1. गाव –
गावाची माहिती लिहिताना पुढील मुद्दे समाविष्ट करावे –
लेखन गावाबद्दलच्या जिव्हाळ्याने केलेले असावे. गावाचा तालुका आणि जिल्हा कोणता? गावाच्या नावाच्या उत्पत्तीची कथा-दंतकथा, गावात कोणकोणती मंदिरे आहेत? ग्रामदैवताचे नाव काय? त्याची माहिती. ग्रामदैवताच्या नावाने जत्रा किंवा यात्रा आहे का? तिच्यातील वेगळेपण, गावाचा इतिहास, स्थानिक कला आणि उत्सव, निसर्ग वैशिष्ट्ये गावात वा गावाजवळ असलेली लेणी-किल्ले किंवा इतर ऐतिहासिक-पुरातन वास्तू, शिलालेख, तेथील बाजार, गावात बनवला जाणारा वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ, सण साजरे करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती, गावात असलेल्या किंवा होऊन गेलेल्या उल्लेखनीय व्यक्ती, गावातील संस्था किंवा उपक्रम, गावाची लोकसंख्या, गावातील लोकांची भाषा-बोलीभाषा, गावातील नदी-तलाव, पावसाचे प्रमाण, शिक्षणाची सोय, पाणी आणि पिके यांची स्थिती, हवामान, पर्यटन स्थळ, गावातील इतर व्यवसाय, गावापर्यंत पोचण्याची वाहतूक व्यवस्था व मार्ग, चार-पाच किलोमीटर परिसरातील गावांची नावे, तसेच, गावाची इतर वैशिष्ट्ये! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तेथील माणसे – त्या माणसांच्या हकिगती, त्यांची कर्तबगारी.
2. व्यक्ती –
व्यक्तीचे पूर्ण नाव, वय, शिक्षण, छंद, आवड-निवड असे तपशील – त्यांचे कार्यक्षेत्र कोणते (शेती, शिक्षण, उद्योग, सामाजिक, कला इत्यादी) आहे?- कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे?, या पार्श्वभूमीचा कामासंदर्भात फायदातोटा झाला असल्यास तपशील, आयुष्यातील काही ठळक अनुभव, त्यांच्यावर एखाद्या व्यक्ती किंवा विचारसरणीचा प्रभाव असल्यास त्याविषयी मजकूर, त्यांनी साध्य केलेली विशेष गोष्ट, त्यांना मिळालेले सन्मान, अन्य काही उल्लेखनीय पैलू अथवा संकल्प, कुटुंब जीवन … अशा मुद्द्यांचा समावेश असलेला त्या व्यक्तीच्या कर्तबगारीची संपूर्णतेकडे जाणारी नोंद घेणारा लेख असावा. लेखन आस्थेने केलेले असले तरी व्यक्तिगत ओळखीने/जिव्हाळ्याने केलेले नसावे. त्यामुळे ताई/माई-अप्पा-भाऊ-दादा असे उल्लेख टाळावे.
3. संस्था –
संस्थेचे नाव, शिक्षण, समाजकार्य, उद्योग अशा कोणत्या कार्यक्षेत्रात काम चालते?, स्थापना कधी व कशी झाली? संस्थापक कोण? संस्थेचे उद्दिष्ट? कोणते प्रमुख उपक्रम झाले व सुरू आहेत? संस्थेच्या कामाचा गावावर तसेच समाजावर झालेला परिणाम? पुढील संकल्पित उपक्रम? संस्थेपुढील आव्हाने?, संस्थेला वा प्रमुख कार्यकर्त्यांना या कामासाठी काही पुरस्कार-सन्मान मिळाले आहेत का? संस्थेच्या वाटचालीतील काही लक्षणीय अनुभव…. अशा मुद्द्यांचा लेखात समावेश असावा.
४. संस्कृतिसंचित –
या मध्ये खूपच वैविध्य असलेले विषय असू शकतात. त्यामुळे त्याविषयी मुद्दे लिहिण्याच्या सोयीसाठी चार उपविभाग केले आहेत.
अ. वास्तू –
वास्तूचे स्वरूप, धार्मिक (मंदिर-मठ-मशीद-समाधी इत्यादी), प्रसिद्ध व्यक्तीचे निवासस्थान, ऐतिहासिक म्हणजे वाडा-गढी-लेणे असे कोणत्या प्रकारचे आहे? भौगोलिक स्थान कोठे आहे? वास्तू कोणी व कधी बांधली? वास्तूचे महत्त्व काय? रचना व शैली कशी आहे? वास्तूचा उपयोग कशासाठी होता व आहे? संबंधित उल्लेखनीय व्यक्ती, घडलेल्या ठळक घटना… असे मुद्दे असलेला लेख असावा.
ब. प्रथा-परंपरा, सण-उत्सव, यात्रा-जत्रा –
कोणत्या धर्म/पंथ/समाजाशी संबंधित आहे? कालावधी कोणता असतो? काय निमित्ताने आयोजन होते? सुरुवात कशी झाली? साजरा करण्याची रीत? यात असलेले स्थानिक वेगळेपण कोणते? इ. तपशील असावेत.
क. कला/ क्रीडा –
याचे स्वरूप व्यक्तिगत / सामूहिक कसे आहे? सादरीकरणाचे तपशील काय आहेत? वेगळेपण वा वैशिष्ट्ये कोणती आहेत? त्यातील प्रसिद्ध कलाकार/खेळाडू कोणते? संबंधित किस्से अशी माहिती असावी.
ड. खाद्यसंस्कृती –
इतर ठिकाणांपेक्षा स्थानिक खाद्यपदार्थाचे वेगळेपण, पदार्थ कसा केला जातो? काय निमित्ताने केला जातो? स्थानिक घटक? ठरावीक काळात होतो का? घरगुती आहे की व्यावसायिक प्रकारे विक्री होते? करणाऱ्याविषयी काही किस्से – माहिती… असे मुद्दे असावेत.