गाडगेबाबांविषयी प्रबोधनकार ठाकरे, गो.नी.दांडेकर, आचार्य अत्रे, विठ्ठल वाघ, मधुकर केचे, रा.तु.भगत. द.ता.भोसले आदी प्रतिभावंत लेखकांनी लिहून ठेवले आहे. पैकी प्रबोधनकार, दांडेकर, केचे या तिघांनी बाबांना जवळून पाहिले. दांडेकर तर बाबांच्यासोबत जवळपास चार वर्षे दिवस-रात्र होते. विठ्ठल वाघ यांनी भरपूर अभ्यास व चिंतन यांतून बाबांच्या मनोभूमिकेत जाण्याचा प्रयत्न केला. त्या सर्वांनी बाबांच्या जगावेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. गाडगेबाबांचा उल्लेख संत, समाजसुधारक, प्रबोधनकार, कर्मयोगी अशा अनेक प्रकारे केला जातो. मात्र तो माणूस अध्यात्माच्या नावाखाली पोपटपंची करणारा हभप नव्हता. त्यांचे कीर्तन माणसांच्या मन आणि मेंदू यांना प्रथा, परंपरा, कर्मकांड यांचे जे झापड लागले आहे, ते दूर करणारे होते. तो माणूस संत नव्हता तर माणसांच्या मनातील विकारांचे ऑपरेशन करणारा ‘सर्जन’ होता. त्यामुळेच एकेकाळच्या निरक्षर, देवभोळ्या, अंधश्रद्ध माणसाने धर्म आणि कर्म या विषयांत दिलेली शिकवण संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित करणारी ठरली.
बाबांनी मुंबई, पंढरपूर, नाशिक, देहू, पुणे, ऋणमोचन, नागरवाडी, उमरी अशा अनेक ठिकाणी भव्यदिव्य काम उभे करून ठेवले आहे. गाडगेबाबांच्या शब्दाखातर सारे काही सोडून समाजासाठी झिजणारी असंख्य माणसे होती. अच्युतराव देशमुख, नानासाहेब तिडके यांच्यासारखी माणसे त्यांचे डोळे दिपवणारे वैभव आणि त्यांना लाभलेली सत्ता यांच्याकडे पाठ फिरवून बाबांच्या कामात सहभागी झाली. उद्योजक आणि व्यापारी यांनीही बाबांसाठी त्यांच्या तिजोऱ्या खाली केल्या. अमरावतीचे गोकुळभाई दोशी, मूर्तिजापूरचे प्रिथमजी तिडके, लोटिया सेठ, मुंबईचे मफतलाल मेहता, नागपूरचे श्रीमंत धनवटे असे व्यापारी बाबांच्या कामासाठी लाखो रुपये देत असत. तत्कालीन राजकारणी, अधिकारी आणि सामान्य माणसेही त्या कफल्लक म्हाताऱ्याचा शब्द आदराने झेलत.
-अविनाश दुधे
(‘मीडिया वॉच’ विशेषांक, फेब्रुवारी 2018 वरून उद्धृत, संस्कारित)
————————————————————————————————————————