भारतीय इतिहासात चार कर्तृत्ववान, शूर स्त्रिया होऊन गेल्या. पैकी तिघी मराठी होत्या. त्या म्हणजे शिवाजी महाराजांची सून- राजाराम यांची विधवा पत्नी ताराराणी, इंदूरच्या मल्हारराव होळकर यांची विधवा सून अहिल्याबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि कित्तूर संस्थानची विधवा राणी चन्नम्मा. त्या तिघी जणी विधवा होत्या. ताराराणी, अहिल्याबाई यांचा लढा स्वकीयांबरोबर होता. राणी चिन्नम्मा आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यामध्ये खूप साम्य आहे. त्या दोघी इंग्रजांविरूद्ध, कंपनी सरकारच्या अन्यायाविरूद्ध लढल्या. कंपनी सरकारने त्या दोघींच्या दत्तकाचा हक्क नाकारला होता. सरकारने चन्नम्माला पतिनिधनानंतर दत्तक घेण्यासच बंदी घातली आणि कित्तूरवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. दोघींचे शौर्य, धैर्य, युद्धाचे धोरण, त्यांनी आखणी करण्यामध्ये दाखवलेली बुद्धिमत्ता यांवर कवने, पोवाडे रचले गेलेले आहेत. दोघीजणी इतिहासात मिथकरूप झाल्या आहेत.
राणी लक्ष्मीबाई लढता लढता मृत्यू पावल्या, ते भाग्य चन्नम्माला लाभले नाही. इंग्रजांनी राणी चन्नम्माला ती युद्ध हरल्यानंतर किल्ल्यामध्ये कैदेत ठेवले. राणी चन्नम्मा पाच वर्षांनंतर अपमानाने खंगून मरण पावली. राणी लक्ष्मीबाई यांचा दत्तक मुलगा, छोटा दामोदर युद्धानंतर कितीतरी वर्षे रानोमाळ भटकत राहिला आणि नंतर, तो इंदूरचे होळकर यांच्या आश्रयास गेला. चन्नम्माच्या सावत्र मुलाची कोवळ्या वयाची विधवा इंग्रजांच्या कैदेत असताना, इंग्रजांनी तिला विषप्रयोग करून मारून टाकले. त्यांना भीती होती, की तिच्याभोवती लोक गोळा होऊन पुन्हा इग्रजांविरूद्ध लढण्यास तयार होतील ! चन्नम्मा 1824 मध्ये वयाच्या छत्तीसाव्या वर्षी इंग्रजांविरूद्ध लढली होती, तर लक्ष्मीबाई यांनी वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी, 1858 मध्ये इंग्रजांशी झुंज अडीच महिने दिली होती. चन्नम्मा निव्वळ स्वत:च्या हक्कांसाठी, राज्यासाठी लढली होती, तर लक्ष्मीबाई जरी स्वत:च्या हक्कांसाठी, राज्यासाठी लढली होती, तरी तिच्या लढ्याचा परीघ मोठा होता. तिला तिच्या दत्तक मुलाचा राज्यावरील अधिकार डावलण्याचा कंपनी सरकारचा निर्णय धक्कादायक वाटला होता, पण त्याविरूद्ध तिने लगोलग इंग्रजांविरूद्ध युद्ध पुकारले नाही. तिला आशा होती, की कंपनी सरकार, शेवटी पन्नास वर्षांच्या मैत्रीला, वेळोवेळी केलेल्या करारांना, दिलेल्या वचनांना जागून मुलाचा राज्यावरचा अधिकार मान्य करील. म्हणून राणी लक्ष्मीबार्इने कंपनी सरकारशी पत्रव्यवहार केला होता. तिला झाशी परत मिळवायचीच होती, फक्त तिचा मार्ग वेगळा होता. तिला इंग्रज हा किती मातब्बर शत्रू आहे याची कल्पना असणारच. इंग्रजांनी त्यांच्या आधुनिक बंदुका-तोफांच्या आणि कवायती सैन्याच्या जोरावर अनेक राजांना एकेकटे गाठून जिंकले होते. चन्नम्माने इंग्रजांविरूद्ध केलेले युद्ध राणी लक्ष्मीबाईच्या जन्माअगोदर झालेले असले तरी त्या युद्धाची पुरेपूर माहिती राणी लक्ष्मीबाईला नक्की असणार. राणी लक्ष्मीबाई चौकस होती, त्याचबरोबर त्यांना आज नाही तर उद्या राज्यकारभार पाहवा लागणार याची जाणीव होती. कारण पती-पत्नी यांच्या वयांमधील तीस वर्षांचे अंतर आणि राज्यकारभार प्रत्यक्षात केला नाही तरी राजघराण्यातील व्यक्तींना राजनीती शिकण्यासाठी इतिहासातील घटना, व्यक्ती यांची पूर्ण ओळख करून दिली जात असणार. तिच्या उदाहरणावरून इंग्रजांसारख्या बलाढ्य शत्रूशी एकट्यादुकट्याने लढणे म्हणजे पराभव अटळ आहे याची जाणीव राणी लक्ष्मीबाईसारख्या बुद्धिमान स्त्रीला नक्कीच असणार.
– प्रभाकर भिडे 9892563154 bhideprabhakar@gmail.com