खिद्रापूरचा कोपेश्वर – छोटे खजुराहो !

कोल्हापूरनजीकच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर शिवमंदिर म्हणजे श्रद्धा व शिल्पकला यांचे उत्तम मिश्रण आहे. तेथील प्राचीन वैभव सुस्थितीत आढळते. शिलाहारांनी अनेक देवळे बांधलीत्यांतील अंबरनाथपेल्हारवाळकेश्वर येथील मंदिरे प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक आहे खिद्रापूरचे शिवमंदिर. रामायणमहाभारतभौगोलिक विश्वसंस्कृती, प्रेम, साहित्य, पर्यावरण, वन्यजीव, स्थापत्यशास्त्र अशा बहुविषयांना स्पर्श केलेली शिल्पे मंदिरात आहेत.

ते कोल्हापूरच्या आग्नेयेकडे, महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर येते. कोपेश्वर मंदिर बाराव्या शतकातील आहे. तेथील वास्तुशैलींवर विविध प्रभाव पाहण्यास मिळतात. चालुक्य वास्तुशैली ही त्या शैलींपैकी एक आहे. मंदिराचा एक भाग विधान (पद्धत) तारकाकृती आहे. शिखराचे बांधकाम अपुरे आहे ! त्याच्या अधिष्ठानावर देवतारूढ अशा हत्तींच्या पंचाण्णव मूर्ती खोदलेल्या आहेत. बाहेरच्या भिंतींवर शिल्पपट्टांत व तीरशिल्पांत अनेक मूर्ती आढळतात. त्या सर्व मूर्ती रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. तेथील स्वर्गमंडपात अष्टद्विक्पालांच्या दांपत्य-मूर्ती आढळतात. मंदिराच्या भिंतींवरील विविध हावभावांतील आकर्षक मदनिकांच्या रेखीव शिल्पांतून तत्कालीन केश-वेषभूषा आणि अलंकार यांचे मनोज्ञ दर्शन घडते. त्या मूर्तिसंभारात स्त्री-पुरुष संबंधांची काही दृश्ये कोरण्यात आली आहेत. त्यामुळे दक्षिणेचे छोटे खजुराहो’ असाही त्याचा उल्लेख करतात. तेथे लागूनच असलेल्या दुसऱ्या ऋषभनाथ मंदिरातील श्रुतदेवतासुद्धा लक्षवेधक आहेत.

कोपेश्वर मंदिरात काही ठिकाणी हेमाडपंथी शैलीही पाहण्यास मिळते. हेमाडपंथी शैलीची मंदिरे जंगलात किंवा पठारावरकोठेही आढळतात. नदीकाठी दोन दगडांच्यामध्ये आधार म्हणून खोबणी आणि कंगोरे यांचा वापर करूनइतर कोठलाही आधार न घेतादगडांची कलात्मक रचना करून मंदिरे बांधण्याची कला हे त्या पद्धतीच्या वास्तुविशारदांचे वैशिष्ट्य. मुख्य प्रवेशद्वारानंतर नगारखाना लागतो. प्रवेशद्वाराच्या भिंतींवरील दोन हत्ती पाहुण्यांचे स्वागत करत आहेत असे वाटते. प्रवेशद्वारातून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल इतके ते अरूंद आहे.

मध्यवर्ती स्वर्गमंडपाला यज्ञमंडप असेही म्हटले जाते. एका मोठ्याअखंड शिळेवर अठ्ठेचाळीस खांबांच्या आधाराने त्याचे गोल छत उभे केले आहे. छताखाली नऊ ग्रहांच्या नऊ कलाकृती आहेत. प्रत्येक खांबामधील कोरीव काम बघत राहवे असेच आहे. त्या कोरीव कामामध्ये एका साच्यातून काढल्याप्रमाणे एकसंधता व सुबकता आहे. दगडाची चकाकी व मऊपणातसेचत्या खांबांवर प्रतिबिंब उमटावे अशी पारदर्शकता पाहून मन थक्क होऊन जाते. स्वर्गमंडपाचे छत होमहवनाच्या समिधांचे धूर जावा या दृष्टीने उघडे ठेवले आहे. त्या छतामुळे किंवा त्या छिद्रामुळे या गावाचे नाव छिद्रापूर … त्याचा अपभ्रंश खिद्रापूर ! खिदरखान सरदाराच्या नावातून खिद्रापूर आले अशीही एक व्युत्पत्ती आहे.

– विजयकुमार हरिश्चंद्रे 9822093048

About Post Author

3 COMMENTS

  1. अतिशय उपयुक्त माहिती.
    अतिशय उपयुक्त माहिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here