई

  11. जून्या आठवणींना उजाळा देऊन आपण गतकाळातील आठवणीची उजळणी केलेली आहे.आठवणी ह्या नुसत्या आठवणी न राहता त्या निरंतर स्मरणीय ठरतात आणि आठवणीच्या प्रसंगाने एक नवीन ऊर्जा व द्दृष निर्माण होऊन आपण खरच त्यात वावरतो असा भास निर्माण होतो आणि एक सुखद आनंद अनुभवतो.
    आपण अत्यंत सुंदर आपले बालपणीचे अनुभव विशद करून अनेकांना आपल्या बालपणीच्या गांवाकडील आठवणींना स्मरणीय केलेलं आहे.
    लेख अतिशय सुंदर व वाचनिय आहे.

  12. आमचे माहेर गाव पुलगाव लेख वाचला. अप्रतिम लेख लिहिला आहे.इतक्या लहान लहान गोष्टी चा विचार करून लिहिलं आहे की काहीच सुटलेलं नाही. वाचत असताना डोळ्या समोर पूर्ण लहानपण आणि पुलगाव उभ राहील. आम्ही पण पहिल्यांदा spcamp राहत होतो नंतर ep barracks ला 6/4 मधे राहिला आलो. मी मुद्दाम copies काढून आणल्या आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचतो. एक वेगळाच आनंद मिळतो. आत्ता जुलै मधे मी पुलगाव ला गेलो होतो पण इतकं strict केलं आहे की फक्त बहिरम बाबा मंदिरा पर्यंत जाता आल आणि तेही त्यांच्याच गाडीतून. मॅडम नी इतकं सुंदर लिहिलं आहे की त्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच. परत एकदा त्यांचे आभार. हा लेख आपल्या पुलगाव chya जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा ही मना पासुन इच्छा. चारू वैद्य. सध्या पुण्याला स्थायिक झालो.

  13. अप्रतिम लेख माझे पुलगाव हो असे प्रत्येक पुलगाव वासी मनापासून म्हणतो सर्व अगदी सजीव चित्रण केले आहे. सगळ्या ंचा अगदी सारखाच प्रवास होता. आपुलकी होतीच. सर्व भाषीय लोक होते सर्व भाषांची लहानपणापासून ओळख झाली, देश प्रेम

  14. बाबी धालगावकर (भट्ट ) खुपच सुंदर लिहिले आहे पूर्ण बालपण डोळ्यासमोर उभे राहिले, आजही ते दिवस वापस यावे असेच वाटते खूप खूप धन्यवाद

    • संजीवनी सर्वप्रथम इतका छान लेख लिहिलास त्याबद्दल तुझे अभिनंदन आणि कौतुक ही.
      कौतुक यासाठी की तू अगदी बारीकसारीक गोष्टी इतक्या तपशीलवार लिहिल्या आणि हे सारं तुझ्या स्मरणात होतं ,त्यामुळे तुझं कौतुकच. खरे तर तुझा लेख लेख वाचून मी मनातून पुलगावची सैर करून आले, त्यावेळी माझ्या मनाची अवस्था आनंदाचे डोही आनंदी तरंग अशी माझी अवस्था झाली. पुलगाव पासून एसपी कॅम्प आणि एसपी कॅम्प नंतर ए पी बॅरेक्स बहिरम बाबाची टेकडी त्यानंतर एसपी महाविद्यालय हे सारे चित्र एखाद्या चित्रपटासारखे डोळ्यापुढून सरकत होते तेव्हा मनातूनच मी तुझे खूप खूप आभार मानले महाविद्यालयातील गॅदरिंग आणि त्यावेळेस एकएकदा आचार्य रजनीश यांचे प्रवचन आपण ऐकले ह्या साऱ्या आठवणींनी अंतकरण भरून आले पुन्हा तू डोळ्यापुढे उभी राहिलीस सायकल वरून महाविद्यालयात येणारी एनसीसी परेड आणि आपल्याला शिकविणारे गौडर सर जोगी सर सहारे सर यांची तीव्रतेने आठवण झाली एस पी कॅम्प असं नातं आहे की सुट्टीच्या दिवसात शकुन कडे मी खूप दिवस राहत होते आणि त्यावेळी बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेला विजय सोबत त्यांनी मला नाटकामध्ये घेतले आणि नाटकामध्ये माझी आईची भूमिका होती हे सगळे चित्रपटासारखं डोळा पुढे उभे राहिले आणि आणखी एक प्रसंग आठवतो की गौरीसन टॉकीज मध्ये मनोज कुमारचा उपकार हा चित्रपट पहिल्या शोला आपण सगळ्या मैत्रिणी गेलो होतो खरं तर ते दिवस मंतरलेले होते आणि बालपणीच रम्य असं बालपण तुझ्या लेखामुळे पुन्हा एकदा डोळ्यापुढे साकारलं गेलं. विशेष असं की संजीवनी तू इतकं बारीक सारी सारीक तपशीलवार लिहिलंस की आणि तुझ्या स्मृतीमध्ये सगळं राहिलं त्यामुळे तुझ्या बद्दल कौतुकही वाटतं मला तू अजूनही तशीच आठवते महाविद्यालयात सायकलवर येणारी तुझ्यासोबत इंदू आणि शकुन पण असायच्या आणखी बऱ्याच काही गोष्टी आठवतात पुन्हा एकदा पुलगाव ला जावं असं वाटत असलं तरीही एस पी कॅम्प मध्ये जाता येत नाही ती खंत वाटते पण तुझ्या लेखामुळे मनातून सैर करण्याचा जो आनंद मिळाला त्याबद्दल तुझे आभार आणि पुन्हा एकदा तुझे अभिनंदन पुढच्या लेखनासाठी आभाळभर शुभेच्छा.

  15. अप्रतिम लेख सजीव वर्णन केले आहे. पुलगाव ला फिरुन आलो त्यात रंगून गेले होते. आता आपण भिसी मुळे संपर्क आता आहोत सतत पुलगाव च्या आठवणीत समतोच. पण संजीवनी ने सफर घडविली. आपले अतोनात प्रेम पुलगाव वर आहेच. लोकांना हेवा वाटतो या प्रेमाचा. आपले प्रेम व आपुलकी वृद्धिंगत व्हावी. धन्यवाद.

  16. Maze maher gaon pulgaon ha lekh atishay sunder padhatine lihilya gele asun yat gavache varnan yogya te kele gele aslyane ha lekh vachat Astana mi kdhi hi n pahilele he gaon jnu khi pratyaksh pne anubhavt ahe ase bhast hote ….khup chhan aie. Mla avdel tumchy kdun lekh lihinya yogy Marathi shikayla

  17. Khup surekh likhan te divas old is gold hote sarvadharma sambhav ,ekmekabaddal Prem ,mothyancha aadar niswarth aapulki hoti
    lekh vachun kharach 40 varshapurvicha camp aathvala vatla punha te divas parat yave hubehub pulgaonchya pratyek gostiche varnan keles Tai kharach manapasun tuze dhanyavad

  18. पुलगाव माझे माहेरगाव लेख वाचला. अप्रतिम लेख. माहेर गावाविषयीचा जिव्हाळा लेखाच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त होतो. माहेर गावाचे वर्णन वाचताना तो गाव डोळ्यापुढेउ उभा राहतो. साव तू एक उत्तम लेखिका आहेस. अशीच लिहित रहा. तुला शुभेच्छा.
    — सौ. वर्तक.

  19. Read the article with interest. It is written in such a style that I could picture the village in front of my eyes. I left India in 1991 to live in U.K. as my husband resided there. Reading articles like these brings memories of my childhood where my dad would take us to some villages so we could see for ourselves and experience village life. Thanks Mrs Sao for re-igniting those memories

  20. Very well written , narration is interesting. Thank you Sanjivani for delightful tour of Pulgaon through this article.

  21. Congratulations Sanjeevani Sao
    You have made your home town proud .Refreshing everyone with your memories and making us relive those days Memories will be cherished forever
    God bless you with many more achievements
    Pushpa John

  22. साव टीचर खरंच खूप सुंदर लेख आहे. मी माझ्या आईकडून १९६२ सालच्या युदधाबद्दल ऐकले होते तिने जसं वर्णन केले होते अगदी तंतोतंत तसेच वर्णन इथे वाचायला मिळाले आणी तेव्हा कशी परिस्थिती असेल ती डोळ्यांसमोर उभी राहिली इतकं जिवंत वर्णन.
    खूपच सुंदर….👌

  23. Very well articulated Mrs Sao. I read the article and could visualize the beauty mentioned in your writeup. Good going !!Thanks for sharing.

  24. संजीवनी,पुलगाव अगदी डोळ्यासमोर सदृश साकार केलेस.अप्रतीम सैनिकी शिस्तबद्ध गावाचे वर्णन.सायकल मारत जाणारी छोटी संजीवनी डोळ्यांसमोर साकार केलीस, बालपण त्यातला निखळ आनंद हे सर्वच आनंददायी..शेवटी गावाची दुरावस्था ऐकून डोकेही पाणावले असतील.अशीच लिहीत रहा.जीवनात संजीवनी भरत रहा.

  25. पुलगाव माझे माहेरगाव हा लेख वाचला. फारच आवडला. यातील प्रत्येक ठिकाणाचे तू केलेले वर्णन वाचताना जणू तू ते ठिकाण प्रत्यक्ष दाखवत आहेस असेच वाटले. खूपच छान. तुझे कौतुक आणि अभिनंदन.

  26. संजीवनी सावचे उत्तम लेख लिहिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

  27. Your article about Pulgaon was very interesting. I could visualise the village very well. Childhood memories will be cherished forever. We are proud of you Sanjeevani sao for such a nice article. Keep writing.

  28. Congratulations Mrs Sao for your incredible article.Well written…I read it slowly to understand it well but could imagine it too at the same time.Those days were really the golden days of life with peace ,contentment ,simplicity ,modesty and humility. ” Jane kahan gaye woh din…..”. I remembersd my Marathi poem of Std 4th or 5th ( not sure) ” Palikade odyavar ,maje gaav te sunder, zada zudpant aahe ,laplele maze ghar…”You have a great passion for writing.Keep going…God bless!!

  29. बऱ्याच दिवसांनी गावाकडील त्या काळातील असलेल्या परिस्थितीचा आणि मंतरलेल्या दिवसांच्या आठवणींचा मागोवा घेणारा अप्रतिम असा लेख वाचण्यात आला. अत्यंत विस्तृतपणे आणि तपशीलवारपणे तत्कालीन घटनांचा आणि आलेल्या अनुभवांचा अगदी मुद्देसूद परामर्श सदर लेखात घेण्यात आलेला आहे. रम्य ते बालपण आणि रम्य त्या आठवणी या उक्ती प्रमाणे गत काळातील स्मुतीत हरखून जायला होते . लेख वाचून अंधुक होत चाललेल्या आठवणींना उजाळा मिळाला आणि वेळ काढून पुलगावला शक्य होत असलेल्या ठिकाणी भेट देऊन यायचा विचार पक्का झाला . ओघवत्या शैलीतील (अगदी स्टोरी टेलर प्रमाणे असल्याने ) सहज सुंदर वाचनीय लेखाबद्दल लेखिकेचे हार्दिक अबिनंदन तसेच लेख प्रकाशित करून तमाम पुलगावकर आणि संबंधित असंख्य वाचकांना पुलगावची सफर घडवून आणल्याची संधी उपलभ करून दिल्या बद्दल प्रकाशकांचे सुद्धा मनापासून आभार .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here