इतिहास पाहता असे दिसून येईल, की चुकीच्या व्यक्तींना राष्ट्रप्रमुख म्हणून निवडल्यामुळे बहुतेक सर्व युद्धे झाली. पूर्वी राजे राज्य करायचे. ते राजे म्हणून जन्मायचे तरी किंवा युद्ध जिंकल्यामुळेच राजे व्हायचे. म्हणजे जनतेने त्यांना निवडण्याचा प्रश्नच नव्हता. बाय चान्स, काही राजे चांगले राज्य करत तर काही युद्धखोर असत.
पण सध्या, लोकशाहीमध्ये निवडणुकीने राष्ट्रप्रमुख निवडतात. हिटलर, मुसोलिनी, पुतिन, नेतन्याहू हे सारे निवडून दिलेले नेते होते किंवा आहेत. सर्व राष्ट्रावर जर दीर्घ काळ अन्याय झाला असेल तर जनता युद्धखोर नेत्याला नक्कीच निवडून देईल. पण तसे नसेल तर चुकीच्या निवडणूक पद्धतीमुळे अयोग्य, गुन्हेगार प्रवृत्तीची माणसे निवडून येऊ शकतात. असे दिसते की मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व (प्र प्र) देणाऱ्या निवडणूक पद्धतीमुळे जास्त चांगले नेते निवडले जातात, सहसा एकाच पक्षाला बहुमत मिळत नाही, आघाडीची सरकारे तयार होतात, त्यामुळे युद्ध सुरू करणारे नेते सहसा सत्ता मिळवू शकत नाहीत.
याला अपवाद जेथे धर्म राजकारणात शिरतो तेथे, उदाहरणार्थ इस्राएल. इतिहासातील बहुतेक सर्व युद्धे धर्मामुळे झाली ! एकदा सेक्युलर झालेली राष्ट्रे पुन्हा धार्मिक होऊ शकतात, उदाहरणार्थ इराण, तुर्कस्तान आणि कदाचित नजीकच्या भविष्यात भारत ! देशातील बहुसंख्य जनता जर निधर्मी झाली, तरच राज्ययंत्रणा धर्माच्या प्रभावापासून कायमची मुक्त होईल.
तेव्हा, प्रमाणात प्रतिनिधित्व (प्र प्र) पद्धत वापरणारी लोकशाही आणि निधर्मी जनता हे माझे शांततेसाठी Prescription आहे. ही उपाय योजना इंग्लंड वगळता बाकी पश्चिम युरोपमध्ये अनुभवास येते. जगातील बहुतेक सर्व देशांत निधर्मी लोकांचे प्रमाण वाढत आहे, ही आशादायक गोष्ट आहे. आपण सर्वांनी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा.
– सुभाष आठले 9420776247 subhashathale@