दादासाहेब तोरणे : आद्य चित्रपटकर्ते (Dadasaheb Torne)

0
140

 

भारतीय चित्रपटाचे जनक कोण? दादासाहेब फाळके, की दादासाहेब तोरणे असा छोटासा वाद महाराष्ट्रात एकेकाळी होऊन गेला. तो मान मात्र दादासाहेब फाळके यांना दिला गेला. भारताचा पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांचा 1913 मधील राजा हरिश्चंद्र हा मानला जातो. दादासाहेब तोरणे यांनी एक वर्ष आधी, 18 मे 1912 मध्ये भक्त पुंडलिक हा चित्रपट दाखवला. परंतु त्याची यथायोग्य नोंद इतिहासात नसल्यामुळे पहिला भारतीय चित्रपट दादासाहेब फाळके यांचा असे ठरले गेले आहे. फाळके यांच्याइतकेच भारतीय चित्रपट तंत्रनिर्मितीचे श्रेय तोरणे यांनाही दिले गेले पाहिजे.       
रामचंद्र गोपाळ ऊर्फ दादासाहेब तोरणे यांचा जन्म 13 एप्रिल 1890 रोजी झाला. दादासाहेब तोरणे यांनी श्री पुंडलिक चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते बावीस वर्षाचे. तोरणे कुटुंबीय मूळचे मालवण नजीकच्या कट्टा गावचे. दादासाहेबांचा जन्म त्या शेजारच्या सुकळवाड या छोट्याशा गावात झाला. ते तीन वर्षांचे असताना, त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबीयांची जमीन आणि राहते घर होते. घरच्यांना त्यांच्या शाळेची फी घरच्या गरिबीमुळे भरणे शक्य नव्हते. दादासाहेबांनी म्हणून लहान वयात नशीब काढण्यासाठी मुंबईचा रस्ता धरला. ते तेथून अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि एका इलेक्ट्रिशीयनच्या दुकानात नोकरी करू लागले. ते तेथे सहा महिने उमेदवारी करून मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिद्ध कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीने त्यांची बदली बढती देऊन कराचीला केली.      
दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन फेमस फिक्चर्सही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. पाठारे प्रभु अॅमॅच्युअर ड्रॅमॅटिक क्लबया मुंबईतील नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने 1904 साली अॅडव्होकेट कीर्तिकर यांचे श्री पुंडलिकहे नाटक बसवले. पहिल्या प्रयोगाला दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. त्यावेळी ते चौदा वर्षांचे होते. दादासाहेब यांनी नाटक मंडळींकडे त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकर यांनी स्वतःचीश्रीपाद नाटक मंडळीही कंपनी स्थापन केली. तोरणे यांनी त्या कंपनीच्या जडणघडणीत सक्रिय भाग घेतला. सर्वांचे लक्ष त्यांच्यातील कलागुणांकडे वेधून घेतले गेले.
श्री पुंडलिकचे काही प्रयोग झाल्यानंतर श्रीपाद नाटक मंडळीने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना 1896 पासून जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेबांनी श्री पुंडलिकहे त्यांच्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास घेतला. ते 1909 पासून हॉलिवूडशी संपर्कात होतेच. त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली. त्यांच्या नाटक मंडळीत सहभागी असलेल्या अॅडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी बोर्न अँड शेफर्डकंपनीच्या मुंबई कार्यालयातून विल्यमसन कायनेमॅटोग्राफहा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळवली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
त्या कॅमेऱ्यात आवाजाचे रेकॉर्डिंग होत नसे. आवाजाच्या रेकॉर्डिंगचा शोधच लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकर यांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून श्री पुंडलिकचे वेगळे संवादविरहित चित्रणकथा (शूटिंग स्क्रीप्ट) लिहिली. कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या परिसरात शूटिंग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या. शूटिंग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठवली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजाने परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट श्री पुंडलिक’, सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफया नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात 18 मे 1912 ला रुपेरी पडद्यावर झळकला!चित्रपट चांगला दोन आठवडे चालला. ‘टाइम्स ऑफ इंडियाने त्याची नोंदही घेतली होती. श्री पुंडलिकचित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात नव्हते. त्यामुळे कदाचित भारत सरकारच्या दप्तरी त्या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी.
सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी 1953 साली सिनेसाप्ताहिक स्क्रीनसाठी खुद्द दादासाहेबांकडून लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणेहे पुस्तक जानेवारी 2007 मध्ये प्रसिद्ध केले आहे. श्री पुंडलिकच्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पद्धतशीर उभारणी अशी बहुविध कामे केली. दादासाहेबांनी पुढे ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरवणारी मुव्ही कॅमेरा कंपनीही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग 1931 साली आर्देशिर इराणी यांच्या आलमआराया पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी, दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. दादासाहेबांनी सरस्वती सिनेटोनही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था त्याच वर्षी सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला शामसुंदरहा मराठी व हिंदी भाषांतील बोलपट काढला. मराठी शामसुंदरमुंबईच्या वेस्ट एण्ड’ (आताचा नाझ’) मध्ये सत्तावीस आठवडे चालला. तो रौप्य महोत्सव साजरा करणारासुद्धा पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. कोल्हापूर येथील प्रभात स्टुडिओचे अयोध्येचा राजाआणि अग्निकंकणहे दोन्ही बोलपट मराठी व हिंदी भाषांतून त्याच वर्षी प्रसारित झाले. दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व लोककथांवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांची (मूकपट आणि बोलपट) निर्मिती केली. दादासाहेब तोरणे यांचे निधन 19 जानेवारी 1960 रोजी झाले.
– कुमार कदम 98696 12526, 8850458824
mahavrutta@gmail.com

————————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here