चौल, शूर्पारक आणि ‘मडफ्लॅट्स’ (Chaul, Shurparak and Mudflats)

चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर. त्याचा उल्लेख चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अशा विविध नावांनी इतिहासात आढळतो. चौलचा उल्लेख घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखातदेखील आढळतो. चौल बंदरात 1470 साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचे नाव अफनासी निकीतीन. त्याने त्या परिसरात सुमारे दोन वर्षे राहून तेथील जनजीवनाबद्दल एक पुस्तकही लिहिले. त्याच्या नावाने उभारलेला स्मृतिस्तंभ रेवदंड्याच्या शाळेत आहे. चौलचे प्राचीन नाव चंपावती किंवा रेवतीक्षेत्र. सुमारे तीन हजार वर्षांहूनही अधिक जुने असे ते प्रसिद्ध बंदर. पण गमतीची गोष्ट म्हणजे त्याच चौल गावाला समुद्री खाऱ्या पाण्याचा स्पर्श कोठेही आज होत नाही! पूर्वी म्हणे, व्यापारी गलबते तेथील शितळादेवी मंदिराच्या पायऱ्यांना लागत असत ! ते सारे मला बुचकळ्यात टाकणारे वाटत होते.

डॉ. विश्वास गोगटे हे फिजिकल केमिस्ट्रीविषयातील तज्ज्ञ, परंतु त्यांनी अनेक वर्षे डेक्कन कॉलेजला पुरातत्त्व विभागात काम केले आहे. चौल परिसर हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा. त्यांच्या पुढाकारामुळे चौल परिसरात काही उत्खनने करण्यात आली आहेत. त्यांनी चौलच्या प्राचीन इतिहासाबद्दल अनेक रंजक कथा सांगितल्या. त्याच गप्पांमध्ये एक विषय आला, तो म्हणजेमडफ्लॅट्स’! बुजलेल्या खाडीला मडफ्लॅट्सही भौगोलिक संज्ञा वापरली जाते. एखाद्या खाडीत गाळ साठत जाऊन (Silting) त्यामुळे खाडी बुजते. त्या जमिनीतील क्षारांमुळे तेथे फारशा वनस्पती उगवत नाहीत आणि तो भाग बोडका होऊन सहजपणे नजरेत भरतो. विश्वास यांनी रेवदंडा आणि चौल यांच्या दरम्यान असलेले मडफ्लॅट्सआम्हाला मुद्दाम दाखवले. तेथील खाडी बुजणेहा प्रकार कदाचित दोन/तीनशे वर्षांपूर्वी घडला असावा.

चौल या प्राचीन बंदराला इतिहासकाळात विशेष महत्त्व होते, त्याचे कारण म्हणजे चौलच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर पसरलेले रेवदंडा बेट. तो प्रकार गुगल मॅप्स किंवा सॅटेलाईट इमेजेस पाहिल्यावर सहजपणे लक्षात येतो. रेवदंड्याच्या उत्तरेस असलेली बागमळा येथील छोटीशी खाडी किंवा अक्षीजवळील साखरखाडी यांमुळे रेवदंडा हे पश्चिम किनाऱ्यापासून पूर्वी विलग असावे. त्या बेटामुळे प्राचीन चौल बंदराला वादळी हवामानापासून सुरक्षितता लाभत असणार आणि म्हणूनच चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील भरभराट पावलेले महत्त्वाचे बंदर ठरले ! ती संकल्पना लक्षात घेतल्यावर चौल येथील शितळादेवी मंदिराच्या पायऱ्यांना खचितच गलबते लागत असणार ! थोडक्यात ती केवळ आख्यायिका न राहता त्यात सत्याचा अंश आढळून आला. त्यानंतर गेल्या दशकात माझ्या चौलला अनेक खेपा झाल्या. प्राचीन इतिहासाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मला गवसत गेला.

यानंतर मी एक वेगळीच कहाणी सांगणार आहे ! ती आहे वसई-विरारच्या किनाऱ्यावरील. माझी पहिलीच कादंबरी लॉक ग्रिफिन’ 2012 साली प्रकाशित झाली आणि गाजली. लॉक ग्रिफिनही कादंबरी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या या मध्यवर्ती घटनेभोवती गुंफलेली आहे. नव्या कादंबरीचा विषय काय असावा हा विचार डोक्यात घोळत होता. सहजच एक वेगळा विचार सापडला. एखादी ऐतिहासिक घटना निवडण्याऐवजी एखादे भूगोलक्षेत्र डोळ्यांसमोर घेऊन त्याचा अभ्यास करावा असा तो विचार. मी भूगोलक्षेत्र निवडले ते आफ्रिकेचा पूर्वकिनारा, मध्यपूर्वेतील आखाती देश, पाकिस्तान आणि भारताचा पश्चिम किनारा असे. थोडक्यात अरबी समुद्र कवेत घेणारा भूभाग. मी त्या भूगोलासंदर्भातील तपशील, निगडित घटना आणि व्यक्तिमत्त्वे यांचा अभ्यास सुरू केला. ते करत असताना एक महान व्यक्तिमत्त्व उसळी मारून वर आले आणि त्याने माझा ताबा घेतला. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण !

महाभारतकालीन संदर्भांचा अन्वयार्थ लावताना लक्षात आले, की श्रीकृष्णाचे वय अंतसमयी सुमारे एकशेचौदा वर्षांचे असावे! कथा-कादंबऱ्यांतून श्रीकृष्णाची महती व जीवितकार्य ठाऊक होते. एका अर्थाने श्रीकृष्ण म्हणजे भारतीय सारस्वत संस्कृतीच्या संचिताचा विश्वस्त. त्याच्या आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण घटनांची मालिका आहे, नव्हे तो त्यांतील अनेक घटनांचा कर्ता करवता आहे. आणखी एक लक्षात आले ते म्हणजे, त्याच्या अंतसमयी यादवांमध्ये माजलेले अराजक (यादवी) आणि त्याला चौदा-पंधरा मुले असूनही योग्य वारसदार नसणे ! दैदिप्यमान आयुष्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी श्रीकृष्णाची शोकांतिका अंगावर येणारी होती. श्रीकृष्ण म्हटल्यावर अनेक प्रतिमा नजरेसमोर येतात- माखनचोरअवखळ बाळकृष्ण, गोपिकांमध्ये रमणारा रोमँटिक मुरलीधर’, कुरुक्षेत्रावर हतोत्साही अर्जुनाला गीतोपदेश करणारा तत्त्वज्ञ’... परंतु पांढऱ्या पापण्या, पांढरे केस, असंख्य सुरकुत्यांत दडलेले डोळे, विकलांग जराजर्जर अशी वृद्ध श्रीकृष्णाची प्रतिमा अजिबात ओळखीची नाही. त्या स्वत:चा वारसदार नसलेल्या वृद्ध विश्वस्त श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाने मला झपाटून टाकले आणि तीच विश्वस्तकादंबरीची पायाभूत संकल्पना ठरली.

मी मला लॉक ग्रिफिनचा लेखनानुभव पाठीशी असल्याने नवीन कादंबरीची सुरुवात करताना निर्धास्त नसलो तरी भेदरलेला नव्हतो. माझ्यासाठी कादंबरी हे प्रकरण एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसारखे होते. न थकता अनेक संदर्भांचा अभ्यास आणि पाठपुरावा करणे, कथानकाचा आरंभ आणि शेवट सुरुवातीसच ठरवणे आणि मग कथानकाचा आकृतिबंध प्लॅन करणे… मी आयआयटी इंजिनीयर असूनदेखील इंजिनीयरिंगला रामराम ठोकल्याबद्दल माझ्यावर अनेकदा टीका झाली आहे. परंतु कादंबरी लेखनासंदर्भात मला माझ्या इंजिनीयरिंग शिक्षणाचा फायदा खूप झाला. कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांचा इतिहास आणि जडणघडण, विविध घटना आणि घटनास्थळे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे असते. मी त्या सर्व विषयांचा सखोल अभ्यास, आकृतिबंधासाठी Excel Sheet चा वापर कसोशीने करतो. मला त्या साऱ्याचा फायदा कथानकाचा रसरशीतपणा टिकवण्यासाठी, घटनाक्रमाचा वेग आणि थरार रंगवण्यासाठी झाला/होतो.

विश्वस्तकादंबरीत द्वारका, चौल आणि शूर्पारक या प्राचीन, समृद्ध आणि प्रसिद्ध अशा बंदरांना विशेष महत्त्व आहे. माझ्या संशोधन, अभ्यास या निमित्ताने गुजरातला सात/आठ वाऱ्या झाल्या, त्यात मी द्वारकेस तीनदा भेट दिली. शूर्पारकविषयाचा अभ्यास करताना असे लक्षात आले, की शूर्पारक म्हणजेच आजचे नालासोपारा !

मी सोपाऱ्यातील बुरुड डोंगराच्या उत्खननातून 1882 साली सापडलेला बौद्ध स्तूप पाहिला. तेथून सम्राट अशोकाची कन्या, संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी श्रीलंकेस सोपारा (शूर्पारक) बंदरमार्गे गेली असा इतिहास आहे. ती सुमारे तेवीस शतकांपूर्वीची गोष्ट ! नंतर निर्मळक्षेत्र येथील शंकराचार्य मंदिर पाहिले. तेथे जगन्नाथपुरीच्या शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांची समाधी आहे. सोपाऱ्यातील चक्रेश्वर तलावाजवळील चक्रेश्वर मंदिर पाहिले. त्याच देवळाच्या बाहेर पत्र्याच्या एका शेडखाली ब्रह्मदेवाची पुरुषभर उंचीची सुंदर उपेक्षित मूर्ती आहे. ती मूर्ती अठराव्या शतकात जवळच असलेल्या गासगावातील एका तलावात सापडली. साऱ्या भारतात ब्रह्मदेवाची मंदिरे विरळा; असे असूनही ती देखणी मूर्ती वाळीत टाकल्याप्रमाणे चक्रेश्वर मंदिराबाहेर उभी आहे !

हिराडोंगरावरील मंदिर

गिरिज गावातील हिराडोंगर ही जेमतेम दोनएकशे फुटांची टेकडी. चिमाजीआप्पांच्या वसई स्वारीच्या वेळेस, म्हणजे 1738 साली त्याच डोंगरावर टेहळणीसाठी बांधलेला छोटासा वज्रगडनावाचा किल्ला होता. हिराडोंगरावर दत्तमंदिर आहे. वसई परिसरातील शिल्पकार सिक्वेरा बंधू यांनी दत्ताची ती देखणी लाकडी मूर्ती घडवली. त्या मूर्तीचे डोळे जिवंत भासतात. मी देवळाबाहेरील उत्तरेकडील दगडी भिंतीवर बसून सारा आसमंत न्याहाळत होतो. उत्तरेकडे दिसणाऱ्या वैतरणा नदीचे पात्र पाहत असताना माझ्या डोक्यात भन्नाट विचार डोकावला!

हिराडोंगरावरून दक्षिणेकडे वसईची खाडी दिसते. पश्चिमेकडे अरबी समुद्र तर वायव्येकडील बेटावर अर्नाळ्याचा किल्ला आणि उत्तरेला वैतरणा नदी; पूर्वेकडे तुंगारेश्वराची डोंगररांग तर उत्तरेकडे समोरच खाली पसरलेले, इमारतींच्या जंगलात हरवलेले सोपारा गाव. सोपारा गावाला म्हणजेच पूर्वीच्या शूर्पारकाला कोठेही समुद्री खाऱ्या पाण्याचा स्पर्श होत नाही ! मला अचानक चौल आठवले. मी पुनःपुन्हा सारा आसमंत निरखून पाहत होतो. मला समोरच्या चित्रात मडफ्लॅट्सस्पष्टपणे दिसत होते. त्याचाच अर्थ असा, की वैतरणेच्या मुखाशी अर्नाळा बेट/किल्ला, मग दक्षिणोत्तर पसरलेले नाळा’, ‘राजोडीबेट, त्याच्या पूर्वेला मडफ्लॅट्सआणि त्याच्याही पूर्वेकडील भूभागावर सोपारा म्हणजेच शूर्पारकअसणार ! पश्चिमेकडील बेटामुळे वादळी हवामानापासून सुरक्षितता आणि वैतरणेतून किंवा वसईच्या खाडीतून या बंदराला पोचता येत असणार ! चौल येथील भौगोलिक रचनेचे ते जणू प्रतिबिंब होते. गेल्या काही सहस्र वर्षांत समुद्राची पातळी पंचवीस-तीस फुटांनी वाढली आहे असे वाचल्याचे आठवले. डोक्यात अनेक विचार, सिद्धांत यांची सरमिसळ झाली होती, पण हळुहळू संगती लागू लागली.

मी पुढे अनेक संदर्भ तपासले. सोपाऱ्यातील बौद्ध स्तूप, तेथील उत्खनन आणिमडफ्लॅट्सचे पुसट उल्लेख हाती लागले. द्वारका, शूर्पारक बंदर आणि युरोप व मध्यपूर्वेशी असलेला प्राचीन व्यापार हे विषय माझ्या विश्वस्त लेखनासाठी जिव्हाळ्याचे होते. इतिहास संशोधक आणि लेखक यांत फरक आहे. संशोधकांसाठी पुरावे, साधने खूप महत्त्वाची. त्यांना केवळ एक पुरावा असून चालत नाही, तर विविध स्रोतांतून तोच सिद्धांत समोर येत असेल, तरच ते खूप जपून निष्कर्षाकडे सरकू शकतात. अर्थातच त्याला अनेक वर्षे लागू शकतात. मी लेखक होतो/आहे आणि म्हणूनच, कल्पनाविस्तार, कल्पनाविलास हे माझे विशेष जन्मसिद्ध स्वातंत्र्य होते ! मला नालासोपाऱ्याला सापडलेला खजिना बहुमोल होता आणि त्याचा विश्वस्तच्या कथानकात फार मोठा चपखल सहभाग होता. मला गवसलेले पुरावासदृश संदर्भ माझ्या कल्पनाविस्तारासाठी पुरेसे होते.

पुरातत्त्व संशोधन हे शास्त्र आहे आणि त्यांची कठोर शिस्त मला पटते. मी त्याचा सन्मानच करतो. संशोधक मंडळी त्यांच्या विषयात थोर असतात, पण अनेकदा अशा थोर मंडळींचे आपापसात फारसे पटत नाही. हीच मंडळी सुजाणपणे एकत्र आली तर क्रांतिकारक नवीन संकल्पना/संशोधन जन्माला येऊ शकेल !

हिराडोंगरावर उभा असताना, अचानक माझ्या डोळ्यांसमोरचे चित्र धूसर होऊ लागले, मोठी शिडाची गलबते वैतरणेतून शूर्पारक बंदराकडे येत असलेली दिसू लागली! विश्वस्तकादंबरीतील एक थरारक प्रसंग आकार घेत गेला.

विजयकेतू गलबताचा सरखेल, वज्रसेन तशाही परिस्थितीत निर्धाराने शूर्पारक बंदराकडे निघाला होता. त्याने तसे वचन भगवान श्रीकृष्णाला दिले होते!

अनामिक अंतःस्थ वेदनेने करकरणारे दोरखंड आणि गलबताची कचकचणारी निर्जीव लाकडे,एखाद्या मुक्या प्राण्यागत अबोलपणे विव्हळत होती. गलबतावरील नऊ जणांना खवळलेल्या सागराने कधीच गिळंकृत केले होते! गलबत धडपडत शूर्पारक बंदराच्या आडोशाला, दगडी कठड्याला धाड्कन आवाज करत कसेबसे येऊन टेकले. काठावरून फेकल्या गेलेल्या दोरखंडांनी बांधून घेत गलबत सुरक्षित करण्यात आले. थकलाभागलेला वज्रसेन धक्क्यावर उतरून खलाशांना आणि बंदरावरील कामगारांना घोंगावणाऱ्या वाऱ्यातही शोष पडलेल्या कंठाने भसाड्या आवाजात ओरडून वेगवेगळ्या आज्ञा देत होता.

इतिहास, भूगोल यांसारखे नीरस रुक्ष विषय एकत्र आले, की ऐतिहासिक भूगोल जिवंत होत लेखकासमोर येऊ शकतो ! लेखकामधील चौकस कुतूहलाला आव्हान देतो. अहम् ब्रह्मास्मिम्हणत त्याच्या प्रतिभेला विविध कल्पनांचे धुमारे फुटू लागतात!
वसंत वसंत लिमये 98221 90644 vasantlimaye@gmail.com
——————————————————————————————————

About Post Author

3 COMMENTS

  1. व्वा – सुंदर ! लहानपणी वाचलेल्या काही कादंबऱ्यात लेखकाच्या प्रास्ताविकापूर्वी एक छोटा लेख असे – पात्रपरिचय किंवा असंच काही. हा लेख त्याच पठडीतला वाटतो – 'विश्वस्त' साठी 

  2. चौलप्रमाणेच समुद्र मागे हटल्याचे आणखी काही पुरावे आहेत. पालघरमधील केळवे किल्ला जो सध्या समुद्रापासून 50 ते 100 मीटर अंतरावर आहे. तो पूर्वी समुद्रात असल्यासारखे वाटते. कारण अलिकडे स्वच्छता करेपर्यंत तो पूर्णपणे वाळूूूूने गाडलेला होता. म

  3. “महाराष्ट्र” एक स्वतंत्र पाठ्य पुस्तक अभ्यास शालेय अभ्यासक्रमात घातला पाहिजे / शिकवले पाहिजे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here