बुद्धीसवे भावना ! (Emotional quotient is necessary part of logical thinking)

0
404

सद्भाव मनात असणे ही सहज प्रक्रिया आहे. तो शोधण्यासाठी काहीतरी अद्वितीय करण्याची किंवा त्याचा पाठलाग करण्याची आवश्यकता मुळीच नसते. अवतीभवती घडणाऱ्या छोट्या छोट्या प्रसंगांतूनदेखील व्यक्तीवर सद्भावनेचा सखोल परिणाम होत असतो. प्रवासात भेटणारी माणसे, प्राणी-पक्षी-वनस्पती यांना समजून घेण्यासाठी किंवा प्रसंग सहृदयतेने टिपण्यासाठी हवे संवेदनशील मन. त्या मनाला समानानुभूतीने विचार करण्याची क्षमता हवी, जागरूकता हवी आणि समजून घेण्याची कुवतही हवी. तसे संवेदनक्षम मन आणि घटना व व्यवहार यांच्याकडे बघण्याची सजगता असेल, तर कितीतरी गोष्टी शिकवल्या जातात असे सांगणारा स्वप्रचीतीने प्रकट झालेला नीलिमा खरे यांचा हा लेख.

– अपर्णा महाजन
———————————————————————————————-

बुद्धीसवे भावना !

भक्तीहीन भावहीन/ ज्ञानहीन वैराग्यहीन
शांतीहीन क्षमाहीन / सर्वहीन क्षुल्लकु

रामदास स्वामी यांनी हा विचार दासबोधात मांडला आहे. त्यांनी भावनेचे महात्म्य वर्णिले आहे. ते वर्णन वाचत असताना, भावहीन हा शब्द आणि त्यातील अपेक्षित भावनेचे महत्त्व लक्षात आले. अनुभवलेले काही भावविचार मनात कळत-नकळत जागे झाले. भावना कृतीतून जेव्हा पोचते तेव्हा तिची अनुभूती माणसाला होते. चांगुलपणा प्रकट होणारे अनुभव आठवले तरी छान वाटते. कोणा एकामुळे मला झालेला आनंद जर मलाही माझ्या वागण्यामुळे इतर कोणाला देता आला तर किती उत्तम ! असे सद्भावाची प्रचीती देणारे अनुभव मी लिहिणार आहे.

कोविडकाळात परदेश प्रवासावर असलेले निर्बंध उठले आणि आम्हाला अमेरिकेत स्थायिक असलेल्या मुलाला व सुनेला भेटण्याचे वेध लागले. मनाने व प्रवासाच्या तयारीने वेग धरला. प्रवासाची तारीख ठरली 21 जुलै 2022. मी त्या पूर्वीही अमेरिकेला जाऊन आले होते. मी अमेरिका 2008 साली पाहिली होती. त्या वेळची तारीख आहे विसरता न येण्यासारखी, 26 नोव्हेंबर 2008 –  मुंबईवरील दहशतवाद्यांचा हल्ला ! त्या दिवशी, आम्ही मुंबई विमानतळावर होतो. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याचा अनुभव मनात जमेस होता. आता, जवळजवळ एका तपानंतर पुन्हा अमेरिकावारी होणार होती. फरक होता वाढलेले वय व सर्व क्षेत्रांत घडलेला तांत्रिक बदल. या दोन्ही गोष्टींशी मिळतेजुळते घेऊन प्रवास करायचा होता.

अमेरिका हा अतिप्रगत देश. तेथे सुबत्ता खूप व त्या मानाने माणसे कमी. साहजिक यंत्रांचा/तंत्रज्ञानाचा वापर भरपूर असतो. तंत्रज्ञानाशी छत्तीसचा आकडा असलेली मी, पण काही आवश्यक गोष्टी जरूर शिकून घेतल्या होत्या. तिकडे जाताना मनातून मी जरा धास्तावलेली होते. भारतातून सहीसलामत परदेशी भूमीवर पाऊल ठेवले खरे, पण नंतर तेथे देशांतर्गत प्रवास करण्याचे दिव्य अजून पार पडायचे होते. काउंटरला सामान देताना काही रक्कम भरणे आवश्यक असते याची कल्पना होती. त्यामुळे तेथील चलन रोख स्वरूपात नेले होते. ते देऊ केले तर पलीकडून उत्तर आले, ‘फक्त क्रेडिट कार्ड वापरून पैसे भरता येतील. रोख रक्कम स्वीकारली जात नाही.’ मी म्हटले, ‘माझा मुलगा ऑनलाईन भरू शकेल, आत्ता’ ! तर तेही नाही. कार्डने भरणे हा एकच पर्याय होता. माझ्याकडे ते नव्हते. पुढील विमान पकडण्याचा ताण मनात होता. ‘बापरे ! आता काऽऽय?’ हा मोठा प्रश्न ‘आऽ’ वासून माझ्या तोंडावर उमटलेला तेथील एका स्थानिक मुलीने जणू वाचला ! ‘एनी हेल्प?’ असे शब्द कानावर आले आणि मी भानावर आले ! माझी अडचण कळताच त्या मुलीने स्वतःचे क्रेडिट कार्ड वापरून पैसे भरले. अर्थात मी तिला माझ्या जवळील तेवढी रोख रक्कम दिली. त्या मुलीच्या दृष्टीने मी परदेशी बाई. ना ओळख ना पाळख. परंतु तिने मला मदत ज्या सहजतेने, तत्परतेने व मुख्य म्हणजे स्वतःहून केली ती मला त्या वेळी लाख मोलाची वाटली. भावनांना भाषेचे, देशाचे, जातिधर्माचे बंधन नाहीच मुळी. यंत्रांच्या व तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात ही संवेदनशीलता आवडली. मदतीच्या हातामागील तिच्या मनातील भावना माझ्या मनाला स्पर्शून गेली !

समाजात वावरताना, प्रवास करताना अनेक प्रकारची, स्वभावाची, राहणीमानाची माणसे भेटत असतात. नेहमीच्या प्रसंगांत ती कोणाची काही वेगळी कृती अंतःकरणाला स्पर्शून जाते. मनात राहते. मी काही मित्रांसमवेत पक्षी निरीक्षणासाठी श्रीलंका सहलीला 2019 मध्ये गेले होते. बारा दिवसांची सहल होती. आम्ही एकमेकांशी अनेक विषयांवर बोलत होतो. त्या सहलीत निर्मल पंडित आमच्या समवेत होत्या. त्यांच्याकडून अमेरिकेत रुजलेली ‘डुला’ नामक एक संकल्पना समजली. निर्मल पंडित जाऊन आलेल्या असल्यामुळे त्यांना त्याबद्दल माहीत होते. एखादी बाई गरोदर असते तेव्हा तिच्या भावावस्थेचे व शारीरिक अवस्थेचे महत्त्व निर्णायक ठरते. त्या संपूर्ण कालावधीत तिला जर त्या दोन्ही बाबतींत योग्य पद्धतीने आधार देता आला तर तो महत्त्वाचा असतो. ‘डुला’ या सेवेअंतर्गत वैद्यकीय प्रशिक्षण नसलेली स्त्री गरोदर स्त्रीला आधार प्रसूतिपूर्व व प्रसूतिप्रश्चात शारीरिक व मानसिक अवस्थांमध्ये देते, मदत करते. परदेशात एकत्र कुटुंबपद्धत अस्तित्वात नसल्यामुळे या संकल्पनेला फार मोठे महत्त्व आहे. ही संकल्पना भारतातही लागू करता येईल, या सेवेची गरज आहे असे वाटल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉ. धनंजय केळकर यांच्याशी विचारविनिमय करून व त्यांच्या प्रोत्साहनाने ही सेवा तेथे सुरू करण्यात आली आहे. डॉ. अनुराधा वाकणकर आणि निर्मल पंडित यांच्या सहकार्याने ती सेवा कार्यान्वित आहे. पंडित या स्वतः देश-परदेशात वेगवेगळ्या मानाच्या पदांवर कार्यरत होत्या. त्या त्यांचे ज्ञान व अनुभव वापरून अर्थप्राप्तीच्या मार्गावर निवृत्तीनंतरही प्रवास चालू ठेवू शकल्या असत्या. पण त्या त्यांच्या वेळेचा सदुपयोग करता यावा या हेतूने या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. ती सेवा विनामोबदला तत्त्वावर असते. पैशाने मदत करणारे अनेक असतात. परंतु स्वत:चा वेळ दुसऱ्यांकरता खर्च करणे व त्यातून त्या व्यक्तीचे हित साधण्याचा प्रयत्न करणे व तेही निरपेक्षपणे, ही भावना सुखावणारी वाटली. अशी माणसे सहवासात आल्यावर उच्च प्रतीचे जीवनमूल्य त्यांच्या आचरणातून शिकवून जातात.

मला आणि माझे पती विकास यांना सहलीला जाणे, विशेषतः पक्षी निरीक्षण आणि त्यांचे फोटो काढणे असा छंद आहे. जंगल, प्राणी, पक्षी यांचे कुतूहल मला आहे. आम्ही असेच एकदा, सहलीला म्हणून पक्षी निरीक्षणासाठी ग्रेटर रण ऑफ कच्छ (GRK) या ठिकाणी गेलो. सहल पाच दिवसांची होती. पण कॅमेरे, दुर्बीण, कपडे, खाऊ अशा इतर आवश्यक गोष्टींमुळे सामान जरा जास्त झाले होते. ते सारे एका बॅगेत ठेवता यावे म्हणून बॅग थोडी मोठी घेतली होती. स्टेशनवर उतरलो तर लक्षात आले की जवळ जवळ पंधरा/वीस पायऱ्यांचा एक जिना चढावा लागणार होता. ती अवजड बॅग घेऊन चढणे मला कठीण वाटत होते. प्रयत्न करावा म्हणून मी जेमतेम दोन-तीन पायऱ्या चढले, पण माझ्याच्याने ते शक्य होत नव्हते. मदत घेण्यासाठी कोणी दिसत नव्हते. तेवढ्यात, एक अनोळखी तरुण चटकन पुढे आला. सहजपणे म्हणाला, ‘आंटी जी, मुझे आपका बॅग दे दो ! मैं उठाता हूं. आप मेरे पीछे पीछे आ जाइये.’ बॅग उचलून तो पायऱ्या चढूही लागला. सहज देऊ केलेली त्याची मदत माझ्यासाठी अनपेक्षित पण सुखद अनुभव देणारी होती. त्याने माझ्या मनात त्याच्याबद्दल स्नेह आणि आपुलकी निर्माण केली.

अशीच एकदा वैश्विक वारसा म्हणून मान्यताप्राप्त अशा पश्चिम घाटात जंगल भटकंती करत असताना झाडे, पशुपक्षी यांचे निरीक्षण चालू होते. झाडाच्या एका फांदीवर एक भृंगराज (Racket tailed drongo) मोठ्या ऐटीत बसलेला पाहिला. फोटो काढण्याचा मोह झाला. फोटो काढता काढता झाडाच्या तळाशी चालू असलेली सातभाईंची लगबगही नजरेस पडली. त्यांच्या हालचालींमुळे लक्षात आले, की गवतातील, झुडुपांतील उडणारे कीटक भृंगराज लीलया मटकावत आहे. अशा ‘जिवंत’ क्षणाचे छायाचित्र काढले व मन सुखावले. त्याच वेळी लक्षात आले, की भृंगराजाने विशिष्ट आवाज केला की सारे सातभाई घाईघाईने झुडुपात लपायचे. नीट लक्ष देऊन बघितले तर एक शिकारी पक्षी आकाशात घिरट्या घालत होता. तो भृंगराज विशिष्ट आवाज करून सातभाईंना धोक्याची सूचना देत होता. भृंगराज सातभाईंमुळे त्याला मिळणाऱ्या किड्यांच्या बदल्यात त्यांना धोक्याची सूचना आधीच देऊन परतफेड करत होता, जणू ! दोन जातींच्या त्या पक्ष्यांमधील एकमेकांना मदत करण्याच्या भावनेची अबोल बोली मला आश्चर्यचकित करून गेली !

माणसांतील, पशुपक्ष्यांतील एकूणच निसर्गातील सद्भावनेचे नाते अनेकदा अनुभवास आले. सजग, सुजाण, जागरूक नागरिक बनण्याकरता हा वसा व वारसा पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने एक पाऊल उचलावे यासाठी मी माझा मुलगा, सुह्रद याला त्याच्या उत्पन्नातील काही ठरावीक रक्कम दरवर्षी दिव्यांग मुलांच्या शाळेला देण्याचे आवाहन केले. ते तो आजतागायत करत आहे. प्रत्येकाने अल्पसा फूल न फुलाच्या पाकळीचा, खारीचा वाटा उचलत राहणे हे समाजाच्या भावनिक बुद्ध्यांकाकरता आवश्यक आहे.

कल्पनांचा, जगण्यातील तत्त्वांचा आदर ठेवून बुद्धीसवे जगणारी ही भावना मला लाख मोलाची वाटते. तिला कोठलेही मोजमाप लावता येत नाही. भावस्पर्शी संवेदनेने नेणिवेत इंद्रधनू रंगाची बरसात होते, हे मात्र नक्की ! आणि मग साहजिकच, दर्पणातील स्व प्रतिमा जास्त लोभस वाटू लागते.

– नीलिमा खरे 9822057458 neelima.v.khare@gmail.com
—————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here