किन्होळा हे गाव दाभाडी या गावापासून दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावामध्ये डोंगरावरून वाहत येणारे अनेक ओढे आहेत. ते जालना शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर बदनापूर तालुक्यात येते. गावाची लोकसंख्या पंधराशे असून सर्वधर्मीय लोक तेथे गुण्यागोविंदाने एकत्रितपणे अनेक वर्षांपासून नांदत आहेत. गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे झाडांची संख्या भरपूर आहे. गावापासून दूर, दोन किलोमीटर अंतरावर एक मोठा तलाव आहे. गावाला पाणीपुरवठा त्या तलावातून होतो. गावामधील ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज असून तेथे आरोग्य उपकेंद्रही आहे.
गावामध्ये हनुमान, गणपती, विठोबा-रखुमाई, महादेव यांची आकर्षक मंदिरे आहेत. किन्होळा या गावापासून दहा किलोमीटर अंतरावर गणरायाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र राजूर हे आहे. गावाच्या पश्चिमेला पुरातन बारव आहे. सर्व गाव त्याच बारवेतून पाणी भरत असे. बारवेशेजारी शिवाचे प्राचीन मंदिर आहे.
किन्होळा गावामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून पीराचे मंदिर उंच टेकडीवर आहे. पीराची यात्रा अनेक वर्षांपासून नियमितपणे गुढीपाडव्यानंतर पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहाने तीन दिवस भरते. यात्रेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक जण, सासरी असलेल्या मुली गावामध्ये येतात आणि मनोभावे पीराचे दर्शन घेतात. तीन दिवसांमध्ये पहिल्या दिवशी रोषणाई, दुसऱ्या दिवशी गलफची संपूर्ण गावातून मिरवणूक आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल असे तीन भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. गावातील आबालवृद्ध मंडळी यात्रेचा मनसोक्त आनंद घेतात. गावापासून जवळच पूर्वेकडे एक किलोमीटर अंतरावर स्वामी विवेकानंद आश्रम आहे. तेथील परिसर निसर्गरम्य असून तेथे रामकृष्ण विवेकानंद ध्यानकेंद्र आहे. वर्षभर तेथे अनेक कार्यक्रम असल्यामुळे बाहेरगावातील अनेक जण भेटी देतात.
किन्होळा या गावी पूर्वी सर्व लोकांचे आडनाव किरड होते. ते लोकांना आवडेना म्हणून 1972 मध्ये ते बदलून भुजंग असे केले. किरड या नावावरून गावाला किन्होळा हे नाव पडले असावे असे वयस्कर लोक सांगतात. गावात फक्त मराठा आणि बौद्ध समाजा मोठ्या प्रमाणावर आहे.
गावामध्ये इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी मुलांना जवळच्या दाभाडी किंवा खामगाव फाटा येथील शाळेत जावे लागते. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील आंदोलनात गावातील दत्तोपंत कुलकर्णी, दादा मैनाजी भुजंग, सुंदरराव भुजंग या स्वातंत्र्य सेनानींनी हिरिरीने सहभाग घेतला आणि गाव व परिसरातील लोकांचे कासीम रिझवीच्या रझाकारी या अन्यायी, अत्याचारी संघटनेपासून संरक्षण केले.
गावामध्ये कापूस, सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. बदलत्या हवामानाचा व पावसाचा फटका त्या गावालाही बसलेला आहे. कारण फार पूर्वी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे ऊसाची लागवड होई. त्यामुळे गावात गूळ तयार करणारी अनेक गुऱ्हाळे होती. पण गावामध्ये ऊस उरला नसल्यामुळे एकही गुऱ्हाळ नाही.
गावातील लोकांची बोलीभाषा मराठी असून तुरळक लोक हिंदी व इंग्रजी भाषा समजू शकतात. गावात बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. तसेच राजकारण, पोलिस, सैन्यदल यांमध्येही अनेक तरुण सेवा बजावत आहेत. गाव डोंगररांगांमध्ये असल्यामुळे साहजिकच येथील वातावरणाचा, हवामानाचा परिणाम येथील लोकांच्या जीवनावर दिसून येतो. गावातील लोक मेहनती, जिद्दी, चपळ आणि बलवान आहेत. दूध देणारी जनावरे भरपूर असून गावात दूध डेअरीचा व्यवसायही चालतो. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे.
किन्होळा गाव बदनापूर सोमठाणामार्गे बावीस किलोमीटरवर आहे. दाभाडी या गावी आठवडी बाजार असतो. मेव्हाणा, दाभाडी, वांजरवाडी, दावरगाव, भातखेडा ही गावे पाच-सहा किलोमीटर परिसरात आहेत.
– नारायण कौतिकराव भुजंग 8275231250 narayanbhujang12783@gmail.com
———————————————————————————————————————