कसबा हे रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील इतिहासप्रसिद्ध गाव. त्या गावाला संभाजी महाराजांचा इतिहास जसा आहे तसाच देवालयांचाही. भग्न देवालयांचे गाव म्हणून त्या परिसराची ओळख राहिली आहे. त्या गावात एकेकाळी सुमारे चारशे देवळे होती असे लोक सांगतात. पण सध्या त्या परिसरात सत्तरच्या आसपास देवालये आहेत. त्यांपैकी कर्णेश्वर मंदिर वगळले, तर अन्य सगळी देवालये ही भग्नावस्थेत आहेत; अखेरची घटका मोजत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. कसबा हे गाव समुद्र किनाऱ्यालगत नाही, पण तेथील नव्वद ते पंच्याण्णव टक्के घरांमधील तरुण हे होड्या बांधणीचे काम करतात. कसब्याची ती एक महत्त्वपूर्ण ओळख आहे.
‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, त्यांपैकी जैन पंथीयांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती, परंतु संगमेश्वर हे त्यांचे राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचे राज्य आले. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती.
राष्ट्रकूट वंशातील राजांनी चालुक्य घराण्याचा नाश सन ७५३ मध्ये करून येथे सुमारे दोनशे वर्षें राज्य केले. पुन्हा चालुक्य घराण्यातील काही राजांनी राष्ट्रकुटांचा पराभव केला. त्यांदची सन ९७३ पासून सन ११३० पर्यंत सत्ता होती. इसवी सन ११३० च्या सुमारास कपिलतीर्थ येथील जैन राजा शोणभद्र याने चालुक्य राजांचा पराभव करून संगमेश्वरचे राज्य त्याच्या राज्याला जोडले. नंतर पुन्हा चालुक्य राजांनी राजा शोणभद्र याच्या वंशजांचा पराभव करून त्याचे राज्य प्रस्थापित केले, ते १४७० पर्यंत! त्या घराण्याचा शेवटचा राजा ‘जाखुराय’ याचा मुसलमानांनी पराभव केला आणि संगमेश्वर येथे मुसलमानांचा प्रवेश झाला. ती मुसलमानी सत्ता पुढे सुमारे एकशेएक्याण्णव वर्षें म्हणजे १६६१ पर्यंत होती. त्या सुमारास शिवाजी महाराजांनी तेथे स्वारी करून विजापूरकरांचे अंकित सरदार शिर्के, दळवी, सुर्वे, सावंत, मोहिते इत्यादींचा पराभव केला व मराठी राज्याची सत्ता स्थापन झाली. पुढे, संगमेश्वर मराठा सत्तेतच राहिले. मराठी सत्तेमध्ये संभाजी महाराज पकडले गेले, ते कसबा संगमेश्वरमध्ये. तावडे बंदरात मुकर्रबखानाचा मुलगा इखलासखान याने संभाजी महाराजांना अटक केली. तेथून त्यांना पुण्याजवळ तुळापूरला नेण्यात आले. तेथेच त्यांना औरंगजेबाच्या सरदारांनी हाल हाल करून मारले. त्या घटनेने संगमेश्वरचे नाव दु:खद, संतापजनक व तितक्याच दुर्दैवी घटनेने इतिहासात नोंदले गेले. ती तारीख होती, ३ फेब्रुवारी १६८२. संभाजीराजांची काही हकिगत हाती लागेल, म्हणून तरून पर्यटक तेथे येत असतात, पण संभाजी महाराजांचे दुर्लक्षित स्मारक पाहून परत मागे जातात.
मराठी राज्यामध्ये त्या भागाची महसूल व्यवस्था ज्या सरदेसाई घराण्याकडे होती त्या सरदेसाई घराण्याचे वंशज कसब्यात आहेत. संभाजी महाराज सरदेसाईंच्या ज्या वाड्यामध्ये पकडले गेले त्या वाड्याच्या खाणाखुणा, त्याच्या मागील बाजूस असलेली काही शिल्पे, भग्नावस्थेतील काही शिवमंदिरे पाहण्यास मिळतात!
कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळ्या कामांसाठी सात गावे दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (शिवने), यज्ञासाठी लवल (लोवले), फळांसाठी धमनी (धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (अंत्रवली). त्यां पैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ सापडत नाहीत. कर्णराजाने कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी तीनशेसाठ प्रासाद म्हणजे मंदिरे बांधली होती. त्यांतील काही मंदिरे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. त्यांमध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे. कोकण परिसरात वैष्णवपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी नंतरच्या काळात कर्णेश्वर मंदिराला कळस चढवला असावा. कारण सबंध मंदिर एका दगडात आहे. कळस दगड, माती आणि विटा यांनी बांधलेला आहे. त्या काळात देवळे दगडात कोरली जात होती, त्यांचे कळस माती-विटांनी तयार झालेले नसत. वैष्णवपंथीयांनी बांधलेल्या देवळांना कळस उंच असतात. पण दक्षिणेकडील शैवपंथीयांनी बांधलेल्या मंदिरांना तसे उंच कळस नसतात. कर्णेश्वर मंदिरात पावसाचे पाणी गळत होते, म्हणून २००३-०४ या वर्षी मंदिराच्या तीन छोट्या कळसांमध्ये थोडी दुरूस्ती करण्यात आली. तेव्हा ते कळस दगडमाती, विटांचे आहेत आणि त्यांना गूळ आणि चुना यांचे प्लास्टर करण्यात आले आहे ही बाब स्पष्ट झाली.
कर्णेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरासारखे कोरण्यात आले आहेत. मूळ मंदिर हे कळसरहित होते. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर कळस चढवण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी गळते, म्हणून त्या कळसांचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याखेरीज त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलेली नाही. ते मंदिर आहे तसेच सुबक दिसते.
सह्याद्री खंडातील वर्णनाप्रमाणे कसबा क्षेत्राच्या आठ दिशांना आठ तीर्थे होती. पूर्वेला कमलजा तीर्थ, गोष्पदतीर्थ, दक्षिणेला अगस्तीतीर्थ, आग्नेयेला गौतमीतीर्थ, नैऋत्येला एकवीरातीर्थ, पश्चिमेला वरुणतीर्थ, वायव्येला गणेशतीर्थ, उत्तरेला मल्लारी मयतीर्थ व ईशान्येला गौरीतीर्थ अशी त्यांची नावे आहेत. त्यांपैकी आग्नेय दिशेचे गौतमीतीर्थ युक्त असे ते तीर्थ भैरवाने व्यापले आहे (त्या ठिकाणी स्नान करून व ते जलप्राशन करून मनुष्यप्राणी ब्रह्मलोकाला जातो अशी समजूत) व त्याच्या पश्चिमेला ज्ञानव्यापी या नावाने विख्यात महातीर्थ अशी तीर्थे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. दक्षिणकडे डोंगरात वसलेले सप्तेश (सप्तेश्वर) हे ठिकाणही कसब्याचे वैभव म्हणावे असे आहे. रामक्षेत्रामध्ये पवित्र अशी दहा क्षेत्रे सांगितली आहेत. त्यांपैकी सहा विशेष श्रेष्ठ आहेत. त्यांची नावे- गोकर्ण, सप्तकोटीश, कुणकेश, संगमेश्वर, हरिहर आणि त्र्यंबकेश्वर. म्हणजेच, रामक्षेत्रात सांगितलेल्या पहिल्या सहा श्रेष्ठ अशा क्षेत्रांत चौथे क्षेत्र ‘संगमेश्वर’ आहे.
कसबा संगमेश्वराचे आध्यात्मिक महत्त्वही सर्वोच्च आहे. कार्तिकस्वामी व सूर्यनारायण अशी अभावाने आढळणारी दोन मंदिरे कसब्यात आहेत. चालुक्य घराण्यातील शेवटचा राजा ‘जाखुराय’ याच्या नावावरूनच त्या गावाच्या ग्रामदेवतेचे नाव ‘जाखामाता’ असे पडले असावे असा एक समज आढळतो. मात्र जाखमाता ही स्त्रीदेवता आहे आणि पुरूषाची स्त्री देवता होत नाही. त्यामुळे तो अंदाज चुकीचा असल्याचा तर्क करता येतो. जाखामातेचा ‘शिंपणे’ उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
कर्णेश्वर देवालयाबाबत आख्यायिका अनेक आहेत. भगवान परशुराम यांनी पांडवांना धनुर्विद्या शिकवली आणि सहावा भाऊ कर्ण याची ओळख करून दिली. त्यामुळे पांडवांनी ते देवालय भावाच्या आठवणीसाठी उभारले! अशी अतर्क्य कथा! ते देवालय एका अखंड शिळेतून कोरून काढलेले आहे. पण त्या देवालयाला कळस नव्हता. पांडवांचा अज्ञातवासाचा काळ असल्यामुळे त्यांनी रात्रीच्यावेळी, सूर्यास्तानंतर कामाला प्रारंभ करायचा आणि सूर्योदयापूर्वी काम संपवायचे असे ठरवले होते. देवालय पूर्ण झाले आणि पांडव भोजनाला बसले. पांडव काम करत आहेत याचा सुगावा सुरमा नावाच्या एका राक्षशिणीला लागला आणि कामात व्यत्यय आणावा या उद्देशाने तिने कोंबड्याच्या आरवण्याचा आवाज काढला. पांडवांनी सूर्योदयाची वेळ जवळ आली असे वाटून काम थांबवले आणि ते निघून गेले. त्यामुळे देवालयावरील कळसनिर्मिती राहून गेली. कालांतराने, स्थानिक कारागिरांनी तो कळस निर्माण केला. त्यामुळे कळसाचे काम अलिकडील असल्याचे जाणवते. देवालयात पाच पालथी ताटे आहेत. ती म्हणे पांडवांच्या भोजनाची! त्याखाली गुप्त धन आहे. तेथील एका खांबावर प्राचीन भाषेत शिलालेख आहे. तो ज्याला वाचता येईल त्याला ते धन मिळेल असा समज आहे. त्या देवालयाजवळ संगम मंदिर आहे. भर नदिपात्रात असलेले ते देवालय. अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री अशा तीन नद्यांच्या पात्रात असल्याने त्याला संगम मंदिर असे म्हटले जाते. संगमाच्या पात्रात असल्यामुळे ते देवालय पावसाळ्यात चार महिने पाण्याखाली असते. त्यामुळे त्या देवालयात ‘लाइट’ची सोय नाही.
– निबंध कानिटकर
(‘दैनिक प्रहार’वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
Last Updated on 24th August 2019
कसबा येथील श्री.
कसबा येथील श्री. नरसिंहलक्ष्मी आमचे कुलदैवत आहे. त्याची काही माहिती कळेल का? बाकी सर्व माहिती अभ्यास पूर्ण आहे धन्यवाद.
Sangameshwar yethil
Sangameshwar yethil Karneshwar Mandirachya madhyamatun sangmeshwarcha sthanik ithas prakashat yevu shakel. Itihas abhyasak va itihas premi yanna hi mahiti upyukta tharel.
कृपया संगमेश्वर मधील राजीवली…
कृपया संगमेश्वर मधील राजीवली गावाचा इतिहास सांगा।
मी हे मंदीर आणि नदीच्या…
मी हे मंदीर आणि नदीचा संगम पाहीलेत, खूप सुंदर शील्पकला आहे, याची जपणुक केली पाहीजे.
chan mahiti ..kanetkar saheb
chan mahiti ..kanetkar saheb
very good article
very good article
Comments are closed.