त्र्यं.वि. सरदेशमुख : साहित्याचे आध्यात्मिक मूल्य (Prof T V Sardeshmukh took criticism to spiritual level)

0
252

साहित्य आणि समीक्षा हे जीवनापासून वेगळे नसतातत्यांचा विचार जीवनाच्या समग्रतेतच केला पाहिजे अशी गंभीर भूमिका प्रा. त्र्यंबक विनायक सरदेशमुख यांची होती. ते म्हणत, दु:खे जीवनात अनंत असतात. ती थोर साहित्यात प्रकट होतात ! त्याचबरोबरसरदेशमुख यांची आंतरिक श्रद्धा अशी होती, की तशा प्रकारचे थोर साहित्य हे स्वरूप आणि विश्वरूप यांतील चैतन्याची रूपे शोधते, त्यामुळे साहित्याला आध्यात्मिक मूल्य लाभतेसाहित्याचे ध्येयच जीवनाचे सौभाग्य वाढवणे हे आहे. त्यामुळे त्यांच्या लेखी साहित्यसाधनेला योगसाधनेशी समांतर महत्त्व प्राप्त झाले होते. सरदेशमुख यांनी त्यांचे ते साहित्यविषयक तत्त्वज्ञान विलक्षण प्रभावाने मांडले आहे.

सरदेशमुख यांचा जन्म श्री स्वामी समर्थ वावरले तेथे, म्हणजे अक्कलकोट गावात 22 नोव्हेंबर 1919 रोजी झाला. तेथील संस्थानी वातावरणातील बरेवाईट राजकारण आणि स्वामी समर्थ यांचा अध्यात्मभाव यांचा लक्षणीय प्रभाव सरदेशमुख यांच्या साहित्यावर जाणवतो. अध्यात्मात प्रचीतीचे बोलणे महत्त्वाचे असते. सरदेशमुख यांनी साहित्यातही प्रचीतीच्या बोलण्याला मोल दिले.

त्यांना अभिजात पाश्चात्य साहित्याच्या वाचनाची गोडी होती. त्यांच्यावर रविंद्रनाथ, जे. कृष्णमूर्ती यांचाही प्रभाव होता. सरदेशमुख यांना आयुष्यभर कौटुंबिक दु:खाचा सामना करताना आणि उमेदवारीचा काळ घालवताना थोर तत्त्वज्ञानी व प्रतिभावंत साहित्यिक यांच्या बरोबरीनेच पाश्चात्य अभिजात चित्रपटांनीही जीवनदृष्टी दिली; तसाच, दिलासाही संकटांत दिला. सरदेशमुख यांनी चाळीस वर्षे शाळा-महाविद्यालयांतून इंग्रजी व मराठी या विषयांचे अध्यापन केलेत्या बरोबरीने साहित्यसाधनाही चालू ठेवली. मनस्वी चिंतक आणि तपस्वी साहित्यसाधक अशी जडणघडण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची होत गेली. त्यांना ते दयानंद महाविद्यालय (सोलापूर) येथे अध्यापन करत असताना कन्नड भाषेचे महाकवी द.रा. बेंद्रे तथा अंबिकातनय दत्त यांचा सहवास लाभला.

त्यांनी कविता, कादंबरी, समीक्षा, नाटक या विविध साहित्यप्रकारांतून आत्मसाक्षात्कार झाल्यासारखे लिहिले. मात्र त्यांनी त्या प्रकारांच्या रूपांचा, नियमांचा धाक मानला नाही. त्यांनी साहित्यसाधनेला अध्यात्म साहित्याच्या उंचीवर नेऊन तिच्यातून जीवनमूल्ये विकसित केलीसाहित्याला उन्नत जगण्याशी जोडले.

त्यांची पहिली कादंबरी ससेमिरा. ती मनोविश्लेषणात्मक प्रेमकथा होती. तिचे स्वागत प्रायोगिक कादंबरी म्हणून झाले. नवकवितेचे एक स्वच्छंदतावादी पण विलक्षण रूप त्या कादंबरीतून प्रकट झाले आहे. सरदेशमुख यांनी त्यांच्या आरंभीच्या काळात वैशाख’ या कविनावाने काही कविता लिहिल्या. त्यांचा पहिला कवितासंग्रह उत्तररात्र’ हा त्यांच्या मित्रांनी पहिल्या कादंबरीनंतर अकरा वर्षांनी प्रकाशित केला. आतून हृदयी अबोध संवेदन दर्वळुनी उठते नि:शब्दाच्या सारंगीवर कविता झंकृत होते ||’ अशा अबोध-अरूपात कवितेचा शोध घेणारी ती कविता अनेक प्रकारच्या अंतर्द्वद्वांनी भरलेली आहे. व्यक्ती आणि वस्तू, जाणीव आणि नेणीव, अद्भुत आणि वास्तव, सत्य आणि आभास, मीलन आणि विरह यांचे ताण त्या कवितेतून नव्या अर्थगर्भ प्रतिमांमधून व्यक्त झाले आहेत. 

त्यांच्या धिंड’ या दीर्घ कवितेतही नेणिवेचा अंत:प्रवाह अशाच, विलक्षण भारलेल्या प्रतिमांतून व्यक्त झाला आहे. गंमत अशी, की त्यांनी ती कविता पुन:संस्कारित करून कविता चंद्रकेतूची’ या नावाने प्रकाशित केली. त्या कवितेचे स्थान मराठी दीर्घकवितेत महत्त्वाचे आहे. ती कविता या संस्कृतीची छपरे उडून जाण्याच्या काळात निराशेचा चटका देतानाच एका युगनांदीचे पहाट-आश्वासन देते. त्यांनी त्या काळाचे वर्णन विषण्णता, औदासीन्य, तडफड, हिंसा, अस्तित्वाला नासवून टाकणारा अनाचार, तामस जग, भयावहाचा भाग्यकाळ भराला’ आलेला असे केले आहे.

सरदेशमुख यांच्या तीन कादंबऱ्यांतून तोच आशय सामाजिक कथांच्या रूपातून व्यक्त झाला आहे. कवितेतील प्रतिमांची ती भावपूर्ण भाषा सरदेशमुख यांच्या गद्यलेखनातही मुरलेली दिसते. सरदेशमुख यांनी कादंबऱ्या का लिहिल्या हे सांगताना त्यांनी सामाजिक परिस्थितीच्या संदर्भात व्यक्तीच्या जीवनाचा व मनाचा वेध घेणे शक्य होते म्हणून असे म्हटले आहे. त्यांना कादंबरी हा प्रकार मनोविश्लेषणाच्या अंगाने आशयाच्या आणि व्यक्तिदर्शनाच्याही आत खोलवर जाण्यासाठी कवितेपेक्षा सोयीचा वाटला.

सरदेशमुख यांची ग्रंथसंपदा

सरदेशमुख यांची बखर, एका राजाची’ ही दुसरी कादंबरी त्यांच्या पहिल्या कादंबरीनंतर अठ्ठावीस वर्षांनी प्रसिद्ध झाली. ती कादंबरी तिच्यातील अद्भुतरम्य संस्थानी वातावरण, त्यात फुलवलेली शोकात्म प्रेमकथा, काव्यात्म भाषाशैलीची मोहक जादू आणि तिला मिळालेली चिंतनशीलतेची डूब यांमुळे लोकप्रिय झाली. सरदेशमुख यांनी कादंबरी-त्रयीची संकल्पना केली होती. त्यांतील ती पहिली कादंबरी. मात्र त्यांनी त्यांतील तिसरी उच्छाद’ ही कादंबरी तिच्या आधी लिहिलीबखरनंतर सहा वर्षांनी. आणि दुसरी डांगोरा- एका नगरीचा’ ही त्यानंतर सोळा वर्षांनीत्यांची भावनाप्रधानता त्या दीर्घ कालावधीत सखोल होत गेली. त्यांनी उच्छादमध्ये कौटुंबिक शोकात्म अनुभव साकारताना धैर्य आणि संयम या गुणांची परीक्षा जणू पाहिली आहे !

डांगोरा- एका नगरीचा’ ही सरदेशमुख यांची सर्वश्रेष्ठ रचना म्हणून मान्यता पावली. तिचा सन्मानही साहित्य अकादमी आणि इतर काही पारितोषिके मिळून झाला. त्र्यं.वि.ना भारतीय कादंबरीकार म्हणून मान्यता लाभली. डांगोरा…मध्ये विविध आशयसूत्रे आहेत. ती कादंबरी महाकाव्यासारखी भासते. कादंबरीत 1930 च्या सुमारास देशात जी परिस्थिती होती, तिचे विदारक चित्रण आहे. जीवनातील सर्वच अंगे कशी नासली आहेत आणि जीवघेण्या स्पर्धेतून अपप्रवृत्ती कशा निर्माण होत आहेत याचे तेथे प्रतीकात्मक चित्रण आहे. एका सार्वत्रिक मूढतेवरील भाष्य म्हणून ती कादंबरी वाचकाला अंतर्मुख करते.

सरदेशमुख यांनी त्यांच्या कादंबरी त्रयीबद्दल लिहिले आहे – मी या तिन्हींतून व्यक्तिगत तशीच सामूहिक दु:खाची गाथा उलगडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मी त्या दु:खाला छेद देण्याला व ते सहन करण्याला सद्भाव आणि सामंजस्य यांहून काहीही सक्षम नाही हे प्रसंगाप्रसंगांतून आणि व्यक्तिदर्शनातून प्रकट किंवा ध्वनित व्हावे हा हेतू बाळगला आहे.” त्या कादंबऱ्या वाचकाला अनाचाराच्या विरूद्ध उभे राहण्याचे नैतिक बळ देतात !

सरदेशमुख यांनी समीक्षेलाही काव्यात्मकतेच्या म्हणजेच सृजनशीलतेच्या उंचीवर पोचवले. त्यांनी त्यांच्या अंधारयात्रा’ या पहिल्या समीक्षाग्रंथात केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज आणि मर्ढेकर या कवींच्या काव्यातील अंधार’ या आशयाचे पदर उलगडून दाखवले. सरदेशमुख यांनी त्या कवींची ती अंधारयात्रा त्यांची एकेकट्याची नसून संबंध सामाजिक जीवनाची आहे असे नमूद करून त्यांनी तिची कुरूपता व भीषणता आत्मप्रत्ययाने जाणवून दिली आहे याकडे लक्ष वेधले आहे. सरदेशमुख यांनी आधुनिक मराठी समीक्षेतील सौंदर्यवादी, आत्मनिष्ठ, मूल्यप्रधान प्रवृत्तीचा पाठपुरावा केला.

त्यांची स्वसंवेद्यतेतून परतत्त्वाकडे म्हणजेच आत्मप्रत्ययातून साहित्याच्या अध्यात्माकडे वाटचाल प्रदेश साकल्याचा या समीक्षाग्रंथातून चालू राहिली आहे. त्यांनी धुके आणि शिल्प’ या ग्रंथात ग्रेस, सुर्वे, दलित कविता यांसारख्या विषयांचा वेध रसिकतेने घेतला आहे. त्यांनी शारदीय चंद्रकला’ या समीक्षाग्रंथात द.रा. बेंद्रे, जी.ए. कुलकर्णी, मुक्तिबोध, कुसुमाग्रज यांच्याबरोबर व्हिक्टर ह्यूगो, हरमान हेस, ब्रेख्त, आयनेस्को या पाश्चात्य प्रतिभावंतांची ओळख करून दिली. शारदीय चंद्रकला म्हणजे देशोदेशींच्या साहित्याचे चांदणे. ते सनातन आणि नित्यनूतन असे अविरत पाझरत असते. सरदेशमुख त्या महानुभाव प्रकाशाला अभिवादन करण्यासाठी लिहितात; चिकित्सा करण्यासाठी नाही. ते त्यांच्या साधनेच्या वाटेवरील सखे-सांगाती यांना स्फटिकदिवे’ म्हणून संबोधतात. ते ज्ञानेश्वरांच्या म्हणौनि सद्भाव जीवगत | बाहिरी दिसताति फाकत स्फटिकागृहींचे डोलत | दीप जैसे ||’ या ओवीतून मिळणारी प्रतिमा जे. कृष्णमूर्ती, खलील जिब्रान, मर्ढेकर आणि बाबामहाराज आर्वीकर यांच्यात पाहतात. सरदेशमुख यांनी साहित्य समीक्षेला संस्कृतिसमीक्षेची व्यापकता आणून दिली. दोषदिग्दर्शनापेक्षा गुणग्रहणाला महत्त्व दिले.

रामदास : प्रतिमा आणि प्रबोध’ आणि गडकऱ्यांची संसारनाटके’ हे सरदेशमुख यांचे प्रबंधस्वरूपी समीक्षाग्रंथ. तेही आत्मनिष्ठेलाच प्रमाण मानतात. सरदेशमुख हे रामदासांना त्यांचा संप्रदायमुक्त विचार करत त्यांचे समकालीन बनवतात. सरदेशमुख यांनी गडकरी यांच्या नाटकांचे संहितेच्या अंगाने केलेले विवेचन म्हणजे सृजनशील, सचेतन समीक्षेचा वस्तुपाठच म्हणावा लागेल. त्यांचे ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्यावरील ग्रंथ सिद्ध झाले नसले तरी त्यांचा प्रभाव सर्वत्र प्रत्ययास येतो.

त्यांनी बखर एका राजाची या कादंबरीला नाट्यरूप दिले. त्याचे काही प्रयोग इंडियन नॅशनल थिएटर संस्थेने केले. ते नाटक पुढे टाहो’ या नावाने प्रकाशित झाले. त्यांनी एका पाश्चात्य कथेवर थैमान नावाचे नाटक लिहिले. त्यांनी आयनेस्कोच्या एका नाटकाचे भाषांतरही केले. नाटकाला साहित्यमूल्य असल्याशिवाय अर्थ नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. त्यांनी केलेली नाट्यसमीक्षा या दृष्टीने लक्षणीय ठरली.

सरदेशमुख यांनी हरमान हेसच्या सिद्धार्थ’ या कादंबरीचा नदीपार या नावाने अनुवाद 1959 मध्ये केला. त्यांनी त्याच्या जोडीने पूर्वेची यात्रा, खलिल जिब्रानच्या प्रोफेटचा देवदूत, काफ्काशी संवाद असे अनुवाद केले. एमिली डिकिन्सन, ह्युगो इत्यादी पाश्चात्य प्रतिभावंतांच्या कृतींचेही अनुवाद केले. स्वत:च्या समर्थ शैलीने मूळ कृतीचा आशय आणि तिचे रूप यांचा सृजनशील प्रत्यय घडवला. त्यांचे वाचन-लेखन आणि मनन-चिंतन आयुष्याच्या अखेरपर्यंत चालू होते.

त्र्यंबक विनायक सरदेशमुख

जन्म 22 नोव्हेंबर 1919, निधन 12 डिसेंबर 2005

कादंबरी –  1. ससेमिरा, 2. बखर : एका राजाची, 3. उच्छाद, 4. डांगोरा एका नगरीचा

काव्य – 1. उत्तररात्र, 2. कविता चंद्रकेतूची आणि उत्तररात्र

समीक्षा –  1. अंधारयात्रा, 2. गडकऱ्यांची संसारनाटके, 3. प्रदेश साकल्याचा, 4. रामदास: प्रतिमा आणि प्रबोध, 5. धुके आणि शिल्प, 6. शारदीय चंद्रकळा, 7. स्फटिक दिवे

नाटके – 1. टाहो, 2. थैमान

अनुवाद – 1. नदीपार (हरमान हेस), 2. सिद्धार्थ आणि पूर्वेची यात्रा (हरमान हेस), 3. देवदूत (खलिल जिब्रान), काप्फाशी संवाद (गुस्ताव यानुश)

– निशिकांत ठकार 9823939946 nishikantsthakar@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here