पेणचे गणपती आणि परदेशांतील कार्यशाळा (Ganapati, Indian idol – Popular in Western world)

4
76

योहानानस बेलटझ नावाच्या जर्मन तरूणाने गणपती युरोपात नेला व तेथून तो अमेरिका-ऑस्ट्रेलियापर्यंत पोचला आहे. योहानानस 2000 साली एक वर्ष पुण्यात राहून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हरिजन’ यावर पीएच डी करत होता. त्याने हायडलबर्ग युनिव्हर्सिटीतून पीएच डी केली व तो स्वित्झर्लंडमधील नामवंत अशा रिटबर्ग म्युझियममध्ये असिस्टंट क्युरेटर म्हणून कामाला लागला. पण त्याने पुण्यात असताना पाहिलेला गणेशोत्सव त्याच्या डोक्यात पक्का बसला होता. रिटबर्ग म्युझियम हे आशियाई, आफ्रिकी आर्ट आणि कल्चर ह्यांची प्रदर्शने मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. योहानानसने गणपतीचे भव्य प्रदर्शन आणि त्या अनुषंगाने सर्व महाराष्ट्रीयन कल्चर स्वित्झर्लंडमध्ये प्रदर्शनार्थ मांडण्याचे ठरवले. त्याने अभ्यास केला तेव्हा त्यात त्याला पूर्वापार मूर्ती करणाऱ्यांची माहिती व इतिहास मिळाला. त्यातच पेण हे गाव व त्यातील देवधर ही नावे त्याच्यासमोर आली. त्याने सरळ पेण गाठले. त्याने तेथील मूर्तिकलेचे व्हिडिओ शूटिंग केले. पुढे माझ्याशी संपर्क ठेवला आणि वाढवला. आम्ही दोघे एकमेकांस दीडदोन वर्षे सतत ईमेलवर पत्रे पाठवत होतो. दरम्यान तो एकदोन वेळा पेणला येऊनही गेला. त्याने खूप अभ्यास आणि त्याची पूर्ण तयारी करून 16 मे 2003 पासून स्वित्झर्लंडमधील झुरीच शहरातील नामांकित अशा रिटबर्ग म्युझियममध्ये गणपतीविषयी (त्यांच्या भाषेत इलिफंटनकॉफ) भव्य प्रदर्शन भरवले.

रसिक प्रेक्षक दालनात आल्यावर त्यांना पुस्तिका, पॅम्प्लेट यांतून महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची माहिती दिली जाई. नंतर त्यांना एका हॉलमध्ये योहानानसने भारत वास्तव्यात केलेली दहा मिनिटांची फिल्म दाखवली जाई. गणपतीची मूर्ती कारखान्यात मातीतून करण्यापासून ते मूर्ती विसर्जनापर्यंतची सर्व माहिती त्यात आहे. सार्वजनिक मंडळांच्या गणपती मूर्ती किती मोठ्या असतात, मंडप सजावट कशी असते, सांस्कृतिक कार्यक्रम दहा दिवस कसे चालतात, त्यात मानाचे गणपती म्हणजे काय? पुण्याची मिरवणूक, मुंबईतील मोठ्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन हे सर्व त्या फिल्ममध्ये दहा मिनिटांत बसवले आहे.

योहानानसने आणि रिटबर्ग म्युझियमने सर्व युरोपीयनांच्या खासगी कलेक्शनमधून गणेशाच्या अनेक भव्य व छोट्या मूर्ती मिळवून त्यांचेही प्रदर्शन एका दालनात मांडले होते. त्यात मोठे दगडी; तसेच ब्रॉंझचे, सोन्या-चांदी-पितळेचे; तसेच मातीचेही गणपती होते. प्रत्येक मूर्तीखाली ती कोणत्या ठिकाणची इंडोनेशियातील आहे किंवा दक्षिण भारतातील आहे? ती केव्हा केली गेली-कोणते साल? तिची लांबी-रुंदी इत्यादी तपशील लिहिलेला होता.

मी तेथे दोन मोठ्या टेबलांवर पेणहून गणपतीचे साचे नेऊन मांडले होते. तसेच, तेथील माती (लेम) आणि प्लास्टर (गीबज्) तयार होते. बऱ्याच जणांनी वेळ आधीच ठरवली होती; पण काही लोक उत्स्फूर्तपणे मातीत हात घालून साच्यातून गणपती काढण्यासाठी तासन् तास रांग लावून बसत. त्यांतील काही जण दुसऱ्या दिवशीपण येतो, अशी माझ्याकडून वेळ मागून घेत; स्वतः साच्यातून काढलेला गणपती नंतर त्यास हात, सोंड वगैरे जोडून साफ करत. तो एका बॉक्समध्ये ठेवून त्याच्या खाली स्वतःचे नाव घालत व उद्यापरवा रंगवायला येतो असे सांगून निघून जात. पुढे ते मूर्ती रंगवायला ठरल्या वेळी येतही असत. मी त्या सर्वांना त्यांचा गणपती पुरा करण्यासाठी मदत करी. मग ते परत परत येत. त्यामध्ये शाळाकॉलेजचे विद्यार्थी, त्यांचे पालक व कित्येक सर्व वयाची माणसे येत. काहींना ते काम म्हणजे हौस वाटे. काहींना ध्यान-धारणा वगैरे औत्सुक्य असे. मग त्या अनुषंगाने अनेक गप्पा होत तसेच प्रश्न आणि उत्तरेही! नुसते प्रेक्षकही प्रचंड येत.

म्युझियमने माझी काही लेक्चर्स ठेवली होती. मी पाऊण तासाच्या लेक्चरमध्ये प्रथम भारतीय आणि पाश्चिमात्य कलेविषयी बोले; मग गणेश मूर्तीच्या निर्मितीबाबत. कधी कधी, गणपतीची पूजा कशी करतात असे विचारल्यावर मी गणपतीची पूजाही करून दाखवत असे.

ते माझे प्रात्यक्षिक दोन आठवड्यांचे होते. त्याला लोकांनी उत्साहात प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे मी जरी जूनच्या पहिल्या आठवड्यात परत आलो, तरी म्युझियमने मला 31 ऑगस्ट 2003 ला परत बोलावले. मी सहपत्नी झुरीचला गेलो. त्या वेळीही तसेच वर्कशॉप झाले आणि एका गणपतीची प्रतिष्ठापना करून दुसऱ्या दिवशी आम्ही झुरीच शहरातून विसर्जनाची मिरवणूक काढली! त्यामध्ये झुरीचमधील सर्व मराठी माणसे आमंत्रित होती. शिवाय, पाच-सहाशे स्विस जर्मनही होते. मी झुरीचमध्ये शहराच्या मेयरची परवानगी घेऊन, बोटीने नदीच्या मध्यावर जाऊन गणपती विसर्जित केला. त्याचा मोठा फोटो तेथील महत्त्वाच्या वर्तमानपत्रांत छापून आला. पुढे तेच प्रदर्शन बर्लिनच्या इथ्नॉलॉजिकल म्युझियममध्ये नेण्याचे ठरले होते. त्या म्युझियमच्या क्युरेटर डॉ. लोबो शेवटच्या दिवशी मला झुरीचमध्ये भेटल्या व म्हणाल्या, हे सर्व प्रदर्शन आम्ही असेच्या असे जर्मनीत बर्लिनमध्ये हलवत आहोत. तेथे तर आमच्याकडे खूप मोठी जागा आहे. येथील तुमच्या कामाला आलेला प्रचंड प्रतिसाद पाहता आपण तेथेही असेच प्रात्यक्षिक (वर्कशॉप) घेतल्यास आम्हाला आवडेल.

त्यांनी मग मला बर्लिन येथे येण्याचे रीतसर आमंत्रण दिले. तेथेही माझ्या दोन आठवड्यांच्या मूर्तिकलेच्या वर्कशॉपला मोठा प्रतिसाद मिळाला. माझी लेक्चर्स, माझ्याशी त्यांचा झालेला संवाद तेथेही खूप आवडला. मी तेथील प्रदर्शनाच्या सुरूवातीला दोन आठवडे तेथे होतो. तसाच तेथील लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मला प्रदर्शनाच्या शेवटी खास लोकाग्रहास्तव पुन्हा दोन आठवडे (जानेवारी 2004) निमंत्रित करण्यात आले. खूप लोकांशी संबंध आला. नवीन ओळखी झाल्या. झुरीच आणि बर्लिन ह्या दोन प्रमुख शहरांतील सर्व म्युझियम्स, कलादालने मला पाहता आली. माझी कलेविषयीची दृष्टीच बदलली. मला कण्टेम्पररी आर्टची चांगली ओळख झाली.

बेन मुलेन बाल्ड ह्या डच क्युरेटरने ही माझी कार्यशाळा (वर्कशॉप) पाहिली. त्याने हिंदू धर्मावर एक प्रदर्शन हॉलंडमध्ये अॅमस्टरडॅम ह्या शहरात किट ट्रोपेने ह्या म्युझियममध्ये भरवले. त्याने त्यातील काही भाग माझ्यासाठी ठेवून मला तेथेही मूर्तिकलेच्या वर्कशॉपसाठी आमंत्रित केले. शिवाय, मी तेथे एक मोठी मूर्तीही बनवली. ती गोष्ट 2005 च्या डिसेंबरची. मग 2006 ला स्पेनच्या अलिकांटे ह्या शहरात, तसेच 2007 ला स्वित्झर्लंडच्या बासल ह्या शहरात कुंस्ट म्युझियममध्येही मूर्तींच्या कार्यशाळा झाल्या.

मी अमेरिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातही या निमित्ताने फिरलो. मेलबर्नमधील (ऑस्ट्रेलिया) प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ.प्रशांत जोशी ह्यांच्यामुळे ‘अखिल ऑस्ट्रेलिया मराठी मंडळा’तील कार्यक्रमात मला आमंत्रित केले गेले होते. मी तेथे एका तासाचे प्रेझेंटेशन दिले. तसेच, त्यांच्याबरोबरही गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली. स्वतःच्या हाताने स्वतःचा गणपती बनवू शकण्याची कल्पना सर्व ठिकाणी लोकांना खूपच आवडली. त्या सर्व कार्यशाळांची प्रसिद्धी वर्तमानपत्रांनी केली. त्यामुळे पेणच्या गणपतीचे नाव दूरवर पसरण्यास मदत झाली.

 ‘रिटबर्ग’ म्युझियम ही संस्था तर आता मला माझीच वाटते. त्यांनी परत मला 20132016 मध्ये बोलावून अनेक कार्यशाळा आयोजित केल्या. तसेच मी स्वित्झर्लंडमधील वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ‘कल्चरल अॅम्बेसिडरचे’ही काम केले. मी ‘रिटबर्ग म्युझियम’चा भारतातील आर्टिस्ट म्हणून रजिस्टरच झालो आहे!

(देवधर मंडळ सुवर्णमहोत्सवी संमेलन – सुवर्णभरारी स्मरणिका 2018 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

श्रीकांत देवधर +91-9423093202 02143-252078 shrikant_deodhar@yahoo.com

—————————————————————————————————-

——————————————————————————————————————————–

About Post Author

4 COMMENTS

  1. आदरणीय श्रीकांत देवधर साहेबांनी केलेल्या कार्चाय अभीमान वाटतो.भारतीय कला ,संस्कृती त्यांनी देश विदेशात नेली .भारत देशाची मान उंचावली.लेख वाचून खूप चांगली माहिती वाचावयास मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here