ट्रेंडिंग काय? – लिव्ह इन रिलेशनशिप ! (Is Live In Relationship good alter active to family system?)

1
620

समाजजीवन हे विवाहसंस्था नष्ट कधी होणार नाही अशा ठाम विश्वासाने चालू आहे. मात्र त्या विश्वासाला नव्या युगात धक्का बसू लागलेला दिसत आहे. लग्न करणे व ते निभावणे याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि विचार हे एका पातळीवर बदलत आहेत. तो प्रश्न सध्याच्या बदललेल्या मूल्यांमुळे गंभीर झाला आहे. सोबत हवी असते, पण ती कशी? याबाबत अनेक जण चर्चा करतात, व्याख्याने देतात. चाकोरीतील लग्न नाकारून, एकमेकांच्या संमतीने एकत्र राहणे या विचाराने अनुरूप सोबतीची व्याख्या बदलत चालली आहे. तशा विचारांबद्दल असणाऱ्या संकोच व भीती या भावनांच्या आवरणाला छेदून लोक विचार करतात आणि तो मांडतात. त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांना आपण कसे सोडवणार आहोत? त्याला नीती-अनीतीच्या नियमांमध्ये बसवणार का? असे प्रश्न निर्माण करून ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधांकडे बघण्याचा गढूळ दृष्टिकोन नाहीसा होवो अशा अपेक्षेने शुभा रुद्र यांनी मांडलेले विचार –
अपर्णा महाजन
———————————————————————————————-

ट्रेंडिंग काय? – लिव्ह इन रिलेशनशिप ! (Is Live In Relationship good alter active to family system?)

भारतात लग्नपद्धत अजून टिकून आहे, पण प्रत्येकाच्या मनाच्या तळाशी पाहिले तर सत्य लक्षात येते. ते हे, की जोडप्यांमध्ये एकाची सहनशक्ती संपलेली आहे ! पती-पत्नींच्या नात्याचे नाविन्य टिकत नाही. ते पाहून तरुण पिढी विचार करते, की आईवडील एकाच घरात राहून एका छताखाली वेगवेगळे जगत आहेत. मग त्यापेक्षा लग्न नकोच ना करण्यास ! तरुणाईची मते बदलली आहेत- त्यांचा लग्नावर विश्वास राहिलेला नाही असे निरीक्षण आहे. भारतीय लग्नपद्धत ही पैशांभोवती फिरते. बघून केलेले लग्न असो, नाही तर ‘लव्ह मॅरेज’ असो; मुलगा काय करतो? तो कमावता आहे ना? त्याला राहण्यास घर आहे का? एवढे विचारले जाते. पण तेवढे पुरेसे आहे का? तो पारंपरिक दृष्टिकोन बदलत नाही.

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज ही वैयक्तिक निवड आहे – प्रेम ही संकल्पना जुन्या काळापासून आहे. विवाहाचे रूपांतर प्रेमात आणि वैवाहिक संबंध म्हणजे दोन घरे एकत्र येणे हे लग्नात पूर्वी अपेक्षित असे. सोयरीक मंडळी एकमेकांची सोय पाहत. काही वेळा, त्यांची धोरणे अडवणुकीची असत. प्रेम हे त्या दोन कुटुंबांतील परस्पर व्यवहारातून उपजे व वाढत असे. विश्वास आणि प्रेम ही त्या परस्पर नात्याची मुळे आहेत.

नव्या युगात स्त्री शिकली तसा तिच्या हातात पैसा आला, तशा अपेक्षाही वाढत गेल्या. पूर्वीची स्त्री सहनशील होती. ती घरचे बघत असे. स्वयंपाक हे तिचे काम, ती मुलांना अभ्यास घरातच शिकवे. नवऱ्याने पैसा कमावून आणावा- अशी स्त्री-पुरुषांची कामाची विभागणी होती. पण पैसा स्त्रीच्या हातात आला, तिला स्वतंत्रपणा लाभला. तसे अहंकार, अपेक्षा, हव्यास अशा भावभावना नवऱ्याइतक्याच प्रदर्शित होऊन विसंवाद निर्माण होत गेला. नात्यातील सामंजस्य संपत गेले. फक्त स्त्री दोषी नाही. पुरुषांमध्येसुद्धा व्यसन, अहंकार, पैसा खर्च करण्याचे प्राधान्य यांवरून वादविवाद होतात.

भारतात पुरुषसत्ताक पद्धत आहे. परंतु पुरुषांनी सारासार विवेक वापरला नाही, तर वाद विकोपाला जातात, घरपण नष्ट होते आणि हृदयाला अनेक घरे पडतात. दोघांचे पटले नाही तर दोघे विभक्त होतात, लग्न घटस्फोटाकडे जाते. परंतु भारतीय संस्कारात लग्न मोडणे तितके सोपे नाही. त्यामुळे अशी कितीतरी जोडपी आहेत, की त्यांचा संसार हा अधांतरी आहे.

लग्न न करता एकमेकांच्या सोबत राहणे म्हणजे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’. लिव्ह इन रिलेशन हे नाते फक्त दोघांचे आहे. त्यात कुटुंबाचे संबंध जोडले जात नाहीत. त्यामध्ये फायदे आणि तोटे, दोन्ही असतात. लग्न पटले नाही तर घटस्फोटाकडे जाते, पण ‘लिव्ह इन’मध्ये येणाऱ्या अडचणींना तोंड कसे द्यायचे? त्या अडचणी कोणत्या असतील? त्या नात्यांमध्ये जबाबदाऱ्या काय असतील? ‘फ्युचर प्लॅन’ काय असेल? एकत्र येणारी दोन माणसे त्यांना ती कोणत्या वयात आहेत? याचा विचार करता येण्यास हवा. त्यासाठी जाणून घ्यावा लागतो एकमेकांचा स्वभाव, परस्परांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, दोघांच्या मनाची लवचीकता, प्रत्येकाची खर्च करण्याची प्रायॉरिटी व आवडनिवड अशा सर्व बाबींमध्ये संवाद असणे आवश्यक आहे. नात्यात पूरकत्व महत्त्वाचे. एकमेकांना एकमेकांची गरज भासणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकमेकांना एकमेकांची गरज काय? नात्यात गुंतण्याच्या अगोदर काही संवाद होण्यास हवा. पतीपत्नीच नाही तर दोन माणसे एकत्र आली, की बिनसण्याची शक्यता असतेच. परंतु भांडणातून शिकता येते हे ध्यानी ठेवावे. भांडणाबरोबर सुसंवादही हवा. खरे बोलणे, खर्च करणे, माघार घेणे, स्वभाव ओळखणे… आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समतोल साधणे, नात्याचे नाविन्य टिकवता येणे हे महत्त्वाचे आहे. एकमेकांना योग्य ती ‘स्पेस’ देणेसुद्धा गरजेचे आहे. ती जीवन जगण्याची कला आहे.

लाँग डिस्टन्स रिलेशनशिप ही एक नवीन संकल्पना अस्तित्वात आलेली दिसते. त्या संकल्पनेत दिवस-रात्र सोबत हवी की नको? त्याचे फायदेतोटे काय? व्यक्तीची निवड योग्य करता आली पाहिजे? जीवनात व्यक्तीच्या ‘प्रायॉरिटी’ काय आहेत त्याचा विचार केला पाहिजे.

दुरिया कब मिटा सकते है? प्यार का अफसाना ख्वाबो में है
हम आशिक दिलवाले चलो छोडछाडकर, दुनिया भर की शिकायत है,
तुम ये प्यार संभालो हम तुम्हारे ख्वाब संभाले

एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. जीवनातील सत्य म्हणजे नवरा-बायको यांच्यामधील कोणीतरी एक आधी जाते. मागे एकटा/एकटी उरतात, त्या व्यक्तीला मात्र जीवन जगणे फार कठीण होते. ती वेळ केव्हाही कोणावरही येते. त्या वेळी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ उपयोगी पडते. चांगली मैत्री ठेवली तर तो आधार ठरतो. एकमेकांची गरज एकमेकांशी मोकळेपणाने बोलली गेली तर एक चांगले नाते तयार होऊ शकते. कुटुंबात अजूनही व्यावहारिक गोष्टी बऱ्याच वेळेला पुरुष करतात. स्त्रिया नवऱ्याला विचारतात- कोठे इन्व्हेस्टमेंट करावी? गाडी कोणती घ्यावी? स्त्रिया घरे सांभाळतात, स्वयंपाक करतात, घरामध्ये नातवंडे सांभाळतात, छंद जोपासतात, त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी मॉर्निंग वॉक, व्यायाम, प्राणायाम, मेडिटेशन करतात. त्याचबरोबर त्यांना सुसंवाद, निखळ मैत्री मिळाली तर जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. मैत्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित व्हावा लागतो. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये तशी शक्यता वाढवत नेली पाहिजे.

– शुभा रुद्र 9657189569 Shubharudra@gmail.com
———————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. लेख विवाह प्रश्नांची चर्चा घडवत आहे. विवाह संस्था ही आपले आर्थिक/सामाजिक प्रारुप बदलू पाहत आहे. यात पूरक आणि अपूरकता लक्षात येण्याचे शहाणपण आवश्यक आहे. ते आता कमी पडत आहे. लग्न टिकत नाहीत,तशी मैत्रीही टिकत नाही. आपल्याला काय हवं आहे? हे परिस्थिती सापेक्ष असायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here