Home व्यक्ती यकृताचे प्रत्यारोपण – दिनेश झिरपे

यकृताचे प्रत्यारोपण – दिनेश झिरपे

0

डॉ. दिनेश कुंडलिक झिरपे हे सध्याचे देशातील आघाडीचे लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आहेत ! ते शेवगावसारख्या ग्रामीण भागातून आले व त्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आणि त्यांनी Gastro Intestinal Surgery या विषयातील सुपर स्पेशॅलिटी विषयात राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांना ते पदक भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनीकुमार यांच्या हस्ते दिल्ली विज्ञान भवनात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलला दिनेशच्या रूपाने हा सन्मान प्रथमच प्राप्त झाल्याने त्यांनीदेखील एका शानदार समारंभाचे आयोजन करून त्यांच्या या गुणी विद्यार्थ्याचे खास कौतुक केले, तर शेवगावच्या ग्रामस्थांनी व रोटरी क्लबनेदेखील शेवगावच्या या भूमिपुत्राचा अनोखा असा सन्मान केला.

ते पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट विशेषज्ञ म्हणून 2017 साली रुजू झाले. त्यांनी दोनशेपेक्षा अधिक यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तर एक हजारावर लॅप्रोस्कॉपी यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. सह्याद्री हॉस्पिटलला अवयव प्रत्यारोपणातील सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे, त्यात दिनेश यांच्या विभागाचे योगदान मोठे आहे.

झिरपे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण शेवगावच्या बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये मराठी माध्यमातून झाले. त्यांनी पुण्याच्या गरवारे कनिष्ठ महाविद्यालयातून शास्त्र शाखेतून बारावी तर धुळ्याच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एस ही पदवी प्राप्त केली. त्यांनी मुंबईमधून एम एस होऊन एक वर्ष पुण्याच्या बी जे वैद्यकीय महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक म्हणून काम केले, पण त्यांना खुणावत होते ते सध्याच्या काळात महत्त्वपूर्ण मानले जाणारे सुपर स्पेशॅलिटीचे क्षेत्र ! त्यांनी चेन्नईच्या प्रख्यात अपोलो हॉस्पिटलमधून Gastro Intestinal Surgery या विषयात सुपर स्पेशॅलिटी 2014 ते 2016 या काळात प्राप्त केली. त्यांनी यकृत प्रत्यारोपण (Liver Transplant ) या विषयातील अद्यावत ज्ञान फेलोशिप मिळवत दक्षिण कोरियातील ‘असान मेडिकल सेंटर’मध्ये सहा महिने राहून प्राप्त केले.

दिनेश यांचे निरीक्षण आहे, की महाराष्ट्रात दारूचा अतिरेक, आरोग्य व स्वच्छता विषयक अनास्था आणि त्यातून उद्भवणाऱ्या गैरसोयी यांमुळे होणारे हिपॅटायटीस बी व सी यांच्यासारखे आजार; तसेच, मधुमेह व रक्तदाब यांमुळे यकृतासंबंधी आजार वाढत आहेत. त्यांनी अवयवदानाविषयी असलेली उदासीनता आणि गैरसमज यांचे निराकरण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. शिवाय, त्यांचा आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या अत्याधुनिक सुविधा पुरवणारे पण सर्वसामान्य रुग्णांना परवडू शकेल असे अद्यावत रुग्णालय उभारण्याचा संकल्प आहे.

– उमेश घेवरीकर 9822969723 umesh.ghevarikar@gmail.com

———————————————————————————————————————

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version