महर्षी धोंडो केशव कर्वे हे एक लोकोत्तर सेवामूर्तीच होते. महर्षी कर्वे यांचे नाव सामाजिक सुधारणेच्या कार्यात महात्मा फुले, आगरकर, पंडिता रमाबाई यांच्याबरोबरीने घ्यावे लागेल. त्यांनी स्त्रियांचा उद्धार झाल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही, हे मर्म ओळखले होते.
समाजाकडून विधवा स्त्रियांवर होणारा अन्याय कोणाच्याही जिव्हारी लागावा असा त्याकाळी होता आणि त्यामुळे कर्वे यांच्या मनात त्यांनी त्या अनाथ, निराधार, विधवा स्त्रियांसाठी काहीतरी करावे असा विचार घोळू लागला. त्याच दरम्यान कर्वे यांच्या प्रथम पत्नीचे निधन झाले. त्यांनी विवाह पुनश्च करायचा तो एखाद्या विधवेशीच असा निश्चय केला. कर्वे यांनी बालविधवा मुलगी गोदावरी जोशी हिच्याशी 1893 मध्ये दुसरा विवाह केला. तो निर्णय त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. किंबहुना अण्णांचा तेव्हा पुनर्जन्मच झाला!
त्यांना अनाथ आणि विधवा स्त्रियांची सेवा करता करता स्त्री शिक्षणाच्या अनेक कल्पना सुचत गेल्या. कर्वे यांना विधवा पुनर्विवाहामुळे महाराष्ट्रातील सनातन्यांचा रोष पत्करावा लागला. त्यांच्यावर टीकेची झोड उठली, ग्रामस्थांनी त्यांना बहिष्कृत केले, परंतु ते डगमगले नाहीत. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे काढले- व्याख्याने दिली. लोकांच्या शंकांना शांतपणे आणि ते त्यांची मते तर्कशुद्ध युक्तिवादाने उत्तरे देत देत सर्वांना पटावीत यासाठी झटत राहिले. अण्णांनी अनाथ बालिकाश्रम 1899 मध्ये पुण्यात सदाशिव पेठेत सुरू केला. तो आश्रम कालांतराने हिंगणे गावात स्थलांतरित करण्यात आला. त्याचे सुरुवातीचे स्वरूप एक छोटीशी झोपडी आणि केवळ एक विद्यार्थिनी असे होते. विद्यार्थिनींची संख्या हळूहळू आश्रमात वाढू लागली. दुसरीकडे आश्रमाचे हितचिंतकही वाढू लागले. तशा दात्यांकडून आश्रमाला अर्थसहाय्यही मिळू लागले. विधवांप्रमाणे गरजू आणि सर्वसामान्य मुलींना रीतसर शिक्षण मिळण्याची गरज होती. अण्णासाहेब कर्वे यांनी ‘महिला विद्यालया’ची स्थापना 1907 मध्ये केली.
कर्वे स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी केल्याशिवाय त्यांची दु:खे कमी होणार नाहीत असाही विचार करू लागले. कर्वे त्यातूनच स्त्रियांसाठी स्वतंत्र राष्ट्रीय विद्यापीठ असावे अशा निर्णयाप्रत आले. त्यांचा उद्देश त्या विद्यापीठात मुलींना संसारशास्त्र, आरोग्यशास्त्र, पाककला, चित्रकला, गायन अशा स्त्रीजीवनाला आवश्यक त्या सर्व विषयांचे शिक्षण मिळावे असा होता. त्यांनी भारतीय महिला विद्यापीठाची स्थापना 1916 मध्ये केली. विद्यापीठाला सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी पंधरा लाख रुपयांची देणगी दिली. ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (SNDT) विद्यापीठ’ हीच ती संस्था. कर्वे यांनी बालविधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षण, अस्पृश्यतानिवारण अशा विविध स्तरांवर केलेले काम अजोड आहे. त्यांच्या पत्नी आनंदीबाई म्हणजेच बाया कर्वे यांची त्यांना मोठी साथ होती.
अण्णांना ‘पद्मविभूषण’ 1955 मध्ये तर ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च बहुमान 1958 मध्ये देऊन गौरवण्यात आले. अण्णासाहेब कर्वे यांनी विविध उद्दिष्टांसाठी काही संस्थांची स्थापना केली. स्त्रियांच्या उद्धारासाठी आयुष्यभर झटणारे कार्यकर्ते तयार व्हावेत म्हणून त्यांनी 1910 मध्ये ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ 1936 मध्ये स्थापन केले; तसेच, अस्पृश्यता निवारणासाठी 1944 मध्ये ‘समता संघ’ स्थापला. त्यांनी लावलेल्या शिक्षणाच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
– स्मिता भागवत 9881299592 smitabhagwat@me.com
———————————————————————————————————–
महर्षी कर्वे ह्यांच्या…
महर्षी कर्वे ह्यांच्या मुलींच्या शाळेत ब्राह्मणेतर समाजातील मुलींना शिक्षणाची परवानगी होती का?
Comments are closed.