कशेळीचा कनकादित्य (Kanakaditya the sun temple from Kasheli)

0
620

सूर्यमूर्ती या भारतात इसवी सनापूर्वी दोन शतकांत घडवण्यात येऊ लागली. सूर्याचे देव म्हणून महत्त्व इसवी सनाच्या चौथ्या, पाचव्या शतकात, म्हणजे गुप्त काळात वाढत गेले आणि उपासना मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. सूर्योपासनेची मूळे वैदिक काळात सापडतात. सूर्यप्रतिमा कुशाणांच्या काळात निर्माण झाल्या. सूर्याची देवालये गुप्तकाळात निर्माण केली गेली. त्यानंतरच्या कालौघात मंदिरे नष्ट झाली, सूर्याचे चलन संपले. सूर्यमूर्तींची जागा अन्य देवतांनी घेतली. मात्र अजून काही प्राचीन सूर्यमंदिरे आढळून येतात. सूर्याच्या संक्रमणानुसार  साजरे केले जाणारे मकर संक्रात, भोगी, रथसप्तमी हे सण; तसेच राणुबाईचे व्रत, श्रावणात केले जाणारे आदित्यपूजन आदी धार्मिक व्रतवैकल्ये सूर्यदेवतेच्या उपासनेशी संबंधित आहेत.

कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी या गावी ‘कनकादित्य’ नावाने सूर्य मंदिर प्रसिद्ध आहे. ते मंदिर सुमारे एक हजार वर्षे पुरातन आहे. मंदिरातील सूर्यमूर्तीबाबत मंदिराच्या विश्वस्तांकडून समजलेली आख्यायिका अशी: ती मूर्ती सौराष्ट्रातील प्रभासपट्टण येथील सूर्यमंदिरातून समुद्रमार्गे गलबतातून येथे आली. प्रभासपट्टण येथून वेरावळ बंदरातून एक व्यापारी माल घेऊन समुद्रमार्गे दक्षिणेकडे जात असताना ती मूर्ती त्याच्याबरोबर गलबतात होती. गलबत कशेळी गावाजवळ समुद्रात अडले. गलबत प्रयत्न करूनही पुढे जाईना, तेव्हा गलबतात असलेल्या आदित्यदेवाला येथेच स्थापित होण्याची इच्छा आहे असे वाटून त्या व्यापाऱ्याने मूर्ती किनाऱ्याजवळ असलेल्या गुहेत आणून ठेवली. मूर्ती तेथे काढून ठेवल्यावर त्याचे गलबत मार्गस्थ झाले.

योगायोग असा, की कशेळी गावात कनका नावाची सूर्योपासक राहत होती. तिला स्वप्नात दृष्टांत होऊन आदित्याची मूर्ती गुहेत आणून ठेवल्याचे समजले. गावकऱ्यांनी तेथे जाऊन शोध घेतला असता मूर्ती सापडली ! मूर्ती समारंभपूर्वक गावात आणली गेली. कनकेने तेथे गावकऱ्यांच्या मदतीने देऊळ बांधले व मूर्तीची स्थापना केली. कनकेने स्थापन केलेला आदित्य म्हणून कनकादित्य या नावाने ते मंदिर ओळखले जाऊ लागले. मूर्ती जेथे ठेवली होती त्या गुहेला देवकोठी असे म्हणतात. तेथील समुद्रकिनारा देवघळी या नावाने प्रसिद्ध आहे.

कशेळी गावाजवळ असलेले आडिवरे गाव मुचकुंदी नदीच्या खाडीच्या मुखाशी वसलेले आहे. आडिवरे या नावाची उपपत्ती आदितवाड म्हणजे जेथे सूर्योपासना होती ते गाव अशी असल्याचे पुरातत्त्व खात्याच्या संशोधन पत्रिकेत म्हटले आहे. पन्हाळगडाचा शिलाहार राजा भोज कशेळी गावात समुद्रस्नानासाठी सन 1191 साली आला असता त्याने कनकादित्य मंदिराचे पुजारी गोविंद भट्ट भागवत यांना कशेळी गाव इनाम दिले. कशेळी गावातील बारा ब्राह्मणांची दररोज भोजनव्यवस्था करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्या इनामपत्राचा ताम्रपट देवालयाच्या विश्वस्तांनी जतन केला आहे.

सूर्याची मूर्ती काळ्या पाषाणात घडवलेली आहे. मूर्ती स्थानक म्हणजे उभी आहे. मूर्ती कानात कुंडल, गळ्यात माळा, कंबरपट्टा परिधान केलेली आणि हातात कमळ अशी आहे. तिचे नेत्र तेजस्वी आहेत. मूर्तीच्या पायाशी उषा, प्रत्युषा आहेत. मूर्तीभोवती चांदीची नक्षीदार चौकट आहे. गाभाऱ्याच्या दोन बाजूंना द्वारपाल व वर शेषशायी विष्णूची प्रतिमा आहे. विष्णूच्या पायाशी लक्ष्मी व गरुड आहेत. प्रतिमेवर विष्णूचे दहा अवतार आहेत. मंदिराच्या छतावर नऊ चौकटींमध्ये नऊ देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे बांधकाम लाकडी आहे. मंदिरापुढे असलेला नक्षीदार खांबांचा सभामंडप मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांनी बांधून दिला आहे. सभामंडपाचा जीर्णोद्धार 2016 साली करण्यात आला. नवे बांधकाम हे नाना शंकर शेठ यांनी बांधलेल्या मूळ ढाच्याप्रमाणे करण्यात आले आहे. मंदिराच्या आवारात आर्या दुर्गा, विष्णू, गणपती अशी लहान लहान मंदिरे आहेत. ती मंदिरे रत्नागिरीचे वैशिष्टय असलेल्या जांभा दगडाच्या चिऱ्याची आहेत. मंदिरासमोर नगारखाना व त्याच्या दोन बाजूंना दगडी त्रिपुर आहेत. पुरातन नगारखान्याचे चिरेबंदी जोते नगारखान्याच्या नवीन इमारतीखाली पाहण्यास मिळते. आवारात चिऱ्याची फरसबंदी आहे. आवारात असलेल्या विहिरीवर पाणी काढण्यासाठी असलेला हातपंप जुन्या काळात असलेल्या आयुधांची आठवण देणारा व सहसा कोठे न आढळणारा आहे.

मंदिर सूर्याचे असल्याने रथसप्तमी हा तेथील प्रमुख उत्सव. रथसप्तमीचा उत्सव माघ शुक्ल सप्तमी ते माघ शुक्ल एकादशी या पाच दिवसांत साजरा केला जातो. आडिवरे गावातील कालिकादेवीला आमंत्रण माघ षष्ठीला दिले जाते. कालिकादेवीचे आगमन कशेळी गावात रात्री वाजतगाजत होते. देवीचा मुखवटा कनकादित्याच्या मूर्तीच्या शेजारी ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी पूजा होऊन उत्सवाला सुरुवात होते. आडिवरे गावातील भगवतीदेवी ही कालिकादेवीची पाठराखीण म्हणून कशेळीत येते. कालिकादेवी, भगवतीदेवी यांचा कशेळीत मुक्काम चार दिवस असतो. दररोज कीर्तन, प्रवचन, आरती, पालखी, प्रदक्षिणा या चालीरीती व नाटक यांनी उत्सव उत्साहात होतो. अश्विन द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत देवळात रोज काकड आरती होते. कार्तिक दशमीला रात्री पालखी काढली जाते. भजन कार्तिक एकादशीला चोवीस तास चालू असते.

रथसप्तमी उत्सव कनकादित्य मंदिरात माघ शुद्ध पक्षात सप्तमी ते एकादशी असा पाच दिवस असतो. कशेळी आणि आसपासच्या गावात हा सर्वात महत्त्वाचा उत्सव मानला जातो. उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा लग्नसोहळा ह असते. कालिकादेवी ही कशेळी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या काळीकावाडीची. त्या सहा बहिणी – कालिकादेवीमहालक्ष्मीमहाकालीमहासरस्वतीभगवतीदेवी आणि जाखादेवी. या सर्व देवी कशेळी गावाच्या आसपासच आहेत. त्यात सर्वात प्रसिद्ध महाकाली मंदिर अडिवऱ्याचे. ते आवर्जून पाहण्यासारखे असे आहे.

कालिकादेवी ही या सर्व बहिणींत धाकटी. आख्यायिका अशी आहे, की वरच्या चार बहिणी कालिकादेवीला जाखादेवीसाठी वर संशोधन करण्यास पाठवतात. पण शेजारच्याच गावातील कनकादित्यला पाहताक्षणी कालिकादेवी त्याच्या प्रेमात पडते आणि कनकादित्याच्या मनातही कालिकादेवीबद्दल प्रेम निर्माण होते. त्यांचे लग्न ठरते. परंतु जाखादेवीला ते पसंत होत नाही. तिला तिच्या धाकट्या बहिणीचा राग येतो आणि ती तिचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते. ती लग्नालाही उपस्थित राहत नाही.

रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळ्यावेळी मोठी बहीण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जातात. भगवतीदेवी पाठराखण म्हणून येते. काळीकावाडीच्या कालिकादेवीची पालखी कशेळीच्या कनकादित्य मंदिराकडे जात असते त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. त्यावेळी त्या मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. कारण जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होती ! ती प्रथा आजही पाळली जाते.

ह्या लग्न सोहळ्याचे एक खास वैशिष्टय म्हणजे हुंडा सर्वसाधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळींनी मुलाकडील मंडळींना देण्याचा असतो. पण कशेळीला उलटे आहे. मुलाकडील म्हणजे कनकादित्याकडील मंडळींना वधूकडील म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो !

कनकादित्य मंदिराच्या छतावर ज्या विविध देव-देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत त्यातील अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या मूर्तीला सात हाततीन पाय आणि दोन मुखे आहेत. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडतात ती तीन दगडांवर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमुखे दोन. एक चुलीचे व दुसरे वैलाचे. म्हणून मुखे दोन आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे खूर (उंचवटे) असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. चुलीच्या रचनेचे प्रतीकात्मक रूप त्या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे. अशा प्रकारची अग्निनारायणाची मोठी मूर्ती रत्‍नागिरी शहरातील सत्यनारायण मंदिरात पाहण्यास मिळते.

– रजनी अशोक देवधर 7045992655 deodharrajani@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here