कर्जतचा एव्हरेस्टवीर संतोष दगडे (Karjat youth climbs Everest peak)

1
508

संतोष लक्ष्मण दगडे हे रायगड जिल्ह्यातील कर्जतचे तरुण गिर्यारोहक 17 मे 2023 रोजी पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी एव्हरेस्टवर पोचले ! महाराष्ट्राच्या या युवकाने या पराक्रमामुळे साऱ्या भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. संतोष हा एका शेतकरी कुटुंबातील मुलगा जागतिक पातळीवरील सन्मानाचा धनी झाला आहे.

मी संतोष यांना एव्हरेस्टच्या माथ्यावर पोचल्यावर तुम्हाला काय दिसले, मनात प्रथम कोणते विचार आले? असे विचारले. त्यावर त्यांनी उत्तर दिले, “अवतीभवती अंधार होता, पण आकाशात चांदणे होते. ग्रह चमचमत फिरत होते. मध्येच, एखादे शिखर क्षितिजरेषेवर खाली अंधुकसे दिसायचे, पण वर आकाश आणि खाली मी एवढीच जाणीव, खरे तर मनात होती. पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले कुटुंबीय, मित्र आणि ज्यांनी मला या मोहिमेसाठी निधी गोळा करून प्रोत्साहित केले त्या साऱ्यांची त्या क्षणी आठवण झाली. मी त्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र ठरलो याचा आनंद वाटला.” माणसाच्या मनातील उन्नत भावना निसर्गाच्या सान्निध्यात जाग्या होत असतात. संतोष यांच्या संभाषणातील उच्च भाव तसाच जाणवत होता. संतोष यांचे सारे जीवनच उजळून निघाले आहे ! संतोष म्हणाले, तेथे पोचल्यावर माझ्यातील अहंकार  नाहीसा झाला. नम्रपणाचे एक नवीन भान उदयाला आले.

संतोष हिमालय पर्वताच्या माथ्यावर पंधरा-वीस मिनिटे थांबले होते. त्यांना काळ जणू तेथे स्तब्ध झाला आहे असेच वाटले. त्यांच्या सोबत कर्मा आणि निग्मा हे दोन शेर्पा साथीदार शिखरावर होते. एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनसिंग यांच्यासारखे दिग्गज जेथे पोचले तेथे मराठमोळे संतोष जीवाची बाजी लावून पोचले होते !

संतोष यांच्या सोबत त्यांचे तीन साथीदार होते. हेमंत जाधव (बदलापूर), संदीप मोकाशी (डोंबिवली), धनाजी जाधव (ठाणे) आणि संतोष दगडे (कर्जत) असे चार मऱ्हाठा गडी’ 1 एप्रिल 2023 रोजी मुंबईहून काठमांडूला निघाले. त्यांचा करार एव्हरेस्टवर जाण्यासाठी 8-केया नेपाळी कंपनीबरोबर झाला होता. त्यांना एव्हरेस्ट बेस कॅम्पवरच महिनाभर थांबावे लागले होते. हवामान खराब होते आणि पुढील चढाईची परवानगी मिळत नव्हती. त्यांचा मुक्काम 12 एप्रिल ते 12 मे इतका काळ बेस कॅम्पवरच होता. घरदार सोडून तशा ठिकाणी महिनाभर बसून राहणे हीसुद्धा एक परीक्षाच होती ! तेथे त्यांचा सराव आणि अन्य उपक्रम चालत होते, पण तरीही तितका वेळ मनातील उत्साह टिकवून ठेवणे अवघड झाले. शिवाय दरडी कोसळणे, बर्फवृष्टी, अपघात असे प्रकार घडतच होते. एका क्षणी तर संतोष इतके वैफल्यग्रस्त झाले, की त्यांच्या मनात आता ते जिवंत परत येत नाहीतअसे आले. तसे त्यांनी पत्नी भारती यांना तेथून फोन करून सांगितले. पण स्वभावाने कणखर आणि खंबीर असणाऱ्या त्यांच्या पत्नीने लवकरच तुमच्या स्वप्नाची पूर्तता होणार आहे; तेव्हा धीर सोडू नका असा सल्ला दिला आणि खरोखरच, त्याचा प्रत्यय संतोष यांनाच नव्हे तर साऱ्या जगाला लगेच आला.

बेस कॅम्पवरील वातावरण हळुहळू सुधारत गेले. ते चौघेही (22 ते 28 एप्रिल) सराव-चढाईत कॅम्प एक आणि कॅम्प दोनवर जाऊन पुन्हा बेस कॅम्पवर आले. तेथे देशोदेशीचे, एव्हरेस्टवर जाण्यासाठी इच्छुक दीडशेहून अधिक गिर्यारोहक त्यांची वेळ केव्हा येते याची वाट पाहत होते. यंदा वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून एकूण सुमारे चारशे लोकांनी एव्हरेस्टवर जाण्यासाठी नाव नोंदले होते. संतोष आणि त्यांच्या टीमसाठी चढाईचा अंतिम आदेश 12 मे रोजी आला. ते चारही वीर कॅम्प चारवर खडतर वातावरणाचा सामना करत 15 मे रोजी पोचले. शिखरावर चढण्याचा शेवटचा टप्पा तेथून सुरू होतो. एक सहकारी संदीप यांना काही दुखापत झाल्याने त्यांना तेथून कॅम्प दोनवर परतावे लागले. बाकी तिघे हेमंत, धनाजी आणि संतोष पुढील आदेशाची वाट पाहत कॅम्प चारवरच थांबले. तेथे त्यांच्या कहाणीला आणखी एक कलाटणी मिळाली. तिघांपैकी एकालाच वर जाण्याची अंतिम परवानगी आली. गटाचे नेतृत्व हेमंत जाधव करत होते. त्यांनी त्या सन्मानासाठी संतोषची निवड केली. त्यांनी त्यांना अद्वितीय स्वरूपाचे यश नजरेसमोर दिसत असताना स्वतःचा विचार एव्हरेस्ट चढाईसाठी न करता सहकाऱ्याची निवड केली. खरोखरीच, त्यासाठी फार मोठे मन हवे ! ते हेमंत यांच्याकडे आहे. पहिले मराठी एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांनी अंतिमतः एव्हरेस्टवर जावे म्हणून त्या टीमचे प्रमुख ऋषीकेश यादव यांनीसुद्धा तसाच निर्णय मोठ्या मनाने घेतला होता

हेमंत आणि धनाजी एक शेर्पा घेऊन खाली उतरले; तर दोन शेर्पा आणि संतोष कॅम्प चारवर पुढील सूचनांची वाट पाहत थांबले. संतोष यांना एकट्याने सव्वीस हजार फूट उंचीवर, हाडे गोठवणाऱ्या थंडीत, तुफान वादळवाऱ्यांत, अतिशय दोलायमान परिस्थितीत मानसिक स्वास्थ्यासह हिमतीने टिकून राहायचे होते. काही शेर्पा अपघातात मरण पावल्याच्या, काही गिर्यारोहक बेपत्ता झाल्याच्या बातम्या त्या भीतीत भर घालत होत्या. इकडे घरी त्यांची पत्नी आणि मुले यांनी हनुमान चालिसा’, रामरक्षा असा जप सुरू ठेवला होता. संतोष यांचे कुटुंब धार्मिक संस्कारात वाढलेले आहे. संतोष स्वतः मोहिमेमध्येही दररोज सकाळी टेण्टमध्ये अर्धा तास पूजाअर्चा करत असत. त्यांनी यशाचे समीकरण साठ टक्के प्रयत्न आणि चाळीस टक्के दैव हे असते असे नंतरच्या गप्पांमध्ये बोलून दाखवले.

अखेर, तो क्षण आला, अंतिम टप्प्याच्या चढाईची परवानगी मिळाली. दोन्ही शेर्पा आणि संतोष शिखराच्या दिशेने 16 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता निघाले. शेर्पा अनुभवी होते. त्यांचा होरा रात्री निघण्याऐवजी संध्याकाळी निघाल्यास शिखर सुखरूप गाठता येईल आणि गर्दीही टाळता येईल असा होता. त्यांनी आखलेला तो एक प्रकारचा गनिमी कावासुद्धा होता असे म्हणता येईल. संतोष यांच्याकडील प्राणवायू वाटेत, हिलरी स्टेपजवळ संपला‌. ते हेलपाटत चालू लागले, शक्तिपात झाल्यासारखे एका जागी वीस-पंचवीस मिनिटे बसून राहिले. ते शेर्पांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्याकडील ऑक्सिजन सिलेंडरची तपासणी केली. ऑक्सिजन संपलेला होता. संतोषप्रमाणे आणखी एका शेर्पाचेही प्राणवायूचे नळकांडे निकामी झाले होते. मग दुसऱ्या शेर्पाने त्याच्याकडचा सुस्थितीतील ऑक्सिजन संतोष यांना लावला आणि दोघे शेर्पा विनाऑक्सिजन चढाई करू लागले.

तिघेही एव्हरेस्ट नावाच्या जगातील सर्वात उंच डोंगरमाथ्यावर पहाटे एक वाजून पंचावन्न मिनिटांनी पोचले. पाच-दहा माणसे उभी राहू शकतील एवढी ती जागा, तेथील स्थानिक राजाची एक मूर्ती आणि फडफडणारे काही नेपाळी प्रार्थना-ध्वजअसे दृश्य तेथे होते. फोटो काढायचे होते. एका शेर्पाकडील मोबाईल बर्फाने गोठून निकामी झाला होता. संतोष यांच्याकडील मोबाईल सुस्थितीत होता, पण त्याची बॅटरी केवळ वीस टक्के इतकी उरली होती. त्यावर फोटो काढता आले, व्हिडिओ शूटिंगही झाले. वर गणपती बाप्पा मोरया, ‘छत्रपती शिवराय यांचा जयजयकार झाला आणि त्या मोहिमेचा उत्कर्षबिंदू छायाचित्रांच्या रूपाने कॅमेऱ्यात बंदिस्त झाला !

एव्हरेस्ट शिखराच्या दिशेने पायी प्रवास लुक्ला या काठमांडूजवळच्या गावी छोटा विमानतळ आहे, तेथून सुरू होतो. संतोष यांना के-4 तळावरून एव्हरेस्ट शिखरावर प्रत्यक्ष पाय ठेवण्यास साडेनऊ तास लागले. ते अंतर सुमारे तीन हजार फूटांचे आहे. ते कापण्यास साडेबारा तासापर्यंत वेळ लागू शकतो. तीनचार पावले उचलून टाकली, की विश्रांती घ्यावी लागते. त्यातच हिलरी स्टेप्स नावाची छोट्या घळीसारखी जागा आहे. ती पार केली, की अडीचशे-तीनशे फूटांवरील शिखरमाथा दिसू लागतो. तेथून सर्वोच्च टोकावर पोचेपर्यंत दमछाक विलक्षण असते, परंतु मनामध्ये आनंदच आनंद असतो, एक दिव्य अनुभूती जाणवते. निसर्गाचे ते अद्भुतरम्य दर्शन मनातच साठवता येते. त्याची कॅमेऱ्यातील छबी म्हणजे त्या दर्शनाची झलक तरी म्हणता येईल का?शंका वाटते !

संतोष यांना सुमारे बेचाळीस लाख रुपये खर्च या मोहिमेसाठी आला आहे. त्यांपैकी साडेआठ लाख रुपये त्यांनी विविध ठिकाणच्या मदतीतून मिळवले तर उर्वरित रक्कम कर्ज, मित्रांकडून उसनवारी, दागिने विकणे-गहाण ठेवणे अशा पद्धतीने जमा केली. संतोष यांचे वडील लक्ष्मण ब्याऐंशी वर्षांचे आणि आई माणिक पंच्याहत्तर वर्षांची असे आहेत. त्यांनी त्यांचे दागिने विकू, गहाण ठेवू; पण तुझे स्वप्न तू पूर्ण करअसे संतोष यांना सांगितले. त्यांचे एव्हरेस्टवर जाण्याची संधी न मिळालेले इतर तिघे सहकारी – हेमंत जाधव, संदीप मोकाशी, धनाजी जाधव रेल्वे, बँक येथे नोकरी करणारे आहेत. त्यांनाही स्वतंत्रपणे प्रत्येकी संतोष यांच्याप्रमाणेच सुमारे बेचाळीस लाख रुपये खर्च या मोहिमेसाठी आला. त्यांनीही संतोषप्रमाणेच कर्ज, देणग्या व स्वत:च्या पदरचे अशा तऱ्हेने मोहिमेसाठी पैसे उभे केले होते.

गिर्यारोहणाच्या क्षेत्रातील शिलेदार संतोष यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले असे तो सांगतो. पुण्यातील गिरिप्रेमीचे प्रमुख उमेश झिरपे स्वतः संतोष यांच्या मोहिमेची खरेदी करण्यासाठी नेपाळला गेले होते. त्यांच्या पथकातील डॉ. सुमीत मांदळे संतोष यांना वेळोवेळी शारीरिक तंदुरुस्तीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करत होते. कर्जतचे डॉक्टर पंकज कुलकर्णी यांची मदत संतोष यांना होतीच.

संतोष सांगतात, मी चारुहास जोशी, वसंत वसंत लिमये, मिलिंद भिडे, शंतनू पंडित, झिरपे गिर्यारोहण क्षेत्रातील अशा दिग्गजांच्या तालमीत तयार झालो आहे; त्या प्रत्येकाकडून मी एकेक गुण उचलला आहे.ते चारुहास जोशी यांच्याकडून टीमवर्क आणि प्रस्तरारोहण शिकले. त्यांनी वसंत वसंत लिमये यांच्याकडून नियोजनाचा गुण घेतला. त्यांनी मिलिंद भिडे यांच्याकडे हिमालयातील गिर्यारोहण या विषयावरील धडे गिरवले आणि शंतनू पंडित यांच्याकडून सुरक्षेची (सेफ्टी) मुळाक्षरे गिरवली. संतोष म्हणाले, “उमेश झिरपे यांची उपक्रमशीलता आणि साहसी वृत्ती यांसमोर मी सदैव नतमस्तक असतो.त्यांचे कर्जतचे मित्र निलेश चौडिये यांच्याविषयीदेखील त्यांच्या बोलण्यातून खास कृतज्ञता व्यक्त होते.

संतोष दगडे यांनी खोपोलीच्या के.एम.सी. कॉलेजमधून बीए केले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सत्याऐंशी सुळके आणि दोनशे किल्ले सर केले आहेत. ते गिर्यारोहणाचे दोन अभ्यासक्रमही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी हिमालयातील भागिरथी, देव तिब्बा, फ्रेंडशिप, स्तोक कांगरी, केदार डोम, सीबी-13, अशी बारा शिखरे यापूर्वी सर केली आहेत तर सायकलवरून मनाली ते लेह, लेह ते श्रीनगर आणि मुंबई ते गोवा अशा पंधरा-सोळा मोहिमाही पूर्ण केल्या आहेत. ते पोहणे, योगसाधना आणि ध्यानधारणा हे व्यायामप्रकार नियमितपणे करतात. त्यांनी गिर्यारोहणात एकाग्रता ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते त्या दृष्टीने मेडिटेशनचा खूप फायदा झाला असे आवर्जून सांगितले. पत्नी भारती त्यांच्या दैनंदिन व्यायामावर जातीने लक्ष ठेवून असतात.

गिर्यारोहण मोहिमांतील शेर्पांविषयी उलटसुलट प्रवाद प्रचलित आहेत. संतोष यांच्यासोबत कर्मा आणि निग्मा हे दोन शेर्पा होते. निग्मा हे दार्जिलिंगचे रहिवासी, त्यांची एव्हरेस्टवरील ही आठवी फेरी होती. कर्मा हेसुद्धा अनुभवी एव्हरेस्टवीर.

संतोष यांनी त्यांची पत्नी भारती यांच्या मदतीने कर्जत येथे साहस आऊटडोअर ॲडव्हेंचर टुरिझमया नावाने संस्था सुरू केली आहे. ते त्याद्वारे गिर्यारोहण-प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी साहसी शिबिरांचे आयोजन, ट्रेकिंगच्या हिमालयात आणि सह्याद्रीत विविध ठिकाणी मोहिमा असे उपक्रम राबवत असतात. ते त्याशिवाय रॉयल कर्जत कॅम्पआणि WEP Resource Development Foundation या त्यांच्या अन्य दोन व्यासपीठांवरूनही विविध प्रकारची कामे करत असतात. त्यात दुर्गम भागातील आपत्कालीन बचावकार्य, प्रथमोपचार मार्गदर्शन शिबिरे यांसारख्या बाबींचा समावेश असतो. त्यांनी कोविड काळात गडकिल्ल्यांखाली राहणाऱ्या गोरगरिबांना धान्य आणि तत्सम जीवनावश्यक साहित्य यांचे वाटप केले. त्यांची मुलगी हर्षाली हिने जैव-तंत्रज्ञानात एम एस्सी केले आहे आणि मुलगा अभिषेक हा मेकॅनिकल इंजिनीयर म्हणून शिकत आहे.

संतोष मोहीम यशस्वी करून 22 मे रोजी कर्जतला परतले तेव्हा त्यांच्या स्वागताचा मोठा सोहळा कौटुंबिक पातळीवर झाला. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक ग्रामस्थ आणि त्यांचे सहकारी त्यावेळी उपस्थित होते. पण त्यांच्या या पराक्रमाचे मूल्यमापन राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कसे होणार आहे ते पाहण्यास महाराष्ट्रातील गिर्यारोहक आणि जाणकार उत्सुक आहेत. भारती यांच्या दृष्टीने एवढे प्रचंड यश प्राप्त करून त्यांच्या पतीने सुखरूप परत येणे हेच मोलाचे होते. त्यांना एव्हरेस्ट गाठून आलेले संतोष खूप बदलले आहेत असे वाटते. त्यांचे शब्द होते- एखादा कोरा कागद समोर यावा तितके संतोष बदलून गेलेले दिसले आणि त्यांनी पुढेही तसेच राहवे अशी माझी अपेक्षा आहे.

भारती यांनाही गिरिभ्रमण, साहसी मोहिमा यांची आवड आहे. त्या संतोष यांच्या खांद्याला खांदा लावून वावरत असतात. त्या स्वतः संतोष यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या संस्थांचे सगळे कामकाज पाहतात. त्यांचा स्वभाव कणखर, स्वाभिमानी आणि तितकाच संवेदनशील असल्याचे त्यांच्याशी बोलताना जाणवते. त्यांना शालेय जीवनापासून मुलांच्या मनात साहसाची आवड निर्माण व्हावी हे महत्त्वाचे आहे असे वाटते. त्या शिबिरांचे आयोजन निसर्गाप्रती विद्यार्थ्यांच्या मनात कृतज्ञतेचे भाव निर्माण व्हावे; तसेच, निसर्गाशी असलेले नाते अधिक घट्ट व्हावे हे सूत्र मनाशी बाळगून करतात. मुलांना टीव्ही, मोबाईल यांच्या पगड्यातून आणि चार भिंतींतून बाहेर काढले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. त्यांनी नोंदवले, की आमच्या शिबिरात भाग घेणारी मुले परतून जाताना निर्भय, निसर्गप्रेमी आणि जीवनसन्मुख झालेली असतात. त्यांनी बोलता बोलता पुस्तकांशिवाय मुलांना शिकवते ते खरे शिक्षणअसे एक अर्थपूर्ण विधान केले. वृक्ष लागवड, पाण्याचा पुनर्वापर, सांडपाण्यावरील प्रक्रिया, छोटे बंधारे, विहिरींचे पुनर्भरण, बायोगॅस, सौर ऊर्जेचा वापर असे मुद्दे त्यांच्याशी बोलताना पुढे येत होते. त्यांचे सारे काम ती सूत्रे मनाशी बाळगूनच सुरू आहे.

संतोष यांचे रॉयल कर्जत कॅम्पहे उपक्रमशील केंद्र आहे. प्रस्तरारोहणाची कृत्रिम भिंत, साहसी क्रीडाप्रकारांसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री, तरण तलाव, प्रशिक्षणासाठी मोठा हॉल, बैठकांसाठी अद्यावत सभागृह, निवासासाठी महाराष्ट्रातील विविध गडकिल्ल्यांची नावे दिलेले तंबू, मन प्रसन्न करणारी हिरवळ असे सारे काही तेथे आहे. महाराष्ट्रातील साहसाची तेजस्वी परंपरा पुढे नेणारे बीज तेथे जोमाने अंकुरत आहे आणि त्यासाठी संतोष यांनी स्वतःच्या उदाहरणाने एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे !

संतोष दगडे 7020365239 dagade.santosh@gmail.com
माणिक’, दगडेवाडा, वीर सावरकर मार्ग, कर्जत, जि. रायगड – 410201

प्रल्हाद जाधव 9920077626 pralhadjadhav.one@gmail.com
————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. खुपचं छान माहिती दिलीत…श्री संतोष दगडे यांचे आणि त्यांच्या पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन…

    रविंद्र नाईक,
    जिल्हा क्रीडा अधिकारी
    रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here