Home वैभव मराठी भाषा इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual...

इमोजी : चित्रलिपीच्या दिशेने आरंभ (Emojis Indicate the Direction of New Visual Language)

इमोजी म्हणजे भावचिन्हे

काही चित्रे लिप्यांमध्ये संगणकीय प्रगतीमुळे आणि विविध गरजांमुळे शिरली आहेत. त्यांना इमोजी म्हणजेच भावचिन्हे म्हटले जाते. ती भावचिन्हे कमीत कमी जागा व्यापून अधिकाधिक अर्थ व्यक्त करणारी असतात. त्यांच्या आधारे आधुनिक संदेशन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहे, म्हणजेच अनेक चित्रे लिपीत शिरू लागली आहेत आणि त्यांच्या परिणामकारकतेमुळे त्यांचा वापरही वाढू लागला आहे. नवनव्या भावभावना व्यक्त करण्यासाठी नवनवी चित्रे-चिन्हे येऊ लागली आहेत.

समाजमाध्यमांवरील भावचिन्हे

 

या भावचिन्हांनी त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे व्हॉट्सअॅप, ट्विटर, टेलिग्राम, फेसबुक यांसारख्या समाजमाध्यमांत हातपाय पसरले आहेतच, पण त्याचबरोबर त्यांचा वावर वर्ड, एक्सेल यांसारख्या औपचारिक लेखनातही होऊ लागला आहे. परिणामी, लेखक किंवा वाचक (आणि त्यामुळे चित्रकारही) त्याचे म्हणणे प्रभावी होण्यासाठी नवनवी भावचिन्हे तयार करता येतील का, याचा विचार करत आहेत. म्हणी किंवा वाक्प्रचार घागर में सागर या न्यायाने कमीत कमी शब्दांत भाषेचे सौंदर्य वाढवतात; त्याप्रमाणे एखादेच भावचिन्हदेखील लिहिणाऱ्याच्या मनातील भावना अधिक चांगल्या क्षमतेने पोचवू शकते. साधे हसण्याचे उदाहरण घेऊ या स्मित, मंद हास्य, सुहास्य, खळखळून हास्य आणि सात मजली हास्य अशा जास्तीत जास्त पाच (किंवा अजून काही शब्द घडवून सहा-सात-आठ) प्रकारे हास्याचे वर्णन करू शकतो. मात्र चलभाषांत हास्याचे सुमारे चोवीस तर रडण्याचे अंदाजे चौदा प्रकार उपलब्ध आहेत (ही संख्या वाढलेली असू शकते). म्हणजे भावना पोचवण्यासाठी जेथे केवळ लिपी नव्हे तर भाषादेखील कमी पडते तेथे ही भावचिन्हे मदतीला आली आहेत !

मूळात लिपीचा उगम हजारो वर्षांपूर्वी झाला, तो चित्रांमधूनच. माणूस त्याच्या पृथ्वीवरील अस्तित्वानंतर हजारो वर्षांनी बोलू लागला. त्याला त्यासाठी झाडावरून खाली, जमिनीवर उतरावे लागले. त्याच्या हालचालींत, आहारात; त्यामुळे शरीरात बदल होऊ लागले. मेंदूच्या रचनेवरही काही परिणाम होत गेला. माणूस साधारण दहा हजार वर्षांपूर्वी बोलू लागला असावा. कालौघात समूहजीवन स्थिरावले आणि त्याला, केवळ बोलणे पुरेसे नाही तर बोललेले लिहिता येऊ शकते याचा शोध लागला. त्यामुळे माणसाच्या जीवनात अक्षरश: क्रांती झाली ! भाषेची अंगे दोन – बोलणे आणि लिहिणे. प्रारंभी, मनुष्य त्याचे विचार साध्या उभ्या-आडव्या रेघोट्या काढून व्यक्त करत असे. त्याची प्रगती रेघोट्या मारता मारताच चित्रे काढण्याइतकी झाली. तो त्याचा आशय चित्रांतून व्यक्त करू लागला. त्याला सूर्य, वृक्ष, साप, बकरी इत्यादी चित्रांनी त्या त्या वस्तूंचा व प्राण्यांचा बोध होऊ लागला. गुहानिवासी प्राचीन माणसांनी कोरलेली चित्रे जगभर ठिकठिकाणी सापडली आहेत.

फ्रान्समधील मॉण्टिगॅक नावाच्या छोट्या गावातील लॅसलॉक्स नावाच्या प्रसिद्ध गुहेतील चित्रे ही रोमन लिपीचे आद्यरूप असावीत असे मानले जाते. इजिप्त व मेसापोटेमिया या देशांत अभिव्यक्ती चित्रांच्या द्वारेच होत असे. इजिप्तमध्ये चित्रे प्राय: दगडांवर खोदत आणि मेसापोटेमियात ती (क्युनिफॉर्म लिपीदेखील) मातीच्या विटांवर खिळ्यांनी कोरत. विटांचा पृष्ठभाग मऊ असल्याने त्यावर केवळ रेघा ओढता येत, गोलाकार काढता येत नसत. उदाहरणार्थ, विटांवर माशाचे चित्र तीनचार रेषा ओढून काढत. त्यामुळे ती चित्रे आरंभापासून संकेतात्मक झाली. त्याच संकेतात्मक चित्रांतून इराणी लोकांनी अक्षरे बनवली. चित्रे (चित्रलिपी) हा लिपीच्या विकासातील एक टप्पा होय.

भीमबेटका येथील खडकांवरील चित्रे

 

मध्यप्रदेशातील भीमबेटका हे भारतातील सर्वात प्राचीन ठिकाणदेखील गुहाचित्रांमुळेच जागतिक वारसास्थान ठरले आहे. तेथील पाषाणयुगीन गुहेतील चित्रकारी इसवी सनपूर्व तीस हजार वर्षांपूर्वीची असल्याचे मानले जाते. भीमबेटकाच्या सभोवताली असणाऱ्या सुमारे पाचशे शैलगृहांमध्ये तशी प्रागैतिहासिक भित्तिचित्रे असली तरी तेथे जाण्यास रस्ते नाहीत. भीमबेटकामध्ये आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची नैसर्गिक रंगांतील विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी चित्रे काढलेली दिसतात. अशा चित्रांच्या आधारे भावना व्यक्त करता येतात आणि त्या टिकवता येतात, हे लक्षात आल्यावर माणसाला लिपीचा शोध लागला असावा !

 

आदिमानवाने काढलेली गुहाचित्रे

 

लिपीही लिखाणाची सूत्रबद्ध पद्धत आहे. लिपीमध्ये प्रामुख्याने अक्षरे व अंक यांचा वापर केला जातो. लिपीचा उपयोग माहितीसंचयासाठी आणि संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी होतो. ज्या चिन्हांचा उपयोग वर्ण किंवा ध्वनी यांचे लेखन करण्यासाठी करतात त्या चिन्हसमूहाला लिपी असे नाव आहे. एका चिन्हापासून जेव्हा एका ध्वनीचा बोध होतो; तेव्हा लिपीचा उद्देश सफल होतो. आजची लिपी ही मानव बोलण्यास शिकल्यापासून हळूहळू परिणत झाली आहे.

वैदिक लोकांनी गणन व लेखन या दोन्ही बाबतींत बरीच प्रगती केली होती. भारतात प्रारंभी ब्राह्मी लिपीचा उपयोग केला जात होता. तिचा उगमकाळ निश्चित सांगता येत नसला तरी ती प्रचारात इसवी सनपूर्व पाचव्या शतकात होती एवढे निश्चित म्हणता येते. पाणिनीच्या अष्टाध्यायीतदेखील (इसवी सनपूर्व 400) लिपीचा उल्लेख येतो. माणसाचा पूर्वज पाच हजार वर्षांपूर्वी रीतसर लिहू लागला असावा आणि पाणिनीच्या काळापर्यंत त्या लेखनाला स्थैर्यही प्राप्त झाले असावे.

लिपीच्या अस्तित्वाला पाच हजार वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय दिसते? जगातील सुमारे सात हजार भाषांसाठी हजारो लिप्या अस्तित्वात आहेत. काही लिप्या पूर्ण स्वतंत्र, काही लिप्या पूर्ण भिन्न, तर काहींमध्ये थोडेफार साम्यभेद दिसतात. डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या लिप्या तर आहेतच; पण त्याचबरोबर वरून खाली जाणाऱ्या लिप्याही अस्तित्वात आहेत. सांकेतिक चिन्हांच्या लिप्या जशा आहेत तशाच चित्रांच्या लिप्याही आहेत.

पण भावचिन्हे लिपीत सामावण्याचा प्रवास साधा-सोपा नाही. युनिकोड कन्सोर्शियम या संस्थेकडे तसा प्रस्ताव पाठवावा लागतो. त्या प्रस्तावासाठी; या प्रकारच्या भावचिन्हांचा वापर पूर्वी त्या विशिष्ट भाषकांनी केलेला आहे याची उदाहरणे द्यावी लागतात. ते भावचिन्ह अमूक प्रकारचे का असावे हेदेखील पूरक माहितीसह पटवून द्यावे लागते. त्या भावचिन्हाला त्या विशिष्ट भाषेच्या जगतातून प्रचंड मागणी आहे हे सिद्ध करावे लागते. त्यासाठी गूगल, याहू, बिंग इत्यादी शोधयंत्रांवर लोकांनी शोध घेतल्याचे पुरावे सादर करावे लागतात. पुन्हा, ते पुरावे फक्त चार-पाच ठिकाणांचे असून चालत नाही; भावचिन्हाची मागणी सर्वत्र आहे हे सिद्ध व्हावे लागते. युनिकोड कन्सोर्शियमला प्रस्ताव पाठवला की पुराव्यांची छाननी होते. मग योग्य तो विचार करून त्या भावचिन्हाला संगणकीय लेखनात किंवा आभासी लेखनात स्थान मिळते. अर्थात अशा किती भावचिन्हांना सामावून घ्यायचे असा प्रश्नही निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे युनिकोड कन्सोर्शियममध्ये काही वादही झडले आहेत- झडत आहेत.

लिपी शिकवायची म्हणजे स्वर, स्वरादी आणि व्यंजने इतकीच शिकवायची? का भावचिन्हे आणि त्यांचे अर्थ पण शिकवायचे? असे प्रश्न अजून पंधरा-वीस वर्षांत भाषातज्ज्ञांसमोर निर्माण होणार आहेत. म्हणजे देवनागरी लिपी ध्वनिचिन्हे आणि चित्रे यांच्या संयोगाची चित्रलिपी होऊ पाहत आहे. चिनी-जपानी भाषक त्याच वेळी चित्रलिपीतून बाहेर पडण्याचा काहीसा प्रयत्न करत आहेत आणि सारे जग चित्रांना त्यांच्या लिप्यांत समाविष्ट करू इच्छित आहे, असा विरोधाभास तयार झालेला दिसतो. त्यातच भावचिन्हांच्या अर्थाविषयी पण मतभेद आहेत. मराठीतील ठेंगा आता लै भारी झाला आहे. अशी अनेक चिन्हे वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणातून वैश्विक होऊ पाहणार आहेत आणि त्यांचे अर्थ त्या त्या भाषकांनी कसे लावायचे याचेही भान त्या त्या समाजाला राखावे लागणार आहे.

– आनन्द काटीकर 9421610704 anand.katikar.marathi@gmail.com

—————————————————–————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version