नवा मानुष वाद

लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंध आणि मराठी साहित्य

एकविसाव्या शतकाने लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे आणि क्षणभंगुरतेचे वादळ आणले आहे, हे खरे आहे. परंतु ते पचवले जाईल आणि स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. नवा पुरुषसमाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे नवेपण सार्वजनिक होऊन जावे.

लैंगिक धारणा व व्यवहार ह्यांत एकविसाव्या शतकात झपाट्याने होणारे बदल जेव्हा समाजाच्या ध्यानात येऊ लागले, तेव्हा मराठी (किंबहुना भारतीय) समाजाचा प्रतिसाद कसा होता, हे सांगण्यासाठी एक चुटका पुरेसा आहे – त्याची वास्तवात घडलेल्या प्रसंगाशी नाते असण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर (अल्पवयीन गरोदर मुलीला): हे झालं कसं? मुलगी: माझे आई-बाबा सिनेमाला गेले होते, तेव्हा माझा बॉयफ्रेंड घरी आला. डॉक्टर: पण तू आई-बाबांसोबत सिनेमाला का गेली नाहीस? मुलगी: सिनेमा अॅडल्टहोता.

विसाव्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यात भारतीय/मराठी समाज इतका भाबडा/ दांभिक का होता ह्याची कारणमीमांसा करणे फारसे कठीण नाही. पुरुष स्पंदनदिवाळी अंकाच्या 2008 च्या लैगिकता विशेषांकातील संपादकीय टिपणात त्याचे विश्लेषण असे केले आहे: साऱ्या धर्मांतील पाप-पुण्याच्या संकल्पना, सदाचार-व्यभिचाराचे ठोकताळे योनिशुचिता व पुरुषप्रधानता यांच्या पायावर उभे असतात. स्त्रीच्या लैंगिकतेविषयी अनिवार आकर्षण व त्याचबरोबर तिला नियंत्रित करण्याची (तेवढीच तीव्र) आकांक्षा ह्या पेचातून पुरुषी मानसिकता बाहेर पडण्याची चिन्हे दिसत नाहीत. पतिव्रता विरुद्ध वेश्या, अनंतकाळची माता विरुद्ध क्षणाची पत्नी, पत्नी विरुद्ध प्रेयसी, देवी विरुद्ध दासी ही सारी द्वंद्वे त्यातूनच निर्माण होतात. इहलोकात धर्माचरण करणाऱ्या पुरुषाला परलोकात अप्सरा-परी-हूरचे आमिषही त्यासाठीच दाखवण्यात येते. देवदासी ते सेक्स- टुरिझम हा सारा प्रवासही त्यासाठीच.त्यामुळे एकीकडे कामप्रेरणेचे दमन, तर दुसरीकडे त्याची अमर्याद लालसा असे वरून कीर्तन आतून तमाशावर्तन भारतीय पुरुषांच्या जणू अंगवळणी पडले. दांभिकता हा भारतीय जगण्याचा स्थायिभाव बनला. स्त्रीचे लैंगिक दमन, तसेच स्त्री आणि पुरुष ह्यांच्यासाठी नैतिकतेचे दुटप्पी मापदंड ह्या बाबी स्त्रियांनीही मनोमन स्वीकारल्या. त्याही पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्थेच्या वाहक बनल्या.

समृद्ध आणि निरामय परंपरा – मुळात भारतीय उपखंडाला लैंगिकता/सेक्स ह्यांकडे पाहण्याची वैविध्यपूर्ण व समृद्ध परंपरा लाभली आहे. इंग्रज येथे आले तेव्हा येथील समाजव्यवस्था अनेक शतकांपासून साचलेली होती, हे खरे असले तरी येथील विविध भूभाग आणि समाजगट ह्यांतील लैंगिक व्यवहारांत कमालीचे वैविध्य होते. दक्षिणेतील नायर आणि ईशान्येतील काही आदिवासी यांच्यामध्ये मातृवंशीय (matrilineal) कुटुंबव्यवस्था होती. देशाच्या बऱ्याच भागांत, विशेषतः जमीनदार कुटुंबांमध्ये बहुपत्नीत्व सर्रास आढळत होते. त्याच वेळी हिमालयात वसलेल्या काही जमातींमध्ये बहुपतित्वाची रीत होती. तथाकथित उच्च जातींमध्ये स्त्रियांच्या लैंगिकतेवर घातलेली बंधने विधवा विवाहबंदी, सती आणि बाल-जरठ विवाह यांसारख्या पद्धतींतून दिसत असली तरी इतर जातींमध्ये अधिक मोकळेपणा होता. गाथा सप्तशतीह्या तेरा-चौदाव्या शतकातील अनोख्या ग्रंथात तर तत्कालीन ग्रामीण व नागर समाजांतील सामाजिक व लैंगिक व्यवहारांचे, समजुतींचे, कुटुंबव्यवस्था न नाकारताही असलेल्या खुलेपणाचे मनोज्ञ व रसाळ वर्णन केलेले दिसते. राजवाडे यांनी सिद्ध केलेला भारतीय विवाहसंस्थेचा इतिहासहा ग्रंथ असो, की दामोदर कोसंबी व शरद पाटील ह्यांच्यासारख्या दिग्गजांनी लावलेला प्राचीन भारतीय इतिहासाचा मथितार्थ असो, भारतीय  संस्कृती लैंगिकतेच्या सोवळ्या, परीटघडीच्या संकल्पनांपासून दूर होती. इंग्रजांनी त्यांच्यासोबत भारतात लैंगिकतेच्या सोवळ्या व्हिक्टोरियावादीसंकल्पना आणल्या. त्यांच्यात लाकडी टेबलाचे पायदेखील कमनीय दिसतात म्हणून झाकून ठेवण्याची पद्धत होती. भारतीयांनी त्यांचे अनेक बाबतींत अंधानुकरण वासाहतिक प्रभावामुळे केले. लैंगिकतेच्या बाबतीत मात्र भारतीय इंग्रजांच्या तुलनेत रानटी आहेत असा अपराधगंड उगाचच बाळगला. खरे तर कामसूत्र, खजुराहो या अभिजात; तसेच, लोकसाहित्य व ललित कला ह्या सर्वांतून समृद्ध असे सांस्कृतिक संचित हाती आले होते. पण सनातनी धर्मवादी व इंग्रज ह्या दोघांच्या प्रभावामुळे भारतीयांनी त्यांचा तो समृद्ध वारसा नाकारला. त्याची गडद छाया एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील भारतीय समाजातील स्त्री-पुरुष नाते व त्यांचे चित्रण करणाऱ्या- त्याचा अन्वयार्थ उलगडणाऱ्या विविध कला यांच्यामध्ये पडलेली दिसते.

आधुनिक मराठी साहित्य आणि लैंगिकता – लैगिकता ही मानवी अस्तित्व, संबंध व समाजरचना ह्या सर्वांच्या मुळाशी असणारी, जीवनाला अर्थपूर्ण बनवणारी; तसेच, त्याची वाताहत करण्याची क्षमता असणारी आदिम प्रेरणा आहे. ती सर्वांच्या आयुष्याला व्यापून पुन्हा दशांगुळे उरते. त्यामुळे तिची सर्जक व संहारक शक्ती, तिचे आविष्कार व मानवी जीवनावरील तिचा प्रभाव ह्यांना वगळून व्यक्ती व समाज ह्यांविषयी केलेले कोणतेही चिंतन व चित्रण हे अपूर्ण व सदोष राहण्याची शक्यता आहे. असे असतानाही मराठी साहित्यात लैंगिकतेच्या प्रामाणिक चित्रणाची परंपरा फारशी नाही. मराठी साहित्यात समाजमान्य संकेतांना छेद देऊन केलेल्या लैंगिक चित्रणाचे स्वागत कसे होते ह्याचा दाखला म्हणून अश्लीलतामार्तंड कृष्णराव मराठे ते सखाराम बार्इंडरविरोधी उठलेला गदारोळ हा इतिहास पुरेसा बोलका आहे. अर्थात, साठच्या दशकानंतर ह्या विरोधाला न जुमानता चाकोरीबाहेरच्या सामाजिक जीवनाचे वास्तववादी चित्रण करण्यास जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा जयवंत दळवी, भाऊ पाध्ये, श्री.ना. पेंडसे ह्यांच्यासारख्या प्रथितयश साहित्यिकांपासून अनेक लहानमोठ्या कवी-लेखकांनी लैंगिकताविषयक निषिद्ध-संकेत (taboos) बाजूला सारून लिखाण केलेले दिसते. त्यात माहीमची खाडी’, ‘गोलपिठाया पुस्तकांपासून ते बेगम बर्वे’ (सतीश आळेकर), ‘अॅडम’ (रत्नाकर मतकरी), ‘भिन्न’ (कविता महाजन) ह्यांसारख्या अनुभव, आशय व अभिव्यक्ती यांचे विलक्षण वैविध्य असणाऱ्या काही कलाकृती आहेत. त्याशिवाय बारबाला, तृतीयपंथी (हिजडा), समलैंगिक ह्या नात्याने बहिष्कृत जीवन जगणाऱ्या व्यक्तींचे आत्मपर लिखाणही प्रकाशित होऊ लागले आहे. असे असले तरी लैंगिकतेच्या लोलकातून दिसणारा मानवी संवेदनांचा संपूर्ण वर्णपट (spectrum) समजून घेण्याच्या दृष्टीने मराठी साहित्यात फारसे प्रयत्न झालेले नाहीत. प्रकाश संत यांच्या लंपनच्या भावजीवनातील स्थित्यंतरापासून पु.शि. रेगे यांच्या सावित्रीपर्यंत, भारत सासणे यांच्या कथेतील सासुरवाशिणीला दिसणाऱ्यामोरापासून हेमंत गोविंद जोगळेकर यांच्या होड्याकवितेपर्यंत प्रेमाचे अतिशय तरल व मनोज्ञ आविष्कार मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत. पण त्याला अस्तररूप असणारी सूक्ष्म लैंगिकता ते तेंडुलकरांच्या नाटकातील अंगावर येणारी हिंसक लैंगिकता हा उलगडत जाणारा एकच पट आहे, हे भान मात्र मराठी समीक्षेत आणि साहित्यस्वादात आलेले नाही.

एकीकडे नव्याने लिहिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यातून उत्तम प्रेमकथा, प्रेमकविता लोप पावत आहेत, तर दुसरीकडे व्यक्तिगत व सामाजिक आयुष्यात दाखल झालेल्या अनेक बाबी मराठी साहित्यातून अस्पष्ट राहिल्या आहेत. भाडोत्री मातृत्व (सरोगेट मदरहूड), शाळकरी मुलांमधील पोर्नोग्राफीचे व्यसन, डान्सबारमधून होणारी पैशांची उधळपट्टी व त्यातून आसरा शोधू पाहणाऱ्या अभावग्रस्त कुटुंबातील मुलींची कोंडी, ‘फ्रेण्डशिपचा अर्थही ठाऊक नसणाऱ्या गावोगावच्या किशोरवयीन किंवा तरुण मुलांनी ती नाकारणाऱ्या मुलींवर केलेले हिंसक हल्ले, जातीय व धार्मिक अस्मितेला आलेले उधाण आणि त्यामुळे आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय लग्नानंतर ठिकठिकाणी घडणाऱ्या सैराटच्या आवृत्ती, धनिक वणिक बाळांच्या रेव्ह पाटर्याआणि सर्व वयोगटांतील स्त्री-पुरुषांमध्ये वाढलेली उपभोगाविषयीची बुभुक्षितता असे असंख्य विषय मराठी साहित्याच्या परिचयाचे झालेले नाहीत. मुळात प्राचीन काळी पुरुषार्थअसणारा कामगेल्या दोनतीन शतकांत (किंवा त्या पूर्वीच्या काळात) भारतीय माणसाचा रिपुकसा बनला हा प्रश्न अनुत्तरित असतानाच गेल्या दोन-तीन दशकांत त्याने समाजजीवन इतके कसे व्यापले हा नवा प्रश्न उभा ठाकला आहे. मराठीत ह्या विषयाचा अभ्यास गांभीर्याने करण्याची, त्याचे विश्लेषण व त्यावर खुली चर्चा करण्याची फारशी परंपरा नाही. र.धों. कर्वे (समाजस्वास्थ्य’) व दिवाकर मोहनी (आजचा सुधारक’) ह्यांनी त्यांच्या मासिकातून स्त्रियांच्या लैंगिक स्वातंत्र्याचा पुरस्कार हिरिरीने केला व भारतीय कामजीवनातील दांभिकता उघडकीस आणली. त्याशिवाय अभिरुचीने 1978 च्या दिवाळीत काढलेला अभिजात चावटविशेषांक, विजय तेंडुलकर यांच्या संपादकत्वाखाली अनुभवने 1998 मध्ये काढलेला छोटेखानी विशेषांक, ‘पुरुष स्पंदनचे 2008 व 2011 साली निघालेले दोन विशेषांक एवढाच ऐवज ह्या प्रश्नांवर उपलब्ध आहे.

लैंगिकताविषयक विवेकी दृष्टिकोनातून केलेले ललित व वैचारिक लिखाण मराठीत विरळ आहे. मराठी समीक्षेत जे विचारव्यूह सक्रिय आहेत, त्यांच्यापैकी केवळ स्त्रीवादही संकल्पना विवेकवादी न-नैतिकतेच्या जवळ जाते. कारण ती पुरुषसत्तेने उभारलेली समग्र मूल्यव्यवस्था आणि विचारव्यूह, दोन्ही नाकारते. लैंगिकतेकडे, विशेषतः स्त्री-लैंगिकतेकडे (यौनिकडे) पाहण्याचा तिचा स्वतःचा वेगळा दृष्टिकोनही आहे. असे असले तरी स्त्रीवाद हा पुरुषसत्ता नाकारणाऱ्या स्त्रियांनी त्यांचे अनुभव आणि त्यांची वैचारिकता ह्यांच्या आधाराने रचलेला विचारव्यूह आहे. पुरुषसत्तेने निर्मिलेल्या साच्यातून स्त्रियांप्रमाणे पुरुषही बाहेर पडून स्वतंत्र विचार करू शकतात असे तो विचार मानतो. पण तशा पुरुषांसाठी स्त्रीवादाजवळ अवकाश किंवा समज नाही. स्त्रीवाद लिंगभाव व बायकीपणा/पुरुषीपणा ह्या बाबी समाजनिर्मित आहेत हे मानतो. पण पुरुष आजुबाजूच्या पर्यावरणातून कसा घडतो ह्याची जाण व अनुभव स्त्रियांजवळ असणे शक्य नाही. पुरुषसत्ता नाकारणाऱ्या पुरुषांजवळ मात्र तो ऐवज असू शकतो. तशा स्त्री-पुरुष समता मानणाऱ्या व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या पुरुषांची चळवळ जगभर आकारत आहे. त्यातून पुरुषत्व-अध्ययन (masculinities study) यासारख्या विद्याशाखा उदयाला येत आहेत. भारतातील विविध राज्यांपैकी महाराष्ट्रात ह्याविषयी सर्वात अधिक व ठोस काम झालेले आहे. तशी चळवळ गेली पंचवीस वर्षे चालू आहे. पुरुषांचे अनुभव, अभ्यास व विश्लेषण ह्यांच्या आधारावर तसा एक नवा विचार आकार घेत आहे. त्याचे नाव आहे मानुषवाद. श्री वाणीच्या ऑक्टोबर 2017- जानेवारी 2018 च्या अंकांतील सांस्कृतिक बदल व नवे पुरुषभान: एका नव्या विमर्शाची सुरुवात’, तसेच शब्द रुचीच्या जून 2018 च्या अंकातील नवे पुरुषभान: नव्या जगासाठी नवा विचारह्या दोन लेखांतून ह्या संकल्पनेची सविस्तर मांडणी करण्यात आली आहे. त्याची येथे सूत्ररूपाने पुनर्मांडणी करतो.

मानुषवाद काय आहे? – ‘नवा पुरुषपुरुषसत्ता नाकारून पुरुषपणापासून माणूसपणापर्यंत प्रामाणिकपणे वाटचाल करू इच्छितो. त्याने त्याचे व अन्य पुरुषांचे अनुभव- त्यांचे विश्लेषण; तसेच, पुरुषसत्तेच्या विरचनेसाठी उभारण्यात आलेले स्त्रीवादासारखे विचारव्यूह ह्यांच्या मदतीने स्त्री, पुरुष आणि अन्य ह्यांच्या जगण्याचा व नातेसंबंधांचा अर्थ लावण्यासाठी विकसित केलेली विचारपद्धत म्हणजे मानुषवाद. असा पुरुष इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर नक्की होता. तो रूढ सामाजिक संकेत, परंपरा, बंधने नाकारून स्त्रीशी निरामय नाते निर्माण करण्यासाठी धडपडत होता. तो स्त्रीवर होणाऱ्या हिंसेचा-अत्याचारांचा प्रतिकार करत, त्याविषयी समाजाला जाब विचारणारा वीरपुरुष असेल. तो तिला ज्यांच्याबद्दल आपुलकी, जिव्हाळा वाटतो, ज्यांच्या संगतीत निःशंक, सुरक्षित वाटते असा तिचा सखा, मित्र असेल. तो प्रत्येक काळात असला तरी तो प्रत्येक काळात नवाहोता. त्याच्याविषयी काही सार्वकालिक निकष निश्चित ठरवता येतील उदाहरणार्थ;

1. पुरुषसत्तेने घालून दिलेले, स्त्री-पुरुष विषमतेला पुष्टी देणारे त्या त्या काळाचे रूढ सामाजिक संकेत, परंपरा, बंधने ह्यांचा विचार व कृती यांच्या पातळीवर विरोध करणे.

2. स्त्रीला भोगदासी किंवा मालमत्ता न समजता तिला मानव समजून तिच्याशी तसा व्यवहार करणे.

3. स्त्रीच्या अडचणींचा पुरुष म्हणून फायदा न उचलता आपुलकी, स्नेह किंवा प्रेम या भावनेने तिच्या पाठीशी उभे राहणे.

4. स्त्रीवर होणाऱ्या हिंसेचा विरोध करत अत्याचाऱ्यांना जाब विचारणे.

नवा पुरुषव तो उभारू पाहत आलेला मानुषवाद ह्या संकल्पना एकीकडे ह्या विषयावरील वैश्विक विमर्शाशी नाते सांगतात, तर दुसरीकडे त्या भारतातील स्त्रीमुक्ती चळवळ आणि गांधी-फुले-आंबेडकर व अन्य सामाजिक सुधारक यांच्या वैचारिक वारशाशी त्यांचे नाते जोडतात.

मानुषवाद व स्त्रीवाद:नवा पुरुषमांडू पाहत असलेला मानुषवाद हा स्त्रीवादाच्या विरोधी नसून त्याला पूरक आहे. दोघांचा वैचारिक आधार व गंतव्यस्थान एकच आहे. पण दोघांची अनुभूती व अनुभव वेगवेगळे असल्यामुळे दोघांचे मुक्तीचे मार्ग समांतर पण भिन्न आहेत. दोघांनाही पुरुष सत्तेने त्यांच्यासाठी बनवलेले ठाशीव साचे मोडून हिंसा, शोषण व सत्तास्पर्धा ह्यांवर आधारित सामाजिक-राजकीय रचना मोडून सहकार्य, आपुलकी, सामिलकी व सहभागिता ह्यांवर आधारित व्यवस्था निर्माण करणे अपेक्षित आहे.

मराठी साहित्यातील नवा पुरुष: ह्या नव्या पुरुषाचे जवळचे नाते महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाशी आहे. महाराष्ट्राचा लाडका देव विठोबा हा बलवान, वरदनायक (म्हणजेच कर्तबगार), रिपुदमनकारी पुरुषाच्या प्रतिमेत न बसणारा कुटुंबवत्सल, लेकुरवाळा असा आहे. खरे तर, मायाळू, प्रेमाने वश होणारी अशी ती विठुमाऊलीआहे; जणू स्त्री-गुणांनीपरिपूर्ण नव्या पुरुषाची दैवी आवृत्ती ! साने गुरुजी व एस एम जोशी ह्यांच्यासारखे मातृहृदयी पुरुष त्याच वैचारिक व सांस्कृतिक मुशीतून निर्माण झाले; तसेच, फुले-शाहू-आंबेडकर-कर्वे-आगरकर-विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्यासारखे कर्तेसुधारकही.

अनेक शतकांच्या ह्या संचिताचे प्रतिबिंब मराठी साहित्यात पडले आहे. पित्याने त्यांच्या जडणघडणीत कसा मोलाचा वाटा उचलला ह्याचे कृतज्ञतापूर्ण अनेक स्त्री- आत्मचरित्रांतून स्मरण येते. काळाच्या बऱ्याच पुढचे लिखाण करणाऱ्या गौरी देशपांडे यांच्या कादंबऱ्यांतून नव्या पुरुषाचे मनोज्ञ चित्रण पाहण्यास मिळते. त्यांच्या नायिकांचा जोडीदार हा संवेदनशील, स्त्रीचे मानसिक गुंते समजावून घेऊन तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा व एकूणच, स्त्री-पुरुष नात्याकडे खुलेपणाने पाहणारा पुरुष आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतील कुटुंबेही देश-धर्म इत्यादी बंधने न मानणारी आहेत. दिनानाथ मनोहर व मिलिंद बोकील ह्यांच्या कथा-कादंबऱ्यांतील बरेच पुरुष स्त्रीविषयक मालकी हक्काच्या भावनेतून मुक्त झालेले आणि नात्यातील खुला अवकाश जपणारे दिसतात. नारायण कुलकर्णी-कवठेकर हे कवी नुकत्याच बोलू लागलेल्या मुलीला लौकरच ब्रउच्चारता येईल अशी आस लावून आहेत, तर किरण येले हे बाईच्या भूमिकेत शिरून बाईच्या कवितारचण्याची हिंमत दाखवत आहेत. हेमंत गोविंद जोगळेकर हा कवी कित्येक वर्षे त्याच्या पर्यावरणातून आधुनिक मूल्ये वेचून ती आत्मसात करणाऱ्या, त्यासाठी स्वतःशी संघर्ष करणाऱ्या पुरुषाची कविता लिहित आहेत. संजय पवार हे त्यांच्या ललित आणि वैचारिक लेखनातून स्वतःच्या मनात खोल दडलेल्या पुरुषावरील शेंदूर खरवडून अंतर्मनाची झाडाझडती घेताना दिसतात. विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत मराठीत असे बरेच लिखाण झाले आहे, त्यातून पुरुषीपणापासून माणूसपणाकडे वाटचाल करणाऱ्या नव्या पुरुषाची पदचिन्हे सापडू शकतात. ह्या साहित्याच्या सामाजिक मूल्याचे अर्थनिर्णयन अद्याप झाले नाही. ते होण्यासाठी मानुषवाद मोलाची कामगिरी बजावू शकेल.

एकविसावे शतक व मानुषवाद: सामाजिक शास्त्रांनी व मराठी समीक्षेने ह्या महत्त्वाच्या समाजशास्त्रीय घडामोडीकडे व साहित्यात पडलेल्या त्याच्या प्रतिबिंबाकडे दुर्लक्ष केलेले आहे. परंतु नवा मानुषवाद ह्या संकल्पनेची व्याख्या, विस्तार व उपयोजन योग्य रीतीने केल्यास त्यामुळे गतकाळातील; तसेच, समकालीन घटिते व साहित्य ह्यांच्याकडे पाहण्याची मर्मदृष्टी प्राप्त होऊ शकते. भारतीय समाजात लैगिकतेला एकविसाव्या शतकात आलेले उधाण ह्या समाजशास्त्रीय-मानसशास्त्रीय घटिताकडे पाहण्यासाठी व त्याचा अर्थ लावण्यासाठी आवश्यक ती विवेकवादी न-नैतिकता ह्या संकल्पनेपासून मिळू शकेल. ह्याची मोजकी उदाहरणे पुढीलप्रमाणे :

एकविसाव्या शतकात लिहिते झालेले नव्या पिढीतील अनेक लेखक, उदाहरणार्थ; प्रतीक पुरी (वाफाळलेले दिवस), श्रीरंजन आवटे (सिंगल मिंगल) त्यांच्या पिढीच्या लैंगिक जीवनाविषयी, त्यातील चकवे, आभास व खाचखळगे ह्यांसह सर्व पैलूंबद्दल गांभीर्याने व प्रामाणिकपणाने लिहित आहेत. संजीव चांदोरकर हे अर्थतज्ज्ञ पोर्नोग्राफिक लिखाणाकडे न-नैतिक दृष्टीने पाहताना त्यामागील आंतरराष्ट्रीय भांडवल, सेक्स टुरिझम, मानवी वाहतूक अशा अनेक पदरांची उकल करून भांडवली व्यवस्थेचा सांस्कृतिक बुरखा फाडताना दिसतात. देवकुमार अहिरे व त्यांच्यासारखे नव्या दमाचे लेखक सामजिक-वैज्ञानिक जातिव्यवस्था व पुरुषसत्ता ह्यांच्या व्यामिश्र नात्यांचे अनेक पैलू वर्ग-जाती-स्त्रीदास्य यांच्या अंताच्या अंगाने उलगडून दाखवत आहेत. श्याम पाखरे हे इतिहास, लिंगभाव व लैंगिकता ह्यांचे आंतरिक नाते शोधतात, तर आनंद पवार, मिलिंद चव्हाण ह्यांच्यासारखे कार्यकर्ते त्यांचा शेकडो पुरुषांसोबत काम करण्याचा अनुभव पुरुषत्व व लिंगभाव ह्या संकल्पनांच्या स्पष्टतेसाठी वापरतात. नवा पुरुषही फार दूरची बाब नाही. त्याची पाळेमुळे नव्या कवींच्या अंतर्मनात खोलवर पसरली आहेत. तसा आश्वासक दिलासा अनेक कवींच्या कवितांमधून मिळतो. हेमंत जोगळेकर ह्या मागच्या पिढीच्या मानुषवादी कवींसोबत भगवान निळे, उत्पल व.ब., किरण येले असे वेगवेगळ्या वयाचे-जाणिवेचे कवीही नव्या पुरुषाची कविता नव्या दमाने लिहीत आहेत. काळासोबत अनेक संदर्भ बदलतात, तसेच जीवनही. परंतु, स्त्री-पुरुष व अन्य ह्यांनी परस्परांसोबत प्रेम, आदर व जिव्हाळा या भावनेने राहवे, शोषण व नियंत्रण ह्यांपासून मुक्त, निरामय जीवन जगावे ही आस कोणत्याही शतकात कायमच राहील. एकविसाव्या शतकाने सोबत आणलेले लैंगिकतेच्या उधाणाचे, नातेसंबंधांच्या बाजारीकरणाचे व क्षणभंगुरतेचे वादळ पचवून अखेरीस त्याच दिशेने त्यांची वाटचाल होत राहवी. दृष्टीआड असणारा नवा पुरुषसमाज आणि साहित्य ह्यांच्या दृष्टिक्षेपात यावा व तो इतका व्यापक व्हावा की त्याचे नवेपण सार्वजनिक होऊन जावे. ही आशा जागवणाऱ्या, आजच्या पिढीतील महत्त्वाचे कवी सुदाम राठोड ह्यांनी त्यांच्या पत्नीवर केलेल्या कवितेतील हा उतारा : मी तसा कफल्लक माणूस कवितेशिवाय काहीच साठवून ठेवलं नाही आणि आज तुला देण्यासारखा माझ्याकडे शब्दांशिवाय अलंकार नाही पण हा चंद्र तुझ्याकडे गहाण ठेव, तोपर्यंत मी भाकरीची तजवीज करतो कधी आईची आठवण आली तर आई समजून माझ्या कुशीत शीर कधी चुकलो, माकलो तर मुलगा समजून मला कुशीत घे आपण एकमेकांसाठी एकमेकांचं माहेर होऊ.

(छायाचित्र – इंटरनेटवरून साभार)

रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ 9833346534 ravindrarp@gmail.com
(वि.सा.संघद्वारा आयोजित ग.त्र्यं.माडखोलकर स्मृती व्याख्यानमालेत केलेल्या भाषणाचा संपादित अंश)
—————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here