मालतीबाई बेडेकर यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1905 आणि निधन 6 मे 2001. पंच्याण्णव वर्षांचे आयुष्य. त्यांची लेखणी कथा, कादंबरी, संशोधन अशा सर्व लेखन प्रकारांत यशस्वीपणे फिरली होती. त्यांनी अनेक परिषदांची, संमेलनांची अध्यक्षपदे भूषवली होती. त्यांना बरीच पारितोषिके पुरस्कार मिळाले होते.
मूळ बाळूताई खरे. त्या हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेतून पदवीधर झाल्या. त्यांनी लेखन करताना विभावरी शिरूरकर (Vibhavari Shirurkar) हे टोपणनाव घेतले. त्या त्याच नावाने मानमान्यता पावल्या. त्या मालती बेडेकर विवाहानंतर झाल्या. त्यांनी मालती बेडेकर या नावानेही काही लेखन केले.
मी त्यांना 1988 मध्ये प्रथम भेटले. त्या मुंबईत वरळीला एका मोठ्या फ्लॅटमध्ये, नाटक-चित्रपट सृष्टीत मानाने वावरणारे, ‘रणांगण’ कादंबरीमुळे गाजलेले पती विश्राम बेडेकर यांच्यासह राहत होत्या. मुलगा अमेरिकेत स्थायिक. ‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थे’ने महाराष्ट्रातील स्त्री-मुक्तीच्या पाऊलखुणा ही पुस्तक मालिका प्रकाशित करण्याचे योजले होते. त्यासाठी मला मालतीबाईंची विस्तृत मुलाखत महाराष्ट्रामधील त्यांच्या काळातील स्त्री-स्थिती जाणून घेण्याकरता घ्यायची होती. त्या विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या स्त्री-जीवन परिवर्तनाला सक्रिय साक्षी होत्या. त्यांचे समग्र लेखन, त्यातील मूलभूत विचारांच्या ठिणग्या, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा; त्यांच्या प्रगल्भ आणि बंडखोर व्यक्तिमत्त्वाची साक्ष देणारे होते. मालतबाईंचे वय तेव्हा त्र्याऐंशी होते. आम्ही मुलाखतीला आरंभ त्यांच्या बालपणापासून केला. त्या मुद्देसूद उत्तरे देऊ शकत होत्या. वाणी स्वच्छ. स्मरण चांगले. माझ्या मालतबाईंच्या घरी आठदहा फेऱ्या त्या वर्षभरात झाल्या. पुष्कळदा मालतीबाई त्यांना जे जे आठवेल ते लिहून ठेवत असत. त्या अनुषंगाने पुढे आमचे बोलणे चालू होई. मी मुलाखतीचे काम संपल्यावरही सहज भेटायला कधी कधी त्यांच्याकडे गेले.
मालतबाईंच्या वडिलांविषयी विशेषत्वाने सांगितले पाहिजे. विसाव्या शतकाचे पहिले दशक. तो काळ असा होता, की स्त्री-शिक्षणाची पहाट झालेली होती. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरांत, श्रीमंत वर्गातील – म्हणजे वकील, ब्रिटिश नोकऱ्यांतील वरिष्ठ सरकारी अधिकारी यांच्या मुली कॉलेज शिक्षण घेऊ लागल्या. पण मालतबाईंचे वडील त्या वर्गातील नव्हते. तरीही त्यांनी स्वतःच्या मुलींना उच्चशिक्षित करण्याचा निर्णय घेतला. मालतबाईंचे वडील अण्णा खरे हे ख्रिस्ती मिशनच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून पुण्याजवळच्या शिरूर (घोडनदी) नावाच्या खेड्यात होते. मालतीबाई आणि त्यांच्या बहिणी यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण घोडनदीत मुलांच्या शाळेत झाले. मालतबाईंचे वडील त्या काळातील सुधारक होते. त्यांच्यामुळेच मालतबाईंना शिक्षणाची, सुधारणेची सर्व द्वारे खुली राहिली. वडिलांनी त्यांना बाटवू पाहणाऱ्या ख्रिस्ती मिशनऱ्याला त्या खेड्यात धडा शिकवला! तसेच, देवळात भजनासाठी जमणाऱ्या गावकऱ्यांसमोर, स्वतःला दत्ताचा अवतार म्हणवून घेणाऱ्या वामन महाराजांचा ढोंगीपणा आव्हान देऊन उघड केला. महाराज पळून गेले. मालतीबाई तसे संस्कार घेत मोठ्या झाल्या. सातवीच्या पुढील शिक्षण घोडनदीत शक्य नव्हते. घोडनदीमधील त्यांच्या वयाच्या मुली लग्नाच्या बोहोल्यावर चढू लागल्या, तेव्हा वडलांनी महर्षी कर्वे यांच्या स्त्री-शिक्षण संस्थेत त्यांच्या मुलींची पुढील शिक्षणाची सोय केली. मालतीबाई बाराव्या वर्षी त्या शिक्षण संस्थेच्या वसतिगृहात राहून शिकू लागल्या. विधवा मुलींची संख्या त्या संस्थेतही खूप होती. कुमारिका तुलनेने कमी होत्या. पुणेकर जनतेने बोडक्यांचा आश्रम असे नाव त्या संस्थेला दिले होते. मालतबाईंना दिसत होते- एका बाजूला केशवपन झालेल्या विधवा पुण्यात बऱ्याच होत्या. दुसऱ्या बाजूला प्रेमकथाही फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या पसरत होत्या. प्रेमविवाह ठरला-झाला किंवा मोडला तरी पुणेभर त्याची चर्चा होत असे. हिंगणे स्त्री-शिक्षण संस्थेतील दिवेकर, मायदेव, वा.म.जोशी हे प्राध्यापक मुलींना म्हणत, आम्हाला खूप प्रश्न विचारा. शंका बोलून दाखवा. मग मुलीही प्राध्यापकांशी वादविवाद करत. मुलींना निबंध लिहावे लागत. सभेत उभे राहून बोलावे लागे. मुली खूप खेळत. सायकल चालवत. मालतीबाई त्या काळात, भराभर बदलत गेल्या. त्या कर्वे विद्यापीठाच्या पदवीधर वयाच्या अठराव्या वर्षी 1923 मध्ये झाल्या. लगेच, कर्व्यांच्या संस्थेच्याच कन्याशाळेत शिक्षिकाही झाल्या. काही विद्यार्थिनी वयाने लहान, काही मालतबाईंच्या बरोबरीच्या तर काही त्यांच्यापेक्षा मोठ्याही होत्या. मुली शिक्षण अर्ध्यावरच थांबून, लग्न होऊन निघून जात. तेव्हा ते शिकवणे अक्षरशः चुलखंडात जाते असे मालतबाईंना वाटत असे. पण बोलण्याची सोय नव्हती. ‘ही घोडनवरी मास्तरीण
मालतबाईंनी लिहिलेल्या त्यांच्या ‘अलंकारमंजूषा’ आणि ‘हिंदू व्यवहार धर्मशास्त्र’ या पुस्तकांनंतर, त्यांचे मेहुणे ह.वि.मोटे त्यांना म्हणाले, “बाळूताई, तुमचे वय काय? हे विद्वत्ताप्रचुर लेखन करण्यापेक्षा, तुम्ही जे अनुभवताय, भोवताली घडतंय-जाणवतंय त्यावर लिहा.” मालतबाईंचे विचारचक्र सुरू झाले. कुमारिका, विधवा यांची जी स्थिती शिकताना, नोकरी करताना भोवताली दिसत होती, त्यावर त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया निर्माण होत होत्या. त्या लिहून काढण्यास काय हरकत आहे? त्यांनी दहाबारा कथा अवघ्या पंधरा दिवसांत लिहिल्या. तो काळ ना.सी. फडके यांच्या श्रीमंती पार्श्वभूमीवरच्या आणि वि.स.खांडेकर यांच्या ध्येयवादी गरिबीच्या पार्श्वभूमीवरील स्वप्निल, धुंद प्रीतिकथांचा होता. त्या वातावरणात, मालतीबाई यांनी भोवतालच्या वास्तवातील विधवा, परित्यक्ता, शिक्षित प्रौढ कुमारिका अशा स्त्रियांच्या कथा, स्त्रीच्या कामवासना, प्रणयभावना, लग्नाचा बाजार – तेथे होणारी स्त्री-मनाची कोंडी, भोवतालच्या समाजाच्या जाचकाचा असे विषय घेऊन चित्रित केल्या. लेखिका लोकांना कळली असती तर नोकरीला मुकावे लागले असते. लोकांनी कसा आणि किती त्रास दिला असता याची कल्पना करवत नव्हती. म्हणून त्यांनी तो कथासंग्रह ‘कळ्यांचे निःश्वास – विभावरी शिरूरकर या टोपणनावाने प्रकाशित ’(1933) केला. प्रकाशक – ह.वि.मोटे. त्या शिरूरच्या होत्या म्हणून शिरूरकर आणि लेखिकेने अंधारात राहणे पसंत केले, म्हणून विभावरी म्हणजे रात्र. ज्ञानकोशकार केतकर यांच्यासारख्या मूठभर सुधारकांनी त्या कथा उचलून धरल्या. इतरत्र वादळ उठले. लोक असे लिहिणारी ही निलाजरी लेखिका कोण, याचा शोध घेऊ लागले. पण थांग लागला नाही. ‘त्याग’ या कथेत, सुशिक्षित मिळवती मुलगी लग्न होऊन गेली, की तिच्या कुटुंबाचे कसे होणार, ही चिंता आईवडलांना जाळते. ती तरुणी तिच्या यौवनसुलभ भावनांची आहुती देऊन एक चकार शब्द न बोलता, लग्न न करण्याचा निर्णय घेते, त्यागाच्या कल्पनेने समाधान पावते. पण कथा तिच्या मनातील ‘परमेश्वरा! हे समाधान पुढे असेच कायम टिकेल ना?’ या प्रश्नचिन्हाशी संपते. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ त्या कथेतील वडील शिक्षणानंतर मुलीला भीती नाही, मुली मुलग्याइतक्या बहकत नाहीत इत्यादी बोलतात. तेव्हा ही सुशिक्षित मिळवती मुलगी वडलांपुढे तिची विवाहाची इच्छा सूचित करते. संसार हे क्षणिक सुख आहे असे म्हणणाऱ्या वडलांबद्दल ती मनात म्हणते, मला राग आला अन् हसूही आले- आजपर्यंत सगळी माणसे संसाराची असारता सांगत आली
विभावरी शिरूरकर याच नावाने वर्षभरात ‘हिंदोळ्यावर’ ही कादंबरी आली. त्यात एका सुशिक्षित परित्यक्तेने विवाहाशिवाय मित्राबरोबर राहून मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्रण आहे. पुन्हा समाजात हाहाकार! विभावरीबाईंनी पुढे लिहिलेल्या ‘जाई’’ या कादंबरीत श्रमजीवी वर्गातील शिक्षकावर एकतर्फी प्रेम करणारी आणि त्यापायी अनेक प्रश्न ओढवून घेणारी शाळकरी मुलगी आहे. ‘‘शबरी’’ या कादंबरीत, प्रेमविवाह करून समान पातळीवर संसाराला आरंभ करणारी, सुशिक्षित मिळवती स्त्री कुटुंबाच्या चार भिंतीत कशी जखडली जाते, ते चित्रित झाले आहे. मालतीबाई ‘‘दोघांचे विश्व’’ या कथासंग्रहातील निर्मलेच्या निमित्ताने स्त्रीच्या मातृत्वावर पुरुषप्रधान संस्कृतीचे नियंत्रण कसे आहे ते दाखवून म्हणतात, ‘मंगलाक्षता पडल्या तरच मातृत्व पवित्र असते, नाहीतर तो शाप होतो.’ रशियाला जाऊन आलेली चित्रा मोकळेपणाने म्हणते, मला तेथील फक्त एक गोष्ट आवडली-कुटुंबव्यवस्था. ज्याने त्याने आपापले कमावावे आणि मैत्रीने राहवे!’
विभावरी शिरूरकर शिक्षित स्त्री-मनाच्या कोंडीच्या विविध बाजू दाखवत गेल्या. मराठी समाज त्यावरील वादळी चर्चेमुळे हळुहळू खरेखुरे स्त्री-मन समजावून घेण्याच्या दिशेने पावले टाकू लागला. ‘मालतीबाईंच्या ‘बळी’’ आणि ‘‘विरलेले स्वप्न’’ या कादंबऱ्या स्त्री-केंद्री नाहीत. त्यांत राजकारणाचे रेटे व्यक्ती व्यक्तीपर्यंत कसे पोचतात त्याचे दर्शन घडते.
मालतीबाई विश्राम बेडेकर यांच्याशी विवाहबद्ध वयाच्या तेहतिसाव्या वर्षी झाल्या. तो प्रेमविवाह होता. बेडेकर यांचे पहिल्या पत्नीशी संबंध तुटल्यात जमा होते. मालतीबाई यांनी पहिल्या पत्नीची भेट घेतली. त्या बाईंनी त्यांचा घटस्फोटाचा विचार मालतीबाई यांना सांगितला. विश्राम बेडेकर यांच्याशी विवाह करण्याचा आग्रह केला. पुरुषाच्या दुसऱ्या विवाहाला त्या काळात कायद्याने अटकाव नव्हता. मालतीबाई आणि विश्राम बेडेकर यांचे लग्न झाले. लग्नाच्या वेळी मालतीबाई सोलापूरमध्ये नोकरीस होत्या. त्यांनी लग्न मुंबईत केले. विश्राम बेडेकर यांनी लगेच, बडोदा राज्यात जाऊन प्रथम पत्नीला घटस्फोट दिला. पुढे, त्या बाईंनीही त्यांच्या परिचित गृहस्थांशी लग्न केले. विश्राम बेडेकर लग्नानंतर इंग्लंडला निघून गेले. ते परत आल्यावर दोघे काही काळ सोलापूरात राहिले. समस्त स्त्रीवर्गाची दुःखे, कोंडमारा लोकांपुढे आणणाऱ्या त्या लेखिकेने दुसऱ्या स्त्रीवर म्हणजे विश्राम बेडेकर यांच्या प्रथम पत्नीवर अन्याय केला नाही का, या प्रकारचे अभिप्राय भोवताली उमटल्याचे ऐकिवात येते. त्यावर मालतीबाई म्हणतात, “पुण्यात त्या लग्नावर टीका झालीही असेल,
चित्रपट क्षेत्रात वावरणारे विश्राम बेडेकर आणि स्त्री-स्वातंत्र्याची मूलभूत मागणी करणाऱ्या मालतीबाई यांचा संसार सर्वसामान्यांपेक्षा वेगळाच होता. स्त्रीविषयक बंडखोरी त्यांच्या लेखनातून व्यक्त झाली. पण त्या इतरत्रही बंडखोरीने वागत होत्या. त्यांनी जपानी शिक्क्याचे कापड खादी म्हणून विकणाऱ्या व्यापाऱ्याला खडसावले. तसाच, रशियातील अनुभव. कॉम्रेड चितळे यांनी सुचवल्यावरून, मालतीबाई एका मंडळाबरोबर 1952 मध्ये रशियाला गेल्या. त्यांना रशियन जनता कोणत्या तरी दडपणाखाली सतत आहे असे वाटत होते. रशियन रेडिओ अधिकाऱ्यांनी रेडिओसाठी त्यांचे भाषण करण्याचे ठरवले. त्यांनी मालतीबाई यांच्याकडे ‘भारतीय स्त्री-स्वातंत्र्याचा इतिहास’ या विषयावर लेखी निबंध मागितला. मालतीबाई यांनी तो लिहून दिला. त्या अधिकाऱ्यांनी भारतात पुरुषांनीच स्त्री-स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले हा मालतीबाई यांचा मजकूर बदलण्याची सूचना केली. कारण स्त्रियांनी स्वतःच त्यांची प्रगती केली अशी कम्युनिस्ट विचारधारा… मालतीबाई म्हणाल्या, “आमच्याकडील वस्तुस्थिती अशीच आहे. इतिहास मी कसा नाकारू? मी वडलांच्या प्रेरणेने शिकले, त्यांना नाकारू? गुरूवर्य अण्णा कर्वे यांच्या संस्थेत शिकले, त्यांना कसे नाकारू?” मालतीबाई यांनी लेखनात बदल करण्यास नकार दिला. त्यांचे भाषण रशियन रेडिओने स्वीकारले नाही! त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे डावलून, स्वतःच्या सोयीचे बोलत राहणे हा रशियन अधिकाऱ्यांचा दांभिकपणा उघड केला. त्या भारतात परत आल्यावर कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी त्यांची एकदोन व्याख्याने योजली. तेथेही मालतीबाई यांनी रशियात जाणवलेल्या दडपणाविषयी सांगितले. पुन्हा त्या मंडळींनी त्यांची व्याख्याने योजली नाहीत. मालतीबाई यांनी त्यांची नोकरी स्वातंत्र्याच्या चळवळीत वाचवण्यासाठी पळपुटेपणा केला, तो त्यांनी मुलाखतीत मोकळेपणाने सांगितला. त्याचे कोणतेही समर्थन केले नाही. ती वेगळ्या प्रकारची बंडखोरीच होती. मातृत्व हे स्त्रीचे वैशिष्ट्य आहे. ते दूषण नाही, तसेच भूषणही नाही, असे मालतीबाई यांचे मत होते. त्या लिहितात, “सगळ्या आध्यात्मिक पुस्तकांत स्त्री ही पुरुषाला मोहात पाडते, ज्ञानमार्गापासून भ्रष्ट करते, म्हणून पुरुषा, तू स्त्रीकडे पाहू नकोस, तिला स्पर्शू नकोस इत्यादी सांगितलेले असते. पण इतकी अधम स्त्री माता झाली, की एकजात सगळे तिचा गौरव करतात! मला तरी हे गूढ उकलत नाही. स्त्री ‘कामिनी’ असते म्हणूनच ‘माता’ होते ना? मातेचा गौरव झाला आहे तितकी तिची लायकी किंवा अधिकार तिला नव्हता व नाहीच… शिक्षणाला वंचित ठेवलेली आई गुरूंची गुरू? शेकडो वर्षें जिला अज्ञानात ठेवली ती सुमाता कशी होणार?” मालतीबाई स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलताना म्हणाल्या, “तुम्हाला अपत्य पाहिजे. बाई त्याला जन्म देते. पुरुषांनी त्याची स्वच्छता करण्याचे काम करण्यास काय हरकत आहे? बाईनेच सगळी घाणीची कामे करायची? नर्सिंगचा कोर्स बाईंसाठीच का? पुरुष आजाऱ्यांची सेवा पुरुषांनी करण्यास काय हरकत आहे?” मालतीबाई यांच्या कोणत्याही पुस्तकात समाजविषयक अशी कितीतरी मूलभूत निरीक्षणे आढळतात.
विश्राम बेडेकर पारंपरिक नवऱ्यासारखे बायकोवर म्हणजे मालतीबाई यांच्यावर येता- जाता खेकसत असत. त्या त्यांना हाताने खूण करून बोलायचे थांबवत. असे झाले, की पारंपरिक पत्नीचा दोन प्रकारचा प्रतिसाद असतो – हिरमुसले होऊन गप्प बसणे अथवा उसळून उलट नवऱ्याच्या अंगावर येणे –‘हेच तर मी म्हणत होते. तरी मी मूर्ख नाही का!’’ असे काहीतरी समर्थन करणे. मालतीबाई मात्र समंजसपणे हसत आणि म्हणत, ‘सांगा, तुम्ही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते. मग मी बोलते.’ विश्राम बेडेकर यांची बोलण्याची शैली प्रभावी. ते हां हां म्हणता दृश्य डोळ्यांसमोर उभे करत होते. चित्रपट-नाटकांबद्दल भरभरून बोलत. प्रभात चित्रपटाच्या काळाबद्दल सांगत. नंतर ‘टिळक आणि आगरकर’ हे नाटक’ रंगमंचावर येईपर्यंत काळ किती आणि कसा बदलत गेला ते सांगत. एकदा ते चित्रपटातील स्त्री-पुरुष संबंधांबद्दल म्हणाले, ‘काय होतं, इथलं वेगळं वातावरण आहे. तुम्ही बँकेत नोकरी करत होतात. एखाद्या दिवशी बॉसला वाटलं, की तुम्ही दमलात. तर तो म्हणेल, घ्या मॅडम, चहा’ किंवा तुम्ही बॉसला तसेच म्हणाल. यापेक्षा जास्त संबंधच येत नाही. इथं चित्रपटात काय होतं, सीनसाठी नटी तयार होऊन सेटवर उभी असते. पूर्ण स्टुडिओत जिकडे तिकडे माणसं त्यांच्या त्यांच्या हातातली उपकरणं घेऊन सज्ज – लाइटमन, मेकअपमन, कॅमेरावाले. दिग्दर्शक कॅमेऱ्यातून पाहतो. त्याच्या लक्षात येतं, ही नटी या अँगलमधून जास्त चांगली दिसत आहे; साडीचा पदर खोचलेला किंवा मोकळा, कसा चांगला दिसू शकेल किंवा काहीतरी ऑकवर्ड पोझीशन जाणवते हे सारं त्याच्या मनात येतं. ते सगळ्यांसमोर मोठ्यानं सांगता येत नाही. मग तो तिच्याजवळ जातो किंवा तिला त्याच्याजवळ बोलावून सूचना करतो, की तिनं कसं उभे राहवं, मान कशी फिरवावी इत्यादी. ती सावध होते. त्यांच्या सूचना आनंदानं अंमलात आणते, कारण तिला माहीत असतं, He is the person who is presenting her on the screen preciously. त्यातून एक वेगळीच जवळीक दोघांमध्ये निर्माण होते. काय असते, पाहा…’’ बेडेकर रंगून सांगत होते. त्यांना मध्येच तोडत मालतीबाई म्हणाल्या, “आणि ती जवळीक मुळी थांबतच नाही; वाढतच जाते. बरं का गं!” विश्राम बेडेकर एकदम गप्प झाले. काहीतरी गुणगुणू लागले. नव्वदीला आलेल्या पतिपत्नींच्या बोलण्याची अशी गंमत
एकदा मालतीबाई यांनी घरातील पुस्तके काढून ठेवली होती. मी गेल्यावर म्हणाल्या, “घेऊन जा तुला हवी ती यातली. आता आम्हाला त्यांचा काहीही उपयोग नाही.” मी दोन-तीन पुस्तके घेतली. त्यातील एक पुस्तक मला अगदी हवे असलेले, अ.ना. देशपांडे यांचे मराठी वाङ्मयेतिहासाचे होते. नंतरच्या भेटीत, विश्राम बेडेकर यांनी ती परत मागितली. मी चकित झाले. मालतीबाई यांना माझ्या नजरेतील भाव कळला. त्या म्हणाल्या, ‘हा अस्सा स्वभाव. आता कशाला लागणार आहेत आम्हाला ती पुस्तकं?’ मीच तिला त्यांना अचानक टाकली. पण नाही.’ मी उत्तर दिलं, ‘अहो देईन परत आणून. त्यात काय!’’ पण मनात आले, इतक्या खेळीमेळीने गप्पाटप्पा करणारा माणूस असा कसा काय वागू शकतो? जाऊ दे. बालपणासारखेच म्हातारपणालाही सगळे माफ असते. मी दुसऱ्या दिवशी मुद्दाम जाऊन पुस्तके परत दिली. वाटले होते, ते सॉरी म्हणतील. पुस्तके परत मागण्याची काहीतरी कारणे देतील. पण अंहं! काही नाही. त्यांच्या सगळ्या आविर्भावातून मला वाटले, मालतीबाई यांनी त्यांना न विचारता पुस्तके दिली म्हणून ती प्रतिक्रि‘या असावी. त्यांचा मुलगा अमेरिकेतून आला होता, तेव्हा मालतीबाई यांनी फोन करून मला मुद्दाम बोलावले. कॉफी घेता घेता, माझी ओळख करून दिली. पण त्यांच्या आईची विस्तृत मुलाखत घेणाऱ्या स्त्रीबद्दल त्यांच्या मुलाला कुतूहल नव्हते किंवा त्याने औपचारिक बोलण्याचा शिष्टाचारसुद्धा पाळला नाही. मी फार वेळ न थांबता निघाले. त्या काहीच बोलल्या नाहीत. पुढील भेटीत मुलाचे वागणे सोडून, त्याच्याबद्दल इतर बोलणे झाले. मुलगा निदान तीस-पस्तीस वर्षें
– विनया खडपेकर (020) 25465394 vinayakhadpekar@gmail.com
Sunder,Parat parat vachava…
Sunder,Parat parat vachava asa lekh
अतिशय सुंदर लेख.
अतिशय सुंदर लेख.