ज्येष्ठ वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांची वनस्पती क्षेत्राच्या एनसायक्लोपिडिया अशी ओळख होती. त्यांनी आयुष्यभर निसर्गाशी एकरून होऊन राहण्याची जीवनशैली सांभाळली. त्यांनी पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी राहूनही शेवटपर्यंत घरात विजेचे कनेक्शन घेतले नव्हते. त्यांनी मनुष्य विजेशिवायही राहू शकतो, हे स्वतःच्या जगण्यातून लोकांना दाखवून दिले.
हेमा साने यांचा जन्म 13 मार्च 1940 रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम एससी, पीएच डी संपादन केली. त्यांनी भारतीयविद्या शास्त्रात एम ए, एम फिलपर्यंत शिक्षण घेतले. साने या पुण्याच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.
त्या पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात राहत होत्या. त्या सांगत, की वाड्यात माझ्याबरोबर चार मांजरे, एक मुंगुस आणि एका घुबडासह काही पक्षी राहतात. तेच माझे कुटुंब आहे. त्यांच्या घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणे नव्हती. त्यांनी नोकरीतील शेवटची दहा वर्षे लुना हे वाहन वापरले, त्यानंतर मात्र त्या इतरत्र पायीच जात असत. त्या वाड्यातील विहिरीच्याच पाण्याचा वापर करत होत्या. त्यांनी दूरध्वनी वापरला नाही. त्यांनी दिवसा सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली. त्या अलीकडील काही वर्षे सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरत होत्या. हेमा साने यांनी आपले हिरवे मित्र, पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (सहलेखिका – विनया घाटे), बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष, वा. द. वर्तक यांनी संपादित केलेल्या ‘शंभरेक संशोधन प्रबंधां’तील काही प्रबंध, सम्राट अशोकावरील ‘देवानंपिय पियदसी राञो अशोक’ अशी पुस्तके लिहिली. त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसाठी बायोलॉजी (सहलेखिका – वीणा अरबाट), इंडस्ट्रीयल बॉटनी (सहलेखिका- सविता रहांगदळे), प्लांट या विषयांवरील पुस्तकांचेही लेखन केले. त्यांना पर्यावरण, निसर्ग संवर्धन क्षेत्रातील संस्थांकडून पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांनी वनस्पती शास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यांना पीएच डी साठी मार्गदर्शन केले.
हेमा साने यांच्या आयुष्यावर आधारित ‘ग्लो वॉर्म इ जंगल’ हा माहितीपट रमणा दुम्पला याने तयार केला होता. रमणा हा राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफ टी आय आय) टीव्ही डिरेक्शन विभागाचा विद्यार्थी होता. तो माहितीपट फ्रान्समधील महोत्सवासाठी 2018 मध्ये निवडला होता. त्या माहितीपटातून साने यांची अनोखी जीवनशैली आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचली. त्यांनी त्यांच्या लेखनीने आणि शिकवण्याने अनेकांना निसर्ग पूजनीय व संवेदनशील जीवनशैलीचा विचार करण्यासाठी आयुष्यभर प्रवृत्त केले.
त्यांचे ‘थिंक महाराष्ट्र’ आणि ‘ग्रंथाली’ या दोन्ही संस्थांशी मैत्र होते. त्यातूनच आम्ही ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’करता त्यांचे दोन व्हिडियो तयार केले होते. त्यांची लिंक सोबत जोडली आहे.
– थिंक महाराष्ट्र