वंचिता मुखी धान्याच्या राशी (Food for every soul)

3
404

मिळून साऱ्याजणी उभारती धान्याच्या राशी, वंचिता मुखी घास भरवती… हे ब्रीदवाक्य घेऊन ठाण्यातील काही मैत्रिणी एकत्र आल्या आणि घरचे स्वयंपाकघर सांभाळता सांभाळता महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांच्या अन्नपूर्णा बनल्या ! त्यांनी गरजू संस्थांच्या स्वयंपाकघरांची जबाबदारी उचलली. हे शक्य झाले ते ध्येयाने प्रेरित झालेल्या उज्ज्वला बागवाडे या एका गृहिणीने पाहिलेल्या स्वप्नातून… उज्ज्वलाने ‘वुई टुगेदर’ धान्य बँकेचा प्रवास ठाण्यातील आठ मैत्रिणींना बरोबर घेऊन सुरू केला आणि महाराष्ट्रातील सव्वाशे गृहिणी धान्यदानाचे काम तिच्याबरोबर गेली आठ वर्षे अविरतपणे करत आहेत.

शांतिवन’ या सामाजिक संस्थेबद्दल ‘अनुभव’ मासिकात आलेला लेख उज्ज्वलाच्या वाचनात आला. ती त्यांच्या कामाने प्रभावित होऊन थेट बीडमध्ये जाऊन पोचली. तिला महाराष्ट्राच्या नकाशात बीड कोठे आहे हेही ठाऊक नव्हते, आज उज्ज्वला ‘शांतिवन’च्या विश्वस्तपदावर आहे. दुसरी प्रेरित करणारी घटना म्हणजे, ती एका तरुण मुलीला अनेक दिवस तिच्या घराजवळ बसलेली पाहत होती. उज्ज्वलाने तिच्याशी बोलण्याचा, तिला काही खाण्यास देण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या लक्षात आले, की ती मुलगी मनोरुग्ण असावी. तिला कर्जतच्या ‘श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’बद्दल वाचलेले आठवले आणि तिने डॉक्टर भरत वाटवाणी यांना फोन केला. ‘श्रद्धा फाउंडेशन’ची गाडी येऊन, मुलीची चौकशी करून तिला घेऊन गेली. तिच्यावर मानसिक उपचार झाले आणि ती मुलगी सुखरूप तिच्या गावी पोचती झालेली आहे.

या दोन्ही अनुभवांनंतर, उज्ज्वलाचा त्या संस्थांच्या कामाशी जवळून संबंध आला, तेव्हा तिला जाणवले, की समाजातील वंचित घटकांचा सांभाळ करणाऱ्या सामाजिक संस्था तुटपुंज्या निधीतून त्यांच्या अगणित गरजा भागवत असतात. कपड्यांची, शिक्षणाची गरज कमीअधिक भागली तरी एक वेळ चालते, पण पोटाची गरज मात्र रोजच्या रोज भागवावी लागते. उज्ज्वलाच्या मनात समाजासाठी काहीतरी करावे असे घोळत होतेच, घरातील समाजकार्याची पार्श्वभूमीही होती. त्यामुळे तिला घराबाहेर न पडता, एक गृहिणी म्हणून हाती असलेल्या मोकळ्या वेळात असे कोणते काम करता येईल जे समाजाच्या उपयोगी पडेल आणि आजन्म करता येईल या प्रश्नाने झपाटले. एक गृहिणी काय करते? तर रोजच्या रोज तिच्या कुटुंबाच्या पोटाची व्यवस्था बघत असते. तेच काम ती आणखी दोन लोकांसाठी का नाही करू शकणार? ती तिच्या घरचे वाणसामान दर महिन्याला भरते, त्यात अजून एक मूठ ती बाहेरच्या कोणासाठी का नाही भरू शकणार?

सुरुवात अशी झाली. तिने एकटीने तो प्रयोग केला, मग तिने तिच्या आणखी चार मैत्रिणींना विचारले. त्याही दर महिन्याला किलोभर धान्य सहज बाजूला काढून ठेवू लागल्या. उज्ज्वलाच्या घरी हा विषय घेऊन मैत्रिणींबरोबर बैठकी सुरू झाल्या. सगळ्यांना धान्यदानाची कल्पना आवडत गेली आणि जन्म झाला ‘वुई टुगेदर’च्या ‘धान्य बँके’चा !

धान्य बँकेची मुहूर्तमेढ 2 डिसेंबर 2015 रोजी रोवली. त्यांनी शांतिवन, श्रद्धा फाउंडेशन, सेवाश्रम अशा एकेका संस्थेच्या स्वयंपाकघराची जबाबदारी अंशतः उचलणे सुरू केले. ‘धान्य बँक’ आता तीस संस्थांच्या पाठीशी उभी आहे. बँकेचे काम वाढत गेले तसे लक्षात आले, की नातेवाईक, शेजारपाजार, समाजातील अनेक लोक समाजासाठी काहीतरी करण्यास उत्सुक असतात, पण ते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत किंवा त्यांना योग्य पर्याय सापडत नाही, दिशा मिळत नाही. अशा, मदतीचा हात देण्याची इच्छा असलेल्यांना सहजी सामील करून घेता यावे यासाठी उज्ज्वलाने दानकर्त्यांची साखळी तयार करण्याचे ठरवले. ‘धान्य बँके’च्या प्रत्येक ‘व्हॉलंटिअर’ने नात्यातील, ओळखीतील, मित्रपरिवारातील किमान दहा जण जमवावे. ते दर महिन्याला एक किलो धान्य किंवा तेवढी रक्कम दान करतात. अशा प्रकारे, प्रत्येकीच्या कष्टातून, कल्पकतेतून आणि सातत्यातून धान्य बँकेची साखळी दर वर्षी वाढत गेली.

‘वुई टुगेदर फाउंडेशन – धान्य बँक संकल्पना’ या नावाने बँकेचे रीतसर रजिस्ट्रेशन 2019 मध्ये झाले. जमणाऱ्या धान्याचे आणि निधीचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी कमिटी तयार झाली. ‘धान्य बँके’चे काम करणाऱ्या मैत्रिणींना ‘अन्नपूर्णा’ अशी सार्थ ओळख दिली गेली. लाभार्थी संस्थांना नियमितपणे धान्य देता यावे यासाठी प्रत्येक संस्थेच्या गरजेनुसार निधी आणि धान्य या समीकरणाची आखणी, विभागणी करून वर्षातून सहा महिने धान्याची खरेदी करून संस्थांपर्यंत पोचवण्यास सुरुवात झाली. त्या बरोबर सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मान्यवर व्यक्ती जोडल्या गेल्या. ‘अन्नपूर्णा’ स्वतः संस्थांना भेटी देऊ लागल्या, त्यामुळे समाजातील विविध घटकांच्या गरजा लक्षात आल्या. गरजू संस्था संपर्क करू लागल्या आणि अशा रीतीने साखळी तयार होत गेली.

‘धान्य बँक’ ही धान्यदाते आणि वंचित घटक यांच्यामधील विश्वासाचा मजबूत दुवा बनली आहे. दरमहा एक किलो धान्याइतकी रक्कम (शंभर रुपये महिना म्हणजे बाराशे रुपये वार्षिक) तहहयात देण्यासाठी हजारो दाते वचनबद्ध आहेत. ‘धान्य बँक’ निधी उभारणीसाठी विविध मार्ग चोखाळत असते. धान्यदाते वर्षभरात येणारे सणवार, घरगुती समारंभ, षष्टयब्दीपूर्ती, सहस्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने होणाऱ्या धान्यतुला अशा विशेष प्रसंगी धान्यदान करतात, ते धान्य लाभार्थी संस्थांना बँकेतर्फे पोचवले जाते. को ऑपरेटीव्ह सोसायट्या, रोटरी क्लब यांसारख्या संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांचे सीएसआर फंड्स, ठिकठिकाणी भरणारी प्रदर्शने, शाळांचे धान्यदान उपक्रम अशा आणखी काही मार्गांनी ‘धान्य बँके’चे काम लोकांपर्यंत पोचत असते. त्यातून धान्यदाते जोडले जातात. त्याव्यतिरिक्त ‘धान्य बँक’ वेळोवेळी पूर, दुष्काळ, कोविड-19 सारख्या काळांत आपत्ती निवारणासाठी धान्यदान करत असते.

‘धान्य बँके’ची सुरुवात झाली ठाण्यात, बँकेचे जाळे मुंबई व उपनगरे, पुणे, चिपळूण, नाशिक अशा गावीपण पसरत आहे. उज्ज्वलाला, पर्यायाने, गृहिणींनी सुरू केलेल्या धान्य बँकेला काही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उज्ज्वलाचे स्वप्न विस्तारले आहे. प्रत्येक गावात, प्रत्येक राज्यात धान्य बँकेच्या शाखा उभ्या राहाव्यात आणि कोणाही गरजूला दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडू नये, हे उद्दिष्ट साकारण्यास ‘अन्नपूर्णा’ सज्ज आहेत.

धान्य बँकेचा संपर्क: फोन नंबर 9820713303 wetogetherthane@gmail.com

– मेघना भिडे 9819860675 meghanabhide@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here