टाक म्हणजे सोने, चांदी, पितळ इत्यादी धातूंची बनवलेली प्रतीके होत. ते पूर्वजांची आठवण म्हणून देवघरात जपले जातात. असे टाक जुन्या घरात व घराण्यांत आढळत असल्याने ते आगळेवेगळे ऐतिहासिक महत्त्वाचे साधन ठरते.
देवघरात आजी-पणजी-आजोबा-पणजोबा यांचे टाक जसे असतात, त्याच सारखे खंडोबा, बहिरोबा, जोतिबा, जाकाई, जोकाई, मेसाई, जानाई यांचेदेखील टाक दिसतात. म्हणजे ते सर्वही आपणा माणसांचे कूळ, पूर्वज म्हणावे का ! आपणा माणसांचे सख्खे, सलोहित रक्तसंबधाचे पूर्वज !
काही टाक हे पंचकोनी असतात तर काही चौरस. सोबतच्या चित्रात दिसणाऱ्या टाकातील स्त्रीला जानाई असे म्हटले आहे. तो छोटासा टाक स्त्रीसत्ताक समाजाचा वारसा सांगतो. जानाईच्या हातात गव्हाची ओंबी आहे. त्या हाताच्या वर नांगर आहे. नांगराखाली शिवलिंग आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतीचे प्रतीक असा बैल आहे. तसेच, बाजूला लहान रूपात मुलगी आहे. त्या ठिकाणी शेतीची प्रमुख स्त्री आहे आणि वारसदार म्हणून मुलगी आहे. ते आहेत मातृवंशीय समाजाचे अवशेष. तिच्या एका हातात त्रिशूळ आहे. ती आयुधे, साधने गतकाळाचा इतिहास नजरेसमोर उभा करतात. त्रिशूळ हा टोळी समाजाचे प्रतिनिधित्व करतो. जानाई हे नाव जन म्हणजे ज्ञाती, बहिणीची ज्ञाती वा कूळ यांचा समूह, अर्थात मातृसत्ता दर्शवते. गव्हाच्या ओंब्या, शिवलिंग ही चिन्हे स्त्रीसत्तेचे प्रतीक ठरतात. नांगर, बैल हे पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतिनिधी. ती स्त्री सर्वसामान्य नाही तर तिने डोक्यावर मुकुट परिधान केलेला आहे. म्हणजे ती ज्ञाती प्रमुख आहे.
लेखनाची कला ज्या काळात अवगत नव्हती त्या काळात भारतीय माणसांचे पूर्वज त्यांचा इतिहास अशा प्रतीकांच्या; तसेच सणवार, उत्सव यांच्या आधारे जपत होते. देवघरातील टाक हेही जुन्या नाण्यांप्रमाणे इतिहासाच्या संशोधनाचे साधन आहे. स्त्रीचा तो टाक शेतीचा शोध लावणाऱ्या निर्ऋतीपर्यंत जातो. शेतीची प्रमुख हक्कदार ही स्त्री असल्याचे सांगतो. निर्ऋतीची वंशज ही जानाई आहे. जानाईची मंदिरे महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आहेत. आजूबाजूचा तसा वारसा डोळस दृष्टीने पाहिला गेला पाहिजे.
– नितीन सावंत, 9970744142 ntsawant31@gmail.com
———————————————————————————————-