हमीद सय्यद हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील भातकुडगावचे. छोट्या गावातून आलेला हा मुसलमान मुलगा वयाची चाळिशी ओलांडित असताना राष्ट्रीय भारूडकार होऊन गेला आहे. आकाशवाणी कलावंत तर तो आहेच. हमीद लहानपणापासून चुणचुणीत होते. त्यांना कलेची आवड होती. त्यांची आकलनशक्ती चांगली होती. त्यांना शालेय जीवनापासून चाली लावून कविता म्हणणे आवडे. त्यात देशभक्तीपर गीते, भारूड, भजन-कीर्तन असे सारे असे. त्यांच्या अंगातील कलेला साजेसे देखणे रूप आणि गोड गळा त्यांना लाभला आहे. त्यांना अभिनयाची जाण होती. त्यात त्यांनी विनोदाचे अंगही जमवले. हमीद शाळेच्या सांस्कृतिक स्पर्धेत व गावातील गणेश उत्सवात सहभागी होत. एक बालकलाकार जो मुस्लिम समाजातील असूनही भारूड, भजन-कीर्तन सादर करतो म्हणून त्याचे कौतुक होई आणि त्याला बक्षीसेही मिळत.
हमीद यांचा जन्म 1981 सालचा. त्यांना दोन बहिणी, एक भाऊ. दुष्काळ (1972) पडला म्हणून हमीदचे आईवडील कामाच्या शोधार्थ भातकुडगाव येथे आले आणि तेथेच वसले. त्यांचे मूळ गाव हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे आहे. भातकुडगावी आल्यावर वडील अमीन सालगडी म्हणून काम करत, गावातील लोकांच्या घरी कावडीने पाणी टाकत. त्यांनी शेवगाव येथे धान्य मार्केटमध्ये हमालीदेखील केली आहे. तर आई हुसेनबी या मोलमजुरी करत.
हमीद यांना लहानपणीच वारकरी संप्रदायाचे आकर्षण निर्माण झाले. हमीद मित्रांसोबत नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे दत्त जयंती सोहळा बघण्यासाठी दरवर्षी जात. त्या ठिकाणी एके वर्षी शिवशाहीर कल्याण काळे यांचा पोवाड्याचा कार्यक्रम चालू होता. त्यात मित्रांच्या आग्रहाने हमीद यांनी पुढे स्टेजवर जाऊन भारूड म्हटले. तालसुरातील बाल आवाज, रंजक सादरीकरण आणि तेही एका मुस्लिम मुलाने सादर केलेले; ते ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले ! बक्षिसांचा पाऊस पडला. घरी आल्यावर आईवडिलांना कौतुक वाटले आणि भीतीही… कारण त्यांचा समाज काय म्हणेल !
शिवशाहीर कल्याण काळे हे त्यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमात हमीदने सादर केलेल्या भारूडाने फारच प्रभावित झाले होते. ते काही दिवसांनंतर हमीदला शोधत त्याच्या घरी आले आणि हमीद यांना त्यांच्या शाहिरी संचात घेऊन गेले. हमीद पोवाड्याला कोरस करत असताना मध्ये भारूड, अभंग, गौळण सादर करत. त्यामुळे समाजातील काही कट्टरपंथी लोकांनी हमीद यांच्या आईवडिलांना समजावले, नावेही ठेवली. परंतु वडिलांनी सांगितले, की कलेला जात, धर्म नसतो ! ती ईश्वरी देणगी आहे. वडील अमीन मराठमोळ्या समाजात वावरत. त्यामुळे त्यांनी आक्षेपांकडे दुर्लक्ष केले व हमीद यांना प्रोत्साहन दिले. स्वत: अमीन यांनासुद्धा गायनाची आवड होती. ते मुस्लिम धर्मात मिलाद सादर करण्याची प्रथा आहे, ती म्हणत असत.
हमीद सांगतात, की ते ग्रामीण भागात राहत असल्यामुळे लहानपणापासूनच गावगाड्यातील विविध लोककला त्यांनी जवळून पाहिल्या – वासुदेव, पिंगळा, जोशी, पोतराज, म्हसणजोगी, कडकलक्ष्मी, नंदीबैल, फकीर, बैरागी अशा नाना कला. हमीद यांना त्यांचे आकर्षण वाटे. ते गावभर त्या कलाकारांमागे फिरत. रात्री गावात मंदिरातील कीर्तने ऐकणे, हरिपाठातील पाऊली बघणे, दूरदर्शन व आकाशवाणीवर लोकसंगीत ऐकणे, कलाकारांच्या मुलाखती बघणे हेही त्यांना आवडे. सकाळ/पहाटेचा मंदिरातील काकडा ऐकून तसाच म्हणणे आणि शाहिरी कार्यक्रम करणे असे सारे करून त्यांनी शाळा पूर्ण केली.
हमीद यांनी एकदा आकाशवाणीवर चंदाताई तिवाडी यांचे भारूड ऐकले. त्यांना त्यातील पारंपरिक सादरीकरण, निरूपण, रंजकता भावली. हमीद यांनी चंदाताई तिवाडी यांना पत्र पाठवले व त्यांना त्यांचे गुरू करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही हमीद यांची इच्छा मान्य केली. हमीद आषाढी वारीला गावातील दिंडीतून पंढरपूरला गेले होते. तेथे त्या दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यांनी चंदाताईंचे भारूड सादरीकरण पाहिले, वारीत इतर काही फडांवर जाऊनही भारूड पाहिले. भारूड सादर करणाऱ्यांची मोहिनी हमीद यांच्यावर पडली आणि त्यांनी फक्त भारूडात लक्ष घालण्याचे ठरवले. तेव्हापासून त्यांची ‘पंढरपूर वारी’ चालू झाली आणि ती कधी चुकलेली नाही.
हमीद यांनी भारूडाचा त्यांचा एक संच बनवला आणि ते छोटेमोठे कार्यक्रम करू लागले. त्यामुळे त्यांचे आसपासच्या गावांत, जिल्ह्यांत नाव झाले. हमीद हे वारकरी सांप्रदायिक पारंपरिक भारुड सादर करून प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच हुकूमत गाजवू शकतात. त्यांची ती ताकद हेरून त्यांचा अनेकविध प्रचारकार्यात उपयोग मुख्यत: केंद्र व राज्य शासनाच्या आणि अन्य संस्थांकडून करून घेतला जातो. तेही ते समाजकार्य खुशीने करतात. ते विविध संतांची पारंपरिक भारुडे सादर करतातच; त्याचबरोबर स्वत:ही भारुडे रचतात. हमीद हे हरहुन्नरी कलाकार आहेत. ते म्हणतात, की ते देशातील विविध ‘किंतुपरंतु विषयां’पासून दूर राहतात आणि समाजोपयोगी कार्यात गुंतून जातात.

हमीद यांनी मराठी साहित्यात एम ए केले असल्यामुळे ते संतरचनांकडे जागरूकपणे पाहू शकले. त्या कारणे त्यांना संत एकनाथ यांनी त्यांच्या काळात समाजाला जागे करण्यासाठी ज्या रचना केल्या, त्या एवढा प्रदीर्घ काळ परिणामकारक असल्याचे जाणवले असे ते सांगतात. त्यांच्या भारूडाला नवसंजीवनी मिळाली ती 2007 साली. त्यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्राची लोकसंगीत कार्यक्रमाची जाहिरात ऐकून अर्ज केला, परीक्षा दिली आणि ते पहिल्याच प्रयत्नात पुणे केंद्राची लोकसंगीत स्वरचाचणी परीक्षा बी श्रेणी मिळून पास झाले. पुढे, लोकसंगीत कार्यक्रमात त्यांचे भारूडाचे अनेक कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित झाले, जाहीर कार्यक्रमही वाढले. मुंबई दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर ‘धिना-धीन-धा’ या कार्यक्रमातील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ‘सह्याद्री’वरच लोकोत्सव, लोकभजन, प्रभात कट्टा, माझी माय, मैत्र शब्दसुरांचे अशा अनेक कार्यक्रमांत हमीद यांनी भारूडाचे सादरीकरण केले. तसेच, झी टॉकीजच्या ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमातही त्यांचे भारूड सादर झाले.

त्यांच्या प्रबोधनपर भारुडाचे कार्यक्रम महाराष्ट्राबरोबर, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, केरळ या राज्यांत; तसेच, दिल्लीपर्यंत होत गेले आहेत. एकूण कार्यक्रमांची संख्या साडेतीन हजारांपेक्षा जास्त भरेल. गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, यात्रा, उत्सव, केंद्र व राज्य शासनांचे कला महोत्सव यांत ते कार्यक्रम सादर झाले. हमीद प्रबोधन कार्यातील भारुडाच्या सादरीकरणात विशेष खुलतात. लेक लाडकी… लाडकी लेक… मी संतांची… ! नाथांच्या घरची उलटीच खूण… ! पाण्याला लागली मोठी तहान…! हमीद जोरकस आवाजात भारुड गात गात लोकांशी संवाद साधतात. ‘तुला बुरगुंडा होईल गं’ अशा संतरचना त्यांच्यातील भक्तिभावनेने सामाजिक परिवर्तनाचा भाग बनल्या. हमीद यांच्या भारुडाने भूत, पिशाच्च, मांत्रिक, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांना छेदत आळशी वृत्तीवर व दांभिकपणावर लोकभाषेत हल्ला चढवला.
हमीद सय्यद यांच्या स्वरचित भारूडांमध्ये गायन, नृत्याभिनय व चटपटीत-उद्बोधक संवाद हे वैशिष्ट्य असते. ते सामाजिक समस्येकडे बोट दाखवत ती दूर करण्यासाठी समाजातील माणूस काय करू शकतो याकडे जनसमूहाचे मन वळवत राहतात. हमीद यांचा दावा आहे, की त्यांच्या प्रबोधनपर भारूडांतून काही तरुण व्यसनमुक्त झाले आहेत. शासनाने हमीद यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारही दिला आहे.
त्यांना यश मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागलाच – कधी मंदिरात कार्यक्रम करू देत नाहीत, तर कधी कट्टरपंथीयांचे ‘समजुती’चे फोन येतात ! उलट, एकनाथ महाराज यांच्या वंशजांनी त्यांना पैठणला बोलावून नाथवाड्यात त्यांचा सन्मान केला. मुस्लिम समाजाकडूनही त्यांच्या कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन केले जाते. त्यांनीही हमीद यांना पुरस्कार दिले आहेत. असे भलेबुरे-चांगलेवाईट अनुभव त्यांना आले आहेत.

हमीद यांनी भारूडकलेचे संवर्धन करावे, त्या अंतर्गत नवनवीन विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी ‘जय हिंद लोककला मंच’ या संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेकडे ‘भारुडाचे रंगी’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘जागर जन प्रबोधनाचा’, ‘जागर पर्यावरणाचा’, ‘जागर पाणलोट विकासाचा’, ‘जागर व्यसनमुक्तीचा’, ‘जागर ग्रामस्वच्छतेचा’, ‘आझादी का अमृत महोत्सव’ अशा विविध शीर्षकांचे कार्यक्रम तयार आहेत. हमीद सय्यद यांनी वामन केंद्रे आयोजित राष्ट्रीय भारूड महोत्सवात (दरवाडी, तालुका-जिल्हा बीड) प्रथम क्रमांक मिळवला आणि ते राष्ट्रीय भारूडकार म्हणून ज्ञात झाले. हमीद हे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रात्यक्षिक शिक्षण देतात. त्यांना सरकारच्या प्रसारभारतीच्या वतीने लोकसंगीत भारूडासाठी ‘ए’ श्रेणी 2024 मध्ये मिळाली. त्यांना सरकारी व वेगवेगळ्या संस्थांचे मानाचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत – भारत सरकारचा जिल्हास्तरीय नेहरू युवा गौरव, महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभागाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा, विश्व शांती केंद्र -आळंदी, एमआयटी शिक्षण संस्था -पुणे यांचा ‘राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड अध्यात्म रत्न’ अशा अनेक पुरस्कारांचा समावेश आहे.
हमीद अमीन सय्यद 8055331617 hamidsayyed9@gmail.com
– राजेंद्र शिंदे 9137342941 info@thinkmaharashtra.com
—————————————————————————————-



