दुर्गेच्या संरक्षक रूपाची उपासना सर्वत्र केली जाते. मुरुडच्या दुर्गादेवीच्या देवळाची कथा तशीच आहे. मुरुड गाव गंगाधर भट नामक सिद्धपुरुषाने कोकणातील दापोली तालुक्यात वसवले. तशी बखर आहे. गंगाधर भट समुद्रकाठाकाठाने सोळाव्या शतकात सौराष्ट्रातून आले होते. मुरुडमध्ये वसाहत करताना दोन्ही बाजूंना घरे आणि मधोमध रस्ता अशी रचना झाली. मंदिरे स्थापन झाली. तरी एक भय राहिले. कोकण किनारपट्टीमधील गावांवर सागरी चाच्यांच्या आक्रमणाचे सावट असे. गावे लुटली जात. म्हणून रक्षणकर्त्या दैवताचे सान्निध्य गावकऱ्यांना धैर्य देईल या कल्पनेने दुर्गा देवीचे मंदिर गावात मध्यवर्ती ठिकाणी स्थापन केले.
मुरुड गावच्या बखरीमध्ये गंगाधर भट हे दातार यांच्या घरी वास्तव्यास असल्याचे व त्यांनी दातार यांच्या मुलांना विद्या शिकवल्याचा उल्लेख आहे. त्यांनीच बहुधा दातार यांची पुजारी म्हणून नेमणूक केली. दातार कुटुंबीय दुर्गादेवीचे पिढीजात पुजारी आहेत. भास्कर दातार देवीचे पुजारी म्हणून कार्यरत आहेत. हर्षल हा त्यांचा मुलगा. दररोज मंदिराची झाडलोट, किरकोळ दुरुस्ती, लादी बसवणे वगैरे डागडुजी अशी कामे दातार स्वत: येणाऱ्या भाविकांच्या मदतीने करत असतात.
दुर्गेचे महात्म्य जाणायचे असेल तर सप्तशतीच्या पाठामध्ये कथा आहे. महिषासुर हा असुरांचा राजा, रंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा. म्हैस आणि रंभ यांच्यापासून उत्पत्ती झालेला महिषासुर. त्याचे ‘काम’ म्हणजे अनियंत्रित लैंगिक भावना आणि मद म्हणजे गर्व, उन्मत्त वृत्ती हे विकार बळावल्यामुळे तो साऱ्यांना पीडा देऊ लागला. शिवाय, त्याने त्याला देव वा दानव मारू शकणार नाहीत असा वर ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतला होता. म्हणून देवांनी त्याचे निर्दालन करण्यास दुर्गेची निर्मिती केली. महिषासुर आणि त्याचे सेनापती राक्षस यांचे दुर्गेशी नऊ दिवस युद्ध चालले. त्यात दुर्गेने त्याला ठार मारले. अशी दुर्गेची महती.
मुरुड गाव वसवताना स्थापन केलेले दुर्गादेवीचे मंदिर लहान व साधे होते. मुरुड गाव नारळी–पोफळीच्या बागांनी संपन्न झाले, गाव भरभराटीला आले. त्यामुळे मुरुडवासीयांनी दुर्गादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे योजले. थोरले माधवराव पेशवे यांनी देवळाच्या जीर्णोद्धारास मदत केल्याची माहिती देवीचे पुजारी भास्कर गणेश दातार यांजकडे आहे. गावातील शंकरभट दीक्षित, विश्वनाथ जोशी, आप्पाभट दातार, केशवभट कर्वे व नारो हरी बाळ यांच्या पुढाकाराने 1760 साली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली. लाकडी खांब असलेल्या मंदिरावर कलाकुसर हवी यासाठी मुद्दाम बाहेर प्रदेशातून कोरीव कामातील कसबी कलाकारांना आणले गेले. कलाकारांच्या कौशल्यपूर्ण कामातून 1763 साली मूळ मंदिराच्या शेजारी दुसरे मोठे व अप्रतिम कलाकुसरीने विलोभनीय मंदिर उभारले गेले. दापोलीच्या पंचक्रोशीत इतके सुंदर मंदिर अन्यत्र कोठे नाही.

मंदिर काळ्या दगडाच्या उंच जोत्यावर बांधलेले असून समोर नगारखाना व त्रिपुर आहे. सभामंडप प्रशस्त व मोकळा आहे. गाभाऱ्यावर कोरलेल्या शिलालेखात मंदिर बांधल्याची तारीख, वार आदी तपशील आहे. सभामंडप व गाभारा यांत कलाकुसरीने नटलेले लाकडी खांब आहेत. जोड न दिलेले भरीव खांब व त्यावरील कोरीव कामाची विलोभनीय सजावट हे मंदिराचे आगळे वैशिष्टय आहे. लाकडी खांबांवर वेली, पाने, फुले, फळे यांच्या नक्षीचे कोरीव काम आकर्षक आहे. हत्ती, वाघ, पोपट, मोर, सर्प; तसेच, दशावतारातील आकृती आहेत. गाभाऱ्याचा दरवाजा व चौकट कोरीव कामाने सजलेले दिमाखदार आहेत. दुर्गेची मूर्ती काळ्या पाषाणात आहे, अष्टभुजा आहे, त्रिनेत्रधारी आहे. अशी मूर्ती दुर्मीळ असते. असुराला मारण्यासाठी उग्र रूप धारण केलेल्या, कपाळावर तिसरा नेत्र अशी ती कल्पना. गाभाऱ्यातील कोनाड्यामध्ये देवीची लहान मूर्ती विराजमान आहे. देवीच्या रथ उत्सवाच्या वेळी ती मूर्ती पालखीत ठेवून मिरवली जाते.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस सुरुवात होणारा देवीचा रथ उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. त्यानंतर अश्विन नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी सुरू होणारा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवाच्या वेळी दररोज चारशेच्या आसपास भाविक दर्शनाचा लाभ घेतात. एरवी देखील दररोज तीस, चाळीस भाविक व पर्यटक मंदिरात येतात.
देवळाच्या सभामंडपाबाहेर मोठी पोर्तुगीज घंटा आहे. ती घंटा वेगळ्याच इतिहासावर प्रकाश टाकते. पोर्तुगीजांनी वसईवर 1534 मध्ये कब्जा केला. त्यांनी वसईचा किल्ला 1536 मध्ये बांधला. पोर्तुगीजांनी वसईवर दोनशे वर्षे राज्य केले. मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पाडाव करण्यासाठी मोहीम आखली. पेशव्यांचा सेनापती चिमाजी अप्पा याने पोर्तुगीजांवर विजय मिळवून वसईवर ताबा मे 1739 मध्ये मिळवला. किल्ल्यातील पोर्तुगीज बनावटीच्या घंटा हस्तगत केल्या. चर्चमधील त्या घंटांची विक्री करण्यात आली. सरदार, सुभेदार, सावकार अशा लोकांनी घंटांची खरेदी केली आणि त्या वेगवेगळ्या देवालयांना भेट दिल्या.

Amazing post.
But tourism directorate of Maharashtra’s folders are dumb for extending info.
TM is doing yoman’s job.
Thanks to authors of this piece of info.