हिंदी सिनेमाचे सगळ्यांच्याच मनात एक आढळ असे स्थान आहे. त्यातही हिंदी सिनेमाच्या सुवर्ण युगातील गाणी आणि संवेदन हे जणु हातात हात घालून प्रकटते. जसा पावसाआधी मातीचा सुगंध येतो आणि मग पाऊस प्रकटतो तसे एखाद्या खास गाण्याचे सूर काहीतरी आठवण मनात प्रकट करुन जातात आणि असे एखादे गाणे प्रत्येक संवेदनशील मनकोपऱ्यात असतेच असते…
‘ओ रात के मुसाफिर’मधल्या लता-रफी यांच्या सुरांना चांदण्याचा रंग असतो. गुरुदत्तच्या ‘जाल’मधलं ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’ ऐकताना चांदण्याला उधाणलेल्या समुद्राचा खारा वास येतो. ‘और थोड़ी देर में थक के लौट जाएगी, रात ये बहार की फिर कभी न आएगी, दो एक पल और है यह समा’ अशी साद ऐकून मारियाच्या (गीता बाली) रंध्रा-रंध्रात उधाणलेली टोनी (देव आनंद) च्या भेटीची ओढ आणि उधाणलेला समुद्र यांचं अद्वैत जाणवत राहतं…
विविध कलांचा व संवेदनांचा अनुभव देणारा सिनेमा व गाण्यातील मूर्त-अमूर्त अशा जागांविषयी लिहीत आहेत ज्येष्ठ पत्रकार व प्रसिध्द लेखिका रेखा देशपांडे. विश्वाच्या संवेदनांना व्यापून राहिलेल्या ‘सिनेमा’तले हे काही सुंदर क्षण प्रत्येकाने वाचायलाच हवेत. प्रस्तुत लेख दोन भागात प्रसिध्द होत आहे. ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख सोबतच्या लिंकवरुन वाचता येतील.
– सुनंदा भोसेकर
कहीं ये वो तो नहीं?…
ओ रात के मुसाफिर, चंदा ज़रा बता दे
मेरा कुसूर क्या है, तू फैसला सुना दे…
‘मिस मेरी’ (1957) या चित्रपटातलं हे खूप सुंदर गाणं. नायक (जेमिनी गणेशन) आणि नायिका (मीनाकुमारी) पौर्णिमेच्या चंद्राला मध्यस्थ करून एकमेकांविषयीची आपापली तक्रार नोंदवतात. साहजिकच या गाण्याचं चित्रीकरण स्टुडिओत कलादिग्दर्शकानं उभारलेल्या पौर्णिमेच्या रात्रीच्या सेटवर झालेलं आहे. असं असलं तरी प्रेक्षकावर त्याचा परिणाम खऱ्याखुऱ्या चांदण्याचाच होतो. यात ब्लॅक अँड व्हाइट सिनेमाटोग्राफीचा मोठा हातभार आहे. ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटात चांदण्या रात्रीचा रुपेरी माहौल निर्माण करण्याची जी विलक्षण क्षमता असते ती रंगीत चित्रपटात नाही. पण विषय तो नाही.
मी हे गाणं ज्या ज्या वेळी ऐकते तेव्हा मला जाणवते ती महाडच्या एसटी स्टँडवरची टळटळीत दुपार आणि त्या भर दुपारी एसटी स्टँडसमोरच्या टपरीवजा हॉटेलातलं मटण ! विनोदी वाटलं असेल किंवा दळभद्री लक्षणही वाटलं असेल. पण तेच वास्तव आहे. साठच्या दशकातला पूर्वार्ध असेल. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की आमचा रत्नागिरीहून आईच्या माहेरी ठाण्याच्या दिशेनं एसटीचा प्रवास सुरू व्हायचा. बारा तासांच्या त्या बस प्रवासात बरोबर मध्यावर, दुपारी जेवणाच्या वेळी एसटी महाडला चांगली पाऊण-एक तास थांबायची. तिथे ड्रायव्हर-कंडक्टरची ड्युटी बदलायची. प्रवासी एसटी स्टँडच्या कँटीनमध्ये डाळ-भात, चपाती, वांग्या-बटाट्याची भाजी, कैरीचं लोणचं जेवायचे. वर्षानुवर्षे तीच भाजी, तीच डाळ, तेच लोणचं आणि ‘एक इसम बारा आणे’ असं काऊंटरवरच्या माणसाला ओरडून सांगत. बारा आण्याचं जेवलेल्या प्रवाशाच्या इज्जतीचा बिनदिक्कत फालुदा करत जेवणाऱ्यांच्या रांगा-रांगांतून फिरणारा ढोल्या मुख्य वेटरही तोच. किमान आम्ही तरी सलग दोन तीन उन्हाळे हाच मेनू जेवल्यावर आणि ढोलूमामांकडून इज्जतीचा फालुदा करून घेतल्यावर, एक वर्ष माझ्या मोठ्या भावानं आईकडे प्रस्ताव ठेवला, ‘समोरच्या हॉटेलात मटण मिळतं.’ त्यानं रेकी करून ठेवली होती बहुतेक. आईही वांग्या-बटाट्याच्या महाराष्ट्र परिवहन भाजीला कंटाळली असणारच. प्रस्ताव लगेचच पास झाला होता. त्या टळटळीत दुपारी, त्या समोरच्या हॉटेलात, पत्र्याच्या तापलेल्या छपराखाली, कपाळावरून, कानफटावरून ओघळणाऱ्या घामाच्या खारट धारा पुसत अत्यंत चविष्ट मटण आणि भाताचं जेवण जेवणारे आम्ही दिवसाचे मुसाफिर आणि या दृश्याला पार्श्वसंगीत होतं ते हॉटेलातल्या रेडिओवरच्या ‘ऐ रात के मुसाफिर’चं. मी ते गाणं त्या दिवशी प्रथमच ऐकलं आणि त्या गाण्यानं बाराव्या-तेराव्या वर्षी भर दुपारी मला चांदण्या रात्रीचा रोमँटिक अनुभव दिला आहे.
मोठेपणी कधी तरी ‘मिस मेरी’ पाहिला. पण ज्या ज्या वेळी ते गाणं मी ऐकते त्या त्या वेळी उन्हाळ्यातल्या झळझळीत दुपारचा महाडचा किचाट आवाजी एसटी स्टँड, मटणाचा स्वाद, गाण्याचे सूर, त्यातल्या शब्दांतून जागणारी चांदणी रात्र, नायक-नायिकेच्या रोमँटिक तक्रारी या सगळ्या संवेदनांचं मिळून एक रसायन माझ्या मनात तयार होतं.
विविध संवेदनांचं असं नकळतच एकमेकांची साथ देत येणं किती तरी वेळा घडत असतं. मोगऱ्याच्या फुलाचा वास येतो आणि उन्हाळ्याच्या सुटीतल्या संध्याकाळी आठवतात. सोनचाफ्याचा वास येतो तेव्हा सोनसळी श्रावण मनात जागा होतो. श्रावण जसा हिरवा, तसा नवरात्र आणि दसरा मला झेंडूच्या पिवळ्या रसरशीत रंगाचा वाटतो. आणि त्याला आणखी एक सुगंध लगडून येत असतो- पिकत आलेल्या भाताच्या शेताचा वास. लहानपणी आजूबाजूला पिकू लागलेली शेतं, तोरणासाठी आयत्याच मिळणाऱ्या नवधान्याच्या लोंब्या, कुठेही उगवणारे हलक्या जांभळ्या-गुलाबी रंगाचे गोंडे ही दृश्यं आणि तो सुगंध हातात हात घालून येतात. अर्थात आता ठाण्या-मुंबईसारख्या शहरात वासाचं, दृश्यांचं गणित वेगळं आहे. बाजारात पैसे मोजावे न लागता मिळणाऱ्या लोंब्या, गोंडे, आवळे, चिंचा, कैऱ्यांच्या दिवसात कैऱ्या ही चैन नाही. पण स्मृतीत ती इतकी घट्ट रुतली आहे की यातला कोणताही वास, कोणताही रंग, कोणताही आवाज आला की तो बरोबर इतर सगळ्या संवेदना घेऊनच येतो. दिवाळीतल्या वासांनी लहानपण जागं झालं नाही अशी माझ्या पिढीतली माणसं विरळाच असतील. फराळांचे वास अधिक फटाक्यांचे वास अधिक दिवाळीचा असा एक अदृश्य वास असतोच. नेमकं वर्णन करता येत नाही त्याचं. अमूर्त असतो तो. आता वास अमूर्त असतोच नं? अमूर्त चित्र असतं तसा हा अमूर्त वास. जाणवतो, भावतो. फोड करून सांगता येत नाही. ‘ओ रात के मुसाफिर’मधल्या लता-रफी यांच्या सुरांना चांदण्याचा रंग असतो ना, तसाच. गुरुदत्तच्या ‘जाल’मधलं ‘ये रात ये चांदनी फिर कहाँ’ ऐकताना चांदण्याला उधाणलेल्या समुद्राचा खारा वास येतो ना, तसाच. ‘और थोड़ी देर में थक के लौट जाएगी, रात ये बहार की फिर कभी न आएगी, दो एक पल और है यह समा’ अशी साद ऐकून मारिया (गीता बाली) च्या रंध्रा-रंध्रात उधाणलेली टोनी (देव आनंद) च्या भेटीची ओढ आणि उधाणलेला समुद्र यांचं अद्वैत जाणवत राहतं ना, तसंच अगदी.
———————————————————————————————-
रूप-रस-गंध-स्पर्श-ध्वनीच्या या रसायनाविषयीचं कुतूहल मनाच्या तळाशी पडून होतं.
अरुण खोपकर यांच्या ‘प्राक्-सिनेमा’ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद करताना ते कुतूहल अचानक जागं तर झालंच, संवेदनांचा हा पडद्यामागे परस्परांत चालणारा छुपा खेळ सरळ पडद्यावरच अवतरला. तोही ज्ञानेश्वरांच्या ‘पैलतोगे काऊ कोकताहे’ या विराणीच्या त्यांनी केलेल्या विश्लेषक रसग्रहणातून. रूप-रस-गंध-स्पर्श-ध्वनी-ग्रहणातून. त्यातून या विराणीत लपलेला एक लघुपटच समोर सादर केला त्यांनी. मग त्यांनी, ज्ञानेश्वरांनीच उलगडून सांगितलेला पंचेन्द्रियांचा ‘कलभा’ – आपसातला कलह – सादर केला.
अनुभवांची ही फोड करून खोपकर थांबले नाहीत. त्यांनी त्याची मानसशास्त्रीय फोडही करून दिली. रशियन मानसशास्त्रज्ञांचं या संदर्भातलं संशोधन, संवेदन-शक्तींच्या या विलक्षण झिम्म्याचा वापर चित्रपटासाठी करू पाहण्याचा सर्गेई आइझेन्स्टीनसारख्या दिग्दर्शकांचा प्रयत्न, मज्जातंतुशास्त्रज्ञ ए. आर. लुरिआ यांना भेटलेली विलक्षण व्यक्ती आणि लुरिआंनी काढलेले निष्कर्ष हा सगळा ऐवज ‘प्राक्-सिनेमा’मध्ये मुळातून वाचायला हवा. अगदी ‘पैलतोगे काऊ कोकताहे’ या खोपकरांनी सादर केलेल्या लघुपटापासूनच.
एका कलेच्या दुसऱ्या कलेत गुंतलेल्या नात्याकडे या ऐंद्रिय अनुभवातूनच जाता येतं. त्याचा वापर कलाकार सतत करतच असतो. कैफी आझमींच्या गीतात तो किती समर्थपणे उतरलाय –
ज़रा-सी आहट होती है तो दिल सोचता है
कहीं ये वो तो नहीं?…
आहट – चाहूल – येते ती आधी ध्वनीतून. कदाचित पावलांच्या आवाजातून, दरवाज्यावरच्या थापेतून, डोअरबेल वाजवण्याच्या किंवा दरवाजा ढकलण्याच्या आवाजाच्या विशिष्ट लकबीतून. आणि तेवढ्यावरून मन कामाला लागतं, प्रियतमच आला असावा. गाण्याचा पहिलाच शब्द ‘कहीं’. लता तो इतक्या दबल्या, हलक्या सुरात उच्चारते की त्या एका शब्दाच्या उच्चारातून मनातली साशंकता मूर्त होऊन उठते. पण लगेचच लताचा सूर ठाम होतो. उत्तरोत्तर खात्रीच होत जाते. खात्री का? तर एकेक पुरावेच सादर होत जातात नं ! तो नसेल तर मग हृदयाची उत्कंठित धडधड इतकी वाढत का चाललीय? काळीज उजळून कसं निघालंय? नसा-नसांतून अशी उत्कंठा वेगानं धावत सुटलीय ती का? त्याच्या वस्त्रांच्या सळसळीनं आलेली झुळूक त्याचा गंधही बरोबर घेऊन येते आहे….
छुपके सीने में कोई जैसे सदा देता है,
शाम से पहले दिया दिल का जला देता है
है उसीकी ये सदा
है उसीकी ये अदा
ध्वनी. हा ध्वनी नक्की पावलांचा आहे, दाराचा आहे. की हृदयातल्या धडधडीतून येतो आहे तो? म्हणजे हृदयालाच कळलंय वाटतं, तो आलाय म्हणून? कारण हृदयातली धडकन अशी लय पकडते ती फक्त तोच जवळपास असतो तेव्हा. तिन्ही सांजा व्हायच्या आधीच काळजातली पणती पेटते. सगळं दृश्य कसं लख्ख होऊन जातं. तेव्हा त्याचाच हा आवाज आणि त्याचीच ही लकब. श्रवणेन्द्रियांना जाणवणारी, डोळ्यांना दिसणारी. मनाला पटणारी.
शक्ल फिरती है निगाहों में वो प्यारी-सी
मेरी नस-नस में मचलने लगी चिनगारी-सी
छू गई जिस्म मेरा किसके दामन की हवा
डोळ्यांपुढे तोच प्रिय चेहरा तरळत राहू लागतो आणि त्याबरोबर नसा-नसात, रक्त-रसात जणू ठिणग्या पेटतात. हवीहवीशी आग. चटका देणारा उत्कंठेचा स्पर्श. स्पर्शातून लागलेली चाहूल म्हणजे – ‘छू गई जिस्म मेरा किसके दामन की हवा.’ त्याच्या वस्त्राची सळसळ, त्यामुळे आलेली झुळूक, त्या झुळकेबरोबर माझ्या शरीराला स्पर्श करणारा त्याचा शरीरगंध त्याचं आगमन सुचवतोय. ध्वनी, स्पर्श, गंध तिन्हीचा हा रोमांचित करणारा अनुभव. अतिशय हळुवार अशी ही शब्दकळा म्हणजे संवेदनशक्तींचा एकत्रित शक्तिशाली आविष्कार. हे गाणं ऐकलं की मला अनिवारपणे आठवतात त्या छायावादी-रहस्यवादी कवयित्री महादेवी वर्मांच्या ओळी-
जो न प्रिय पहचान पाती
दौड़ती क्यों प्रतिशिरा में प्यास विद्युत-सी तरल बन?
क्यों अचेतन रोम पाते चिरव्यथामय सजग जीवन?
क्यों किसीके आगमन के शकुन स्पंदन में मनाती?
जो न प्रिय पहचान पाती
नसा-नसांतून त्याच्या भेटीची लागलेली ही तहान विजेच्या वेगानं वाहू लागली आहे, ही त्याचीच चाहूल. अचानक रोम रोम जागे होतात, जिवंत होतात, चिरव्यथेचा जागर मांडतात. याचा अर्थ काय? त्याच्या आगमनाच्या शुभसंकेतांचा श्वासा-श्वासात चालू झालेला सिलसिला. याचा अर्थ काय? ओळखलाच मी. तोच येतो आहे. त्याशिवाय का इंद्रियांनी हा उत्सव मांडलाय? पैलतोगे काऊ कोकताहे…
– रेखा देशपांडे 9821286450 deshrekha@yahoo.com
—————————————————————————————————-
अप्रतिम लेख.
फार छान शब्दकळा.
निवडलेली गाणी परफेक्ट.
संध्या जोशी