नादसागर मालकंस (Melodic Malkansa)

शास्त्रीय संगीतातील रागांचा परिचय करून देणाऱ्या लेखमालेत डॉ. सौमित्र कुलकर्णी ‘मालकंस’ या लोकप्रिय आणि कलाकारप्रिय रागाविषयी माहिती देत आहेत. हा राग गाण्याची वेळ मध्यरात्र ही आहे. मध्यरात्रीच्या महासागरासारखा, प्रशांत आणि धीरगंभीर असलेला हा राग माहीत नसतानाही त्यावर आधारित संगीतरचना मनाला मोहिनी घालतात. थोडासा परिचय झाला तर त्या आनंदात भरच पडेल. दिग्गज कलाकारांनी गायलेल्या या रागातल्या बंदिशींच्या यू-ट्युब लिंक सोबत दिल्या आहेत, रागाचा परिचय होण्यासाठी त्यांची मदत होईल.

‘मोगरा फुलला’ या सदरातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

नादसागर मालकंस

नादसागर अपरंपार
महाकठिन जाको पायो न पार
रागन की नैया तालनकी पतवार
गुरु खेवट भी ना जाने कब पावे पार

डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांची ही मालकंसाची रचना फार समर्पक आहे. खरंच, मालकंसाचा विस्तार हा अपरंपार आहे. पाचच सुरांचा हा राग; पण त्याची व्याप्ती ती केवढी! ती ऐकूनच अनुभवावी. असे म्हणतात, की शंकराच्या वामदेव या मुखातून मालकंसाचा जन्म झाला. त्यामुळे मूळ सहा रागांपैकी मालकंस हा एक आणि हिंदुस्तानी राग-संगीतातील महत्त्वाचा राग! ‘मालवकौशिक’ असे याचे आधीचे नाव होते असे ऐकले आहे. परंतु आज गायल्या जाणाऱ्या मालकंसाच्या स्वरूपाला ग्रंथाधार नाही. तरी देखील सर्व घराणी, कंठ-संगीत असो वा वाद्य- संगीत, रागदारी असो वा नाट्यसंगीत, भावगीत असो वा सिनेगीत या सर्व प्रकारांत मालकंसाचा मुक्त संचार आढळतो.

मालकंसाची व्याप्ती फार मोठी असली; तरी अस्सल रागदारी पद्धतीने ऐकताना तो धीरगंभीर, विचारमग्न; पण काहीसा शांत असा भासतो. रात्री उशिरा, किंबहुना मध्यरात्री गायन-समय असल्यामुळे, त्यातील कोमल गंधार, धैवत आणि निषाद यांच्यातील स्वर संवाद या नाद सागरात उठणाऱ्या लाटांचा आभास निर्माण करतात व दिवसभरात घडलेल्या गोष्टींविषयी विचार करत, निवांत पहुडलेल्या जिवाला वेढून घेतात, काहीसे शांत करतात. षड्ज व मध्यम हे यातले प्रमुख न्यास स्वर. यांच्या लगावातून काहीसा आधार वाटतो. त्यामुळे मला स्वतःला रात्री झोपताना हमखास मालकंस ऐकावा, असं वाटतं.

यातले विलंबित खयाल हे अनेकविध रंगांचे आहेत. ‘पीर न जानी’, ‘जिनके मन में राम बिराजे’ आणि ‘पग लागन दे’ हे त्यातले काही प्रमुख! पंडित भीमसेनजी यांच्या घुमारेदार आवाजात मालकंस फारच शोभत असे. ‘रंगरलिया करत सौतन के संग’ ही द्रुत बंदिश अतिशय नटवून ते म्हणत. त्यांची आणि कर्नाटक संगीतातील ज्येष्ठ गायक पंडित एम. बालमुरली कृष्ण यांची जुगलबंदी ही प्रसिद्ध होती. कर्नाटकी पद्धतीत मालकंसला ‘हिंदोळम्’ असं नाव आहे. रागस्वरूप सारखं असल्यामुळे उत्तर हिंदुस्तानी आणि कर्नाटकी संगीताच्या जुगलबंदी कार्यक्रमात मालकंस आणि हिंदोळम् हमखास असतो.   

अत्यंत जुना आणि प्रसिद्ध राग असल्याकारणाने थोडे बहुत गाणं शिकलेले सर्वजण बहुधा मालकंसाच्या छायेतून गेलेले असतात. मला आठवतं, माझी आजी नेहमी ‘मुख मोर मोर मुसकात जात’ ही पारंपरिक रचना गुणगुणायची; तर आजोबा ‘कोयलिया बोले अंबुवा डालपर’ ही बंदिश आवडीने गायचे.

पंडित मालिनी राजूरकर यांनी गायलेली द्रुत बंदिश ही मालकंसच्या वातावरणाचे सुरेख चित्र उभे करते. उदाहरणार्थ, ही अस्ताई बघा-

‘नभ निकस गयो चंद्रमा 
चांदनी चमक रही कमल खिलो पवन बहे’ 

मालकंसाचे हे चित्र असेच अनेक गायक-वादकांच्या आविष्कारातून उमटताना दिसते. बडे गुलाम अली खाँसाहेबाची ‘मंदिर देख डरे सुदामा’ किंवा ‘आये पी मोरे मंदर’ ही बंदिश, उस्ताद विलायत खाँ यांचा सतारीवर वाजवलेला ‘सुकूनभरा’ मालकंस अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. वादकांसाठी देखील हा खास आवडीचा राग आहे. किशोरीताई म्हणायच्या की मालकंस हा खरंतर कंठ-संगीताचा नव्हे; तर वाद्य-संगीताचा राग आहे. याची स्वरस्थाने कंठातून तंतोतंत काढणे हे खरंच मुश्किल आहे.  

जयपुर-अत्रौली घराण्यात मालकंस अत्यंत समृद्धीने गायला जातो. सुरश्री केसरबाई आणि गान तपस्विनी मोगूबाई यांनी गायलेल्या ‘मैं सन मीत’ या बंदिशीचं रेकॉर्डिंग फारच श्रवणीय आहे. केसरबाईंच्या अफाट दमसासाच्या ताना आणि मोगूबाईंचे ताळेबंद हिशेबाचे डौलदार बोलआलाप ऐकणाऱ्याला अचंबित केल्याशिवाय राहत नाहीत. तसाच किशोरीताईंनी बांधलेला ‘तुम बिन कौन सॅंवारे’ हा खयाल, अश्विनीताईंचा आधी उल्लेख केलेला ‘नादसागर’ हा खयाल आणि ‘मैं कोसो बताऊॅं’ ही द्रुतही मालकंसाच्या खजिन्यातील जणू एकेक रत्नच आहेत. अशा या विविध कलाकारांच्या प्रतिभेने नटलेला मालकंस अनेकविध चेहरे लेऊन उभा राहतो आणि त्याच्या असीमपणाची जाणीव करून देतो. 

खुद्द अल्लादियाखाँसाहेबांच्या देखील मालकंसामधील रचना लक्षात घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे ‘आदिदाता अंत दयावंत’ हा झपताल आणि ‘ए मन रब साई’ ही बंदिश! ‘आदिदाता अंत’ हे जयपूर घराण्याचं ध्रुपदाशी असलेलं नातं सांगतं आणि मुसलमान असूनही जानवं घालणाऱ्या आणि गायत्री मंत्र जपणाऱ्या खाँसाहेबांच्या या रचनेतून संगीताला धर्माचं बंधन नसते, स्वर हाच त्याचा ईश्वर हे प्रकर्षाने जाणवते.  

ऋषभ पंचम वर्ज्य असणाऱ्या या रागात जर एका विशिष्ट पद्धतीने हे सूर वापरले; तर जयपूर घराण्याचा एक खास राग ‘संपूर्ण मालकंस’ तयार होतो. जयपूर घराण्याच्या सर्वच कलाकारांचा आवडीचा असलेला हा राग आता बऱ्यापैकी प्रचलित आहे असे म्हणता येईल. ऋषभ व पंचम लावताना रागाचे ‘मालकंस’पण हरवू नये, याची काळजी घ्यावी लागते. नेहमीच्या मालकंसाच्या शांत आणि काहीशा धीर गंभीर वातावरणापेक्षा ‘संपूर्ण मालकंस’ काहीसा बोलका आणि ललित वाटतो. पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, मोगूबाई, किशोरीताई ते अगदी आजच्या आघाडीच्या गायिका मंजिरी असनारे-केळकर यांचे संपूर्ण मालकंस जरूर ऐकावेत. ‘बरज रही वाहूँ’ हा खयाल आणि त्याला जोडून मोगुबाईंची ‘बनवारी शाम’ किंवा निवृत्तीबुवांची ‘कित ढूँढन जाऊँ’ ही बंदिश द्रुत म्हणून गायली जाते. पंडित दिनकर पणशीकर यांनी देखील या रागात सुरेख बंदिशी बांधल्या आहेत.

मालकंसाचे अनेकविध प्रकारही गायले जातात. आग्रा घराण्यात ध्रुपद-धमारदेखील गायले गेले आहेत. विलायत हुसेन खाँसाहेबांचं मालकंसातील धमाराचं रेकॉर्डिंग आहे. पंडित उल्हास कशाळकर ‘मालकंस-बहार’ असा जोड राग गातात; तर ग्वाल्हेर घराण्याचे लोक ‘पंचम-मालकंस’ गातात. ‘कौशी भैरव’ असा मालकंस व भैरव यांचा जोड राग देखील आहे. संवादिनी वादक गोविंदराव टेंबे यांनी निर्माण केलेला ‘कौशी ललित’, श्रुती सडोलीकर गातात. मालकंस आणि दरबारी यांचे मिश्रण असलेला ‘कौशी कानडा’ हा देखील अत्यंत प्रसिद्ध व गायक वादकांचा आवडता राग आहे.

मालकंसाच्या विस्तृत आकाशात जितके खयाल आहेत; साधारण तेवढीच हिंदी-मराठी गाणी आणि नाट्यपदेही आहेत. ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘मन तरपत हरिदर्शन को आज’, ‘बलमा माने ना’, अशी हिंदी; तर ‘देवरूप होऊ सगळे’, ‘निजल्या तान्ह्यावरी’ अशी मराठी गाणी मालकंसावर आधारित आहेत. पंडित भीमसेन जोशींनी गायलेलं ‘ये तनु मुंडना’ हे कबीर भजन आणि ‘अणुरणीया थोकडा’ हा संत तुकारामाचा अभंग म्हणजे देखील मालकंसाचं रूप! ‘उगवला चंद्र पुनवेचा’, ‘अशी सखी सहचरी’ ही नाट्यगीते संपूर्ण मालकंसावर आधारलेली आहेत; तर ‘तेचि पुरुष दैवाचे’, ‘दिव्य स्वातंत्र्यरवि ‘ही नाट्यपदे मालकंसाचे ललित रूप साकारतात.

असे हे मालकंसाचं विस्तीर्ण आकाश! याच्या खाली उभं राहून स्वरांच्या चांदण्यात न्हाऊन निघावं आणि असीम शांततेचा, समाधानाचा अनुभव घ्यावा. दुनियादारीने थकलेल्या जिवाला अजून काय हवं असतं ?

डॉ. सौमित्र कुलकर्णी 9833318384 saumitrapk94@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. सौमित्र अरे खूप खूप कौतुक तुझ. खूपच सुंदर माहिती दिलीस. संत तुकारामांचा अभंग ‘ अनुरणीया थोकडा ‘ माझ्या अत्यंत आवडीचा…. शब्द आणि मालकौंस राग यामुळे.
    खूप छान लिहितोस असाच लिहीत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here