समाजमाध्यमांमध्ये विनोदी, गोड दिसणाऱ्या इमोजींचा वापर सहज आणि नित्याचे झाले आहे. विविध हृदये, रडके-दुःखी चेहरे, ‘ब्लोईंग किसेस‘… आणि अशा अडीचशेहून अधिक भावचिन्हांच्या मदतीने भावना व्यक्त करता येतात. मात्र ती पद्धत साचेबंद होत आहे का? उलट या चेहेऱ्यांमुळे खऱ्या भावना व्यक्त होणे नाहीसे झाले आहे. हाताच्या बोटाची वाट बघत असल्यासारखी ती भावचिन्हे, त्यांना स्पर्श करताच, त्यात दडलेल्या उसन्या भावना संदेशामधून व्यक्त करतात. त्या भावना मनापर्यंत पोचण्यापूर्वीच हे घडते. त्या भावचिन्हांना ‘Decode’ करून त्यातून अर्थ समजून घेण्यापेक्षा स्वतःच्या भाषेतून भावना व्यक्त करणे हे प्रामाणिक, सत्य आणि हितावह ठरणार नाही का?
इमोजींची सुरुवात जपानमध्ये 1990 च्या दशकामध्ये झाली. इमोजी या शब्दाचा अर्थ चित्र. ती चित्रभाषा छोट्या विशीच्या आतील मुलांमध्ये लोकप्रिय झाली. मात्र, सगळ्या जगातील जनता या इमोजींची मुळाक्षरे 2008 नंतर गिरवू लागली आणि भाषेच्याऐवजी, भावचिन्हांचा/चित्रभाषेचा धुमाकूळ माजला. उद्गारवाचक चिन्हांच्या ऐवजी ‘विस्फारलेले डोळे‘, ‘अरेरे‘च्या ऐवजी अश्रू असलेले चेहरे, ‘हसून हसून मुरकुंडी वळली आहे‘ असे सांगणारे डोळ्यांच्या कडेला पाणी असलेले हसरे चेहरे आणि असे कितीतरी! इमोजींचा वापर करून हा भाषाबदल होऊ लागला आहे. ही भाषेची प्रगती आहे का? झटकन एखादा निरोप देण्यासाठी तांत्रिक दृष्ट्या महत्प्रगती झाली आहे. जुन्या काळी पोस्टातून टपाल, अगदीच घाई असेल तर तार, नंतर फोन या माध्यमांतून निरोपांची देवाणघेवाण होत असे. त्याला दिरंगाईही होत असे. आता, नुसते मनात आले, की त्याच क्षणी तो त्याचा विचार हव्या त्या ठिकाणी पोचवू शकतो. त्यावर प्रतिसाद आला, की जे काम असेल, विचार असेल, भावना असेल, त्याला पटकन चालना मिळते. या गतीला, या तंत्रज्ञानाला तोड नाही !
प्रश्न असा, की इमोटीकॉन/ इमोजी यांची मदत घेऊन संवाद साधला जाऊ शकतो का? माणसाच्या भावना, विचार, म्हणणे हे जसे कळायला पाहिजे तसे पोचते का? छापील पत्रे आणि हातांनी लिहिलेली पत्रे यांत जसा फरक आहे तसाच फरक प्रत्यक्ष संवाद आणि संदेशात्मक संवाद किंवा ‘WhatsApp’ चॅट यांमध्ये आहे.
एके काळी सभाधीटपणा अंगी यावा यासाठी शालेय पातळीवर प्रयत्न केले जात. भाषा शिक्षक सांगत, ‘एकदा फजिती होईल, दुसऱ्यांदा होईल, पण हळू हळू समोरच्यांच्या डोळ्यांकडे बघण्याची भीड चेपली, की म्हणणे नीट सांगता येईल. सरावाने ते अधिक जमेल. शब्द, त्यांतील छटा यांचा अभ्यास केला तर अभिव्यक्ती अधिक प्रभावी होईल. शिक्षक त्यासाठी भाषेचे पुस्तक देऊन मदत करत, वाचनास प्रवृत्त करत.
पाठीमागील बेंचवर बसून, खाली मुंडी घालून चित्रविचित्र आवाज काढणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी असतात. जो पर्यंत चेहरा दिसत नाही, तो पर्यंत ते शूरवीर असतात; आणि जर कधी उभे केलेच, तर त्यांचे डोळे स्थिर राहत नाहीत, तोंडातून आवाज निघत नाही, कपाळ घामाने डवरून जाते.. अगदी एका मिनिटासाठीसुद्धा. ही भावचिन्हे इतकी लोकप्रिय होण्याचे कारण मला त्याच मानसिकतेत दिसते. अभिव्यक्तीचीच भीती, संकोच आणि अनास्था. मख्ख चेहरा ठेवून डोळ्यांतून पाणी येईपर्यंत हसण्याची इमोजी टाकणे हे स्वतःला, दुसऱ्याला आणि सत्याला फसवण्यासारखे आहे. व्यक्ती फोन आडून काहीही बोलू शकते. प्रसंग कोणताही असो. उदाहरणार्थ, तुझा लेख वाचला, मी कोविडची लस घेतली, माझा पीएच डी चा थेसिस submit झाला, आज मी आमरस केला होता… आणि अशा प्रकारचे काहीही. तर त्यावर येथे एक अंगठा वर केलेली इमोजी आणि एखादी हसण्याची इमोजी. ते सगळे आनंद एकाच पारड्यात तोलण्याचे आहेत का? या इमोजींमधून भाषेची परिपूर्णता जाणवते का? एखाद्या संदेशाला प्रतिसाद नेमका कसा द्यावा हे समजत नसेल किंवा प्रतिसाद न देणे हा उद्धटपणा वाटू नये म्हणून एक सुरक्षितता म्हणून थम्स अपचा अंगठा टाकला की झाले ! तीच मनोवृत्ती बळावताना दिसते. एकमेकांशी बोलावेसे वाटत नाही असाही संदेश त्यातून व्यक्त होतो.
संदेश म्हणजे संवाद नव्हे. संदेश म्हणजे संभाषण नव्हे. संदेश फक्त सरळ रेषेसारखा असतो. माहिती पोचवण्याइतकाच जीव असलेला. वेगवेगळ्या स्माईली आणि इमोजी वापरून एखादा भावनिक संदेश पाठवला जातो. अशा संवादामुळे विसंवाद होण्याचीच शक्यता अधिक असते. इमोजींची मदत घेऊन संदेशाला अर्थ प्राप्त होतो हे खरे, पण त्याला संवाद म्हणावे का? उदाहरणार्थ, कोणीतरी खूप आपलेपणाने एखादी गोष्ट विस्तारीत सांगितली आणि त्यावर दुसऱ्या बाजूने फक्त थम्सअपचा अंगठा नाहीतर हात जोडलेली इमोजी आली तर पाठवणाऱ्या व्यक्तीला ‘नॉट इंटरेस्टेड‘ असा न दिसणारा संदेश पोचू शकतो, गप्प केल्यासारखे वाटू शकते. तसे घडत असेल तर त्या भावनांचा समतोल कसा राहणार? प्रसंग कोणताही, पण भाव तोच. एखादी गोष्ट पटली आहे, मान्य आहे, भारावून जाण्याइतकी आवडली आहे अशा विविध पातळींवरचे आवडणे पण इमोजींमुळे त्या सगळ्याचा एकच साचा होतो.
एकदा आमच्या अगदी जवळचा मित्र सहलीसाठी लक्षद्वीपला गेला आणि तेथे हार्ट अॅटॅकने वारला. त्यावर अर्ध्या क्षणात व्हॉटस् अॅप गटावर ‘मिस यू‘, आणि ‘RIP’ बरोबर अश्रू असलेली इमोजी… यांचा दोन दिवस सगळ्या नातेवाइक-मित्रांच्या संदेशांचा सडा पडला आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याच बातमीखाली तीन थरांचा केक आणि फुलांचा गुच्छ आला ! कोणाच्या तरी वाढदिवसाची ती सुरुवात झाली होती. कोणत्याच भावना हृदयापर्यंत जाऊ न देता, बोथटपणे ‘समोर दिसले, दिला प्रतिसाद‘ हे आणि एवढेच महत्त्व अशा संदेशांमधून आणि त्याला सहाय्य करणाऱ्या इमोजींमधून दिसते.
मी घेतलेल्या एका कार्यशाळेत मुलांना फोनचे व्यसन लागले आहे, काय करायचे? या प्रश्नावर चर्चा करताना, लहान मुलांच्या आईबाबांकडून चार उत्तरे आली :
1. आत्ताच्या काळाची फोन गरज आहे. त्याला/तिला आम्ही फोन घेऊन दिला आहे. निदान त्यामुळे तो/ती त्यातले कार्टून बघता बघता जेवतो/ते तरी.
2. लक्षात आले की आम्ही त्याच्या/तिच्या हातातला फोन हिसकावून घेतो, प्रसंगी मारतोसुद्धा. शिक्षा केली तर फरक पडेल अशा आशेने.
3. फोन वापरायचे त्याच्यासाठी / तिच्यासाठी वेळापत्रक केले आहे, तेव्हाच फक्त हातात देतो फोन. (ती वेळ येईपर्यंत तो/ती काहीच न करता वाट बघत बसतो / ते. पण तिकडे आम्ही दुर्लक्ष करतो)
4. आम्ही घरी आल्यावर फोन एका ट्रेमध्ये ठेवून देतो. गप्पा मारतो, एकत्र वेळ घालवतो. फोन आलाच तर घेतोसुद्धा. त्याला आठवण आली तर तो/ती ही घेतो/ते. नंतर पुन्हा तेथे ठेवून देतो. फोन ही विशेष गोष्ट आहे असे त्याला वाटत नाही.
अगदी तसेच, प्रत्येकाने संदेशासाठी, संवादासाठी भाव चिन्हांच्या ऐवजी भाषा वापरायलाच पाहिजे. एखाद्या प्रसंगी गंमत पातळीवर अथवा पूरक म्हणून इमोजींचा वापर करणेही योग्य पण त्याचा अतिरिक्त वापर करणे हा भाषेच्या अस्तित्वाला धोका आहे. भाषेचा अभ्यास करणाऱ्या, विचार करणाऱ्या लोकांनीच जर भावचिन्हांना इतके महत्त्व दिले तर त्यांच्या हाताखाली घडणारी पिढी दुसरा विचार कसा करणार? अभिव्यक्तीतील बोथटपणा वाढत जाऊन संवेदनशीलता हरपलेला समाज निर्माण होणे आणि एका पातळीवर जे वाटत नाही, ते इमोजींमधून व्यक्त करण्यास प्रवृत्त करणे मला विनाशकारी वाटते.
संवादाला, संभाषणाला वेगळा आयाम आहे, घनता आहे, परीघ आहे. त्याला लगटून भाव, प्रेम, स्नेह आहे, प्रसंगी चिडचिडेपणा असतो, आवाजातील चढउतारामुळे त्या शब्दांच्या परिघात व्यक्तिगत पातळीवरील वैचारिक, भावनिक देवाणघेवाणीचे समाधान असते. अमर्याद, भावनेचा ओलावा आहे. भाषा पातळीवर, भावचिन्हांनी याची जागा घेतली तर ते समजणार नाही. असे झाले, तर भाषा संवर्धनाचे आणि जतनाचे विषय कदाचित अधून मधून येणाऱ्या लेखापुरतेच मर्यादित राहतील आणि ते वाचणार कोण हा त्या पुढचा प्रश्न असेल.
– अपर्णा महाजन 98220 59678 aparnavm@gmail.com
अपर्णा महाजन या चाकण येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विभागप्रमुख म्हणून निवृत्त.झाल्या. त्यांनी नामवंत वृत्तपत्रे, जर्नल आणि मासिके यांमधून वैचारिक लेखन केले आहे. अपर्णा यांना कार्पोरेट क्षेत्रामध्ये सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स आणि इंग्रजी भाषा शिकवण्यास बोलावले जाते. त्यांचे नाट्यशास्त्र, इंग्रजी-मराठी अनुवाद आणि भाषाविषयक कौशल्ये हे आवडीचे विषय आहेत. त्यांची महाविद्यालयात उपक्रमशील प्राध्यापक म्हणून ओळख आहे. त्या तळेगाव दाभाडे येथे राहतात.
———————————————————————————————————————————————————-
����������काळाप्रमाणे बदल ठिक आहे.पण भावना ह्या नैसर्गिकरित्या पोहोचल्यावरच मानवाला समाधान मिळते.हेच खरे आहे.
इमोजी म्हणजे सण साजरा करण्यासाठी कागदी फुलांचा वास घेण्यात तात्कालिक समाधान शोधणे. लेखात मांडलेली कल्पना छान.
लेख वाचला . आवडला . गणेश देवी असे म्हणाले होते की काही दिवसांनी चित्राची भाषा अस्तित्वात येईल व आपण बोलतो ती भाषा नष्ट होईल . जोपर्यंत मानवी भावभावना असलेला माणूस अस्तित्वात आहे तोपर्यंत भाषा नष्ट होणार नाही . आपण लेखात भावचिन्हांचा तोचतोपणा, अर्थाचा विपर्यास अशा अनेक चिन्हांच्या त्रुटीची नोंद केली ती योग्यच आहे .वाढदिवसाच्या शुभेच्छाभावपूर्ण श्रद्धांजलीविनम्र श्रद्धांजलीमृत आत्म्याला शांती लाभोRIPअशा वाक्याची वारंवारता प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे ही वाक्येसुद्धा अर्थहीन, मनाला बोचणारी, अत्यंत कंटाळवाणी झाली आहेत तेव्हा अशा भावचिन्हांचे अस्तित्व किती काळ टिकेल?
अपर्णा महाजन यांनी मांडलेल्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. माझ्यामते अशिक्षित माणसांना व्यक्त होण्यासाठी ही चिन्हे बनवली असावीत. शिक्षित माणसाने आपले मत, भावना व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करणे योग्य आहे. अधिक लिहिण्याची गरज नाही.
फारच छान आणि व्यवस्थित सांगितलेले आहे. अशा इमोजींमुळे खरं तर माणसाची विश्वासार्हता कमी होते आहे…