चौदावे साहित्य संमेलन (Fourteenth Marathi Literary Meet 1928)

 

ग्वाल्हेर येथे भरलेल्या चौदाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते लोकनायक माधव श्रीहरी ऊर्फ बापूजी अणे. त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारताचार्य चिंतामणराव वैद्य हे स्वत: पुणे येथे 1908 साली भरलेल्या सहाव्या साहित्यसंमेलनाचे अध्यक्ष होते. माधव श्रीहरी अणे यांनी विशेष कोठल्याही प्रकारचे लेखन केलेले नाही. त्यांची वाङ्मयीन छाप मराठीवर नाही. तरी ते ग्वाल्हेरच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, ते त्यांच्या बहुअंगी व्यक्तिमत्त्वाने आणि बहुढंगी कर्तृत्वाने.

माधव श्रीहरी अणे यांचा जन्म  29 ऑगस्ट 1880 रोजी वणी (जि. यवतमाळ) येथे झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण नागपूर येथील मॉरिस कॉलेजमध्ये झाले. त्यांना वैचारिक, सांस्कृतिक विषयांचे आकर्षण अधिक होते;तसेच, त्यांचा जास्त कल इंग्रजी व संस्कृत वाङ्मय यांकडे होता. त्यांचे शिक्षण बी ए, एलएल बी असे झाले होते. त्यांनी काही काळ शिक्षकाचे काम केले. नंतर वकिलीचा व्यवसाय यवतमाळ येथे सुरू केला. पण त्यांचा ओढा सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याचा होता; तसेच, त्यांना राजकारणाची ओढ विलक्षण होती. त्यांनी सत्याग्रहात भाग घेतला. विविध महत्त्वाची पदे भूषवली. ते अखेरीस जळगावला स्थायिक झाले. त्यांचे काही लेख, भाषणे, स्फुट लेखन प्रसिद्ध झाले आहे. ते अक्षरमाधवया नावाने दोन खंडांत समाविष्ट आहे. त्यांच्यावरील प्रेमामुळे महाराष्ट्रीय जनता त्यांना लोकनायकम्हणत असे.

अणे यांचे घराणे वेदविद्या व्यासंगात रममाण होते. माधवरावांचे वडील त्या विद्येत पारंगत होतेच, पण त्यांनी त्यांच्या माधवलाही लहानपणी संस्कृत विषयाची गोडी लावली. माधवराव लोकमान्य टिळक यांचे केवळ अनुयायी नव्हे, तर परमभक्त होते. त्यांनी संस्कृत भाषेत लोकमान्य टिळक यांचे श्रीतिलकयशोर्णव नावाचे चरित्र लिहिले. महाराष्ट्रातील लोक बापूजी अणे यांना लोकमान्य टिळक यांच्याइतकाच मान देत असत आणि म्हणून बापूजी अणे विदर्भाचे टिळकम्हणूनदेखील ओळखले जातात. त्यांनी गांधीजी यांच्याबरोबरही काम काही काळ केले. त्यांना जंगल सत्याग्रहात कारावास सोसावा लागला. ते काँग्रेसचे 1933 साली अध्यक्ष होते, पण त्यांनी 1942 च्या चले जावला विरोध केला. ते ब्रिटिश सरकारात व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. मात्र पुढे जेव्हा महात्माजी प्राणांतिक उपोषणाला बसले तेव्हा त्यांनी गांधीजींना पाठिंबा देण्यासाठी सरकारी पदाचा राजीनामा दिला ! ते श्रीलंकेचे हायकमिशनर 1943 साली झाले. ते भारत देश स्वतंत्र झाल्यावर बिहारचे राज्यपाल झाले.

ते अध्यक्षीय भाषणात म्हणाले, की भाषा उच्चारानुसार लिहिण्याच्या मोहास बळी पडल्यास महाराष्ट्रीयांच्या ग्रांथिक भाषेतील लेखनपद्धतीत प्रत्येक जिल्हानिहाय भेद दृष्टीस पडू लागतील. त्यामुळे मराठी भाषा बोलणाऱ्या जनतेस एकभावनेच्या सूत्राने एकत्रित करणाऱ्या सरस्वती देवीच्या मंदिरातही पंक्तिप्रपंचास प्रारंभ होईल व वाङ्मयाचा उद्देश निष्फळ होईल.

बापूजी अणे यांच्या मते, “शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास साधला जावा; तसेच, शिक्षण हे देवसेवा व देशसेवा यांची जाण निर्माण करण्यास पोषक असावे”. बापूजींनी शारीरिक, मानसिक, नैतिक शक्तींचा ऱ्हास करणाऱ्या शिक्षणपद्धतीचा विरोध केला. बापूजी त्यांच्या युवाशक्तीस आवाहनया लेखात म्हणतात, “ज्या शिक्षणाच्या योगाने देशसेवा व देवसेवा यांचा उद्भव विद्यार्थ्यांच्या मनात होईल असे शिक्षण विद्यार्थ्यास दिले पाहिजे. शिक्षणपद्धतीतून जर असे शिक्षण मिळत नसेल तर तो त्या शिक्षणपद्धतीतील दोष आहे. तो दोष दूर करण्याचे कर्तव्य लोकनेत्यांचे आहे.बापूजी विद्यार्थ्यांबाबत बोलताना म्हणतात, “विद्यार्थ्यांनी स्वदेशसेवा व स्वधर्मसेवा यांचे शिक्षण मिळेल अशा ठिकाणी शिक्षण घ्यावे. शिक्षण घेताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी करारीपणा बाणवावा; तसेच आज्ञाधारकता, विनयशीलता, अभ्यासू वृत्ती, चिकाटी, देशभक्ती, समाजसेवा या गुणांची जोपासना करावी.बापूजी यांच्या मते, विद्यार्थ्यांनी सत्याचे रक्षण व असत्याला शासन करण्याचे धैर्य अंगी बाळगावे. विद्यार्थ्यांनी जातीयता, प्रांतिक भेद व राष्ट्रविघातक विचार यांपासून दूर राहण्यास हवे.

अभ्यासक्रमाबाबत बोलताना बापूजी म्हणाले, ”विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा, राष्ट्रीयत्वाची भावना, आंतरराष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण करणारा अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांनी राबवावा, तरच भारतीय तरुण येणाऱ्या नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकतील.तळागाळातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा पोचावी या उदात्त हेतूने बापूजी अणे यांनी यवतमाळ येथे न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना 1928 साली केली. तेच हायस्कूल लोकनायक बापूजी अणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयम्हणून प्रसिद्ध आहे. बापूजी अणे यांनी यवतमाळ येथील दत्त चौक येथे असलेले स्वत:चे राहते घर शैक्षणिक कार्यासाठी उपलब्ध करून दिले. त्या ठिकाणी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय सुरू आहे. त्या दोन्ही वास्तू लोकनायक बापूजी अणे यांच्या शिक्षणविषयक तळमळीची साक्ष देत आहेत.

बापूजी अणे यांच्या जीवनावर लोकमान्य टिळक यांच्याप्रमाणेच महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वाचाही परिणाम झाला होता. बापूजींचा गांधीजींना वैचारिक विरोध असला तरी त्यांचा त्यांच्या नि:शस्त्र प्रतिकारया मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा होता. गांधीजींनी इंग्रजांच्या विरूद्ध कायदेभंग चळवळीअंतर्गत साबरमती येथे मिठाचा सत्याग्रह सुरू केला. परंतु तो सत्याग्रह समुद्र नसलेल्या विदर्भासारख्या प्रदेशात घेणे शक्य नव्हते, म्हणून बापूजी अणे यांनी जंगल संपदा लाभलेल्या विदर्भात जंगलचा कायदाभंग करण्याचे ठरवले. त्यांना अशी वैचारिक प्रगल्भता लाभली होती ! जंगलचा कायदा हा लोकांना आणि विशेषकरून शेतकऱ्यांना जाचक झाला होता. कायदेभंग सत्याग्रहाचे स्वरूप जंगलाच्या बंद भागातील गवत विनापरवाना कापून आणणेअसे होते. सत्याग्रहासाठी यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यामधील धुंदी गावानजीकचे जंगल निवडण्यात आले आणि तो सत्याग्रह 10 जुलै 1930 रोजी करण्यात आला. त्या सत्याग्रहामुळे बापूजींना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली. बापूजींनी तुरुंगात महाभारताचा अभ्यास केला.

बापूजींचा पुढाकार विदर्भ साहित्य संघाच्या स्थापनेतही होता. बापूजी उदारमतवादी होते. त्यांच्या सहवासात आलेला मनुष्य त्यांचाच होत असे. बापूजी त्यांच्या ध्येयनिष्ठा, कर्मनिष्ठा, गुरुनिष्ठा, तत्त्वनिष्ठा, निर्भयता, अभ्यासवृत्ती या स्वभाववैशिष्ट्यामुळे अजातशत्रू ठरले. बापूजींचा लोकसंग्रह मोठा होता. त्यांनी शिक्षक, वकील, वक्ता, साहित्यिक, संशोधक, कवी, धुरंदर राजकारणी, समाजसेवक अशा अनेक भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. लोकनायक बापूजी अणे यांचा भारत सरकारने 26 जानेवारी 1968 रोजी पद्मविभूषणपदवीने सन्मान केला. ते त्याच दिवशी मृत्यू पावले. त्यांच्या नावाने 29 ऑगस्ट 2011 रोजी डाक तिकिटही काढले.

वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र सुरेश लोटलीकर 99200 89488

——————————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. मा श्री अने यांच्या निमित्ताने विदर्भाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न अशेडे दिसते.अशी वृत्ती असणे मराठी भाषेचा अपमान करणारे आहे असे वाटते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here