फलटणच्या भूमीतील अनेक सत्पुरूषांपैकी सद्गुरू हरिबुवा यांचे स्थान वेगळे आहे. ते फलटणमधील लोकांच्या उद्धारासाठी प्रकट झाले अशी लोकभावना आहे. लोक त्यांना ईश्वरी अवतारच मानतात. सदगुरू हरिबुवा महाराज माघ शुद्ध एकादशीला (शके 1820 – सन 1898) सायंकाळी साडेचार वाजता फलटण (मलठण) येथेच समाधीस्थ झाले.
हरिबुवा यांची मूळ समाधी जेथे बांधण्यात आली आहे तेथील समाधीचा आतील गाभारा अतिशांत व स्वच्छ आहे. महाराजांची समाधी त्या मधोमध आहे. त्यांच्या दोन पादुका त्यावर कोरलेल्या आहेत. समाधीच्या मागील बाजूच्या कोनाड्यात मुंबईच्या भक्तांनी दिलेली हरिबुवांची दोन फूट उंचीची पितळी मूर्ती आहे; ती गोविंदस्वामी उपळेकर महाराज यांच्या हस्ते बसवण्यात आली. मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामदास दाणी हे होते. प्रमुख भाषण शिवाजीराव भोसले यांनी केले.
गाभाऱ्यात एका कोपऱ्यात अखंड जळणारा नंदादीप आहे. गाभाऱ्याबाहेर ओट्यावर संगमरवरी फरशी राजाराम रावजी केंजळे यांनी 1936 साली बसवली तर ओट्याला लागून असलेल्या पायरीचे बांधकाम दगडोबा आत्माराम गाडे यांनी व मंदिराच्या शिखराचे संपूर्ण बांधकाम दत्तात्रय मनोहर बर्वे यांनी 1939 साली केले. समाधीसमोर जो प्रशस्त मंडप आहे तो भक्तांच्या देणग्यांतून बांधण्यात आला आहे. त्यात मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचा सहभाग फार मोठा होता.
सदगुरूंच्या समाधी मंदिराचा दरवाजा रोज पहाटे साडेपाच वाजता उघडला जातो. सकाळी सात वाजता व सायंकाळी सात वाजता समाधीची सशास्त्र पूजा, नैवेद्य आदी कार्यक्रम होतात. मंदिर दुपारी बारा ते तीन बंद असते. नंतर ते रात्री नऊपर्यंत उघडे असते. मंदिर रात्री नऊनंतर बंद ठेवण्यात येते. समाधीसमोरील मंडपात अवधूत भजनी मंडळ, महिला मंडळ (केसकरबाई), केशवस्मृती भजनी मंडळ, अद्वैत भजनी मंडळ व शारदा भजनी मंडळ यांची भजने वरचेवर होत असतात. श्रावण महिन्यात हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचने; तसेच, श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी चोवीस तास अखंड हरिनाम चालू असते.
महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा माघ शुद्ध वसंत पंचमी ते माघ शुद्ध द्वादशीपर्यंत उत्साहात पार पडत असतो. लोकांना द्वादशीला महाप्रसाद वाटण्यात येतो. त्या कार्यक्रमाव्यतिरिक्त मंदिरात तुकाराम महाराजांची बीज साजरी केली जाते. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जाणारी केन्दूर (ओतूर, जिल्हा पुणे) येथील श्री कान्होजीबाबा फाटक महाराज यांची पालखी आणि ह. भ. प. दादामहाराजांची दिंडी हरिबुवांच्या मंदिरात मुक्कामास असते; तर संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री चैतन्यबाबा महाराज यांची पालखी पंढरपुरहून परत जाताना फलटण येथे हरिबुवांच्या मंदिरात उतरत असते.
समाधी मंदिराच्या आजूबाजूला मोकळी जागा भरपूर आहे. पूर्व बाजूला भजनी मंडळासाठी खोली आहे. पाकगृह, भांडीकुंडी मिळू शकतात. मंदिराच्या आवाराबाहेर बंदिस्त कंपाऊंड आहे. आवारात चौफेर पंचवीस-तीस लहानमोठी झाडे आहेत. तेथे एक छोटी बाग व पाण्याचा आड आहे. ट्रस्टींचे स्वतंत्र कार्यालयही आहे. महाराजांचे भक्त गोपालदास यांची समाधी पूर्वेला असून त्या समाधीचे बांधकाम दौलतराव हरिबा पवार यांनी करून घेतले आहे. हरिबुवांच्या समाधीची पूजाअर्चा व इतर खर्च हा भक्तांच्या देणग्यांतून भागवला जातो. कांबळेश्वर व गणेशशेरी येथे थोडीशी जमीन आहे. पण त्यातून देवस्थानाला उत्पन्न मिळत नाही.
देवस्थानाजवळ अद्यावत भक्तनिवास बांधला जात आहे. गोविंदकाका उपळेकर यांनी श्रीहरिबाबांचे ‘विभूती’ या नावाने चरित्र लिहिलेले आहे.
श्री हरिबुवा समाधी देवस्थान
महानपुरा पेठ, मलठण फलटण,
जिल्हा सातारा, 415523.
– रोहन उपळेकर 8888904481 rohan.upalekar@gmail.com
———————————————————————————————-