Home वैभव इतिहास पहिले साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1878)

पहिले साहित्य संमेलन (Marathi Literary Meet 1878)

_ranade

अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांचा, साहित्यिकांचा आणि ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांच्या आनंदाचा वार्षिक सोहळा असतो. त्यानिमित्ताने लेखक, वाचक, प्रकाशक, ग्रंथविक्रेते एकत्र येतात आणि व्याख्याने, परिसंवाद, कवीसंमेलन यांनी ते साहित्य संमेलन तीन दिवस विविध अंगांनी फुलत जाते.

साहित्य संमेलनांची सुरुवात 11 मे 1878 रोजी पुण्यात झाली. तेव्हा त्या संमेलनाचे नामाभिधान होते ‘ग्रंथकार संमेलन’ आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. पूर्वार्धात मराठी भाषेची अवस्था तेव्हाही चांगली नव्हतीच. मराठी भाषेला पुन्हा नव्याने बहर यावा, ग्रंथकारांना उत्तेजन मिळावे, वाचक-ग्रंथकार यांचा मिलाफ व्हावा; निदान ग्रंथकारांची एकमेकांत नीट ओळख तरी व्हावी म्हणून रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी पुढाकार घेऊन 1878 साली आधी ग्रंथोत्तेजक मंडळाची स्थापना केली. दोघांनी ‘ज्ञानप्रकाशा’त जाहीर पत्रक प्रसिद्ध केले आणि वाचकांसमोर मंडळाची कल्पना मांडली. तो दिवस होता, 7 फेब्रुवारी 1878. पहिले ग्रंथकार संमेलन हिराबागेत झाले. साहित्य संमेलनांची पहिली ती सुरुवात होय.

रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये निफाड, जिल्हा नाशिक येथे झाला. त्यांनी एमए, एलएल बी चे शिक्षण घेतले. त्यांनी बीएनंतर काही काळ शिक्षक म्हणून नोकरी केली. ते एमए झाल्यावर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक बनले. त्यांनी एलएल बी झाल्यावर अक्कलकोट संस्थानात काही काळ कारभारी म्हणून काम केले. ते अॅडव्होकेट परीक्षा दिल्यानंतर कोल्हापूरला न्यायाधीश म्हणून रुजू झाले. त्यानंतर काही काळ पोलिस खात्यात मॅजिस्ट्रेट आणि निवृत्त होईपर्यंत मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश होते.

त्यांना सामाजिक, राजकीय, सार्वजनिक कार्यात विलक्षण रस होता. त्यांनी मराठी भाषा आणि वृद्धी यांसाठी विशेष कष्ट घेतले. त्यांनी त्या वेळच्या सरकारला पन्नास-साठ वर्षांत प्रसिद्ध झालेल्या मराठी साहित्यातील ग्रंथांचा वाङ्मयीन आढावा सादर केला. रानडे यांनी कलात्मक साहित्य असे काही फार लिहिलेले नाही, परंतु त्यांची विचारात्मक व अभ्यासात्मक अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते साहित्यिक कार्यकर्ते व संयोजक उत्तम होते. त्यांनी समाजसुधारणेचा विचार मांडला व जमेल तेव्हा तशी कृती केली. त्यांनी भारतातील दारिद्र्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्र्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय यासंबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले. त्यांनी भागवत धर्मावरील दोन उपदेश, न्या. रानडे यांची धर्मपर भाषणे, व्यापारासंबंधी भाषणे तसेच, त्यांच्याच मूळ इंग्रजी ग्रंथांचा मराठी अनुवाद, मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष, मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी: 1818 ते 1896 असे ग्रंथ लिहिले. ते विविध संस्थांचे संस्थापक होते. रानडे यांनी स्वातंत्र्यासाठी व सामाजिक सुधारणांसाठी घटनात्मक व सनदशीर मार्गांचा कायम पुरस्कार केला. ते स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘मवाळ’ प्रवाहाचे नेते होते.

रानडे यांनी भारतीय राजकारणात अर्थशास्त्रीय विचार आणला. त्यांनी स्वदेशीच्या कल्पनेला शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले. त्यांचा मृत्यू 16 जानेवारी 1901 साली झाला.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
———————————————————————————————-——————————–

 

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version