पंढरपूरची पालवी… स्पर्श मायेचा… (Palawi from Pandharpur)

0
525

एचआयव्ही एडसग्रस्त अनाथ बालकांच्या संगोपनाकरता मंगलताई शहा यांनी 2001 मध्ये पंढरपूरमध्ये ‘पालवी’ नावाची संस्था स्थापन केली. दोन मुलांच्या प्रवेशापासून सुरू झालेली ही संस्था आता बहू अंगांनी विस्तारली आहे. संस्थेने या मुलांकरता स्वत:ची शाळा, गोशाळा सुरू केली आहे. एडसग्रस्त अनाथ बालकांबरोबरच अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो. परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग इत्यादी कामे त्यांना शिकवली जातात. याखेरीजही संस्थेतर्फे वंचितांकरता अनेक प्रकल्प राबवले जातात… 

काही वेळा अचानकपणे सुरू करावा लागलेला प्रवास कुठून सुरू होणार आहे हे माहीत असते पण कुठे संपणार हे माहीत असतेच असे नाही. माहीत असले तरी सरळसोट नसलेल्या प्रवासाच्या वाटेवर अनेक वळणे, डावे-उजवे फाटे फुटत असतात. ते पार करत करतच, आपली दमछाक होऊ न देता, आपले ध्येय साध्य करायचे असते. एखाद्या संस्थेचेही तसेच असते. कोणतीही संस्था अचानक किंवा काहीही प्रयत्न न करता मोठी होत नाही; नावारूपाला येत नाही. त्यामागे संस्थापकांचे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांचे कष्ट असतात. एखादे लहानसे कारण असते संस्था उभी राहताना. मंगलताई शहा यांनी पंढरपूर येथे ‘पालवी’ ही संस्था साधारणपणे पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन केली. ही संस्था स्थापन करण्यापूर्वीही सामजिक कर्तव्य म्हणून मंगलाताई शहा कुष्ठरोग्यांच्या वस्तीत जाऊन सेवाकार्य करत होत्या. रिमांड होम बालिकाश्रमामध्ये जाऊन मुलींचे प्रबोधन, एचआयव्ही एडस् विषयी प्रबोधन अशी कामे करत होत्या. ‘पालवी’ या संस्थेच्या स्थापनेला कारण झाले ते म्हणजे 2001 साली गोठ्यात टाकलेली दोन बालके. एचआयव्ही एड्सविषयी प्रबोधन करण्यासाठी मंगलताई एका खेड्यात गेल्या असताना त्यांना गुरांच्या गोठ्यात टाकलेली दोन बालके दिसली. अंगावर बोटभर चिंधी नाही, जखमांनी आणि मलमूत्रानी त्यांची शरीरे भरलेली होती. एडसग्रस्त असलेल्या पालकांच्या या दोन मुलांना सांभाळायला त्यांचे नातेवाईक, आजी आजोबा कोणीच तयार नव्हते. मग प्रबोधन करणाऱ्या मंगलाताईंनी प्रत्यक्ष कृती करायचे ठरवले. त्या दोन बालकांना त्या स्वत:च्या घरी घेऊन आल्या.

मंगलाताईंनी प्रभा-हिरा प्रतिष्ठानच्या अंतर्गत ‘पालवी’ या संस्थेची स्थापना केली ही संस्था एड्सग्रस्त अनाथ मुलांचा सांभाळ करते. संस्थेचा असा विश्वास आहे की जन्माला आलेली सर्व बालके समान आहेत आणि आरोग्य, शिक्षण, सुरक्षित आणि कलंकमुक्त वातावरणासह प्रेमळ, आनंदाने भरलेले बालपण हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे.

‘पालवी’च्या स्थापनेनंतर साधारण आठ ते दहा वर्षे वयाची एक मुलगी दाखल झाली. तिचा कमरेखालचा सगळा भाग जखमांनी भरलेला होता. कारण काय तर घरात तिचा वावर नको म्हणून तिची चुलती तिला दिवसभर झाडावर बसवून ठेवत असे आणि रात्री अंगणात झोपवत असे. ‘पालवी’मध्ये एड्सग्रस्त बालकांना सांभाळले जाते असे समजल्यावर अशा मुलांचा ‘पालवी’मध्ये ओघ वाढला. मग जवळच भाड्याने जागा घेतली पण मालकाला समजल्यावर त्याने त्या मुलांसह तेथे राहण्यास मज्जाव केला. मग घरातून पाणी नेऊन मुलांचा सांभाळ सुरू केला. येणारी मुले जखमांनी भरलेली, कुपोषित असत. डॉक्टरांचेही सहकार्य मिळायचे नाही. मंगलताई स्वत: ड्रेसिंग आणि औषधोपचार करत असत. त्यांनी मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी दूध मिळावे म्हणून गोशाळा सुरू केली. मुले निरोगी रहावी म्हणून योगोपचार सुरू केले. या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळत नाही म्हटल्यावर शासनाकडे असंख्य हेलपाटे घालून स्वत:ची स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर शाळा सुरू केली.

प्रभा हिरा प्रतिष्ठान मार्फत आठ प्रकल्प राबवले जातात-

  1. पालवी संगोपन प्रकल्प – ‘पालवी’ हा एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ बालकांचा हा संगोपन प्रकल्प आहे. समाजाच्या आत्यंतिक गरजेतून एचआयव्ही बाधित बालकांसाठी महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प पंढरपूर येथे 2001 साली सुरू झाला. एक महिन्याच्या बालकापासून ते एकवीस वर्षे वयाच्या तरुणापर्यंत; एचआयव्हीबाधित ह्या संगोपन केंद्रात आहेत.ही बालके कचराकुंडी, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, स्मशानभूमी, आरोग्यकेंद्रे अशा ठिकाणी सोडून दिलेली असतात. पालवीमध्ये त्यांना सुरक्षित, आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी प्रयत्न केले जातात. या प्रकल्पाला दोन बालकांपासून सुरुवात झाली, ती आज 150 बाधितांपर्यंत पोचली आहे.
  2. पालवी ज्ञानमंदिर प्रकल्प – पालवी प्रकल्पामध्ये बालकांना अंगणवाडी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. काही वर्षांपासून इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागत आहे.
  3. गोशाळा प्रकल्प – बालकांच्या सकस आहारासाठी गोशाळा सुरू केली असून त्यात सध्या आठ गायी आहेत.
  4. स्वयंसहायता प्रकल्प – या प्रकल्पांतर्गत संस्थेतील मुलांना प्रशिक्षित व्यक्तींकडून प्रशिक्षण देऊन टाकाऊतून टिकाऊ वस्तू, साड्यांची पायपुसणी, कॅरीबॅग्स, विविध पर्सेस बनवल्या जातात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई काम, शेती काम, प्लंबिंग, कागद काम शिकवले जाते. आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त महिलांना गोधडी शिवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
  5. हिरकणी प्रकल्प – या प्रकल्पामध्ये अत्याचार पीडित कुमारी माता, मनोरुग्ण माता, विवंचनेने पीडित स्त्रिया यांचा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी सांभाळ केला जातो.’गरज त्याला आसरा’ या पद्धतीने परित्यक्ता, विधवा, वृद्ध, मनोरूग्ण यांना आधार दिला जातो. या सुविधेचा आजवर 105 व्यक्तींना लाभ झाला आहे. सध्या वीस महिला निवासी आहेत.
  6. पालवी परिसस्पर्श – समाजामधील कचरावेचक लहान मुलं सुसंस्कारित नागरिक व्हावी म्हणून त्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी, ही बालके व्यसनांमध्ये अडकू नयेत यासाठी पालवीचे काम सुरू आहे. आजवर दोनशेपेक्षा जास्त मुलांनी याचा लाभ घेतला आहे, तसेच सध्या पन्नास मुले याचा लाभ घेत आहेत.
  7. पालवी अंकुर – पुणे शाखा – वेश्यावस्तीतील बालकांकरता संस्कार वर्ग, अनाथ, गरजू महिलांकरता विविध प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. तसेच, सरकारी रुग्णालयांमध्ये पेशंट भरती झाल्यानंतर तो जर अनाथ असेल तर त्याची व्यवस्था एखाद्या संस्थेमध्ये करणे, त्याची सर्व व्यवस्था होईपर्यंत त्याला राहण्याकरता पालवीमार्फत पुणे येथील अंकुर शाखेमध्ये ठेवले जाते. त्यांची तेथे चार दिवस ते पंधरा दिवस व्यवस्था करून त्यांना योग्य त्या संस्थेमध्ये पोचवले जाते.

8. पालवी श्रावण सेवा – पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्री वंचितांचे प्रमाण वाढते आहे. हे वंचित रस्त्यावर बसून येणाऱ्या जाणाऱ्याकडे अन्नाकरता याचना करत असतात. मंगलताईनी पुढाकार घेऊन रेल्वे स्टेशनवर बसणाऱ्या याचकांना एआरटी सेंटर, उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे रोज सकस आहार, गरम खिचडी वाटप सुरू केले आहे. सध्या सरासरी 250 लोकांना जेवण दिले जाते. सर्व लेकरांनी एकत्र बसून गुण्यागोविंदाने सोबत भोजन करावे हे मंगलताईंचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न ‘श्री नैवेद्यम’ ह्या भोजनगृहाच्या उभारणीने वर्षभरापूर्वी साकार झाले.

पालवीतील सहा मुलींची एकाच वेळी 2023 या वर्षी जून महिन्यांत व नंतर महिन्याभराने आणखी एका मुलीचे लग्न झाले. सगळ्या मुली पालवीतच लहानाच्या मोठ्या झालेल्या होत्या. मुलगे मात्र बाहेरगावचे होते. दोघींना लग्न झाल्यावर देखील पालवीतच राहायचे असल्यामुळे, मंगलाताईंनी पालवीत रहाण्याची तयारी असलेले आणि त्या मुलींना अनुरूप असलेले मुलगे निवडले. आज त्या दोघीही पालवीत आहेत. त्या सातही मुली व जावई आनंदात आहेत. त्यातल्या काहीजणी आई झाल्या आहेत. ‘एचआयव्ही + एचआयव्ही’ वधू-वरांचे विवाह 2012 पासून करून दिले जात आहेत. विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे त्यांच्या मुलांमध्ये रोग संक्रमित झालेला नाही. समाज त्यांना स्वीकारतो आहे. मंगलताईंच्या उदाहरणामुळे आज पालवीला मदत करणाऱ्यांमध्ये डॉक्टर, समुपदेशक, तरुण कार्यकर्ते दाखल झालेले आहेत.

ताईंना वाचनाची प्रचंड आवड आहे. ताई ‘पुस्तकांच्या खोलीत’ रहातात असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांनी वाचनाच्या आवडीमुळे चाळीस-बेचाळीस वर्षांपूर्वी महिलांनी महिलांसाठी चालवलेले ‘शब्द-शिल्प’ वाचनालय सुरू केले. या वाचनालयात 9000 पुस्तकांचा खजिना आहे, तर ताईंची वैयक्तिक ग्रंथसंपदा एक हजाराच्या आसपास आहे. त्या कविता लिहितात. त्यांची एक कविता अशी: 

मृत्यूशी लपंडाव
पालवीतील बालकाचा मृत्यूशी संवाद !
हे मृत्यू, मी तुझ्यापासून दूर जातोय असं समजू नकोस.
मी तुला चुकवतोय असंही समजू नकोस 

मी एचआयव्ही सहित जगणारा एक बालक !
फक्त एक गंमत करतोय तुझ्याबरोबर
कारण गमतीनंही खेळायला कोणी आजकाल
माझ्याबरोबर येतच नाही 

मृत्यू, तू येणार हे जेव्हा मला कळलं तेव्हा ठरवलं
तुझ्याबरोबरच थोडी लपाछपी खेळायची
तुही गंमत म्हणून धरायला थोडासाच उशीर कर
तेवढीच जगण्यातली गंमत चाखेन!

प्रबोधनात्मक कार्य करत असताना पालवीची सुरवात कशी झाली हे सांगणारा मराठी लघुपट, ‘A Touch of Life – Palavi’ युट्यूबवर उपलब्ध आहे. “आणि ते मंगल झाले” – ‘पालवीची मानवता गाथा’ या पुस्तकात मंगलताईंच्या कार्याची महती व माहिती लेखिका सुरेखा शहा यांनी शब्दबद्ध केली आहे. या पुस्तकाला प्रा. प्रवीण दवणे यांची प्रस्तावना लाभली आहे.  ताईंना आतापर्यंत तीनशेहून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना चाळीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या समाजसेवेसाठी अलीकडेच ग्लोबल महासभेने ‘जैन सशक्त महिला पुरस्कार’ दिला आहे. अशाच प्रकारे ‘लंडन बुक ऑफ रेकॉर्डस्’ या संघटनेने करोना काळात संस्थेने पुरवलेल्या सेवेकरता पुरस्कार प्रदान केला आहे. डॉ प्रकाश व डॉ मंदाताई आमटे, डॉ रवींद्र व डॉ स्मिता कोल्हे, प्रवीण दवणे, संजय मांजरेकर, जॅकी श्रॉफ, आदेश बांदेकर, अमृता सुभाष, निर्मिती सावंत, पंढरीनाथ कांबळे, राहुल सोलापूरकर, महेश मांजरेकर अशा बर्‍याच नामवंतांनी तसेच अनुश्रीताई व आनंदराव भिडे ह्या दानतपस्वी दांपत्याने पालवीला भेट दिलेली आहे. एचआयव्हीसारख्या गंभीर आजारावर नियंत्रण मिळवायचं म्हणजे आरोग्य, आहार, शिक्षण, सामाजिक, मानसिक पाठिंबा यांचा समाजजीवनाच्या कितीतरी पुढे जाऊन विचार केला पाहिजे असे मंगलताईंचे मत आहे. 

बाधित बालकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या ताईंच्या प्रचंड योगदानामध्ये त्यांची मुलगी डिंपल, जावई, सून, मुलगा व आता तिसरी पिढीदेखील सक्रिय आहे. या बरोबरीने देणगीदारांची साथ देखील आहे. आजही त्यांना नवनवी आव्हाने साद देत आहेत, नवनवे उपक्रम खुणावत आहेत; त्यातील काही भविष्यकालीन उपक्रम / योजना – 

  1. ‘मातृवन’ हा 500 बालकांसाठी निवासी इमारतीचा प्रकल्प निर्माणाधीन आहे;
  2. शाळेची आधुनिक इमारत;
  3. बहुउद्देशीय विशाल सभागृह; औषधी वनस्पतींची लागवड; बालकांच्या पोषणासाठी भाज्या व फळांची लागवड; कर्मचार्‍यांसाठी वसाहत; आधुनिक सुसज्ज रुग्णालय; पर्यावरणाशीसुसंगत उत्पादनांच्या निर्मितीचा कारखाना.     
  4. पुढील कामांसाठी ‘सेवातीर्थ’ व‘पालवी विश्व कल्याण विद्यापीठ’ उभे करायचे आहे. सेवातीर्थमध्ये अधिकाधिक तृतीयपंथीयांचे पुनर्वसन, रस्त्यावरून फिरणाऱ्या मनोरुग्ण महिला व अशा महिलांवर झालेल्या अत्याचारातून जन्माला येणाऱ्या बालकांसाठी काम करायचे आहे. या विद्यापीठात (गुरुकुल) बालकांना तीन वर्ष वयापासून संस्कारक्षम करायचे आहे.

पालवी प्रकल्प, कोर्टी रोड, पंढरपूर
वेबसाईट – www.palawi.org, इमेल – info@palawi.org
मोबाइल – मंगलताई शहा – 9881533403 / डिंपल घाडगे-9860069949

– विष्णु यादव 9819512567 Yvishnu1@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here