‘पालडोह’ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या जिवती तालुक्यातील घाटवळणावरचे गाव… ते गाव शेतीचे वाद, कौटुंबिक भांडणतंटे, भुरट्या चोऱ्या, अंधश्रद्धा, बालविवाह अशा कारणांनी तालुक्यात बदप्रसिद्ध होते. दोन वर्गखोल्या असणारी चौथ्या वर्गापर्यंतची जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी प्राथमिक शाळा तेथे होती. विद्यार्थी चौथा वर्ग पास झाले, की पाचव्या वर्गासाठी तीन किलोमीटर दूर असणाऱ्या टेकामांडव येथील केंद्र शाळेत व गुणवंत विद्यालय या खासगी शाळेत दाखल होत, तर काही चौथीनंतर शाळेला दांडी मारत ! मुलींची शाळा तर प्रथा-परंपरेचा पगडा जास्त असल्यामुळे कायमचीच सुटायची. नंतर त्यांना घरकाम, शेतकाम असे उद्योग… अन्यथा काहींची लग्नेही होत.
राजेंद्र उदेभान परतेकी हा तरुण तशा अभावग्रस्त वातावरणात शाळेत रूजू होण्यासाठी वीस वर्षांपूर्वी, 8 ऑगस्ट 2006 रोजी आला. त्या वेळी शाळेची विद्यार्थी पटसंख्या होती बावीस. मुलांच्या पालकांना शैक्षणिक प्रगतीबद्दल, शाळेबद्दल आणि शिक्षकांबद्दल देणेघेणे काहीच नव्हते. ते म्हणे त्यांच्या शेतीच्या कामात कष्ट उपसत असतात ! त्यांची उपस्थिती ग्रामशिक्षण समितीच्या सभेलाही कमी असे. त्यांना ‘ते आले का नाहीत?’ असे विचारले, तर त्यांचा शेतीकामाचा बहाणा हा ठरलेला असे.
राजेंद्र परतेकी यांनी गावच्या या शिक्षणविषयक उदासीनतेवर मात करण्याचे ठरवले. राजेंद्र यांनी विद्यार्थी, पालक, गाव, शाळा यांचा मेळ परस्परांशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी गावतरुणांची क्रिकेट, व्हॉलिबॉल, खो-खो टीम गावाशेजारच्या जत्रेमध्ये जमवली, त्या संघाकडून खेळणे, टीम जिंकण्यासाठी निकराची लढाई करणे अशा गोष्टी गावच्या मुला-तरुणांध्ये सुरू केल्या. गावातील युवकांना नव्या गुरूजींमध्ये ‘दम’ वाटू लागला. विद्यार्थ्यांनाही व्यायामाची आवड लागली. त्यांनी विद्यार्थ्यांसमोर चंद्रप्रकाशात व्यायाम, पहाटे साडेचार वाजता उठणे वगैरेसारख्या कल्पना मांडल्या. धावणे आणि खो-खो खेळणे यांचा सराव तीन किलोमीटरवरील रस्त्यावर सुरू झाला ! शाळा टेकाडावर होती. शाळेपासून लगतच्या शेतापर्यंत उतार होता. समजा, ठेचाळून कोणी पडला तर तो सरळ कोलांट्या खात समोरील शेताच्या कुंपणात येऊन अडकणार ! खेळासाठी मैदान नव्हते. राजेंद्र यांनी गावातून टिकाव, सब्बल, पावडे, घमेले असे साहित्य जमवले अन् शाळेसमोरील टेकाड फोडण्यास सुरुवात केली. ‘शाळेची वानरसेना’ माती खाली नेऊन टाकण्यास तयार होतीच.
विद्यार्थ्यांना शाळा आवडू लागली. गावकऱ्यांनाही शाळेसाठी ‘गुरूजी’ घेत असलेले कष्ट दिसू लागले. जंगलातील बांबू आणून त्याचे कुंपण विद्यार्थ्यांच्या मदतीने बनवण्यात आले. विद्यार्थ्यांना आनंददायी वाटणारे अनेकविध उपक्रम राबवून, शिक्षण जीवनाशी अलगदपणे जोडले जाऊ लागले. शालेय पोषण आहार दुपारी खाऊन घरी पळणारी मुले शाळेच्या आवारात रमू लागली, फुलपाखरांसारखी बागडू लागली. शिक्षक आणि इवले विद्यार्थी यांनी टेकडी फोडून खेळण्यापुरते समतल मैदान स्वकष्टाने बनवले होते. विद्यार्थी बीटस्तरीय, तालुकास्तरीय तथा नवरत्न स्पर्धांत सहभागी होऊन पुरस्कार मिळवू लागले. त्या गोष्टीचा सकारात्मक बदल गावकऱ्यांमध्ये जाणवू लागला. पालक शेतीकडे जाताना गुरूजींशी बोलू लागले. शालेय व्यवस्थापन समिती सक्रिय झाली !
ज्येष्ठ साहित्यिक राम शेवाळकर म्हणत, “जे पाठ्यपुस्तकात आहे, ते विद्यार्थ्यांसमोर विशद करण्याची जबाबदारी शिक्षकांची असतेच, पण जे पाठ्यपुस्तकात नाही, परंतु विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे ते ओळखण्याचा व त्याच्या परीने फुलवण्याचा गुण शिक्षकामध्ये असण्यास हवा.” राजेंद्र त्या कसोटीवर उतरले. पालडोहच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध स्पर्धांत बक्षिसे पटकावली, विद्यार्थ्यांनी त्यांची दखल राज्यस्तरीय उपक्रमांमध्येही घेण्याजोगी कामगिरी बजावली ! खरेच, ‘शिक्षक हा राष्ट्राचा शिल्पकार आहे’ या वचनाचा प्रत्यय गावकऱ्यांना शब्दांविना येत गेला.
पालडोह प्राथमिक शाळेचे पाचवी ते आठवी असे एकेक वर्ग चंद्राच्या कलेप्रमाणे दरवर्षी वाढू लागले. शेजारील गावांचे पालकही त्यांच्या मुलांना पालडोहच्या शाळेत दाखल करू लागले. वर्गखोल्या फक्त दोन आणि वर्ग एक ते आठ. त्यावरही गुरुजींनी मार्ग काढला. विद्यार्थी अन् गावकरी यांच्या मदतीने बांबू, तुराट्या, कडे, ग्रीन नेट यांचे मांडव टाकण्यात आले. अध्ययन- अध्यापन कार्य ‘आनंददायी रीती’ने सुरू झाले. जणू पूर्वीचे ‘गुरुकुल’च ! परगावचे विद्यार्थी स्वखर्चाने रिक्षा/ऑटोद्वारे शाळेत येऊ लागले, शिकू लागले, रमू लागले. शिक्षकाने शाळा वर्षाचे तीनशेपासष्ट दिवसही सुरू ठेवण्याचा ठराव शालेय समितीच्या सहमतीने केला. शाळेतील उत्साह वाढतच गेला. तीनशेपासष्ट दिवस शाळा हा नवोपक्रम महाराष्ट्रात गाजला !
गावकऱ्यांनी वर्गखोलीच्या कायमस्वरूपी बांधकामासाठी प्रत्येक कुटुंबामागे स्वेच्छेने दोन हजार रुपये जमा केले. गाववर्गणी म्हणून असे एक लाख साठ हजार रूपये जमा झाले. शेताची किंमत होती दोन लाख रुपये. गावकऱ्यांनी गावाच्या मंदिरातील दानपेटीत साठून असलेली चाळीस हजार रुपयांची देणगी ‘विद्यामंदिरा’साठी दिली ! कधी नव्हे असा एक वेगळा इतिहास घडला गेला. मंदिराच्या पैशांतून शाळा बांधली गेली ! कवितेच्या ओळी आठवल्या : फळाफुलांचा मळा पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे | गावात एक वेळ देऊळ नसेल तर चालेल, पण एक आदर्श शाळा पाहिजे…
पालडोह हे तीनशेपंच्याऐंशी लोकसंख्येचे इवलेसे गाव. फक्त बावीस पटसंख्या. तेथील प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा बनली आणि शालेय पटसंख्या एकशेब्याण्णववर गेली. शाळाप्रवेशासाठी येणाऱ्या पालकांना ‘प्रवेश फुल्ल’चा फलक दिसू लागला, तरीही पालक ‘आमच्या मुलाला सर, तुमच्या शाळेत प्रवेश द्या’ म्हणून विनवणी करताना दिसतात. जिल्हा परिषद प्रशासनही शाळेकडे विशेष लक्ष देत आहे. शाळेला सुसज्ज इमारतीचे बांधकाम व इतरही सोयीसुविधा मिळू लागल्या आहेत. चारशे शाळांनी या शाळेत चालणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेण्यासाठी व स्वत:च्या शाळेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी शाळाभेटी दिल्या आहेत !
राजेंद्र हे मूळचे किन्ही(ज) गावचे- पो. दहेगाव, ता. राळेगाव, जिल्हा – यवतमाळ. गावी त्यांची आई व मोठे भाऊ असतात. राजेंद्र यांचे वडील आश्रमशाळेत कामाठी होते. त्यांना अकाली मृत्यू आला. त्यामुळे ती पाच भावंडे उघड्यावर आल्यासारखे झाले. तरीदेखील त्यांच्या आईने सर्वांना वळण लावून त्यांच्यावर संस्कार केले. आई काही वेळेला लाकडाच्या मोळ्या विकून संसार चालवत असे. नंतर तिला वडिलांच्या जागी रामपूर येथे आश्रमशाळेत काम मिळाले. राजेंद्र म्हणतात, की “आईचा तो संघर्ष आठवला, की अजून अंगावर काटा येतो.” राजेंद्र यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले आहे. त्यांचे अकरावी-बारावीचे शिक्षण मारेगाव या ठिकाणी झाले. त्यांनी डी एड परीक्षा गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यात दिली आणि ते बी एड ‘इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठा’तून झाले. राजेंद्र परतेकी यांच्या पत्नी अमृता आणि शाळेत दाखल होण्यास उत्सुक देवांश नावाचा गोड छोकरा हे त्यांचे स्वत:चे कुटुंब आहे.
राजेंद्र परतेकी 9881674994
– नरेशकुमार बोरीकर, चंद्रपूर. 9604944590 nareshBorikar22@gmail.com