मुरुडचा भूलभुलैया चौक (Murud’s 400 year old Magic Square)

0
580

गावात, शहरात चौक असतात. पण एखाद्या गावात चौकटीत किंवा चौकाच्या व्याख्येत न बसणारा असा; तरीही तो चौकच असतो, हे वाचून अचंबा वाटेल. असा चौक आहे दापोली तालुक्यात मुरुड या गावी. मुरुड हे टिंबाएवढे गाव. नकाशात त्याचे अस्तित्व ते काय दिसून येणार ! परंतु त्या गावाची ख्याती ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक वेगळेपणामुळे सर्वदूर पोचली आहे. गावाची रचना विचारपूर्वक करण्यात आली असल्याचे जाणवते. दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता. सुमारे चारशे वर्षांपूर्वीची ही रचना स्वत:चे रूप अजूनही टिकवून आहे.

गावाच्या मध्यभागी एक चौक आहे. चौक म्हटले, की चार रस्ते चार दिशांना जाणारे आणि एकमेकांना काटकोनात छेदणारे असतात ना ! ते जेथे मिळतात तेथे चौकोनी आकाराची जागा तयार होते. तेथून चारही दिशांना चार रस्त्यांवरून होणारी रहदारी दृष्टीस पडते आणि त्या जागेला वेगळेच महत्त्व प्राप्त होते. मात्र मुरुड गावातील चौक या संकल्पना चौकटीत बसणारा नाही.

चौक गावाच्या मध्यभागी आहे. ज्याला चौक म्हटले जाते त्या चौकाच्या समोर ग्रामदैवत, श्री दुर्गा देवीचे मंदिर आहे. चौकापासून सुरू होणारा एक रस्ता आहे, तो जातो उत्तर दिशेकडे, दुसरा समुद्राकडे, तिसरा दक्षिणेकडे आणि चौथा रस्ता गावाबाहेर जातो. मौज अशी, की हे सगळे रस्ते शेवटी गावाबाहेर जातात, पण गावाच्या वस्तीतून जातात. चौकाचे वेगळेपण असे आहे, की त्याचे चार रस्ते चौकाच्या इतर रस्त्यांपासून लपवल्यासारखे आहेत. म्हणजे चौकापासून सुरू होणाऱ्या कोणत्याही एका रस्त्यावर, पण चौकात उभे राहिले तर बाकी तीन रस्ते सहजी दिसत नाहीत. उलट, चौकात आले की गोंधळायला होते. मार्ग सांगणारा कोणी ग्रामस्थ सापडला नाही तर होणारा गोंधळ विचारायलाच नको ! म्हणून मग स्वत:च्याच मनाने थोडे पुढे चालत गेले तर दोन रस्ते दिसतात. एक दक्षिणेकडे जातो तर दुसरा पूर्वेकडे. पुन्हा मनात गोंधळ तयार होतो. मागे वळून परत उत्तर दिशेकडे यावे, तर डावीकडे जाणारा लपलेला एक रस्ता डुकली वर काढून खिजवत राहतो. तोच रस्ता पकडून जावे तर पुढे गेल्यावर लक्षात येते- अरे, हा रस्ता तर समुद्राकडे निघाला आहे ! आता गावाबाहेर कसे पडावे? अशा चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू मग पुन्हा चौकात परततो. खरोखरीच्या ‘मार्गदर्शना’साठी कोणी माणूस दिसेपर्यंत वाट पाहण्यावाचून गत्यंतर नसते. अशी भांबावलेली स्थिती या चौकाला मिळणाऱ्या प्रत्येक रस्त्यावरून येणाऱ्याची होतेच होते.

चौकाची अशी रचना का? तर गावावर पूर्वी ठग-पेंढाऱ्यांचे हल्ले होत. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी अशी मांडणी केल्याचे बोलले जाते. पाठलाग करत आलेले ठग-पेंढारी या चौकात आल्यावर विचारात पडत. ती संधी गावकरी साधत. योग्य त्या रस्त्यावरून पळून जाऊन स्वतःचा जीव तरी सांभाळत किंवा कुमक जमवून त्या हल्लेखोराचा जीव तरी घेत ! काहींचे म्हणणे असेही आहे, की ‘सिद्धपुरुष’ नामक एका कनोजा ब्राह्मणाने हे गाव वसवले. त्याच्या वेगळ्या स्थापत्य दृष्टीमुळे असा चौक निर्माण झाला. चौकात एका बाजूला (दक्षिणेकडे) विहीर आहे. तिला ‘सिद्धपुरुषाची विहीर’ असे म्हणतात.

चौकात येऊन मिळणारे रीतसर रस्ते हे काही वर्षांपूर्वी तयार झाले. त्यापूर्वी चारही बाजूंनी पाखाडी होती. पाखाडी म्हणजे मोठ्या आयताकृती जांभ्या दगडांनी तयार केलेला फूटपाथ. सुमारे अडीच फूट उंचीचा आणि चार फूट रुंदीचा. त्याला लागून ‘बिदी’ म्हणजे पूर्णपणे मातीचा रस्ता असे. समांतर जाणाऱ्या या पाखाडी-बिदीचा असा रस्ता गावाच्या सौंदर्यात भर तर घालत असेच; शिवाय, त्यातून काही सुविधा उपलब्ध होत. पाखाडीवरून माणसांनी येजा आणि बिदीतून बैलगाड्या-गुरेढोरे यांचा राबता अशी कल्पना प्रत्यक्ष अमलात होती. पावसाळ्यात बिदीचा उपयोग पाणी वाहून जाण्यासाठी होई. भर पावसात बिदीला एखाद्या पऱ्ह्याचे स्वरूप येई. पऱ्हा म्हणजे नाला; झरा; पर्जन्य काळी पाणी जाण्यासाठी खणलेली चरी; खांचखळगा. त्यावेळी या चौकाचे स्वरूप वेगळे दिसे. पाणी वाहून जाण्याच्या सोयी ठिकठिकाणी करण्यात आल्या होत्या. उत्तर दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही एक विहीर दिसून येते.

– विनायक बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here