धडवईवाले यांचे इंदुरी मराठीकारण (Dhadwaiwale: Cause of Marathi Language In Madhya Pradesh)

अनिलकुमार धडवईवाले हे इंदूर शहरी जन्मापासून राहतात, पण मराठी भाषेचा सन्मान आणि संवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व अभिमानाचा विषय आहे. त्यांनी मराठी रक्षण समिती या संस्थेची स्थापना तेथे केली. त्यांचे मायमराठीच्या सन्मानाचे कार्य त्या समितीच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे. त्यांनी मराठी समाज हाच त्यांचा परिवार आणि त्याचे हित हेच त्यांचे हित या पद्धतीने मराठी माणसांचा कोठलाही लढा हा त्यांचा स्वत:चा मानला. त्यांनी इंदूरमधील मराठी शाळा बंद पडू लागल्या तेव्हा आंदोलनाचे शस्त्र उभारले, उपोषणे केली. ते मध्यप्रदेशमधील मराठी समाजाच्या जवळपास प्रत्येक संस्थेची काळजी घेत असतात. मराठी साहित्यिक, कवी, लेखक, विचारवंत आदींचे मध्यप्रदेशातील हक्काचे व्यासपीठ म्हणजे मराठी रक्षण समिती हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे. पन्नासहून अधिक दर्जेदार साहित्यिक समारोह इंदूरमध्ये मराठी रक्षण समितीच्या वतीने मागील दोन दशकांत आयोजित केले गेले. त्यांत दरवर्षी होणारा तात्यासाहेब शिरवाडकर आणि राजकवी गोविंदराव झोकरकर हे समारोह विशेष मानले जातात.
अनिलकुमार हे इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठाचे पदवीधर. त्यांनी चित्रकलेचा पाच वर्षांचा अभ्यासक्रम इंदूरच्या चित्रकला महाविद्यालयातून पूर्ण केला. त्यांनी महर्षी दत्तात्रय देवळालीकर यांच्या हस्ते विवेक कला संगम या क्रियाशील संघटनेची मुहूर्तमेढ 1970 मध्ये रोवली. त्यांनी त्या संघटनेच्या माध्यमातून उपेक्षित व विकलांग कलाकारांबरोबरच नवोदित व उदयोन्मुख कलाकारांना न्याय मिळवून दिला आहे. अनिलजींनी चार दशकांच्या कालावधीत शंभराहून अधिक कला समारोहांचे यशस्वी आयोजन केले आहे. इंदूरच्या रवींद्र नाट्यगृहात व देवळालीकर कला वीथीकामधील आर्ट गॅलरीची स्थापना अनिलकुमार धडवईवाले यांच्या परिश्रमांमुळे होऊ शकली आहे. इंदूरच्या फाईन आर्ट कॉलेजचा तीन दिवसीय सुवर्ण महोत्सव 1978 मध्ये त्यांच्या संयोजकत्वाखाली झाला. त्यास माजी विद्यार्थी एम.एफ. हुसेन, एस.एम. जोशी, एम.जी. किरकिरे, डी.जे. जोशी, विष्णू चिंचाळकर, नरेंद्रनाथ यांच्यासारखे मान्यवर चित्रकार उपस्थित राहिले होते. अनिलकुमार यांच्या पाठपुराव्यामुळे ते शक्य झाले. त्यामुळे तो समारंभ आगळावेगळा ठरला. कॉलेजचे संस्थापक-संचालक चित्रमहर्षी दत्तात्रय देवळालीकर यांनी या जगाचा निरोप, समारंभानंतर काही महिन्यांनी घेतला. जणू ते या सुवर्ण महोत्सवासाठी जगत होते!
अनिलकुमार हे हिंदी-मराठी नियतकालिकांतून विविध विषयांवर लेखन करतात. नई दुनिया, भास्कर, साप्ताहिक हिन्दुस्थान, धर्मयुग, दिनमान, जनसत्ता यांसारख्या मातब्बर हिंदी पत्र-पत्रिकांबरोबरच ते महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ इत्यादी मराठी नियतकालिकांतही सातत्याने लेखन करत असतात. ते मराठी पाक्षिक समाज चिंतनचे प्रकाशन गेल्या एक तपाहून अधिक काळ करत आहेत. धडवईवाले यांना दर्पण पुरस्काराने महाराष्ट्र पत्रकार निधी (पुणे) या संस्थेतर्फे मनोहर जोशी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ते तशा प्रकारचा सन्मान मिळवणारे महाराष्ट्राबाहेरील एकमेव मराठी पत्रकार आहेत. त्यांनी महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिकांची संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ (नवी दिल्ली) यांचा श्रेष्ठ मराठी पत्रकारहा पुरस्कारही मिळवला आहे. त्यांनी समाज चिंतनच्या शंभराहून अधिक अंकांत पासष्ट कोटी रुपयांच्या तोट्याने बुडीत गेलेल्या इंदूर येथील महाराष्ट्र ब्राह्मण सहकारी बँकेतील विविध घोटाळ्यांना उजागर करून त्या संस्थेच्या अनेक भ्रष्ट चालकांना तुरुंगाची हवा खाण्यास लावले आहे.
अनिलकुमारांनी वीस वर्षांच्या सरकारी नोकरीनंतर स्वेच्छा निवृत्ती घेऊन स्वत:ला पूर्णपणे समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे. मराठी माध्यम बंद करण्याची घोषणा मध्यप्रदेश राज्य सरकारने विद्यालयीन पाठ्यक्रमातून (1994) केली. अनिलकुमार यांनी राज्य सरकारच्या त्या अन्यायपूर्ण निर्णयाविरूद्ध मराठी भाषा सन्मान रक्षण समिती (इंदूर)च्या ध्वजाखाली इंदूर शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या राजवाडा चौकात उत्स्फूर्त असे आंदोलन उभे केले होते. त्यांनी उपोषणाचा मार्गही अवलंबला. राज्यशासनाने मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. तेव्हा ते उपोषण संपले. त्याप्रमाणे मध्यप्रदेश सरकारने मराठी शाळा कॉलेजांमध्ये शिकण्यासाठी तरतूद केली आहे. तथापी वास्तवात ना शाळा ना कॉलेजांत मराठी माध्यमाला पसंती असते. अनिलकुमार यांनी इंदूर व इंदूरच्या बाहेरील अनेक मान्यवर संस्थांचे पदाधिकारी व संचालक म्हणून कार्य केलेले आहे. त्यांनी बृहन्महाराष्ट्र मंडळच्या मध्यप्रदेश राज्याच्या शाखेचे प्रांतीय कार्यवाह म्हणून दोन वेळा कामगिरी बजावली आहे. त्यांनी इंदूर येथील महाराष्ट्र ब्राह्मण सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून 1987 ते 1990 च्या कालावधीत यशस्वी कारकीर्द गाजवली आहे.

 ते इंदूरच्या समस्त मराठी भाषिकांची केंद्रीय संस्था असलेल्या मराठी समाज संस्थेचे संचालक म्हणून कार्य करत आहेत. ते इंदूरच्या शताब्दीपार महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांनी युवावस्थेपासून इंदूर शहरात केलेल्या रचनात्मक कार्यासाठी त्यांचा जाहीर अभिनंदन सोहळा आयोजित केला गेला होता. धडवईवाले मराठीकारणाच्या नादात अविवाहितच राहिले. त्यांचा आदर्श अटलबिहारी वाजपेयी आहेत. ते इंदोरच्या राजनगर भागातील लोकमान्य नगर कॉलनीत राहतात. 
अनिलकुमार धडवईवाले 88714 00338 anildhadwaiwale@gmail.com

धनश्री देसाई/मुकुंद भांडारी
धनश्री देसाई (तोडेवाले) या लेखिका, कवयित्री आणि गीतकार आहेत. त्यांनी आज देवाला सुट्टी आहेया महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर गाजलेल्या कवितेची रचना केली आहे. त्या तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियान नवी मुंबईसाठी जनजागृती गीतांची रचना करत आहेत. त्यांनी विविध लेखमालांचे लेखन केले आहे. त्यांची विजय प्रकाशनकडून (नागपूर) बालकथा (पांडुरंग हरवलाय) प्रकाशित झाली आहे. त्यांनी काटोल नगर परिषदेसाठीही (नागपूर) स्वच्छ भारत अभियान गीतांची रचना केली आहे. त्यांनी विविध ऐतिहासिक स्थळांच्या केलेल्या फिचर स्टोरी आयबीएन लोकमत आणि स्टार माझावर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा जन्म इंदूर, मध्यप्रदेशमध्ये झाला. त्या सध्या नवी मुंबईच्या नेरुळ भागात राहतात.
 ———————————————————————————————————————————–

 

 

 ———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

  1. अनिलकुमार यांचे अभिनंदन। मराठी भाषा सरंक्षण त्यांचे योगदान खरोखरच तारीफ लायक आहे। त्यांच्या वर सर्व मराठी माणसाला गर्व करण्या सारखे आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here