स्त्रीपुरूष तुलना – काल आणि आज (Comparing Men and Women – Yesteryears and Now)

9
1093

ताराबाई शिंदे यांचा ‘स्त्रीपुरूष तुलना’ हा निबंध सन 1882 मध्ये प्रकाशित झाला. एका विधवा स्त्रीने केलेल्या भ्रूणहत्येमुळे खवळून उठलेल्या आणि त्या स्त्रीला धारेवर धरणाऱ्या समाजावर धारदार लेखणीने ताराबाईंनी या निबंधात अक्षरश: कोरडे ओढले आणि त्यावर मीठही चोळले. हिंदू शास्त्र-पुराणांविषयी आणि देवादिकांविषयी तर त्यांचे विचार असे जहाल आहेत की ते वाचताना आज त्या हयात नाहीत हे लक्षात येऊन हायसे वाटते. त्या स्वदेशी उद्योगधंद्यांच्या -हासाचीही चिकित्सा करतात. तर्कशुद्ध पद्धतीने समाजातले दोष दाखवून त्यामागची कारणे विषद करतात. काळाच्या मर्यादेत सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात लक्षवेधी काय असेल तर त्यांच्या स्वभावातला सडेतोडपणा आणि भाषेतला रोखठोकपणा!

‘महिला दिन’ (2024) मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर ‘स्त्रीपुरूष तुलना’ ह्या निबंधाकडे आजच्या परिप्रेक्ष्यात पहात आहेत आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांची जाण असणाऱ्या ललित लेखिका राणी दुर्वे.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

‘स्त्रीपुरूष तुलना’ – काल आणि आज

महात्मा जोतिबा फुले यांच्या ‘सत्सार’ अंक 2 मध्ये ज्या ‘स्त्रीपुरूष तुलना’ या कै. ताराबाई शिंदे यांच्या पुस्तकाचा गौरवाने उल्लेख केलेला आहे त्यांच्या निबंधाचा परामर्ष 8 मार्च म्हणजेच महिला दिनाच्या (2024) निमित्ताने घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न. हा निबंध 1882 साली प्रसिध्द झाला. ताराबाई शिंदे यांचा काळ 1850 ते 1910 असा मानला जातो. ज्या काळात फार फारतर स्त्रियांनी पोथ्या-पुराणे वाचावीत, त्याविषयी आदरभावाने बोलावे, झोपाळ्यावर बसून गाणी गावी, हळदी-कुंकू करावे अशा काळात एखाद्या स्त्रीने स्वतंत्र पुस्तक लिहून चर्चात्मक विचार मांडावे हे संपूर्ण समाजासाठी धक्कादायक होते. निबंधाचे तात्कालिक कारण एका घटनेचे असले तरी त्या निमित्ताने त्या काळच्या समाजातील अनिष्ट रुढी-परंपरा व विचार यांचे ताराबाईंनी अक्षरश: विच्छेदन (Dissection) म्हणावे असे विवेचन केले आहे. निबंधाची भाषा काहीशी जरडभरड, सडेतोड, आक्रमक व थेट आहे ! भाषेला कोठेही गुळमुळीतपणा म्हणून नाही. विजयालक्ष्मी नावाच्या एका तरुण विधवेने केलेली भ्रूणहत्या आणि त्या नंतर ‘पुणेवैभव’सारख्या सनातनी वृत्तपत्राने केवळ तिच्यावरच नव्हे तर त्या घटनेमुळे समस्त स्त्रीजातीविरोधी उठवलेली टीकेची झोड हे निमित्त ! ताराबाईंनी वैभवकारांना प्रत्युत्तर करताना समस्त पुरुषवर्गाची आणि त्यांच्या तथाकथित समजुतींची अगदी खरडपट्टीच काढली आहे. कोणा एखाद्या स्त्रीची एखादी चूक ही सगळ्या स्त्रीजातीचेच प्रतिनिधित्व करते आणि पुरुषांनी केलेल्या चुका मात्र वैयक्तिक ठरतात हे तर आजघडीलादेखील सत्य आहे. ताराबाई त्यांच्या निबंधात विजयालक्ष्मीच्या घटनेचा उल्लेख करुन त्याचा परामर्ष घेता घेता सगळ्या स्त्रीजातीविरोधात पुरुष कसे पक्षपाती व अन्याय्य होतात आणि एकूण स्त्रीजातीवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांचे खंडन त्या ज्या पोटितिडिकेने करतात ते 2024 सालपर्यंत स्त्रियांनाही लागू व्हावे या परते दु:ख ते काय? काळानुसार, समाजानुसार प्रश्न वेगळे असतील पण स्त्रीच्या दुय्यम असण्याविषयी पुरुषांच्या विचारांची धारा तीच ! त्यात बदल नाही.

ताराबाई निबंधाच्या प्रस्तावनेत लिहितात, ‘रोज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीची नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असतानाही तिकडे कोणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दोषांची गोणी लादतात, हे पाहून स्त्रीजात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून तळतळून गेले, त्यामुळे मला निर्भीड होऊन असेच खडखडीत लिहिल्यावाचून रहावेना.’ स्त्री म्हणजे – जारणमरण यंत्र, संशयपरिभ्रमाचा भोवरा, उध्दटपणाचे माहेरघर, अविचारकर्माचे नगर, सकलदोषांचे निधान, कपटाची खाण, दुर्गुणांचे उत्पत्तिस्थान, मोक्ष मार्गातील धोंड ! काळ आहे 1850 नंतरचा. ब्रिटिशांच्या अंमलाखालील प्रदेशात सती प्रथेवर बंदी 1829 पासून होती, पण विधवा स्त्रीचे केशवपन करून, अलंकार, रंगीत वस्त्रे नेसण्याचा तिचा अधिकार हिरावून घेऊन व पतीनिधनाचा दोष तिच्याच माथी मारून तिला घराच्या काळोख्या खोल्यांमधून कोंबणारा हा समाज आहे. एकत्र कुटुंबपध्दतीत माघारी येणाऱ्या लेकी-सुनांवर त्या काळोखात किती अनन्वित अत्याचार झाले असतील याची कल्पनाही करता येणार नाही. त्यातून होणारे असंख्य गर्भपात, भ्रूणहत्या आणि स्त्रीहत्या याला केवळ ‘काळोखच साक्षी’ असा हा एकूण समाज! काळोखात होणाऱ्या चुकांची जबाबदारी स्त्रीच्या माथी. पुरुष नामानिराळे! पुन्हा शहाजोगपणे कोट-टोपी घालून स्त्रीविरोधात होणाऱ्या सभांस जाण्यास राजरोस मोकळे. स्त्रियांवर लादले जाणारे सगळे दोष हे मूळात पुरुषांतच कसे प्रामुख्याने आहेत आणि स्त्रियांच्या चुका होत असतीलच तर त्याला शास्त्र-पुराणे आणि पुरुषच कसे जबाबदार आहेत हे एकामागोमाग एक मुद्दे मांडत सांगताना ताराबाईंना सतत स्त्री-पुरुष वर्तनाची तुलना करावी लागत असल्यामुळे निबंधाचे नावही समर्पक व रोखठोक. ‘स्त्रीपुरुष तुलना’!

एखाद्या कसलेल्या फलंदाजाने चौफेर चेंडू मारावेत तशा कुशलतेने त्या पुरुषांना प्रश्र्न विचारुन जेरबंद करु पहातात. वानगीदाखल सांगायचे तर –

‘अरे, तुम्ही इसापनीतीतील उंदराच्या सभेतील उंदराप्रमाणे आहात. मांजराचे गळ्यात घंटा बांधावी हे खरे तोंडाने मात्र म्हणता पण पुढे होतो कोण?’

‘अरे नवऱ्याआधी बायकोने मरावे किंवा बायकोने नवऱ्याआधी मरावे याचा तुमच्या बापदादांनी देवांपासून काही दाखला आणला का रे?’

‘स्त्रीचा नवरा मेला तर ती अभागी करंट्या कपाळाची. तिचे तोंड पाहू नये. अपशकून  होतो. अरे, पण तिचा पती मेला, तो का तिने मारिला? देवांजवळ, ‘या नवऱ्याला देवा, तुम्ही लवकर न्याहो’ असा काही तिने अर्ज केला होता?’

‘पतिनिधनानंतर स्त्रीला केशवपन करायला लावून तिला घरात डांबून ठेवता, मग त्याच न्यायाने पत्नी मेल्यावर तुम्ही आपली दाढी-मिशी भादरुन अरण्यात का रहात नाही?’

‘पुरुषांनी अनेक बायका करणे शास्त्राला चालते, मग स्त्रियांना अनेक पती करण्याची मुभा का नसावी?’

‘अरे, तुमचा शूरपणा जोवर अजमावून पाहिला नाही तोच तुमचा आब. झाशीच्या राणीसारख्या फार नकोत पण एक चारपाचशे स्त्रियांना नि:संग होऊन हातात संगिनी घेऊ द्या. मग पहा तुमची कशी दुर्दशा उडेल ती. अरे, मग चुलीजवळ सुध्दा लपण्यास जागा मिळणे कठीण.’

‘अरे, तुम्ही असे अट्टल हुशार कोल्हे… तुमच्यापेक्षा बैल बरा…’ अशी सर्व शेलकी विशेषणे वापरुन निबंध लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे बुलढाण्याच्या. सासरप्रमाणे त्यांचे माहेरचे आडनावही शिंदेच होते. माहेरचे घराणे श्रीमंत. ताराबाई जात्याच हुशार. वडिलांची एकुलती एक, लाडकी लेक. त्यांनी काळाचा विचार करता तिला चांगलेच शिकवले. त्यांना मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेचे चांगले ज्ञान होते. खरे तर ताराबाईंना लग्नच करायचे नव्हते, पण त्या काळची जनरीत म्हणून घरजावई करुन आणला. परंतु ताराबाईंना संसारसुख लाभले नाही. त्या कोर्टकचेरीच्या कामासाठी घोड्यावर बसून जात. लेखनादी अनेक सुप्त गुण अंगी असतीलही पण सामाजिक पडदापोषी व बायकांनी समाजात पुढे न येण्याची पध्दत त्यामुळे त्यांचे अधिक लिखाण प्रकाशात आले नसावे. असाही उल्लेख सापडतो की त्यांच्या  करड्या व्यक्तिमत्त्वाचे आजुबाजूच्या मुलांस भय वाटे. ठेंगणी-ठुसकी, डोळ्याला जाड चष्मा, हातात काठी घेऊन शेतावर जाणारी, रागीट स्वभावाची बाई असे त्यांचे वर्णन समोर येते. त्या स्वत:बद्दल लिहिताना म्हणतात, की ‘तरी मी निरंतर म-हाटमोळ्याचे अटकेतील गृहबंदी शाळेतील मतिहीन अबला असून हा माझा पहिलाच प्रयत्न…’ किंवा ‘कित्येक श्रीमंत लोकं आपल्या लाडक्या लेकीचे लाडाकरिता एखाद्या गरीब मुलाबरोबर लग्न करून ते जोडपे जवळ बाळगतात’ अशांसारखी वाक्ये या निबंधातली त्यांची स्वत:ची त्यातील वैयक्तिक गुंतवणूक आणि दु:ख जाणवून देतात. पहिल्याच प्रयत्नात लिखाणातला हा जो धुवांधार जोरकसपणा आहे त्याचा अंत:प्रवाह त्यांच्या स्वत:च्या व्यथेतही असावा.

एकूणच, हिंदूंची शास्त्रे अनेक, त्यात एकवाक्यता नाही. त्या काळात तथाकथित वरच्या जातींमध्ये विधवांवर अधिकच कडक बंधने लादली जात. त्यांचेच अनुकरण खालच्या जाती करू पहात. बालविवाह, विषम वयाच्या माणसांशी लग्न, स्त्रीच्या मनाचा विचार नाही, एकापाठोपाठ एक अशी दहा-बारा बाळंतपणे, स्त्रीला शिक्षण नाही, विधवेच्या विवाहाचा तर विचारच नाही, पुरुषाचे बहुपत्नीकत्व, हुंडापध्दत, क्वचित सतीत्वाकडे लोटणेही… ह्या समाजात, हिंदीमध्ये ‘दबोचना’ म्हणतात तसे स्त्रीला समाजाने पंजाखाली घट्ट जखडून ठेवले होते. आणि त्या विरोधात म्हणावा तसा आवाज कोणीच उठवत तर नाही उलट ‘पुणेवैभव’कारासारखे सनातनी लोक विजयालक्ष्मीसारख्या प्रकरणांचा बाऊ करून समस्त स्त्रीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावत आहे हे पाहून ताराबाईंनी लेखणी हातात घेतली आहे. संपूर्ण निबंधात शास्त्रे-पुराणांचे दाखले बाई सहज देतात. बाई केवळ बहुश्रुत नव्हे तर त्यांचे वाचनही चौफेर आहे. त्या मराठी म्हणी – वाक्प्रचार, संस्कृत वचनांचा आणि इंग्रजी वाक्यांचाही चतुराईने वापर करतात. 

त्या पुरुषांविषयी जहाल भाषा वापरून स्त्रियांविषयीच्या तळमळीने स्त्रीवाद मांडतात. मात्र हा स्त्रीवाद आपल्याला ज्ञात असलेला विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातला स्त्रीवाद नव्हे. स्त्री स्वातंत्र्याचा किंवा स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार त्या करत नाहीत. स्त्रीने अंगभर कपडे ल्यावे, परमेश्वराने स्त्रीपुरुषांचा जोडा परस्परांच्या सुखासाठी निर्माण केलेला असून अनुरूप पती मिळाल्यास तिच्या सुखाला पारावार रहात नाही असेच त्यांचे म्हणणे आहे. शील हेच स्त्रीचे भूषण, माता व पत्नी म्हणून आपली कर्तव्ये सदाचरणाने बजावून लक्ष्मी हे आपले बिरुद तिने सार्थ करावे व सासर-माहेर दोन्हीकडच्या माणसांचे मन जिंकावे अशीच त्यांची धारणा आहे. तसेच, जरी अत्यंत तळमळीने त्या त्यांच्या निबंधात स्त्रियांची बाजू मांडत असल्या तरी त्यांच्या मते जिथे झोडायला हवे तिथे स्त्रियांनाही झोडायला त्या कमी करत नाहीत. आपल्याच पुरणांतील तथाकथित पतिव्रतांचीच नाही तर देवादिकांचीही नालस्ती करण्यास त्या मागेपुढे पहात नाही आणि मग म्हणतात की करणेच भाग पडले म्हणुन मी दोनतीन देवांची निंदानालस्ती केली आहे. पाहिजे तर त्यांची क्षमा मागेन, पण देवही पडला पुरुषच!

मुळात त्यांचा सरळ सरळ हल्ला आहे तो नवरा मेल्यानंतर स्त्रीला रुढी, परंपरांच्या काचात बांधून तिला पुनर्विवाह करण्यास परवानगी न देणाऱ्या समाजावर आणि पुनर्विवाहाची सोय नसल्यामुळे जर विधवा स्त्रीचे पाऊल घसरले किंवा तिला वाकड्या वाटेने जाण्यास भाग पाडले गेले तर सगळा दोष तिच्या माथी मारण्याच्या पुरुषी प्रवृत्तीवर! पुरुषाचे वय कितीही असो, तो विधुर झाला की पत्नीच्या मृत्यूनंतर अल्पावधीतच बोहल्यावर चढतो. तो आपल्याहून निम्म्या वयाच्या स्त्रीला वरतो. हे समाजाला मान्य आहे. का तर पुरुषाला स्त्रीशिवाय चैन पडत नाही! पण जर पुरुष स्त्रीशिवाय राहू शकत नाही तर पती मेला म्हणून स्त्रीला का मन आणि शरीर नाही? तिचे केशवपन करून, तिचा सगळा साजशृंगार उतरवून ठेवून तिला असुंदर केले म्हणून तिची शरीरेच्छा संपली का? त्या इच्छेमधून जर तिने शरीरसुख घेतले (ज्याची नालस्ती पाऊल घसरले म्हणून समाज करतो) तर दोष तिचा की स्त्रीला तन, मन, बुद्धी नाही हा (गैर)समज बाळगणाऱ्या पुरुष जातीचा, हा त्यांचा थेट प्रश्र्न आहे.

इथे जरा थांबून विचार करावे तर लक्षात येते की ताराबाई सरळ सरळ बोलत आहेत, की कामेच्छा ही केवळ पुरुषांना असते असे मानू नका; तर ती स्त्रीलाही असते आणि नवरा मेला म्हणून तिचे शरीर, शरीरसुख – जी नैसर्गिक भावना आहे; ती विसरते असे नाही. त्यातून तिचा पाय घसरला तर रान उठवले जाते, पण पुरुषाइतकेच शरीरसुख हा स्त्रीचा हक्क आहे आणि ते तिला मिळायला हवे. त्या साठीच पतिनिधनानंतर स्त्रीला अंधारात कोंडून न ठेवता तिच्या पुनर्विवाहाचा विचार व्हायला हवा. पुरुषांप्रमाणेच तिलाही पुन्हा बोहल्यावर चढण्यास मान्यता मिळावी. The desire of women for sex – आजही हा विषय घाईघाईने गालिच्याखाली दडवून ठेवायचा विषय आहे. स्त्रीच्या मातृत्वाचे देव्हारे माजवले जातात पण तिच्या शरीर गरजा आणि भावनांचा आदर व स्वीकार करायला हवा हा विचार आजचे पुरुष तरी मानतात का? तसेच, स्त्रियादेखील अजूनही कामेच्छा व्यक्त करणे हा आपला प्रांत नव्हे या भ्रमातच जगण्यात समाधान मानतात.

जसे कादंबरीत मुख्य कथानकाला अनेक उपकथानके असतात तसेच अनेक उपविषय ताराबाई मांडत जातात. कधी चक्क देवादिकांना नावे ठेवतात, पुराणात ज्या पतिव्रता मानल्या जातात त्यांच्याच पातिव्रत्याबद्दल शंका उपस्थित करतात, तर कधी इंग्रजांच्या राज्याला दुवा देतात तर कधी समाजबदलामुळे येणारे बेरोजगारीसारखे आर्थिक प्रश्न आणि स्वदेशीवादही मांडतात. येथे लक्षात घेतले पाहिजे, की स्वदेशी चळवळ सुरु होण्याच्या कितीतरी आधी त्या स्वदेशी व्यवसाय मोडकळीत येत असल्याबद्दल पोटतिडिकेने बोलतात. बाईंच्या म्हणण्यानुसार (सन 1882 मध्ये) इंग्रज लोकांच्या चाली या देशातील कुणा एकाच जातीने घेतल्यात असे नाही; तर सर्व जातींत पोशाखाच्या चाली पार बदलून गेल्या आहेत. पूर्वीचे किनखापाचे ठाणचे ठाण, भरजरी पोशाख, शिरपेच मंदिल, चंदेरी दुपट्टे, पैठणी, लफ्फेदार पागोटे, नागपुरी धोतरजोडे नाहीसे झाले आहेत आणि नवऱ्यानेच नवी तऱ्हा घेतली तर बायकाही त्याप्रमाणे करु लागल्या आहेत.

‘सारांश, सांप्रत सर्व पहिली सुदशा जाऊन आपल्या देशास अवकळा येऊ लागली. या तुमच्या भिकार चाळ्यांनी (हे पुरुषांना उद्देशून आहे) सर्व प्रकारचे आपले स्वदेशी रोजगार बुडून हर एक प्रकारचे व्यापारी व कसबी कारागीर लोक उपाशी मरू लागले आहेत. वैभव हटत चालले. विधवा स्त्रियांची व या गरीब कारागीर लोकांच्या मुलाबाळांची कनवळा येऊन तुम्ही आपल्या देशाकडे पुन्हा पहिल्यासारखे नजर फिरवून आपापले धर्म, चाली, देशरिवाज न सोडता स्वदेशाभिमानी व्हावे’.

मजा अशी वाटते, की तेच तर आपण सांप्रत काळातही बोलत आहोत की इथल्या मातीतले व्यवसाय प्रामुख्याने रुजवले पाहिजेत, परकीय बनावटीच्या वस्तूंपेक्षा भारतीय मालाला आपलीच बाजारपेठ उपलब्ध करुन दिली पाहिजे. आपल्या देशातील start-ups ना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. मॉलच्या बाहेर असलेल्या वाण्याचे दुकान टिकून राहिले तर देशाचा विकासदर वाढेल. देशांतर्गत उत्पादन किंवा विकासाचा दर आदी बाबींपासून कोसो मैल दूर असलेल्या गोष्टींचा विचार ताराबाई शिंदे सन 1882 मध्ये मांडत आहेत हे विशेष आहे.

सन 1882 पासून 2024 या काळात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे हे तुम्हा-आम्हा सर्वांस माहीत आहे. त्या काळच्या समाजाचे प्रश्न आज राहिले नाहीत. स्त्री व पुरुष यात साहसी कोण अशी तुलना ताराबाई करत होत्या. त्या निमित्ताने त्या सतत स्त्रिया व पुरुष दोघांनाही तराजूत तोलत रहातात. मनात येते, की काळाच्या फार पुढे आणि आज घडीलाही तसे म्हटले तर समकालिन असणाऱ्या ताराबाई आज स्त्रीपुरुष-तुलना लिहीत असत्या तर काय लिहित्या…

‘अरे तुम्ही मारे स्वत:ला साहसी, शूरवीर समजता पण त्या एका यत्कश्चित विषाणूने तुम्हांस दाखवून दिले की घाबरणे हा काही केवळ स्त्रियांचा प्रांत नव्हे. मृत्यूला स्त्री-पुरुष असा भेद नाही हे एका विषाणूने तुम्हांस दाखवून दिले. स्त्री शिकली-सवरली, भल्या भल्या क्षेत्रांत तिने नाव काढले तरी स्त्री-पुरुष भेदाभेद काही तुमच्या मनातून पुसला जात नाही आणि म्हणूनच बहुधा या विषाणूने अवतार घेऊन सगळ्यांना एका पातळीवर आणून बसवले. मी कर्ता, करविता, पोशिंदा हा भ्रम आजही काही तुमच्यातून जात नाही. स्त्रीला अक्कल कमी, तिच्यापेक्षा आपण हुषार. मग भले ती कामाच्या ठिकाणी कितीही उच्च पदावर असो, हा तुमचा विचार. स्वैपांकघरातील काम, मुलांच्या संगोपनाचे काम, म्हाताऱ्या सासू-सास-यांचे काम हे काय केवळ स्त्रीचे का रे? कोणे एके काळी, ती अर्थार्जन करत नव्हती, तर घरसंसाराची जबाबदारी तिच्यावर टाकून बाहेर ओसरीवर तुम्ही गावगप्पा ऐकत होता. तेंव्हा निदान अर्थार्जनाचे काम पुरुषाचे आणि घर-संसाराचे रहाटगाडगे स्त्रीचे अशी विभागणी होती. पण आज तसे नाही. आज कामावरुन स्त्री दमून घरी येते तर तिच्यासाठी साधा डाळ-भात शिजविण्याचे तंत्रही तुम्हांस अवगत नसावे? मुलांचा अभ्यास तिनेच घ्यायचा, शाळेतल्या मिटिंगांना तिनेच जावे, भाजी-बाजार-बॅंकेतली कामे तिनेच करावी, धापा टाकत नोकरी करावी, घरी येऊन स्वयंपाक करावा, सासू-सास-यांची सेवा करावी आणि तुम्ही बहाद्दर बसणार टीव्हीपुढे गावगप्पा ऐकत ! आणि स्त्रिया तर काय, त्यांना वाटते की घरची, दारची सगळी कामे त्यांनीच करावीत. अष्टभुजा देव्या होऊन आपल्या पतीला अधिकाधिक आराम द्यावा कारण सगळी कामे त्याच उत्तमरीतीने करु शकतात. शिक्षण-पदवी घेतली, स्वत: बक्कळ पैका कमवला तरी पैशाच्या गुंतवणुकीसाठी त्या पुरुषांच्याच तोंडाकडे पहाणार. जणू गुंतवणूक म्हणजे मंगळावर यान पाठवण्याइतके गहन काम. पण मंगळावर यान पाठवणेही स्त्रीला जमलेच की ! तरी मंगळावर यान उतरण्यात थोडी चूक झालीच तर सोफ्यावर आडवा पडलेला पुरुष म्हणणार की बायकांना काय जमते !’

असो. क्षणभर अंगावर घातलेली ताराबाईंची शाल आणि जोडेही उतरवून ठेवावे तर – 

विसाव्या शतकात जगभर वेगाने घडामोडी होत गेल्या. न भूतो न भविष्यती असे बदल समाजात घडले. तंत्रज्ञान विकसित झाले. सध्याच्या समाजस्थितीचा विचार करता केवळ सव्वाशे-दीडशे वर्षांत शिक्षणालाही पारख्या असलेल्या स्त्रीला आता कोठलेच क्षेत्र वर्ज्य राहिले नाही. स्त्रीस्वातंत्र्य हा काही आता तसा नवा विचार राहिला नाही. स्त्री स्वातंत्र्याच्या विविध लाटा युरोप-अमेरिकेतून आपल्यापर्यंत पोचत राहिल्या. त्यातून जगभर स्त्री-स्वातंत्र्याची चळवळ जोडली गेली. नवा आयाम, नव्या व्याख्यांनी स्त्रीकडे पाहू जाऊ लागले. स्त्री बदलत गेली. घडत गेली. शिक्षणापासून वंचित अशी ताराबाईंच्या जगातली स्त्री शतकभराच्याच वाटचालीत कुठल्याकुठे झेपावली. सुरुवातीला तिच्या क्षमतेवर प्रश्र्न करणाऱ्या पुरुषाशी तिने प्रत्येक क्षेत्रात बरोबरी केली. स्त्रीस्वातंत्र्याचा काहीसा एकांगी विचारही कालांतराने दूर सारत आज पण पोचलो आहोत लिंग समानतेच्या विचारापाशी (Gender Equality). स्त्री आणि पुरुष यांच्यात असलेला शरीर फरक मान्य करून सामाजिक, आर्थिक आणि कायदा यांबाबत त्यांच्यात असलेल्या समानतेवर आपण बोलत आहोत. स्त्रियांनी काय कपडे ल्यावे, शरीर संबंध कुणाशी ठेवावे, मूल होऊ देण्याचा त्यांचा अधिकार, लग्न करावे न करावे हा तिचा विचार या सर्व बाबींच्या स्वातंत्र्याबाबत आपण आज बोलत आहोत. एकूणच आचारविचारांचे स्वातंत्र्य तसेच तिच्या देहावर सर्वस्वी तिचा अधिकार याविषयी जागरुकता निर्माण होत आहे. एकोणिसाव्या शतकात कुणा विजयालक्ष्मीला भ्रुणहत्या करावी लागली तर आजच्या स्त्रीला संतती निर्मिती किंवा गर्भपाताचा अधिकार हवा आहे. स्त्रीस्वातंत्र्याचा नवा विचार स्त्रीच्या पुनरुत्पादक आरोग्याशी निगडीत आहे. घरातच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही तिला सुरक्षित वातावरण, यौन उत्पीडनापासून (sexual harrasement) मुक्ती आणि सभ्यतेची, प्रतिष्ठेची व बरोबरीची वागणूक मिळावी इथवर आपण येऊन पोहोचलो आहोत. आणि इथेच पुरुषांची कसोटी आहे. त्यांच्या परिपक्वतेची परीक्षा आहे. कारण आज घडीलाही वेगवेगळ्या प्रकारे विजयालक्ष्मी आणि वैभवकार पुरुष आहेतच. स्त्रीला दुय्यम मानणाऱ्या पुरुष शिरोमणींची कमतरता नाही. काही उघडपणे तर काहीजण छुपेपणाने! संसारात अशा किती एक बाबी आहेत की पुरुषाला आपले पुरुषपण सोडवत नाही. स्त्रीच्या शरीरावरचा हक्क सोडवत नाही. कामाच्या ठिकाणी भल्या भल्या पुरुषांनाही स्त्रीमध्ये असलेल्या क्षमता मान्य करण्यात अडचण येते. तिला अर्थव्यवहारात पुरुषापेक्षा कमी दाम, कमी संधी दिल्या जातात. Me too सारखी चळवळ जात-पात-उच्च-निच्च-श्रीमंत-गरीब-काळा-गोरा असे भेदाभेद पार करून जगभरातील अनेक स्त्रियांना जोडते, यातच पुरुषांचा स्त्रीविचार अधोरेखित होतो.

स्त्री मुक्ती चळवळ आणि प्रत्यक्ष स्त्रीचे स्थान व पुरुषाचे भान यावर स्वतंत्रच लिहावे लागेल. सध्या फक्त एवढे की तंत्रज्ञानाच्या या आधुनिक युगात जिथे बीजही उपलब्ध होऊ शकते, गर्भधारणेसाठीही पुरुषाची गरज उरलेली नाही तिथे पुरुष आपला अहंकार कुरवाळत राहिले तर शतकभरातच पार अंतराळापार पोचलेली स्त्री केव्हा त्याच्या कक्षेबाहेर जाईल हे त्यालाही कळणार नाही. ज्या स्त्रीला स्वत:मधील सुप्त शक्तीचा परिचय होतो तिला तसे कुणावर अवलंबून रहाण्याची गरज रहात नाही. तिला मग असलीच तर पुरुषाची नाही, पुरुषातल्या माणसाची आवश्यकता असते. अर्थातच दूषणे समस्त पुरुषवर्गाला देण्याचा जराही मकसद नाही; तरीही प्रत्येक पुरुषाने मनातल्या मनात आपल्या पुरुषपणाची पायरी जोखावी, एवढेच! ताराबाईंच्याच शब्दात सांगायचे तर परमेश्वराने स्त्रीपुरुषांचा जोडा परस्परांच्या सुखासाठी निर्माण केलेला असून दोघांनीही स्त्री-पुरुष होण्यापलीकडे माणूस होऊन जगावे !

तुलना नक्कीच नाही, पण एक आठवण. खूप वर्षांपूर्वी हैदराबादच्या एका झू मध्ये आम्ही गेलो होतो. बरोबर आठ-नऊ वर्षांचा भाचा होता. चिंपाझीच्या पिंजऱ्यासमोर जाऊन उभे राहिलो, तर काही क्षण चिंपाझीकडे पाहून भाचा विचारता झाला, की ‘माकडाचा माणूस कधी होणार?’ लहान मुलांच्या कोठल्याही शंकांचे निरसन करायलाच हवे या विचाराने आम्ही तत्परतेने त्यास डार्विनची थिअरी वगैरे सांगू लागलो. तो म्हणाला, ‘ते ठीक आहे पण ‘ह्या माकडाचा माणूस’ कधी होणार?’ समोरील पिंजऱ्यातल्या माकडाचा माणूस होण्याची तो वाट पहात आहे हे काही सेकंदांनंतर आमच्या लक्षात आले!

रतन थिय्यामने केलेले कालिदासाचे ‘ऋतुसंहार’ एकदा पाहिले होते. त्यात सर्व नाटकभर एक निरीक्षक (Observer) थोड्या थोड्या वेळाने रंगमंचावर फेरी मारत घडणाऱ्या गोष्टी न्याहाळत असतो. सुरुवातीला त्या माणसाचे प्रयोजन लक्षात आले नाही, पण नंतर लक्षात आले की असाच एक निरीक्षक आपल्यात सतत असतो जो घडणाऱ्या सर्व गोष्टी न्याहाळत असतो. जगात भोवतालच्या रंगमंचावर खूप काही घडत असतेच, जे आपण तटस्थ नजरेने न्याहाळत असतो. आजच्या काळातही स्त्रीला दुय्यम मानत स्वत:भोवती पुरुषपणाच्या अहंकाराचे वलय घेऊन वावरणाऱ्या पुरुषाला पाहिले, की मी विचार करते की ‘या पुरुषाचा माणूस कधी होणार’? असो. तर, 8 मार्च महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही केवळ स्त्री-पुरुष असण्यापलीकडे ‘माणूस’ होण्याच्या शुभेच्छा!

सांप्रत काळात!      

– राणी दुर्वे 9619663972 ranidurve@gmail.com
संदर्भ – संशोधक-समीक्षक डॉ. स. गं. मालशे- प्रस्तावना खंड, जन्मशताब्दी-विशेष आवृत्ती (पृ. क्र. 263 -289)

About Post Author

9 COMMENTS

  1. ताराबाई शिंदे यांच्या सडेतोड विचारांचे सांप्रत कालोचित सडेतोड समालोचन. खूप छान..

  2. अतिशय सुंदर लेख! सर्वसमावेशक विश्लेषण. ताराबाई शिंदे यांची शाल पांघरून लिहिलेला परिच्छेद खूप आवडला. प्रत्येकाने वाचलाच पाहिजे असा लेख.

  3. स्त्रीपुरूष तुलना नव्हे त्यांचा वागण्या , बोलण्या , रहाण्या बद्दलच्या कल्पना आणि अपेक्षा ह्याबद्दल समाजांत त्यातल्यात्यात भारतीय समाजांत प्रचंड विरोधाभास आहेत त्यात जात , धर्म , आर्थिकस्तर , ग्रामीण अथवा शहरी ह्या परीस्थीतीनुसार फरक आहे . सुधारणा आहे पण त्याचा वेग नगण्य आहे . ताराबाईंचा त्या काळचा लेख तेंव्हाच काय पण आजही खळबळजनक आहे .
    एका महत्वाच्या विषयावर लिहील्याबद्दल मन:पुर्वक अभिनंदन💐💐

  4. ताराबाईंच्या लेखाचे अभ्यासपूर्ण समालोचन ! आणि तेही बायकोने माहेरचे नाव लावताना नवऱ्याची परवानगी हवी का हा मुद्दा चघळताना ! किती युगे मागे चाललोय आपण !! 😪😪

  5. खूप छान व परखड विचार मांडले आहेत. २०२४ मध्येही परिस्थिती फारशी बदललेली नाही. जोपर्यंत समाज पुरुषी अहंकार, अहंगंड सोडत नाही तोपर्यंत ताराबाईंच्या रूपाने असे निबंध स्त्रियांना लिहावेच लागतील. ते काम तुम्ही केलं आहे. अभिनंदन व शुभेच्छा.

  6. फारच सुंदर आणि परखड विचार आपण मांडले आहेत पुरुषांचा मानव कधी होणार बदलाचा वेग फारच कमी आहे तुमच्या विचारांशी पूर्ण सहमत

  7. 1882 सालातला कालौघात मागे पडलेला जुना लेख, जो आजच्या एकविसाव्या शतकातही जुना झालेला नाही, असा लेख ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणला ह्या बद्दल अभिनंदन. ताराबाईंचे सडेतोड आणि निर्भीड विचार आणि त्यावरच आजच्या काळाच्या संदर्भातील समीक्षण छान उतरलं आहे. महिलादिनाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख जास्तीतजास्त पुरुष वाचकांपर्यंत पोचावा.

  8. उत्तम लेख! ताराबाई शिंदे यांच्या लेखनाची ओळख करून दिल्याबद्दल आभार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here