महत्त्वाच्या काही बखरी (Few significant Marathi Bakhar)

0
4

मराठी साहित्यात मराठीच्या इतिहासाच्या दृष्टीने काही बखरींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांची वर्णनात्मक नोंद येथे केली आहे.

सभासद बखर : कृष्णाजी अनंत सभासद यांनी छत्रपती शिवाजीसंभाजी व राजाराम यांच्या काळात दरबारात विविध पदांवर काम केले होते. त्यांना शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचाही योग लाभला होता. सभासद यांनी, ते छत्रपती राजाराम यांच्यासोबत जिंजीला असताना, राजारामांच्या आज्ञेनुसार शिवाजीराजांच्या चरित्रावरील बखर इसवी सन 1697 च्या सुमारास लिहून काढली. त्या बखरीत शिवाजी महाराजांचे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचे सर्व पराक्रम वर्णन केलेले आहेत. बखर संक्षिप्त स्वरूपात असली तरी ती शिवकालीन बखर असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

श्री शिवछत्रपतींची 91 कलमी बखर आणि भोसले घराण्याची चरितावली : दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी ही बखर 1701 ते 1706 या काळात लिहिली. लेखकाने फार्सी तवारिखा वाचून बखर लिहिली’ अशी प्रेरणा नोंदवली आहे. ते या बखरीला आख्यान म्हणतात. त्यात नव्वद प्रकरणे आहेत. लेखकाने स्वप्रेरणेने पुण्यश्लोक राजाची कथा’ लिहिली आहे. अफझलखान वधप्रसंग, आग्ऱ्याहून सुटका इत्यादी प्रसंग त्रोटक आहेत. राज्याभिषेकाचे वर्णनही मोजक्या शब्दांत येते. तिला जुनी, सभासदपूर्व बखर म्हणून मोल आहे. त्या बखरीची नवी आवृत्ती (2018) वि.स. वाकसकर यांनी संपादित केली आहे व व्हीनस प्रकाशनने ती प्रसिद्ध केली आहे.

सप्तप्रकरणात्मक बखर : ही मल्हार रामराव चिटणीसविरचित शिवाजीराजांच्या चरित्रावर आधारित उत्तरकालीन बखर आहे. बखरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे लोभस आदर्श राजामहापुरुष म्हणून वर्णन केलेले आहे. शिवरायांच्या संगीत-नाट्य-कलाकुशल व्यक्तिमत्त्वाचा पराक्रमी-तेजस्वी राजा म्हणूनही परिचय होतो. बखरकाराने सुभाषितांचा वापर केला आहे. त्यांनी मानवी स्वभावाचे विविध नमुने सादर केले आहेत. बखरीत तत्कालीन लोकस्थितीचेही दर्शन आहे. 

भाऊसाहेबांची बखर : ही मराठी भाषेतील प्रसिद्ध बखर आहे. मराठी वाङ्मयेतिहासातील लालित्यपूर्णश्रेष्ठ वाङ्मयगुणांनी युक्त असणारीनावाजलेली अशी ही बखर आहे’ या बखरीच्या कर्त्याबद्दल मतभिन्नता आहे. अभ्यासक कृष्णाजी शामराव व चिंतोकृष्ण वळे अशी दोन नावे त्यासाठी मानतातपरंतु कृष्णाजी श्यामराव हेच बखरीचे लेखक असावेत. बखरीचा रचनाकाळ 1762-63 असावा. भाऊसाहेबांची बखर’ असे याचे व्यक्तिवाचक नामाभिधान असलेतरी बखर व्यक्तिकेंद्रित नाही. रघुनाथरावांनी जाटाच्या कुंभेरीवर 1753 साली स्वारी केली. तेथपासून 1761 साली पानिपतच्या दारुण पराभवानंतर नानासाहेब पेशवे यांचे शोकावेगाने निधन झाले व माधवराव पेशवेपदी आरूढ झालेइथपर्यंतचा इतिहास व उत्तर भारतातील मराठ्यांच्या राजकीय घडामोडींचे सूक्ष्म व साद्यंत वर्णन या बखरीत आहे. त्यांतील काही प्रसिद्ध वाक्यांपैकी एक नमुना – जैसे भडभुंजे लाह्या भाजतात की विद्युल्लतापात व्हावा तसा एक धडका जहाला. या विषयावरयाच नावाची मराठीत संपादित पुस्तके अनेक आहेत.

पानिपतची बखर : पानिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर म्हणजे पानिपतची बखर. लेखक – रघुनाथ यादव. श्रीमंत महाराज मातु:श्री गोपिकाबाई यांच्या आज्ञेवरून’ बखरीचे लेखन झाले असे तेथे नमूद आहे. लेखनकाळ 1770 च्या आसपासचा मानतात. बखरीचा नायक कल्पांतीचा आदित्य’ सदाशिवराव भाऊ. शिंदे-होळकरांच्या भांडणाला स्पष्ट उत्तर देणारा हा नायक, विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरून येणारा भाऊ तेथे दिसतो. लेखक भाऊसाहेबांची विविध रूपे चितारतो. त्यांचा युद्धवर्णनात हातखंडा आहे. तो रामायण वर्णनप्रसंगी महाभारताच्या उपमा वापरतो. लेखक निवेदनशैलीहुबेहूब भाषावर्णन यांत वाकबगार आहे. पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील शोककथा आहेत्या शोककथेचा शोकात्म प्रत्यय बखरीत मिळतो हेच तिचे यश आहे.

होळकरांची बखर (कैफियत) : होळकरांच्या घराण्याचा समग्र इतिहास साद्यंतपणे सांगणारी ही बखर. होळकर घराण्याने महान इतिहास घडवला. मल्हाररावअहिल्याबाई ही होळकर नावे इतिहासात अजरामर आहेत. त्यांचा इतिहास बखरकार शब्दबद्ध करतो.

महिकावतीची बखर : माहीम पालघर (केळवे-माहीम) या प्रांताची ही बखर आहे. संपादक वि.का. राजवाडे यांना ही बखर कल्याणच्या सदाशिव महादेव दिवेकर नामक व्यक्तीने वसईच्या हिरा हरी भंडारी यांच्याकडून मिळवून दिली होती. सध्या ती बखर बहुधा राजवाडे यांच्या धुळे येथील संस्थेत आहे. राजवाडे यांनी त्या बखरीचा अभ्यास करून एकूण एकोणपन्नास मुद्यांवर एकशेदहा पानी प्रस्तावना तयार केली. ती खूप महत्त्वाची आहे. माहीमच्या बखरीतील एकूण सहा प्रकरणांपैकी भगवान् दत्ताने लिहिलेली पद्य प्रकरणे (पहिले व चौथे) ही 1578 ते 1594 मधील असावीततर केशवाचार्याने लिहिलेला गद्य भाग (प्रकरणे 2  3) 1448 मधील आहेत. बखरीचे पाचवे प्रकरण 1538 मध्ये लिहिले गेले असावे (त्या लेखकाचे नाव अज्ञात आहे)तर सहाव्याचे लेखन 1478 मध्ये झाले. आबाजी नायक आणि रघुनाथपंत कावळे हे त्याचे लेखक.

फ्रान्स राष्ट्रीय वाचनालयातील शिवरायांची बखर : गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी या पुण्यातील दोन संशोधकांना नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स’ येथे इतिहास संशोधनासाठीची कागदपत्रे चाळत असताना शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली. ती बखर मोडी लिपीत असून बखरीचा कालखंड 1740 नंतरचा असल्याचे मत त्या दोन संशोधकांनी व्यक्त केले आहे. बखरीत शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द आणि संभाजी महाराज यांच्या प्रारंभिक जीवनाचा तपशील आलेला आहे. बखरीच्या शेवटी ही किताबत राजश्री राघो मुकुंद याची असे’ असा उल्लेख आहे. 

संकलन- सुभाष बोरसे 9403027752 subhashbborse@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here