Home व्यक्ती संमेलनाध्यक्षांची ओळख त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)

त्रेचाळिसावे साहित्य संमेलन (Forty-third Marathi Literary Meet 1961)

कुसुमावती देशपांडे यांची कथाकार व समीक्षक अशी मराठी साहित्यसृष्टीत ओळख आहे. त्यांचा इंग्रजी व मराठी वाङ्मयाचा व्यासंग विलक्षण होता. त्यांनी त्या काळी कुटुंबियांचा विरोध डावलून कवी अनिल यांच्याशी केलेला प्रेमविवाह चर्चेचा विषय बनला. त्या दोघांचा त्या काळातील पत्रव्यवहार ‘कुसुमानिल’ या पुस्तकात प्रसिद्ध झाला आहे…

त्रेचाळिसावे साहित्य संमेलन ग्वाल्हेर येथे 1961 साली पार पडले. प्रा.कुसुमावती देशपांडे यांनी त्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. कुसुमावती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळवणाऱ्या पहिल्या लेखिका होत्या. कुसुमावती या अनेक वर्षे महाविद्यालयात इंग्रजी भाषा शिकवत होत्या. त्यांचा इंग्रजी भाषेचा व्यासंग विलक्षण होता.

त्या पूर्वाश्रमीच्या कुसुम जयवंत. त्यांचा जन्म वऱ्हाड प्रांतातील अमरावती येथे सीताबाई व रामकृष्ण जयवंत या दाम्पत्याच्या पोटी 10 नोव्हेंबर 1904 रोजी झाला. त्यांचे वडील वकील होते. त्या पुण्याच्या हुजूरपागा या शाळेतून मॅट्रिक 1921 साली झाल्या. कुसुमावती फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना (1921-1922) डिबेटिंग सोसायटीचे कार्यक्रम इंग्रजीतून होत असत. ज्या काळात स्त्रिया शाळेची पायरीही चढत नसत, त्या काळात कुसुम ही सतरा वर्षांची मुलगी इंग्रजीतून बोलणार, ही एक विलक्षण थरारक घटना होती. कुसुम जयवंत यांनी वादविवादात बाजी मारली. त्यांची तेथेच ओळख प्रसिद्ध कवी अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे या बी ए तील विद्यार्थ्याशी झाली. त्या ओळखीचे पुढे प्रेमविवाहात रूपांतर झाले. कुसुमावती देशपांडे या ‘अत्यंत झळाळते व्यक्तिमत्त्व’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कुसुमावती बी ए ला इंग्रजी विषय घेऊन नागपूर विद्यापीठात पहिल्या आल्या. त्यांना मध्य प्रदेश आणि वऱ्हाड सरकार यांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्या इंग्रजी वाङ्मयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी लंडनला गेल्या. त्यांनी लंडनमधील वेस्टफील्ड कॉलेजमधून इंग्रजी वाङ्मयात बी ए ऑनर्स ही पदवी (1929) मिळवली. कुसुमावती लंडनहून परतल्यावर कवी अनिल यांच्याशी 1929 साली विवाहबद्ध झाल्या. त्यांची नागपूरच्या मॉरिस कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नेमणूक 1931 साली झाली, तेव्हा एका स्त्रीला प्राध्यापक म्हणून नेमावे की नाही या प्रश्नावर चर्चा-वादंग झाला होता.

कुसुमावती देशपांडे या मूळ समीक्षक; पण त्यांनी ‘मृगाचा पाऊस’ ही पहिली कथा लिहिली आणि मग त्या अनेक कथा एकामागोमाग एक लिहित गेल्या. त्यांचे तीन कथासंग्रह म्हणजे ‘दीपकळी’ (1935), ‘मोळी’ (1946) आणि ‘दीपदान’ (1941). त्यांच्या ललित निबंधसंग्रहातील निवडक लेखांचा संग्रह पुढे ‘दीपमाळ’ या नावाने प्रकाशित झाला. मुंबई मराठी साहित्य संघाने कै.वामन मल्हार जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची व्याख्यानमाला आयोजित केली होती. त्यात कुसुमावती यांनी त्या वेळी ‘मराठी कादंबरीचे पहिले शतक’ या विषयावर व्याख्याने दिली. ती व्याख्याने ‘मराठी कादंबरी : पहिले शतक’ या नावाने दोन खंडांत (1953) – (1954) प्रसिद्ध झाली. ते कुसुमावती यांचे महत्त्वाचे वाङ्मयीन कार्य आहे. त्यात त्यांनी शंभराच्या वर कादंबऱ्यांचा खोलवर जाऊन आढावा घेतला आहे. त्यांचा ‘पासंग’ हा (1954) समीक्षालेखांचा संग्रहही प्रसिद्ध आहे. त्यांनी रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील आठवणी’चे इंग्रजी भाषांतर केले.

कुसुमावती यांची आकाशवाणीत ‘प्रोड्यूसर’ म्हणून 1956 साली, तर ‘चीफ प्रोड्यूसर’ म्हणून केंद्रीय आकाशवाणी संचालनालयात दिल्ली येथे 1957 साली नेमणूक झाली.

“आजच्या परिस्थितीत मराठी भाषासाहित्य यांचा योग्य अभ्यास व प्रसार हेच महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या रक्षणाचे व विकासाचे एकमेव साधन आहे…” असे त्यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात म्हटले आहे.

त्यांनी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद, जबलपूर येथे आयोजित केलेल्या 14 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, मुंबई मराठी साहित्य संघाच्या गोरेगाव येथील संमेलनाचे अध्यक्षपद; तसेच, बडोदे आणि इंदूर येथील संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्या ‘साहित्य अकादमी’च्या सभासद होत्या.

हुशार प्राध्यापक, समीक्षक, वाङ्मयाच्या गाढ्या अभ्यासक आणि लघुकथा लेखक कुसुमावती देशपांडे ग्वाल्हेरच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या. पण दुर्दैवाचा भाग असा, की त्यानंतर दोनच आठवड्यांनी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू दिल्ली मुक्कामी 17 नोव्हेंबर 1961 रोजी झाला.

– वामन देशपांडे 9167686695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 9920089488

———————————————————————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version