कोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे. त्या परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत. त्यांपैकी अभ्यंकर, केळकर, केतकर, रेमणे ही घराणी थेट विशाळगडावरून तेथे आली. ती घराणी पेशवाईमध्ये विशाळगडावर अधिकारपदावर होती. त्यांपैकी अभ्यंकर हे पागा सांभाळत होते, केतकर यांच्या घराण्यात सुभेदारी होती तर केळकर हे दिवाण होते. त्या घराण्यांचा उल्लेख पागे अभ्यंकर, सुभेदार केतकर, दिवाण केळकर असाच होतो. सरदेशपांडे यांचे घराणे हे विशाळगड परिसरात महसुली प्रमुख होते. त्यांच्या घराण्यात खोतकी होती. रेमणे घराणे हे विशाळगडावर आणि परिसरातील बारा गावांत ग्रामोपाध्येपण करत. त्या घराण्यांना गडाखाली कोंडगाव-साखरपा परिसरात जमिनी इनाम म्हणून मिळाल्या होत्या. देशात इंग्रजांनी सत्ताविस्तार केला आणि गडांवर राहणार्या घराण्यांचे अधिकार अस्ताला गेले. उदरनिर्वाहासाठी ती कुटुंबे गडउतार झाली आणि कोंडगाव साखरपा येथे येऊन स्थायिक झाली. त्यांना मिळालेल्या जमिनी ते कसू लागले. ते गडावरून घोड्यावरून आले म्हणून घराण्यातील गणेशमूर्ती घोड्यावरून आणण्याची प्रथा सुरू झाली. ती प्रथा त्या घराण्यांमध्ये सांभाळली जात आहे. त्यांच्याखेरीज जोगळेकर, नवाथे, रेमणे, पोंक्षे, पुरोहित यांच्या घराण्यांच्याही गणेशमूर्ती अश्वारूढ आहेत. त्यासाठी त्या घराण्यांमध्ये पूर्वी लाकडी घोडे तयार केले होते. ते घोडे मूर्तिकारांकडे पाठवले जात. मूर्तिकार थेट त्या घोड्यांवरच मूर्ती तयार करत. लाकडी घोडे बनवताना त्याच्या पाठीवर लोखंडी सळी घालण्यात आली. मूर्तिकार त्या सळीच्या आधाराने गणेश मूर्ती साकारतात. काही घराण्यांमधील ते जुने घोडे नष्ट होऊन गेले. लाकडी घोड्यावरून गणपती आणणे आणि विसर्जन करणे अवघड जात असल्यामुळे काही घरांत लाकडी अश्व असतानाही त्यांनी गणेशमूर्ती मातीतूनच अश्वासह काढण्यास सुरुवात केली.
सरदेशपांडे यांच्या घरी लाकडी घोडा अस्तित्वात असून त्यांची गणेशमूर्ती त्यावरून आणली जाते. भडकंबा नावाचे गाव साखरपाला लागून आहे. तेथे जामसंडेकर यांची गणेशमूर्ती शाळा आहे. त्या मूर्तिशाळेतच सरदेशपांडे यांची मूर्ती गेली सत्तर वर्षे बनते. सरदेशपांडे त्यांचा अश्व नागपंचमीला मूर्तिशाळेत नेऊन देतात. त्या काळी सरदेशपांडे यांच्या घरातील शिपायांना विसर्जनाचा मान दिला जात असे. सामान्यत: गणपतीची स्थापना ही घरात दर्शनी भागी होते. पण सरदेशपांडे यांचा अश्वारूढ गणेश घरातील मूळ देवघरात बसतो. त्या गणपतीला कृत्रिम सजावट केली जात नाही. त्यासाठी कायम स्वरूपी लाकडी मंडप आणि देव्हारा तयार करण्यात आला आहे. त्यातच मूर्तीची स्थापना होते.
कोंडगाव येथील जोगळेकर कुटुंबीयांचा लाकडी अश्व हा सुमारे शंभर वर्षांचा आहे. गावातील सुतारकाम करणारे विश्राम उर्फ बाबू पांचाळ यांनी तो अश्व तयार केला आहे. तो अश्व सुस्थितीत आहे. तोही अश्व नागपंचमीला मूर्तिकारांकडे नेऊन दिला जातो. अश्वारूढ गणेशाचे आगमन तृतीयेच्या दिवशी सायंकाळी होते. त्या घराण्यातील आरत्यांचे खास वैशिष्ट्य आहे. गणपतीच्या आरत्या ह्या उभ्याने केल्या जातात, पण जोगळेकर यांच्या गणपतीची आरती ही बैठकीवर बसून होते. त्यासाठी पाट वापरले जात असत, पण आता बैठका घालून, त्यावर बसून लोक आरत्या म्हणतात. विभक्त कुटुंब पद्धतीत जोगळेकर कुटुंबाची तीन घरे झाली आहेत. त्यांपैकी कांचन जोगळेकर यांच्या घरी लाकडी अश्व ठेवण्याची प्रथा आहे. तेच तो अश्व मूर्तिकाराकडे पोचवतात. त्यानंतर अश्वारूढ गणेशाचे आगमन त्यांच्या बाजूला असलेल्या मकरंद जोगळेकर यांच्या घरात होते. जोगळेकर कुटुंबाचे ते मूळ घर. गणेश विसर्जनानंतर लाकडी अश्व पुन्हा कांचन जोगळेकर यांच्या घरी नेऊन ठेवला जातो.
अभ्यंकर (पागे) यांच्या घराण्यातील लाकडी अश्व शंभर वर्षांपासूनचा जुना आहे. तोही नागपंचमीला मूर्तिकाराकडे दिला जातो.
साखरप्यात राहणारे रेमणे घराणे हेही मूळचे विशाळगडावरील. पेशवे काळात, त्या घराण्याकडे गड घेर्यातील पंधरा गावांचे पौरोहित्य होते. घराणे लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावात स्थायिक झाले आणि कालांतराने साखरप्यात आले. प्रभानवल्ली नजीकच्या शिपोशी या गावाच्या नकाशावर रेमण कोंड नावाचे ठिकाण दिसते. ते ठिकाण त्यांना इनाम मिळाले होते. रेमणे घराण्याचा गणेशही अश्वारूढ आहे. त्यांचा तो अश्व लाकडातून शंभरएक वर्षांपूर्वी तयार करण्यात आला. तो सुस्थितीत आहे, पण त्यावरून गणेश मूर्ती आणणे, विसर्जनासाठी नेणे कठीण होऊ लागल्यामुळे तो अश्व न वापरता गणपतीबरोबरच अश्वही मातीचाच करण्यात येतो. तो बदल गेल्या पाच-सहा वर्षांपासून करण्यात आला आहे.
नवाथे घराण्याची तीन घरे साखरप्यात आहेत, पण त्यांचा गणपती मात्र एकच आहे. तो मूळ घरात स्थापन केला जातो. त्या घराण्याचा गणेश मूळ बैठा होता. नंतर कधीतरी तो अश्वारूढ रूपात आणण्यास सुरुवात झाली. ती परंपरा गेली दीडशे वर्षे सुरू आहे. त्या घराण्याचे पूर्वज जयराम गोविंद नवाथे यांनी तेव्हा लाकडी अश्व करून घेतला. तो अश्व कोंडगाव येथील सुतार रत्नोबा पांचाळ यांनी करून दिला. पण नवाथे यांनीही त्या अश्वाऐवजी मातीचा अश्व असलेली गणेशमूर्ती आणण्यास सुरुवात गेल्या पाच-सहा वर्षांपासून केली आहे.
अभ्यंकर आणि पोंक्षे यांचे लाकडी अश्वावरील गणेश लक्ष्मण उर्फ काका पांचाळ यांच्या मूर्तिशाळेत काढले जातात. सरदेशपांडे, नवाथे, रेमणे यांचे अश्वारूढ गणेश हे भडकंबा गावातील जामसंडेकर गणेशमूर्ती शाळेत साकारले जातात. त्याच मूर्तिशाळेत पूर्वी त्यांच्या लाकडी अश्वावर मूर्ती काढली जाई. तेथेच मातीच्या अश्वासह गणेशमूर्ती काढली जाते. त्या मूर्तिशाळेचे मूर्तिकार संतोष उर्फ बाळू जामसंडेकर हे त्या मूर्ती काढतात. लाकडी तयार घोड्यावर गणेशमूर्ती काढणे खूप कठीण असल्याचे जामसंडेकर सांगतात. तशी मूर्ती काढताना मूर्तीचा तोल सांभाळणे हे सर्वात कठीण काम असते.
(लेखासाठी; तसेच, फोटोसंकलन यासाठी चैतन्य सरदेशपांडे यांचे सहाय्य लाभले)
– अमित पंडित 9527108522 ameet293@gmail.com
अमित पंडित हे शिक्षक आहेत. ते ‘दैनिक सकाळ‘मध्ये पत्रकारिताही करतात. त्यांची सात पुस्तके प्रसिद्ध आहेत. ते विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून लेखन करतात.
संबंधित लेख –
———————————————————————————————-——————————————-
गद्रे कुटुंबीय यांच्याकडील लाकडी घोडा |
—————————————————————————————————-