श्री.के. क्षीरसागर म्हणजेच श्रीकेक्षी हे निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचे समीक्षक होते. ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने प्रकाशात आले. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली…
मिरज येथे 1959 साली झालेल्या एकेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते व्यासंगी समीक्षक, उर्दू काव्याचे गाढे अभ्यासक श्रीकृष्ण केशव उर्फ श्री.के. क्षीरसागर हे. ते ‘श्रीकेक्षी’ या नावाने ओळखले जात. ते टीका वाङ्मयाचा, रसिक समीक्षेचा बादशहा म्हणून साहित्यप्रेमींना परिचयाचे होते. क्षीरसागर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यामुळे मराठी समीक्षा-वाङ्मयाचाच जणू सत्कार झाला! जातिवंत समीक्षेमुळे ललित वाङ्मय जोमाने जोपासले जाते याची जाणीव साहित्य विश्वात दृढ झाली.
त्यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1901 रोजी झाला. त्यांना वाचनाचा नाद लहानपणापासून होता. त्यांचे बालपण ‘खंडोबाचा पाल’ या, सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात गेले. मोरोपंतांच्या हजारभर आर्या त्यांच्या त्या लहानग्या वयात त्यांना पाठ होत्या.
क्षीरसागर यांना विद्याव्यासंगाचे आणि वाङ्मयप्रेमाचे संस्कार घरीच मिळाले. त्यांना आजोबांकडून प्राचीन भारतीय वाङ्मय, वडिलांकडून इंग्रजी साहित्य आणि चुलत्यांकडून सौंदर्यवादी व आदर्शवादी दृष्टिकोन यांचा लाभ झाला. त्यांची पुण्यातील वाङ्मयीन जडणघडण गोपीनाथ तळवलकर व भय्यासाहेब उमराणी या मित्रांच्या सहवासात होत गेली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण पाल व सातारा येथे झाले. ते सातार्याच्या शासकीय शाळेतून 1918 साली मॅट्रिक झाले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण प्रथम धारवाड (कर्नाटक) येथे झाले. त्यांनी बी ए, एलएल बी पर्यंतचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून 1922 साली पूर्ण केले. ते पुण्याच्याच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करू लागले. ते त्याच सोसायटीच्या कॉलेजात मराठीचे प्राध्यापक 1945 साली झाले. त्यांनी शेवटपर्यंत अध्यापन केले.
त्यांनी लेखनास प्रारंभ 1925 सालापासून केला. त्यांनी शेजवलकर यांच्या ‘प्रगती’ साप्ताहिकात क्रमशः दीर्घ भावकथालेखन 1931 साली केले.
ते लेखन ‘राक्षसविवाह’ या कादंबरीरूपाने प्रसिद्ध झाले. त्यांचे ‘बायकांची सभा’ हे पहिले पुस्तक 1926 साली प्रकाशित झाले. त्यांनी कविता, कथा असे ललित लेखन प्रारंभी केले. ते 1936 साली प्रकाशात आले ते सावरकर आणि पटवर्धन यांच्या भाषाशुद्धीविषयक विचारांवर ‘सह्याद्री’ मासिकातून परखड टीका केल्याने. त्यांनी भाई डांगे यांच्या मार्क्सवादी भूमिकेवर व साने गुरुजी यांच्या उपदेशप्रधान वाङ्मयीन भूमिकेवरही टीका केली. त्यामुळे त्यांच्या झुंजार, निर्भय आणि नि:स्पृह वृत्तीचा परिचय वाङ्मयीन रसिकांना आला.
क्षीरसागर यांची ‘राक्षसविवाह’ ही कादंबरी गाजली. परंतु क्षीरसागर ललित साहित्याच्या प्रांतात रमले नाहीत, तर ते समीक्षेच्या, टीका वाङ्मयाच्या ‘क्षीरसागरा’त यथेच्छ आणि खळबळ करत पोहत राहिले! त्यांचे लिखाण ‘श्रीकेक्षी’ या नावाने प्रसिद्ध होई. त्यांनी ‘रविवारच्या लोकसत्ते’त सात वर्षे सतत प्रासंगिक लेख लिहिले. त्यांच्या लेखनातून वाङ्मयीन व्यासंग पाझरत राहायचा. ते सारे लेखन पुढे ‘वादे वादे’ आणि ‘वादसंवाद’ या त्यांच्या ग्रंथांत समाविष्ट झाले आहे. त्यांनी त्यांचे सारे लेखन समर्पणवृत्तीने केले. त्यांचा ‘टीकाविवेक’ हा ग्रंथ मराठी समीक्षा वाङ्मयातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
त्यांची ग्रंथसंपदा ‘वादे वादे’, ‘वादसंवाद’, ‘व्यक्ति आणि वाङ्मय’, ‘सुवर्णतुला’, ‘वाङ्मयीन मूल्ये’, ‘सागर मंथन’, ‘साहित्याच्या दरबारात’ हे स्फूट लेख संग्रह, ‘राक्षसविवाह’ ही कादंबरी, ‘टीकाविवेक’ आणि ‘रविंद्रनाथ टागोर’ हे टीकाग्रंथ; तसेच, ‘उमर खय्यामची फिर्याद’ सारखे ग्रंथ आणि ‘तसबीर आणि तकदीर’ हे आत्मचरित्र, ही होय.
त्यांनी अवघे आयुष्य मनन-चिंतनात घालवले. त्यांनी उच्च मूल्यांची पाठराखण सतत केली. कथा-कादंबऱ्या लिहिणाऱ्या लेखकांना जसा वाचकांचा प्रेम करणारा जथा मिळतो, तसाच तो क्षीरसागर यांनी त्यांच्या टीका वाङ्मयातून मिळवला होता हे महत्त्वाचे. त्यांनी संपूर्ण आयुष्य अखंडपणे अध्ययन-अध्यापन-लेखन आणि मराठी भाषेवर व मराठी भाषिकांवर प्रेम करण्यात घालवले. क्षीरसागर यांचे पाचशेहून जास्त लेख संग्रहित झालेले नाहीत.
त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात “…पुण्य लागेल या कल्पनेने नित्य वाचलेल्या किंवा ऐकलेल्या रामचरित्रापेक्षा आणि पांडवप्रतापापेक्षा स्वेच्छेने वाचले जाणारे आजचे केसरी, सकाळ, लोकसत्ता, साधना, नवयुग, मौज हेच मी अधिक यशस्वी लोकशिक्षण समजतो” असे म्हटले होते.
त्यांनी बडोद्याच्या चौदाव्या वाङ्मय परिषदेचे 1951 साली अध्यक्षपद आणि अंमळनेर येथे भरलेल्या पस्तिसाव्या साहित्य संमेलनाच्या टीकाविभागाचे अध्यक्षपद 1952 साली भूषवले होते.
त्यांचे देहावसान 29 एप्रिल1980 रोजी झाले.
– वामन देशपांडे 91676 86695, अर्कचित्र – सुरेश लोटलीकर 99200 89488
————————————————————————————————————————————–