मनुष्याने अधिकाधिक सौंदर्यसंपन्न होण्यासाठी सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती ही हजारो वर्षांपासून चालवली आहे. सुंदर दिसणे मुख्यत्वेकरून स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय बनला. साहजिकच, सौंदर्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न व प्रकाशझोत हे स्त्री साधनांकडे वळतात…
निसर्गाने स्वतः सर्व प्राण्यांना नटवले आहे, पण त्याने विविध प्राणी, पक्षी आणि कीटक यांना सुंदर दिसण्यासाठी त्यांच्यातील नरांना सुंदर रंग, पिसारा, तुरे, आयाळ, आवाज, आकार दिलेले आहेत. मनुष्यप्राण्याला निसर्गाने दिलेले ते सौंदर्य अपूर्ण वाटते. त्यामुळे तो अधिकाधिक सौंदर्यसंपन्न होण्याच्या प्रयत्नात असतो. त्यासाठी त्याने सौंदर्यवर्धक वस्तूंचा शोध आणि निर्मिती ही हजारो वर्षांपासून चालवली आहे. तेवढेच कशाला, रत्नागिरी जिल्ह्यांत आढळणारी कातळशिल्पे किंवा भीमबेटकाच्या गुहांतील चित्रे त्याहीपूर्वीची असावी. मोहेंजोदरो आणि हडप्पा, ईजिप्शियन, ग्रीक अशा पुरातन संस्कृतींचा तर त्या अंगाने अभ्यास झाला आहे. मनुष्यप्राण्याने स्वतः सौंदर्याची व जाणिवेची काही वेगळी परिमाणे निर्माण केली. त्याने सुंदर दिसणे मुख्यत्वेकरून स्त्रीकडे सोपवले आहे. त्यामुळे साहजिकच सर्व सौंदर्याप्रत सर्व प्रयत्न व प्रकाशझोत हे स्त्री साधनांकडे वळतात.
सौंदर्य साधनांची व्यावसायिक बाजारपेठ अब्जावधी रुपयांच्या पलीकडे जागतिक पातळीवर पोचली आहे. पैसा आणि नवनवीन वस्तू यांची उपलब्धता या दोन्ही गोष्टी मुबलक आहेत. त्यामुळे वस्तुवापरात ‘घ्या, वापरा आणि फेकून द्या’ असा कल आहे. पण एके काळी वापरण्याच्या वस्तू केवळ ‘वस्तू’ नव्हत्या. त्याभोवती वापरणाऱ्याच्या भावनांचा, आठवणींचा सुंदर गोफ विणलेला असे. त्यांना सामाजिक संदर्भ होते, त्यांची उपयुक्तता होती. त्यांत वैविध्य होते. पूर्णत: अपरिचित अशा काही सौंदर्य प्रसाधनांची आणि वेगळ्या अशा काही गोष्टींची ही ओळख.
फणी करंडे पेटी (ऐना पेटी) – ही स्त्री साजशृंगाराची महत्त्वाची ठेव. सागवानी पेटीत झाकणाच्या आतील बाजूला आरसा बसवलेला असे. त्यातील विविध खणांमध्ये कुंकवाचा करंडा, फणी, काजळाची डबी (सुरमा डबी), केसात खोवण्याचे आकडे, काचेच्या बांगड्या अशा वस्तू असत. कुंकवाचा करंडा हा पितळी किंवा चांदीचा असे. त्या करंड्याचे दोन भाग असत. वरील भागात छोटा गोल आरसा आणि नैसर्गिक मेण, तर खालील भागात पिंजर/कुंकू असे. काजळाची डबी सहसा चांदीची असे. त्यावेळी काजळ घरीच बनवले जाई. स्त्रियांचे केस जाड, लांब व घनदाट असायचे. त्यामुळे कंगव्यापेक्षा फणीचा वापर अधिक होई. फणी चंदणी किंवा कडुलिंबाच्या लाकडाची असे. ऐपतीनुसार ती हस्तिदंती, चांदी यांच्या मुठीचीही असे. केसात खोवण्याचे आकडे ‘मेड इन इंग्लंड’ असत. पेटीच्या खालील भागातच रोजच्या वापरातील बांगड्यांचा एक कप्पा असे आणि अंबाड्यात खोचण्याची फुले (चांदीच्या फुलांच्या लांब आकड्यांना सोन्याचा मुलामा दिलेला असे) एका खणात असत.
अनेक पेट्यांना अंगचेच चांगले कुलूप असे. पेटीची मालकीण या कुलुपाची किल्ली एखाद्या गोफात किंवा लोकरी धाग्यात गुंफून गळ्यात घालून ठेवत असे. पेटीत माहेराहून आणलेला चांदीचा रुपया जपून ठेवलेला असे; तसेच, साधुपुरुषाचा अंगाराही आणि लहानपणची एखादी आठवण असे.
शृंगार डबी – म्हणजे ‘मेक अप कॉम्पॅक्ट’. मधोमध लांब दांडीचा आरसा. आरशाच्या मागेपुढे दांडीवर बसवलेले आणि सरकावून उघडता येणारे दोन खोलगट गोल. त्या दोन खोलगट भागांत कुंकू आणि काजळ आणि चेहरा पाहण्यास छोटासा आरसा असे. त्या दोन गोलांच्या बाहेर शृंगाराची द्योतक अशी राघू-मैनेची जोडी. सगळ्या भागांवर छान कोरीव काम. सहजपणे कोठेही अडकवायला टोकाशी एक आकडा ! पूर्वी कुंकू, काजळ आणि आरसा या तीन गोष्टीच महत्त्वाच्या होत्या.
केस वाळवणारे आकडे दणकट आणि पितळेचे किंवा चांदी, तांबे इत्यादी धातूंचे असत. स्त्रियांचे केस भरघोस आणि बळकट असल्याने लाकडी किंवा हस्तिदंती आकडे टिकत नसत. दोन किंवा तीन काट्यांचे ते आकडे ओल्या केसांतून सतत फिरवत राहिल्याने गुंतलेले केस सुटण्यास आणि केस वाळण्यासही मदत होई. कलात्मकतेने घडवलेल्या त्या आकड्यांवरील नक्षीकाम आणि त्यांच्या कलात्मक मुठी पाहण्यासारख्या असत. काटा ओलसर-तेलकट हाताने वापरताना, तो हातातून निसटू नये म्हणून मुठीला कंगोरे ठेवलेले असत. मुठीवर मात्र फुले, महिरपी, मोर, पोपट, मोरपीस, अप्सरा, यक्षिणी, नर्तिका इत्यादी कोरलेल्या असत.
धूप पळी – वाळलेल्या केसांना सुगंधित करण्यासाठी केसांना धुरी दिली जाई. त्यासाठी धुपाटणे, धूपदाणी, लांब दांडीच्या पळ्या इत्यादींचा वापर केला जाई. त्यात निखारे ठेवून वर चंदन, धूप, ऊद, नागरमोथा इत्यादी सुगंधी पदार्थांचे चूर्ण टाकल्यावर धूर निर्माण होई. त्या धुरावर केस धरले जात. त्यामुळे केस कोरडे होऊ लागत व केसांना सुगंध येई. धूरजनक गोष्टी या सौम्य जंतुनाशकही असत. म्हणून केसांत ऊवालिखांचाही प्रादुर्भाव होत नसे. लांब दांडीच्या हलक्या पळीने धुरी दिली असता, ती पळी लांब केसांमध्ये, आतपर्यंत सहज पोचू शकत असे. दांड्याची लांबी आणि त्यावरील नक्षीमधील अनेक छिद्रे यांमुळे तो दांडा लवकर तापत नसे. पळीवर खोदून आणि कोरून अशी दोन्ही प्रकारे सुंदर नक्षी काढलेली असे. शिवाय, तिच्या टोकावर पुन्हा छानशी अप्सराही असेच.
वज्री – पायाच्या खोटेवर त्वचेचा जाड थर साचल्याने पायांच्या सौंदर्याला बाधा येते. पायांना भेगाही पडतात. त्यामुळे स्नानाच्या वेळी तेथील त्वचा नरम झाल्यावर ती हलक्या हाताने घासून काढली जाई. त्या खोट घासणीला ‘वज्री’ म्हणतात. पितळ, चांदी, पंचधातू यांपासून बनवलेल्या वज्रींवर कलात्मक अशा मोर, हत्ती, पोपट यांच्या जोड्या असत. आंघोळीचे पाणी आत अडकून राहू नये म्हणून वज्री तळाशी जाळीदार असत. त्यात धातूची गोळी घुंगरू असल्यास त्वचेवर घासताना त्यातून छानसा आवाज येई. वज्रीच्या तळाला मुद्दाम तयार केलेला खरखरीत भाग ओल्या त्वचेवर घासून जाड थर काढून टाकला जाई.
पानाचा आम्रडबा – भारतात पानविडा (तांबूल) संस्कृती फार जुनी. तो खानदानी शौक मानला जाई. अगदी धार्मिक विधींमध्ये पानसुपारीला पहिला मान. तर विडा उचलण्यावर शौर्याचे मोजमाप होई. मित्रमंडळींची बैठक पानसुपारीभोवती फिरे. लावणीची बैठक, नृत्यांगनेची अदाकारी, संगीताची मैफिल, कव्वालीचा मुकाबला, शायराचा मुशायरा, गायनाची जुगलबंदी या गोष्टी विड्याशिवाय रंगणेच अशक्य ! स्त्रियाही विडा खाण्याच्या शौकीन होत्या. त्यांच्यासाठी आगळेवेगळे आणि कलात्मक नजाकतीने पानडबे बनवले जात असत.
आंब्याच्या आकाराचा पितळी पानडबा हा पितळी पानाच्या टोकाने विड्याच्या पानाला चुना लावण्यासाठी असे. त्याला बसवलेल्या घुंगरांमुळे नाजूक आवाज येई. नंतर छोट्या खणांतील सुपारी, लवंग, वेलची, कात अशा अन्य सर्व चिजा पानात भरत. अशा प्रकारे साग्रसंगीत विडा तयार होई. डब्याच्या झाकणाला छोटासा आरसाही असे. त्यामुळे पान खाल्ल्यावर ओठ किती रंगले हे लगेच पाहता येई.
कट्यारीचा अडकित्ता – या अडकित्त्यावर नाजूक कोरीव काम असून त्याचा वेगळा घाट लक्षवेधक आहे. संकटाच्या वेळी तो छोटा अडकित्ता एक जीवघेणे शस्त्रही बनतो ! त्याच्या दोन्ही मुठी उलट्या वळवल्या, की ती स्वसंरक्षणाची कट्यार होते. स्त्रीच्या मुठीत उत्तमपणे बसणारी ती कट्यार तिचे संरक्षण करण्यास नक्कीच पुरेशी आहे.
चंची – कष्टाची कामे करणाऱ्या आणि थोड्या कमी आर्थिक स्तरातील स्त्रियांची पानविड्याची ही कापडी चंची होय. ती गोंडे, आरसे, घुंगरू, रंगीत काठ यांनी सजलेली असे. तिला चार-पाच खण असत. चंचीमध्ये कात, चुन्याची डबी, सुपारी आणि चक्क तंबाखूसुद्धा असे. विड्याची पाने ताजी राहवीत म्हणून ती मेणकापडाच्या छोट्या तुकड्यात गुंडाळून चंचीत ठेवत. चंचीच्या टोकाला लांब दोरी, घुंगरू व गोंडा असे. चंची दोरीने गुंडाळून बांधली जाई.
तांबोळा – अडकित्ते, चुनाळी, चुनपेट्या, कातगोळ्यांच्या डब्या, तयार विड्यासाठी छोट्या डब्या, तस्त (थुंकदाणी) यांचे असंख्य कलात्मक प्रकार अस्तित्वात आले. त्यापैकी दुर्मीळ असा एक प्रकार म्हणजे ‘तांबोळा’. छोट्याछोट्या बैठकीत पान-विडा बनवण्याच्या सर्व पदार्थांनी सज्ज असे तबक असे. प्रत्येक जण त्याचा विडा त्याच्या आवडीप्रमाणे बनवून घेई. बैठकीला जास्त मंडळी असली तर तबक सहजपणे फिरवणे अडचणीचे होई. त्यामुळे विमान, मोटारी, गाडीचे इंजिन अशा आकारांचे आणि चाके असलेले पानाचे नावीन्यपूर्ण डबे अस्तित्वात आले.
एका कडीत अडकवलेल्या नारळासारख्या निमुळत्या कलशाला सर्व बाजूंनी साखळ्या सोडलेल्या असत. त्या प्रत्येक साखळीच्या टोकाला एकेक काटा आणि त्या प्रत्येक काट्यात तीन-चार विडे अडकवलेले असत.
आणखी काही तयार विडे वरच्या कलशात सज्ज ठेवले जात असत. एका वेळी पूर्ण तांबोळ्यात साठ-सत्तर विडे ठेवण्याची सोय असे. नृत्य किंवा गायन अशा मैफिलीत गाद्यागिरद्यांवर बसलेल्या शौकिनांना तबकाऐवजी तयार विडे रसिकतेने घेता येतील अशी सोय असलेला हा तांबोळा ! तांबूल धारण करणारा म्हणून ‘तांबोळा’. शौकिन त्यातून विडा सहजपणे काढून घेऊ शकत. साखळीच्या टोकाला बसवलेल्या घुंगरांमुळे विडा काढून घेऊन साखळी सोडून दिल्यावर नाजूकसा आवाज येई. कलशावर आणि त्याच्या झाकणावर सुंदर नक्षी असे.
सुरमादाणी – मुस्लिम स्त्रियांत डोळ्यांमध्ये काजळाऐवजी सुरमा घालण्याची पद्धत आहे. पुरुषही त्यांच्या डोळ्यांत सुरमा घालतात. सुरमादाणीच्या फिरकीच्या झाकणाला नाजूक शलाका जोडलेली असे. तसेच वेगळ्या नक्षीदार कांड्याही असत. त्यावरील नक्षीकाम मुस्लिमधाटणीचे असले तरी बरेचसे आकार मासा, आंबा, कोयरी, पिंपळ पान असे असत. सोनेरी रंगापेक्षा रुपेरी चमकदारपणा अधिक लोकप्रिय असे. त्यामुळे पितळी सुरमादाण्यांना चांदीचा किंवा निकेलचा मुलामा दिला जाई. सुरमादाणीच्या मागे किंवा सुरमादाणीला जोडून छोटासा आरसाही असे. सुरमा घालण्याच्या कांड्या धरण्यासाठी त्यांना मधोमध छोटीशी मूठ आणि दोन्ही बाजूंना निमुळती गुळगुळीत टोके असत. त्यामुळे सुरमा एकाच वेळी दोन्ही डोळ्यांमध्ये घालणे शक्य होई.
अशी ही सौंदर्य प्रसाधने स्त्रीचे मूळ सौंदर्य अधिकच खुलवतात. काळ कितीही बदलला असला, तरी स्त्रियांच्या मनाला सौंदर्य प्रसाधनांप्रमाणे त्यांची पदचिन्हेदेखील आजही तितकीच भुरळ घालतात !
– मकरंद करंदीकर 9969497742 makarandsk@gmail.com
(किस्त्रीम दिवाळी अंक 2016 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
—————————————————————————————————————————